"भूकंप" गडावरचा "खादाडेश्वर" .....

        आपण सह्याद्रीत का फिरतो याला अनेक कारणं आहेत.रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून चार घटका निसर्गात जावं..तिथल्या रानपाखरांशी गप्पा माराव्यात...दोन क्षण स्वत:शीच अंतर्मुख होण्यासाठी....वगैरे अनेक कारणं देत येतील.पण ट्रेकला गेल्यावर "क्षुधागडाची" अर्थात आपल्या मनसोक्त हादडण्याची मोहिम यशस्वी झाली नाही तर ट्रेकमध्ये काहीतरी राहून गेलंय असं राहून राहून वाटायला लागतं !!!!! म्हणूनच दिवसभर पाय तुटेस्तोवर भटकल्यावर पोटात जो काही "भूकंप" होतो (= मरणाची भूक लागते !!! ) ती भागवायला एखादा सिद्धहस्त आचारी मदतीला धावून आला तर त्या ट्रेकच्या आठवणींना एक वेगळाच नूर चढतो !!!! काल तैलबैल्याहून येताना (कितव्यांदा गेलो असेन आठवत नाही !!!) मुळशीच्या "दिशा" धाब्याने जो काही श्रमपरिहार केला आहे तो एन्जॉय करतानाच आजवरच्या ट्रेक्स मधल्या अश्या अनेक ठिकाणांची यादीच सर्रकन डोळ्यासमोरून तरळून गेली आणि आपल्यासारख्या पट्टीच्या "बकासुरां" बरोबर  ती शेअर करायचं ठरलं !!! 
      आता ट्रेकमध्ये व्हेज खावं की  नॉन - व्हेज हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न !!! मी मात्र या दोन्ही विरोधी पक्षांचा कॉमन मतदार असल्याने आपल्याला मटकीचा तेजतर्रार रस्सा जितका प्रिय तितकंच माशांचं कालवणही प्रिय !!!! त्यामुळेच प्रस्तुत लेखात दोन्ही पक्षांच्या सदस्यांना उपयोगी पडतील अशीच ठिकाणं आज मी सांगणार आहे.खरं तर ट्रेक मधले अत्यंत पेटंट आणि महाप्रसिध्द पदार्थ म्हणजे मिसळ,पोहे आणि खिचडी.हे जर तुमच्या ट्रेकमध्ये एकदा जरी झाले नाहीत तर "फाऊल" समजावा !!! हे ज्याला आवडत नाहीत त्याला आधी कोणी ट्रेकर म्हणतच नाही आणि त्यात जर तो "चहा आवडत नाही" असं चुकून जरी म्हणाला तरी त्याने संपूर्ण ट्रेकभर एकांतवास सहन करायची मानसिक तयारी ठेवावी !!!! एकदा गणपतीपुळ्याच्या एका घराबाहेर " घरगुती जेवण मिळेल " अशी पाटी वाचून मी त्या वास्तुपुरुषाला "आजचा मेनू काय" हा प्रश्न केल्यावर "आज पालक आणि बटाटयाची ताकातली पातळ भाजी आणि दुधी भोपळा आणि डाळिंब्याची सुकी उसळ आहे " हे त्यांचं उत्तर ऐकल्यावर त्यांना "काका....मग मसालेभातात सुरण,पडवळ आणि गवार घातली नाहीये का " असं विचारायचं तोंडावर आलं होतं !!!! याच गणपतीपुळ्याच्या मुख्य मंदिराच्या बाहेर एक "सम्राट" नावाचं उपहारगृह कम हॉटेल आहे.अख्ख्या गणपतीपुळ्यात या सम्राट सारखी मिसळ आणि साबुदाण्याची खिचडी कुठेही मिळत नसेल !!! सकाळची फर्स्टक्लास सुरुवात करावी तर इथला नाश्ता करूनच !!! मंदिराच्या बाहेर भाऊ जोशींचा अलिशान डायनिंग हॉल आहे.इथला उकडीचा मोदक,पुरणाची पोळी,सोलकढी आणि वरणभात लाजवाब !!!! त्यात पुन्हा भाऊंकडचे कर्मचारी तव्यावरच्या गरमागरम पोळ्या आग्रह करून वाढत असतात.भाऊंच्या डायनिंग हॉल समोरच "मालवणी कट्टो" नावाचं कौलारू हॉटेल आहे.इथे मिळणारा सुरमई न पापलेट फ्राय काय वर्णावा...ब्येष्ट !!!! गणपतीपुळ्याप्रमाणेच चिपळूणच्या "अभिषेक" मधली फिश थाळी,कोंबडी वडे तर जगप्रसिद्धच आहेत !!! आम्ही चिपळूणच्या गोविंदगडावर गेलेलो असताना ह्या अभिषेक हॉटेल मध्ये असे एक सदगृहस्थ भेटले जे फक्त कोंबडी वडे आणि पापलेट खाण्याची तीव्र इच्छा झाल्याने रत्नागिरीहून रात्री १० वाजता त्या मुंबई - गोवा हायवे वरून एकटेच बाईक हाणत चिपळूणला जेवायला आले होते !!! (अंतर - १०० किलोमीटर्स !!!!).याला म्हणतात जिभेच्या प्रेमात पडणं !!!!

 कोकणाकडे खेचलं जाण्याचं एक महत्वाचं कारण....

एक परिपूर्ण नाश्ता...हा ट्रेक मध्ये मिळाला तर काय बहार येते....!!!!

       अनेकदा...म्हणजे फक्त ट्रेक मध्येच नाही पण जनरली सुद्धा आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की बाहेरून सामान्य दिसणा-या हॉटेल मध्ये अतिशय अप्रतिम चवीचं जेवण मिळतं आणि बाहेरून राजेशाही दिसणा-या हॉटेलच्या पदार्थांची चव महासुमार असते !!!! नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळा,भिलाई,चौल्हेर या राक्षसी किल्ल्यांच्या ट्रेकला गेलेलो असताना सटाण्याच्या " पुष्पांजली " हॉटेल मध्ये शेवभाजी,काजू करी,व्हेज कोल्हापुरी आणि दाल तडक्याची जी काय चव चाखलीये ती आजपर्यंत विसरलेलो नाही !!! आई शप्पथ...!!! काय त्या आचा-याच्या हाताला जादू होती कळत नाही.पण आजपर्यंत अशी चव कुठेही पाहिलेली नाही.!!!! बाहेरून चहा - नाष्ट्याच्या टपरी टाईप दिसणारं हे हॉटेल सटाण्याच्या पुष्पांजली नावाच्या थिएटरच्या बाहेर उभं असून सदर थिएटर स्थानिक पब्लिक मध्ये प्रचंड फेमस आहे (कारण तिथं  सगळे " C " ग्रेडचे सिनेमे लागतात !!!! ). असो. पण सटाण्याला गेलात तर ह्या हॉटेल मध्ये नक्की जाच !!! तसंच सटाणा एस.टी.स्टॅंडच्या बाहेर शिवाजी पुतळ्याशेजारी गंगा,यमुना का कावेरी असल्या काहीतरी नावाचं हॉटेल असून तिथला पाववडा चाखाच !!! एकच नंबर !!! पाववडा म्हणजे तुम्ही त्याला गोल आकाराचं पाव पॅटिस म्हणू शकता. (आणि हो...वडा पाव नाही..पाव वडाच...मी त्या हॉटेल मालकाची "स्लीप ऑफ टंग" सुधारताच "कुटून आलाय बे...!!" असा सवाल त्याच्या चेहे-यावर उमटला होता..!!!). इथलं पाव पॅटिसही खूप प्रसिद्ध असून ते खाण्यासाठी संध्याकाळी इथे गर्दी उसळलेली असते (हे पॅटिस पाववडयापेक्षा खूप वेगळं आहे...!!!)."पुष्पांजली" प्रमाणंच नगर जिल्ह्यातील भंडारद-याजवळच्या राजूर गावातल्या "मातोश्री" ची शेवभाजी पण भन्नाट !!!! या शेवभाजीची आम्हाला इतकी भुरळ पडली आहे की त्याची चव न विसरता आल्याने ती कमी भरून काढण्यासाठी शेवटी राजूरहून एक किलो शेव विकत घेऊन रतनगडावर आमचा शेवभाजीचा बेत एकदम झक्कास जमला होता !!!! भोरच्या बाजारपेठेतल्या "श्रीराम" हॉटेलचीही खासियत काहीशी अशीच.तिथे कधीही जा आणि काहीही खा...चव अप्रतिमच !!!! भोरच्या राजवाड्याच्या शेजारी पटवर्धनांचं "श्रेयस" हॉटेल असून तिथे "मारामारी" नावाचा एक भन्नाट प्रकार मिळतो.मारामारी म्हणजे चहा आणि कॉफीचं बेमालूम मिश्रण !!! हा चहा - कॉफी एकत्र करण्याचा शुभारंभ बहुतेक याच हॉटेलने केला असावा.पण हे हॉटेल रविवारी बंद असतं (याला म्हणतात मराठी माणूस !!!!). एकदा जुन्नर जवळ अशाच एका हॉटेलच्या बाहेर "गरमागरम सांडविझ मिळेल" अशी पाटी वाचून उत्सुकता शिगेला पोचल्याने मी आत गेलो तेव्हा "सांडविझ" म्हणजे " सॅण्डविच " हा उलगडा मला साक्षात हॉटेल मालकानेच करून दिला !!!! पदार्थाच्या नावाबाबतच त्याची इतकी अनास्था बघून मी तसाच मागे आलो आणि पुढच्याच वर्षी ते हॉटेल बंद झाल्याचं कळालं (देव त्या हॉटेल मालकाचं भलं करो !!! )

एखाद्या अमुक अमुक हॉटेल मधेच जेवायचं असं आधीपासून ठरलेलं नसताना एखाद्या ठिकाणी सरप्रायझींगली बोटं चाटत रहावीत असं जेवण मिळावं आणि त्या हॉटेलशी आयुष्यभराची दोस्ती व्हावी असं कित्येक वेळेला होतं !!! मला आठवतंय..एकदा पुरंदरवर फुलांचे फोटो काढायला म्हणून गेलेलो असताना अचानक प्रचंड पाऊस झाला. मी आणि मित्र दोघंही नखशिखांत भिजून थंडीने कुडकुडत सासवडला आलो तेव्हा दिवे घाटाच्या अलीकडे ढाब्यांची जी रांग लागते त्यातल्या "गारवा" नावाच्या एका गार्डन ढाब्यात पोचलो आणि पुढच्या काही मिनिटातच त्या हॉटेलने ज्या चवीची चिकन हंडी आम्हाला वाढली त्याला तोड नाही !!!! त्या ग्रेव्हीत नक्की काय रसायन घातलं होतं माहित नाही पण त्याला जी काय सुरेख चव आली होती ती केवळ अप्रतिम !!!! हा गारवा अनुभवायला नंतर मी किती वेळा तिकडे गेलोय माहित नाही !!!! तिथलं एकूणच व्हेज व नॉन व्हेज जेवण अफलातून चवीचं असून माफक दरात उपलब्ध आहे.सासवडच्या एस.टी.स्टॅंडच्या समोर "समर्थ वडेवाले" म्हणून फक्त वड्याला वाहिलेलं एक लई फेमस हॉटेल आहे.तिथला वडापाव काय सांगावा !!!!! मी चॅलेंज  देऊन सांगतो...या चवीचा वडापाव फार क्वचित ठिकाणी आणि तेही एखाद्या ट्रेक दरम्यान तुम्ही खाल्ला असेल !!! रसाळगडावरून चिपळूणला येताना संध्याकाळी पोटात भूकंप झाला म्हणून एक अति सुमार चवीची मिसळ खाऊन पोट न भरल्याने (खाऊन म्हणण्यापेक्षा "गिळून"!!) लोटे गावाच्या अलीकडे दोनच टेबल असलेलं एक हॉटेल दिसल्यावर नाईलाजाने आम्ही आत शिरलो.त्या मातेसमान मालकिणीने अंडा भुर्जी आणि अमूल बटर लावून खरपूस भाजलेल्या पावाचा जो काही नमुना पेश केलाय त्याला तोड नाही !!!! निखालसपणे चविष्ट !!!! त्यात वरून तेलात परतलेला बारीक कांदा आणि नंतर भन्नाट चवीची मलई लस्सी....आहाहाहा...याला म्हणतात ट्रेकमध्ये जान येणं !!!!

बघताच क्षणी "गारवा "ची आठवण काढायला लावणारी चिकन हंडी ...
 

समजा तुम्ही गाव कम शहर असलेल्या म्हणजे भोर,जुन्नर इत्यादी ठिकाणी एखाद्या जनरल कामाकरता शनिवार - रविवारी गेलात आणि समजा तिथल्या  छोटया का होईना पण एखाद्या हॉटेल मध्ये नाश्ता करायची वेळ तुमच्यावर आली तर तिथे बसलेल्या लोकांपैकी ट्रेकर्स कसे ओळखावेत ?? एखादा ग्रुपच्या ग्रुप आजूबाजूचं वातावरण,लोक इत्यादी क्षुद्र घटकांची पर्वा न करता मिसळ हा प्रकार शब्दश: "हाणत" असेल तर तुम्ही तिथेच माणसं ओळखायला शिकलात असं समजावं !!! मिसळ ह्या ट्रेकर्सचा जन्मसिद्ध हक्क असलेल्या राज्यस्तरीय पदार्थात तर मी डॉक्टरेट मिळवेन इतक्या ठिकाणच्या हॉटेल्सचं माप ओलांडलं आहे. आपण बारा गावचं पाणी पितो ना तसं मी बारापेक्षा जास्त गावांच्या त-र्या (तर्रीचं अनेकवचन) मनसोक्त ओरपल्या आहेत. मिसळ या प्रकारात प्रमुख मक्तेदारी म्हणजे नाशिक आणि कोल्हापूर जिल्हे. ह्या जिल्ह्यांमधल्या सामान्यातल्या सामान्य हॉटेलनेही माझी कधीच निराशा केलेली नाही !! बाकी जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी "नादखुळा" प्रकारातली मिसळ मिळते.  पण नाशिक अन कोल्हापूरने मात्र मिसळीवर आपला कॉपीराईट कायमचा लावून ठेवला आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मिसळीबरोबर  तळलेला पापड किंवा मस्त वडी असलेलं दही "फ्री मदे" द्यायची पद्धत आहे. याच नाशिक जिल्ह्यातल्या वणी - नांदुरी जवळच्या अचला किल्ल्याच्या पिंपरी अचला फाट्यावरच्या  "हॉटेल साईराज" नामक हॉटेलमधे आम्ही सकाळी पोहोचलो. ह्या साध्या टपरीवजा हॉटेलमधल्या मिसळीने आमची अचलासारखा अवाढव्य किल्ला चढायची शारीरिक आणि मानसिक क्षमता कित्येक पटीने वाढवली !!! तीच गोष्ट नांदुरी मधल्या कनाशी - अभोणा  फाट्यावरच्या हॉटेल गौरव ची. इथली मिसळ आणि तर्रीबाज रस्सावडा तर काय वर्णावा !!! त्या आचा-याच्या नावावर आपली सगळी इस्टेट बहाल करावी असा विचार त्या मिसळीच्या पहिला घास घेताचक्षणी आमच्या मनात डोकावून गेला. नाशिक मधेच कळवणच्या जवळ कुठेतरी अशाच साध्याश्या हॉटेलमध्ये खाल्लेल्या मिसळीने तर अजून माझ्या जीभेचा ताबा सोडलेला नाही. खुद्द नाशिक शहरात    शामसुंदर,अंबिका,कमलाविजय,तुषार,गारवा,अलंकार,गुरुदत्त ही हॉटेल्स तर कोल्हापूर शहरात फडतरे,चोरगे,मोहन वगैरे मिसळ स्पेशालीस्ट मंडळी आहेतच. याशिवाय भोरमध्ये हॉटेल साईराज,मुंबई - गोवा हायवेवरच्या माणगावमधलं हॉटेल बाळाराम,तोरणा पायथ्याचं हॉटेल विसावा आणि तोरणा विहार, पेणमध्ये चावडी नाक्यावर तांडेल,लोणावळ्यात शहराच्या थोडं अलीकडे हॉटेल सेंटर पॉइंट , राजगुरूनगरला हॉटेल राजकमल,पुणे नाशिक हायवे वर हॉटेल हेमंत (एस.टी वाल्यांचा थांबा ), रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मध्ये पेठे हॉटेल, भोर आणि जुन्नर एस. टी स्टॅंडचं कॅंटीन,रायगड जिल्ह्यात कर्जत मध्ये नेरळ फाट्याला ठाकरेंचं हॉटेल आणि सर्वात शेवटी पुणे - मुंबई हायवेला खोपोली नंतरच्या श्रीदत्त / दत्त स्नॅक्स  सेंटरची मिसळ म्हणजे सर्व मिसळींची अनभिषिक्त सम्राज्ञी !!! ही सगळी ठिकाणं म्हणजे ट्रेकर्स जमातीसाठी "मस्ट" आणि तितकीच…. अविस्मरणीय !!!  

श्रीदत्त / दत्त स्नॅक्स,खोपोली 
याच्याशिवाय ट्रेक कम्प्लीट होतंच नाही....

हीच ती "पुष्पांजली" ची आजही वेड लावणारी शेवभाजी....


पुणे - नाशिक हायवे  ड्रायव्हर्स मध्ये जरी तसा कुप्रसिद्ध असला तरी चाकण पासून नाशिक पर्यंत पसरलेल्या एक से एक हॉटेल्समुळे मात्र त्याला ट्रेकर्सनी उचलून धरलंय.चाकणचं "सहारा" आणि "इंद्रायणी" तसंच राजगुरुनगरचं "स्वामिनी" म्हणजे परिपूर्ण भोजन.इथलं जेवण तर अस्सल खवय्यानं चुकवुच नये !!! मंचर सोडून आपण नारायणगावकडे जाऊ लागलो की मध्ये अवसरी घाट नावाचा छोटा घाट आहे.या घाटाच्या शेवटी डावीकडे "आनंद ढाबा" म्हणून एक हॉटेल असून तिथला आलू पराठा म्हणजे निव्वळ स्वर्गसुख !!!! सकाळी सकाळी गरमागरम खरपूस भाजलेला तो आलू पराठा त्या अतिशय भन्नाट चवीच्या चटणी आणि दह्याबरोबर खाताना जो काही "आनंद" होतो ना तो शब्दात सांगणं कठीण आहे !!! चंदनापुरी घाटात पण असे २४ तास चालू असणारे एक दोन ढाबे असून विदर्भातले किल्ले बघायला जाताना त्यातल्या लक्ष्मी नावाच्या हॉटेल मध्ये रात्री अडीचच्या सुमारास खाल्लेला स्पेशल मसाला पराठा आणि ती वाफाळती दाल खिचडी अजूनही जशीच्या तशी लक्षात आहे !!!! रात्री अडीच वाजता ८ आलू पराठे,५ मसाला पराठे आणि ३ वेळा दाल खिचडी मागवणारे कोण सैतान आपल्या धाब्यावर आले आहेत हे बघण्याकरता साक्षात त्या हॉटेलचा आचारी स्वत:चं काम सोडून बाहेर आला होता !!! (ता .क. - आम्ही एकूण ९ लोक असल्याने एवढी ऑर्डर दिली गेली.माझं अजून तरी बकासुरात रुपांतर झालेलं नाही  !!!).तुम्ही कधी रात्री या मार्गाने प्रवास केलात तर वेळ काळ विसरून खरंच हे पदार्थ टेस्ट करा !!!! अंधारबन घाटाचा ट्रेक पहिल्यांदा करून खाली भि-यात उतरल्यावर काहीच खायला न मिळाल्याने शेवटी एका चायनीजच्या हॉटेल कम गाडीवर  "हाफ राईस" सांगितलेला असताना त्याने आपण हॉटेल मध्ये डोसा खातो त्या आकाराच्या प्लेट मध्ये रचून आणलेला राईसचा डोंगर बघून  "ह्याने कित्येक दिवस धंदा न झाल्याचा राग आपल्यावरच का काढला" असा विचार मनात येउन गेला !!!!! जुन्नर - माळशेज रस्त्यावरच्या पारगाव फाट्याच्या अलीकडे एक पेट्रोल पंप आहे.तिथल्या "अंबर" हॉटेल मधल्या पंजाबी भाज्यांची आणि स्पेशली चिकनची चव एकदा घेऊन बघाच.काय त्या मसाल्यांमध्ये भरलेलं असतं काय माहित  !!! कारण तिथे जेवल्यावर मला बाईकवर टांग टाकणंही मुश्किल झालं होतं !!! सिन्नर - घोटी रस्त्यावरच्या "हॉटेल सह्याद्री" मध्ये खाल्लेली ती अफलातून चवीची अंडाकरी आणि नंतरचा तो स्वर्गीय चवीचा दाल फ्राय आणि जीरा राईस जब्बरदस्तच !!!! आमच्या ग्रुपातल्या दोघांनी ट्राय म्हणून तिथे "चिकन लष्करी" आणि "मोगल मुर्ग" या डिशेस मागवल्यावर आम्ही व्हेजचा नाद सोडला !!!! त्या अर्थातच कित्येक पटीने चविष्ट होत्या !!!! एकदा आळेफाट्या वरच्या एका चहावाल्याच्या लहान दुकानातली गुलकंद लस्सी मी दोन ग्लास प्यायली हे बघून त्याने बिल माफ केलं !!! (चव अप्रतिम पण क्वॅंटिटी म्हणजे एक माणूस अख्खा एक ग्लास पिऊ शकणार नाही इतकी...काय करणार...हरिश्चंद्राने जीवच इतका काढला होता !!!).विरार जवळच्या तुंगारेश्वर रोडजवळ शिरसाड म्हणून एक गाव आहे.तिथे एक अस्सल पंजाबी धाबा असून ऑथेंटिक चवीचा आलू पराठा,दाल माखनी आणि सरसो का साग तिथेच जाऊनच खावं.आत्ता नाव आठवत नाही पण सगळ्या ट्रकवाल्यांचा तो ठरलेला ढाबा आहे. केळव्याच्या मन:शक्ती रिसोर्टची (अनलिमिटेड चिकन पिसेस असलेली !!! ) चिकन कढाई  आणि रायगड जिल्ह्यातल्या महाड जवळच्या दासगावातल्या (मुंबई - गोवा हायवे वरच्या ) " हॉटेल निसर्ग " मधली चिकन कोल्हापुरी,बटर चिकन आणि व्हेज जाल्फ्राजी ज्या सत्पुरुषाने बनवलीये ना त्याला "भारतरत्न" द्यायची शिफारस करावी असं मला वाटू लागलं आहे !!!! काय चव असते राव एकेकाच्या हाताला !!!! राजमाचीच्या वरेमावशींकडचं एकूणच जेवण,कोथळीगडाच्या पायथ्याच्या सावंतांच्या "हॉटेल कोथळीगड" मधली लाजवाब चवीची कढी आणि राजगड पायथ्याच्या गुंजवण्याच्या "अरण्यधाम" मध्ये चाखलेली मिक्स कडधान्यांची उसळ आजही जिभेवर आहे !!!! तैलबैल्याच्या पायथ्याच्या मेणे काकांनी पहिल्यांदा गेलो असताना आग्रह करकरून वाढलेली ती नादखुळ्या चवीची झुणका भाकर आज अगदी तस्शीच लक्षात आहे !!!!
औरंगाबाद जिल्ह्यातल्या अंतुर - सुतोंडा इत्यादी किल्ल्यांची भन्नाट मुशाफिरी करून परत येताना अजिंठा - येवला रोडवर फरशी फाटा नावाचं एक गाव आहे. "विधाता" नावाचं टिप्पिकल फिल्मी नाव असलेल्या एका ढाब्यात आम्ही जीव मुठीत धरून शिरलो आणि मेनुकार्ड बघितल्यावर घेरी येउन खुर्चीवरून कोलमडलोच !!! मराठी व्याकरणाची जी काही "सागुती" त्या "हाटेल" मालकाने केली होती त्याला जवाब नाही. त्यातल्या काही पदार्थांच्या नावाचा आणि विभागवार शीर्षकांचा अर्थ साक्षात तर्खडकर,चिपळूणकर वगैरे मराठी भाषेच्या अतिरथी महारथींनाही लावता आला नसता !!! मेनूकार्ड तयार करण्यात जर इतकी आस्था असेल तर जेवणाचं काय ही आमची शंका सत्यात उतरवत त्या ढाब्याने त्या रस्त्यावरसुद्धा  पुन्हा कधीही फिरकावंसं वाटणार नाही असलं जेवण दिलं !! पण मेनूकार्ड मात्र मनात कायमचं घर करून गेलं :D !!!


  
ह्याच्याशिवाय ट्रेकला काय मजा....!!!!  
  
      मी रोहीडयावर पहिल्यांदा गेलेलो असताना बाजारवाडीत जेवण सांगितलं आणि किल्ल्यावर गेलो.खाली आल्यावर आपल्या भविष्यात होणा-या लग्नाचं ताट यांनी आत्तापासूनच सजवून ठेवलंय का अशी शंका मला यायला लागली होती !!! पायथ्याच्या त्या मध्यमवयीन गृहस्थाने माझ्यावर खुश होण्याचं काहीही कारण नसताना ताटात पिठलं भाकरी (तांदुळाची बरं का!!!),आंबेमोहोरचा नुसता सुगंधानेच वेडावून टाकणारा भात,आमटी,पापड,लोणचं,चटणी,ठेचा,कोशिंबीर,गोडाचा शिरा,दिवाळी नुकतीच होऊन गेल्याने रव्याचे लाडू आणि एक परातभर पापड्या कुरडया समोर आणून ठेवल्यावर ते बघून माझी बोबडीच वळाली !!! वर त्यांनी "अजून काही लागलं तर सांगा" असं म्हटल्यावर त्यांना " काका...मंथली मेसचे किती घ्याल " असं विचारायचं तोंडावर आलं होतं !!!! काय या भाबडया प्रेमाची आपण किंमत देणार !!!! मागून थोडीच मिळतं हे !!!! हे मिळवायला तर सह्याद्रीच्या कुशीत जायचं  !!!! आजवरच्या मनसोक्त भटकंतीत या ठिकाणांनीच तर ख-या अर्थाने भूक भागवली.वरील ठिकाणांशीवाय मग लोणावळ्याच्या अन्नपूर्णामधला मेदूवडा - सांबार आणि मैसूर मसाला डोसा,रमाकांतचा वडा,कोलाडच्या प्रभाकर मधली मिसळ आणि वडापाव,निजामपूरच्या सिद्धाई हॉटेल मधली गावरान चिकन थाळी,लोणावळ्याच्या रामकृष्ण मधलं गरमागरम मऊ उपीट,गुहागरच्या जगदंबा मधले अनन्यसाधारण चवीचे बटाटेपोहे,वैनतेय मधली हरभरा उसळ आणि थालिपीठ आणि अन्नपूर्णा मधला पापलेट आणि सुरमई फ्राय,रत्नागिरीच्या वर्ल्ड फ़ेमस "छाया" मधलं  पॅटिस आणि वायंगणकरांच्या उपहारगृह कम हॉटेल मधले सगळेच अतिरथी महारथी पदार्थ,खेडच्या एस .टी.स्टॅंड समोरच्या पेठे हॉटेल मधला अशक्य जबरी चवीचा वडापाव आणि इडली सांबार,खेड शिवापूरच्या विलास हॉटेलची भेळ,तोरणा विहारचं सुकं चिकन,वाईच्या बंडू गोरे खानावळीच्या पदार्थांना असलेली अद्वितीय चव,संगमनेरच्या जोशी पॅलेस मधली गुजराथी थाळी,मुरूडच्या पाटील खानावळ मधील नॉन व्हेज डिपार्टमेंट मधले झाडून सगळेच पदार्थ तसंच रविवारी हमखास मिळणारे छोले,वडखळ नाक्याच्या गंधर्व मधली व्हेज महाराजा,त्याच्याच समोरच्या लवाटेंच्या मिलिंद आणि क्षुधाशांती मधला वडापाव   आणि....असं कितीतरी !!!!! या सर्व ठिकाणाचं आणि पर्यायाने पदार्थांच नातं ट्रेकर्सशी आता जोडलं जाऊ लागलंय.किल्ल्यांच्या पायथ्याला घरगुती जेवण ज्या आपुलकीने वाढलं जातं त्या आपुलकीमुळे नकळत तयार होणा-या नात्याला काय नाव द्यावं खरंच कळत नाही !!! वरती उल्लेख केलेल्या हॉटेल्सनी आज पर्यटक आणि ट्रेकर्सच्या मनात अढळ ध्रुवपद निर्माण केलंय !!!! म्हणूनच की काय....खास रत्नागिरीहून फक्त कोंबडी वडे खायला रात्री चिपळूणला आलेला तो जातिवंत खवय्या मला जवळचा वाटला !!! खरं तर ही यादी वाढत जाऊन  या विषयावरचं एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल इतकं वैविध्य तुमच्या भटकंतीत तुम्हीही अनुभवलं असेल.काही ठिकाणांचा उल्लेख राहून गेला असेल तर तो जरूर कळवा.मला खात्री आहे...ही अनोखी खाद्यसफर तुमची भूक पुन्हा एकदा नक्की चाळवेल आणि खास जिभेचे चोचले पुरवायला तुमच्या पायाला पुन्हा एकदा भिंगरी लागेल...!!!!

हे फक्त "बघण्यासाठीच" केलेले नसतात...!!!

खाद्यजगताचा अनभिषिक्त सम्राट ....याला पर्याय नाही.....!!!!!
नादखुळा....!!!!

 (नम्र सूचना : वर दिलेली सर्वच हॉटेल्स ही वर्षानुवर्ष अप्रतिम चवीचं आणि उच्च दर्जाचं जेवण पुरवत आलेली आहेत.तसंच ही ठिकाणं स्व:अनुभवावरून रिकमेंड केलेली आहेत.तुम्हाला या हॉटेल्स मधला एखादा वेगळा पदार्थ पसंद पडल्यास नक्की कळवा !!! )


तुमचाच,

ओंकार ओक
oakonkar@gmail.com    
Comments

 1. लेख वाचताना रुमाल घेऊनच बसावे लागले ! तोंडाला इतके पाणी सुटत होते की बास्स !

  ReplyDelete
 2. Bas bas yar ,he menu card vachun jam bhookh
  Lagli ahe....

  ReplyDelete
 3. एक नंबर...इतक्या सगळ्या ट्रेक मधल्या खाद्यपदार्थांची यादी आणि ते सुद्धा न विसरता लिहिलंस ...
  अप्रतिम लेख आणि तपशीलवार माहिती....पुढच्या ट्रेक ला तुझा Blog (खाण्यासाठी सुद्धा) नक्की Refer करीन.... :)
  Subject Title सुद्धा लई भारी...

  PS : तुझ्या जिभेवर साक्षात आचाऱ्याने Hotel Management चे क्लास उघडलेत कि काय? .... :)


  धन्यवाद,
  जितेंद्र बंकापुरे,
  पुणे.
  http://bankapure.blogspot.com


  ReplyDelete
 4. एक नंबर रे... कुठेही ट्रेकला जायचे तर हा लेख एकदा नजरेखालून घालायला हवा.. योगायोगाने तिथे जाणे असेल तर खाणे पण होईल.. ;)

  बाकी घोटीला कसारा मार्गे जाताना हायवेला 'बाबा दी धाबा' चा मोठया ग्लासातून मिळणारा चहा व दालफ्राय रोटी मस्तच !!

  ReplyDelete
 5. apratim khadya yatra. hyatil barech padarth tya tya jagi mi chakhle aahet. so ur article made me nostalgic :))

  ReplyDelete
 6. Lay bharee rao ..!!!! Kaay lihilay - ek number ..!

  ReplyDelete
 7. Tuza phone number deun thev ithe...!!!!!!!! will call you during the treks.

  ReplyDelete
 8. excellent eating houses collective information

  ReplyDelete
 9. तुझा ब्लॉग वाचून खरच खूप मजा आली. पुढच्यावेळी खास करून ट्रेकसाठी नाही पण खाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन.

  ReplyDelete
 10. ओंकार , जर्मनीतल्या एका मोठ्या शहरातल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये बसलोय ...कितीही पैसे द्यायला तयार आहे ...पण समोर जे काही दिसतंय ते म्हणजे ..ब्रेड आणि त्याच्या मध्ये अत्यंत बेचव कुठला तरी प्राणी ( माफ कर ) . कंटाळलो ..एक मस्त चहा मागवला ... आणि फेसबुक बघता बघता तुझा हा लेख पहिला ... साधारण बादलीभर लाळ तरी नक्कीच गाळली असेल . असो , इतक्या सुंदर पद्धतीने वर्णन करून , इतके अशक्य सुंदर फोटो टाकून नको रे छळू मित्रा . भारतात आलो की मला ह्या सर्व ठिकाणी नक्की घेऊन जा.

  ReplyDelete
 11. लै भारी राव ! तोंडाक पानी सुटला ना भौ ;)

  ReplyDelete
 12. वा मस्तच!! नाशिक मधील मिस्साळच्या ठिकाणांच्या नावांमध्ये फक्त ते कमलाविजय ऐवजी कृष्णविजय करा.

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड