गिरीदुर्गांचा षटकार - दिवस पहिला

अनुभव ही पण एक अजब चीज आहे. त्याचं चांगला किंवा वाईट ह्या विभागांमध्ये वर्गीकरण करायला कोणतंही फिक्स असं परिमाण नाही. ज्यानं ज्याच्या त्याच्या मतांनुसार ह्याची तीव्रता ठरवावी इतकं साधं सरळ स्वातंत्र्याचं तंत्र शिकवणारा हा प्रकार !!! पण जाता जाता आयुष्यभराची शिकवण मात्र देणारा !! आमच्या कोकण बाईक एक्सस्पिडीशनची स्टोरी पण अशीच असंख्य भन्नाट अनुभवांनी सजलेली…काही अनपेक्षित पण अविस्मरणीय घटनांनी नटलेली आणि अशाच काही सुखद आठवणींनी बहरलेली….!!!
अलंग - मदन - कुलंग नामक सह्याद्रीतील एका दमदार ट्रेकनंतर श्रमपरीहारासाठी एखादा सोपा पण ज्यात डोळ्यांना  मेजवानी आहे असा ट्रेक हवा होता. त्यामुळे दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातले सहा सर्वांगसुंदर किल्ले आणि साथीला पहिलीपासूनचा भक्कम दोस्त विनय बिरारी असल्यावर अजून काय हवं !!! मोहिमेचा "अजेंडा" होता….मंडणगड - पालगड - रसाळगड - गोविंदगड उर्फ गोवळकोट - दातेगड आणि गुणवंतगड. 

सदर ट्रेकची रूपरेषा खालीलप्रमाणे होती. 

दिवस पहिला :

१.  पुणे - ताम्हिणी घाट - माणगाव - गोरेगाव - आंबेत फाटा - मंडणगड 

२. मंडणगड - खेड रस्ता - धामणी - पालगड 

३. पालगड - खेड - तळे  - झापाडी - निमणी - रसाळगड 

४. रसाळगड - खेड - परशुराम घाट उतरून चिपळूण - गोवळकोट गावात (गोविंदगड पायथा) मुक्काम.

दिवस दुसरा  : 

१. गोविंदगड - चिपळूण - आलोरे - पोफळी - कुंभार्ली घाट चढून मोरगिरी फाटा - मोरगिरी गाव - मोरगिरी (गुणवंतगड)

२. मोरगिरी गाव - मोरगिरी फाटा - पाटण - चाफोली रस्ता (स्थानिक नाव - पवनचक्की रोड) - दातेगड 

३. दातेगड - पाटण - उंब्रज - सातारा - पुणे    

अशी ही दोन दिवसात सुमारे ६०० किलोमीटर्स कव्हर करणारी भन्नाट मुशाफिरी होती. निघण्याचा दिवस होता… १४ फेब्रुवारी… ' व्हॅलेंटाइन्स डे' !!!! आमचा प्रवास बराच लांबचा असल्याने शनिवारी पहाटे ४ वाजताच निघायचं ठरलं होतं. त्यामुळे विनय आदल्या दिवशीच माझ्याकडे मुक्कामाला येणार होता. आम्ही अस्मादिकांच्या तीर्थरूपांची CT १०० ही  मायलेज आणि दूरच्या प्रवासाला उत्कृष्ट असलेली बाईक घेऊन जाणार होतो. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं !!!

शुक्रवारी विनयला बस स्टॉप वर आणायला मी निघालो आणि घरापासून काही अंतर गेल्यावर अचानक बाईकचं मागचं चाक पूर्ण पंक्चरावस्थेत जाऊन स्थानापन्न झालं  !!!! तातडीने मी तिच्यावर उपचार करायला तिला पंक्चराधिपतीकडे घेऊन गेलो आणि त्या महानुभावानेही त्याच्या धंद्याच्या पॉलीसीशी इमान राखत आणि माझ्या अज्ञानाचा पुरेपूर फायदा घेत "सायेब टयूब फाटलीये…बदलावी लागल नायतर सरकारी हापिसासारख्या रोज माझ्याकडे चकरा माराव्या लागतील" असं धमकीवजा उत्तर दिल्याने मीही त्याच्यासमोर नांगी टाकली !!! १४ फेब्रुवारी उजाडला. पहाटे तीन वाजता माझ्या अलार्मने जणू काही मला आयुष्यातून उठवण्याचा पण केल्यासारखी जोरदार बोंब मारली. आज काहीही झालं तरी ९.३० पर्यंत मंडणगड गाठायचाच होता. प्रवासाची पहिली २० मिनिटं अगदी सुखात गेली आणि  अचानक काहीतरी विचित्र जाणवल्याने मी रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवली !!!! आपल्या गाडीचा  मागचा टायर लवकरच आपली साथ सोडणार आहे हे क्षणार्धात माझ्या लक्षात आलं आणि जर का हिला या स्थितीत आपल्याबरोबर असंच ओढत नेलं तर दोन दिवस हिचा फुकटचा सासुरवास सहन करावा लागेल हे आम्ही ओळखलं. त्या सुनसान रस्त्यावर चिटपाखरुही नव्हतं.काय करावं तेच कळेना.विनयने माझ्याकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं आणि पुन्हा आमचा मोर्चा घराकडे वळाला !!! आता आमच्यापुढे शेवटचा पर्याय उरला होता….

गेल्या दिवाळीत आमच्या घराचं माप माझ्या को-या करकरीत स्प्लेंडर प्लसने अगदी धुमधडाक्यात ओलांडलं होतं !!! मनाशी पक्का निश्चय करून मी स्प्लेंडरला किक मारली आणि ताम्हिणीच्या दिशेने तिचे लगाम सोडले. फेब्रुवारी महिन्यातला पहाटेचा थंडगार वारा अंगावर अक्षरश: काटा आणत होता. शहराला थोडी जाग यायला सुरुवात झाली असल्याने रस्त्यावर आता वाहनं दिसू लागली.साधारणपणे चांदणी चौकापर्यंत जाईस्तोवर (म्हणजे घरापासून अंदाजे ४ किलोमीटर्सवर) सगळं सुरळीत सुरु होतं. आता अगदी घरी परत येईपर्यंत कसलाही प्रॉब्लेम येणार नाही असं वाटत असतानाच माझं लक्ष पेट्रोलच्या काट्याकडे गेलं आणि खरंच आपण एका झपाटलेल्या मुहूर्तावर निघालो आहोत असा भास मला त्याच क्षणी व्हायला लागला !!!!  आमच्या या रथात आम्ही जेमतेम पौडला पोचू एवढंच पेट्रोल शिल्लक होतं !!!! ट्रेकच्या सुरुवातीला बसलेला दुसरा मोठा धक्का !!! अक्षरश: हादरवून सोडणारा. पहिल्या प्लॅननुसार CT १०० घेऊन जाणार असल्याने आम्ही त्या गाडीची टाकी फुल केली होती आणीत्यामुळे ट्रेकसाठी स्प्लेंडरमध्ये पेट्रोल भरण्याचा प्रश्नच उद्भवला नव्हता !!! त्यात पिरंगुट वगैरे गावांचे पेट्रोलपंप सात  - साडेसातला उघडत असल्याने हे मधले दोन तास वाया घालवले तर आमचं पुढचं सगळं वेळापत्रक कोलमडणार होतं !!! आता मात्र माझा संयम सुटायला सुरुवात झाली. अत्यंत वरमलेल्या स्वरात मी विनयला  सगळी परिस्थिती सांगितली. पण त्याने अत्यंत शांतपणे "जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ…पुढचं पुढे बघता येईल " असं सांगितल्याने माझा जीव पेट्रोलच्या टाकीत पडला !!!! पण आमचं नशीब इतकंही **** नव्हतं !!!! माझ्या अपेक्षेच्या कितीतरी पट चांगली साथ माझ्या बाईकने (नवीन असल्याने) आम्हाला दिली आणि आम्ही मुळशीत येउन दाखल झालो. साडेसहा वाजले होते. गाव एव्हाना जागं झालं होतं. आता पेट्रोलच्या काट्याने असहकाराचा नारा द्यायला सुरुवात केली. दोघंही पूर्णपणे ब्लॅंक झालो होतो. मनात नैराश्य,उद्विग्नता ,चिडचिड,काळजी यांचं काहूर माजलं होतं. ट्रेकची सुरुवातच जर इतकी निगेटिव्ह झालीये तर पुढे काय वाढून ठेवलं असेल,पुन्हा आयुष्यात ट्रेकचं नावही काढणार नाही असं मत तयार व्हायला भाग पाडणारा कोणता दुर्धर प्रसंग तर नाही ना ओढवणार अशा अनेक विचारांनी मनात वादळ निर्माण केलं होतं. इतक्यात एस.टी ची वाट बघत उभ्या असलेल्या सत्तरीच्या एका म्हतारबुवांचं लक्ष आमच्याकडे गेलं.  

"काय रे प्वोरांनो… कुटून आलात अन चाललात कुटं… काय झालंय??? " सकाळच्या बोच-या थंडीत ते ओलाव्याने भरलेले शब्द ऐकताच आम्हालाही हुरूप आला आणि मी त्यांना घडलेलं सगळं रामायण सांगितलं. 
"आयला…येवढच ना… येक काम करा. त्या समोरच्या घरामंदी एक जण राहतात. त्यांच्या घरी पेट्रोल असतं.मी पाठवलंय म्हणून सांगा त्यांना.आरामात मिळंल" इति आजोबा. पडत्या फळाच्या आज्ञेप्रमाणे आम्ही त्या घरी दाखल झालो. त्या गृहपुरुषाच्या षोडशवर्षीय शाळकरी पोराने "गाडीत पेट्रोल भरायची अक्कल नाही आन चालले कोकनात तडमडायला" असा चेहरा करत आमच्या स्प्लेंडरच्या टाकीत प्राण फुंकले आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. कोणत्याही बाईक एक्सपीडीशनवर येणारी सगळी संभाव्य संकटं टळली होती.आमचा पुढचा मार्ग आता सुकर झाला होता !!!

 ताम्हिणी घाट

 प्लस व्हॅली… ताम्हिणी घाट 

एका नाट्यमय प्रवासाचे दोन साक्षीदार…  

ताम्हिणी घाट… एक झलक…  

रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ मंडणगड हे तालुक्याचं गाव !!! किंबहुना किल्ल्याच्या नावावरूनच तालुक्याचं बारसं झालेलं. तालुक्याचं गाव असल्याने सगळ्या मुलभूत सोयीसुविधा असलेलं आणि प्रचंड प्रमाणात गजबजलेलं.गावाच्या मागेच मंडणगडाचा टेकडीवजा किल्ला उभा आहे. मंडणगड गावाच्या बस स्थानकापासून सरळ जाणारा कच्चा रस्ता सरळ गडमाथ्यावर जाऊन थांबतो (आम्ही गेलो होतो तेव्हा कच्चा होता… आता बहुदा डांबरी झाला असावा अशी अपेक्षा करायला हरकत नाही ).  

 मंडणगडाच्या पूर्वपश्चिम पसरलेल्या पठारापैकी पश्चिमेकडील भागाकडे मोर्चा वळवला तेव्हा  दहा वाजत आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोकणी उन्हाने आणि आर्द्रतेने हळूहळू आपले रंग दाखवायला सुरुवात केली. 

गडावरील नव्याने बांधून काढलेलं गणरायाचं राउळ नजरेत भरलं. गाभा-यातल्या शक्तीपुढे नतमस्तक झालो !!

 गडाचा विस्तार थोडाथोडका नव्हेच !!! त्याचा पश्चिमकडा म्हणजे तर अवशेषांची रेलचेल आहे. वाटेत कोणा अनामिक वीराची समाधी नजरेस पडली पण त्यावर गवताने थाटलेला संसार पाहून विषण्णताच आली. 

मग पुढे सुरु झाल्या गतवैभवाच्या उध्वस्त खुणा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका महत्वाच्या तालुक्याच्या गावाची पाठराखण करणारा इतिहासकालीन दुर्ग असूनही केवळ सरकारी दुर्लक्षामुळे इथल्या अवशेषांच्या भाळी मात्र अवहेलनाच आली आहे. 


गडाच्या किल्लेदाराचा भलाभक्कम चिरेबंदी वाडा किंवा खाशांचा राजमहाल असावा असं प्रतीत करणारा हा इमारतीचा पाया !!! सध्या मात्र दुर्गप्रेमींनी किमान त्या वेळच्या वैभवाचे अंदाज तरी बांधावेत ह्या अपेक्षेने उन्हा पावसाचा मारा झेलत असलेला.

टळटळीत उन्हामुळे दूरवरचं दृश्यही धुसर झालेलं !!! क्षितीजरेषेवर पालगड मात्र तेवढा मान वर काढून खुणावत होता.  

पुढे गडावरचा एकमेव पाणीसाठा असणारा तलाव नजरेस पडला. त्यावेळच्या जळाची निर्मळता मात्र कुठेतरी अंतर्धान पावलेली आणि मानवी उपेक्षेच्या शेवाळ्यात विरघळलेली होती !!

तलावाच्या काठी बांधकामाच्या खुणा आढळून आल्या

ही कोणा अनामिक देवतेची घुमटी असावी. पण त्यासमोरच्या धुनीतली  राख मात्र वातावरणातला रखरखीतपणा वाढवून गेली. 


पुढे गेल्यावर पालगडाच्या दिशेने रोखून पाहणारी जडशीळ तोफ दिसली. परिसरातल्या भाबड्या भक्तांना ह्यात कोणत्या दैवी शक्तीचा साक्षात्कार झाला कुणास ठावूक पण हिच्या मूळ  अस्तित्वाला धक्का लावून रंगरंगोटी केलेली आहे  . काळाचा महिमा म्हणत सोडून दिलं !!!! 

पुढे गडावरचा त्यातल्या त्यात स्वछ आणि पिण्यायोग्य असा पाणसाठा सापडला. बाकी गडावर पिण्यायोग्य पाणी नाही. 

तोफेपासून पुढे गेलो की सिमेंटच्या मदतीने बांधकाम चालू असलेली एक विहीर नजरेस पडली. गडाला आधुनिकतेचा झालेला स्पर्श ह्या "वास्तू" ने दाखवून दिला.

पश्चिमेकडे अनिश्चित लांबीचा वैराण प्रदेश पसरलेला. मध्येच हवेत विरणारे वणव्याच्या धुराचे लोट त्या खरमरीत दृश्यात जरातरी जीवंतपणा आणत होते. डोंगरपायथ्यातून कुठलासा काळा कुळकुळीत घाटमार्ग सर्पाकार वळणं घेत चालला होता !!!

गडाच्या उत्तर तटबंदीवरून खाली डोकावलो. रौद्रभीषण वगैरे शब्दांचं इथे काहीही काम नाही !!! तटबंदीसुद्धा वार्धक्याने झुकलेली होती.


गडावरच्या तुरळक वाढलेल्या झाडीत कुणा अनामिकाचा पीर आहे. अगदी नुकताच नव्याने बांधून काढलेला !!

शेजारी कुलुपाच्या आकाराचे दगड ओळीने ठेवलेले आहेत . ह्यांचं प्रयोजन समजू शकलो नाही. 


मंडणगडावरील त्यातल्या त्यात लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे हा अत्यंत सुरेख नक्षीकाम केलेला दगड. नशिबाने हा मात्र कोणत्याही रंगरंगोटीच्या तडाख्यात सापडलेला नाही.  

पुढे आणखी एक जोतं निळ्या आभाळाखाली विसावलं होतं


गडाचा पूर्वकडा पाहून परतीच्या प्रवासास लागायचं ठरलं. गडावरून दिसणारं पायथ्याचं  मंडणगड गाव आता आधुनिकतेच्या खुणा अंगावर घेत बाळसं धरू लागलंय  !!!

गडाच्या पूर्वकड्यावर जाण्यासाठी रीतसर जिना बांधलेला आहे.

पाच मिनिटात माथा गाठला. वैराण सुकलेल्या गवतावर असंख्य समाध्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.
गडाचा निरोप घेऊन निघालो. ह्या संपूर्ण डोंगरावर गड बांधण्याची आज्ञा स्वराज्याच्या धन्याने केली आणि शेकडो हात कामाला लागले. गडाचं पूर्वाश्रमीचं नाव "चिरदुर्ग". पण हा किल्ला जणू स्वराज्याचं "मंडण" (आभूषण) आहे म्हणून ह्याचं नामकरण केलं गेलं "मंडणगड". स्वराज्याच्या त्या महामानवाने ज्या नजरेने गडकोटांकडे पाहिलं ती नजर आजच्या राज्यकर्त्यांना असती तर किती सुधारणा घडू शकल्या असत्या !! पण हळहळण्यापलीकडे कोणताही पर्याय दुर्गप्रेमी,इतिहासप्रेमी आणि दुर्गअभ्यासकांसाठी सरकारने ठेवलेला नाही.

तासाभरात ह्या अप्रतिम किल्ल्याचा निरोप घेऊन निघालो. आता नजरेसमोर तरळत होता पालगड !!!

मंडणगड गावातून आपण खेडच्या दिशेने जाऊ लागलो की सुमारे १५ किलोमीटर्सवर पालगड गाव आहे. मंडणगडापासून जवळ असूनही पालगड मात्र दापोली तालुक्यात मोडतो. साने गुरुजींचं मूळ गाव असलेलं हे पालगड आजही गुरुजींच्या विचाराने भारावलेलं आहे !!!! गावात साने गुरुजींचं स्मारक असून त्यांच्या घराचं नुतनीकरण करून स्मारक तयार करण्यात आलं असून आतमध्ये साने गुरुजींच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांचे फोटो लावलेले आहेत. पालगड गावातून मात्र गडाचा आकार काही केल्या लक्षात येईना. रामराणा जन्मला ती टळटळीत दुपारची वेळ !!!! रस्त्यावर तशी फार वर्दळ नव्हती. एखाद दुसरी एस.टी किंवा टेम्पो आम्हाला मागं टाकून जात होते. एक दोन बाईकवाल्यांना पालगड किल्ल्याचा रस्ता विचारल्यावर "हये गाव हाये पालगड नावाचं. किल्ला कुटून काढलात तुमी " असली उत्तरं ऐकायला मिळाली !!! कोणी किल्ल्याचा नीट पत्ता सांगायला तयार नाही. शेवटी कंटाळून धामणी गावापर्यंत आलो आणि रस्त्याच्या एका बाजूला सावलीत गाडी उभी केली. तेवढयात आमच्यामागून एक रिक्षावाला अवतरला. पंचावन्नच्या आसपास वय असावं !!! "इकडे पालगड किल्ला कोणाला कळणार नाही. डोंगरावरची कदमवाडी विचारा… कोणीही सांगेल". अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात फक्त हेच काका शाळेत गेले असावेत असं आम्हाला क्षणभर वाटून गेलं !!! आपल्याला स्थानिक नावं माहित नसण्याची आणि स्थानिकांना आपली पुस्तकी नावं माहित नसण्याची वेळ नेमकी एकच असते. धामणी गावाच्या पुढे डावीकडे एक गंजलेली पाटी आहे. तिच्या शेजारून जाणारा चढाचा अरुंद रस्ता आपल्याला अर्ध्या पाउण तासात थेट पालगड गावात घेऊन जात होता. 

(टीप : आम्ही पालगडला गेलो तेव्हा गडावर प्रचंड गवत माजलेलं होतं. तसंच घेरा पालगड गावात असलेली एक प्राचीन समाधी व तोफही आम्हाला माहितीच्या अभावामुळे पाहता आली नाही. पालगडचे मी काढलेले फोटोज हे त्यावेळचे असून गवताने संपूर्ण झाकून गेलेले अवशेष फोटोमध्ये दिसतील. मात्र गिर्यारोहकांना गडाच्या सद्यस्थितीतील अवशेषांची स्पष्ट कल्पना येण्यासाठी व घेरा पालगड गावातील समाधी व तोफेचे नेमके स्थान समजण्यासाठी पालगडचे काही फोटोज माझे नाशिकचे गिर्यारोहक मित्र श्री. मयुरेश जोशी ह्यांच्या खजिन्यातून साभार )

धामणीमधून पालगडाचा आकार पटकन लक्षात येणं तसं मुश्किलच. पण एखाद्या स्थानिकाच्या सध्या अंगुलीनिर्देशाने काम सोपं होऊन जातं !!

पानगळ झालेल्या झाडांच्या मधून जाणारा डांबरी रस्ता पालगड गावच्या "घेरा पालगड" उर्फ वरच्या कदमवाडीत सावकाश घेऊन जात होता. आमच्या पुढे कासवाच्या गतीने रस्ता कापणा-या आणि संपूर्ण मार्ग अडवणा-या ट्रॅक्टरला  कंटाळून ओव्हरटेक केलं तेव्हा त्याच्या ड्रायव्हरने दिलेली खुन्नस हशा पिकवायला कारण ठरली !!!

अखेरीस घाटाच्या ब-याच वेळच्या चढानंतर डावीकडे पालगडाचा सुपरिचित कातळमाथा नजरेत भरला. फोटोत दिसणा-या झाडाची सावली फोटो काढतानाही क्षणभर सुखावून गेली आणि त्याच्या सावलीत निपचित पडलेल्या सपाट पृष्ठभागाच्या ह्या थंडगार दगडाने आमचे पृष्ठभाग काही क्षण टेकवायला भाग पाडलं !!!

घेरा पालगड गावातून गडाची तटबंदी आणि माथ्यावरचा भगवा सहज नजरेत आला. गावातल्या एका गृहलक्ष्मीने आग्रहाने पुढे केलेलं थंडगार पाणी रिचवलं. "पहिल्यांदा आलायत गडावर. पोरं घेऊन जा वाट दाखवायला संगती !!" ही सूचना प्रेमाने डावलली कारण सरावलेल्या दृष्टीने गडाच्या सहजपणाची जाणीव स्पष्टपणे करून दिलेली. तरी हातावर अलगद आणि न मागता मिळणा-या लिमलेटच्या गोळ्यांना भुलून दोन चार चिल्लीपिल्ली पहिल्या पठारापर्यंत मागोमाग आलीच !!!

पालगडच्या पहिल्या पठारावर एका झाडाखाली घुमटीसारखं केलेलं आहे. समोर दिसणा-या गडाच्या माथ्यावर घेऊन जाणारी ठसठशीत मळलेली पायवाट आणि भरभक्कम पाय-या पठारावरूनही सहजपणे नजरेत आल्या.


घेरा पालगडमधून निघाल्यापासून अवघ्या वीस मिनिटात गडाच्या भग्न दरवाजात प्रवेशते झालो. गडाचा दरवाजा नामशेष झालेला. पण बुरुज मात्र इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.

पालगडाची भक्कम तटबंदी. फोटो - मयुरेश जोशी


पालगडाच्या माथ्यावर सर्वत्र वाळलेल्या गवताचं बेभान रान माजलं होतं. गडावरचे अवशेष धुंडाळताना नाकी नऊ आले. पण गडमाथा अगदीच आटोपशीर असल्याने काही अवशेष स्पष्टपणे दिसलेही.

 गडाच्या जोत्यावर व्यवस्थित ठेवलेली तोफ. फोटो - मयुरेश जोशी

डोंगरकडेच्या तटबंदीवर रान माजलेलं होतं. सावलीला म्हणून तसूभरही जागा नाही !!

पालगडाच्या चोर दरवाजाला संरक्षित करणारी तटबंदी व गडावर नव्याने उभारलेली पत्र्याची शेड. 
फोटो - मयुरेश जोशी 

 गडमाथ्यावरच्या अशक्त काठीला लावलेल्या भगव्या ध्वजाच्या शेजारी बांधकामाचं जोतं आढळलं !! पूर्वेकडे महिपतगड  - सुमारगड - रसाळगड हे भन्नाट दुर्गत्रिकुट सहज ओळख दाखवून गेलं !! ह्यातला रसाळगडच तर आमचं पुढचं लक्ष्य होता !!!

 पुढे  काळ्या पत्थरातल्या अशाच काही अस्ताव्यस्त खुणा सापडत गेल्या. 


गडमाथ्यावरचे बुरुज आपलं अस्तित्व दाखवून गेले. गडाच्या चोरवाटेचे हे बुरुज 

पालगडाचा चोर दरवाजा  - फोटो - मयुरेश जोशी गडापासून सुटी झालेली डोंगरसोंड लक्षवेधी होती.

पावलं थबकली ती पालगडावरच्या लक्षात राहणा-या अजून एका अवशेषाकडे लक्ष जाउन !! गडावरची ही दुसरी तोफ. 

तोफेची सद्यस्थिती. फोटो - मयुरेश जोशी 

कदमवाडी अथवा घेरा पालगड हे मी आत्तापर्यंत बघितलेल्या आणि सह्याद्रीतल्या डोंगरमाथ्यांवर वसलेल्या अनेक गावांपैकी एक असं नितांत सुंदर गाव !!! गोंगाट,गजबजाट वगैरे हे शब्द ह्या गावाला ठाऊकच नसावेत. गावात अंजनीसुताचं प्रशस्त राउळ आहे. मुक्कामाला कमालीची अप्रतिम जागा !! सरत्या पावसाळ्यात हे निसर्गचित्र काय लोभसवाणं रूप धारण करत असेल ह्या कल्पनेनेच अंगावर रोमांच उभे राहिले !!!

पालगडाच्या कड्याच्या पोटातील खांबटाके. ह्या छोट्याश्या किल्ल्याला पाणीपुरवठा करणारा एकमेव स्त्रोत 
फोटो - मयुरेश जोशी 

घेरा पालगड गावही गतकाळच्या खुणा जपतंय !! गावाच्या परिसरात असणारी कुणा अनाम वीराची ही प्राचीन समाधी. आम्हाला माहितीच्या अभावी सापडू शकली नाही पण स्थानिकांच्या मदतीने सहज मिळू शकेल. 

गावाच्या शेतांमधील ही तोफ. कदाचित गडावरून खाली आणली असावी 

समाधीजवळ ही विहीरही आहे 

आम्ही पालगड सोडला तेव्हा दुपारचे अडीच वाजत आले होते. घेरा पालगड गावात जेवण बनवून देणार का असं विचारल्यावर "आत्ताच आमचं जेवण झालंय. तुम्हाला ताजं बनवून देते. तासभर थांबा" असं उत्तर आलं आणि समोर रसाळगडाचा चेहेरा दिसल्याने आम्ही तो नाद सोडला. खेडच्या दिशेने एकतरी ढाबा मिळेल आणि आपला "भूकंप" आटोक्यात येईल या आमच्या विचारालाच धामणी - खेड रस्त्याने सुरुंग लावला. खेडला पोहोचेपर्यंत एक धाबा सोडा साधी चहाची टपरीही उघडी दिसली नाही (ही त्यावेळची परिस्थिती आहे. सध्या नवीन हॉटेल्स झाल्याचं माहित असल्यास ही माहिती अपडेट करता येईल ). आमच्याकडचा बिस्किटांचा पुडा सकाळी नाष्ट्यालाच संपल्याने आता तोही पर्याय उरला नव्हता. जवळचे खाद्यपदार्थही भूकेशी प्रतारणा करणारे होते. भर दुपारच्या तळपत्या उन्हाने गाडीचं सीट १०० डिग्री सेल्सियसमध्ये भाजून काढल्यासारखं गरम केलं होतं (आणि त्याचे "दुष्परिणाम" आम्ही दोघांनीही भोगले !!!). त्यात मला "सकाळी त्या संत व्हॅलेंटाइनला एखादा नारळ फोडून निघालो असतो तर निदान वडापाव तरी मिळाला असता" असं सारखं राहून राहून वाटत होतं !!!!  जसं जसं आपण पुढं जाऊ तसं तसं खेडचे माईलस्टोन्स त्या शहराचं अंतर वाढवतच नेत चाललेत असा भास व्हायला लागला. शेवटी दोघंही पोटातल्या खड्ड्यासकट एकदाचे खेडच्या भरणे नाक्याला पोचलो आणि रसाळगडाचा रस्ता विचारण्यासाठी एका पानाच्या टपरीसमोर मी गाडी थांबवली. त्या पानवाल्याला मी किल्ल्याचा रस्ता विचाणार तेवढयात विनयने मधेच तोंड घालून "इथे जेवायला कुठे मिळेल" असं विचारलं.त्याने हे शब्द उच्चारताच त्या मध्यमवयीन मालकाने आधी दुकानातल्या घड्याळाकडे आणि नंतर आमच्या दोघांकडे अशा काही जालीम नजरेनं पाहिलं की त्याच्या चेहे-यावरचा "काय बेशिस्त कार्टी आहेत…" हा अतितुच्छतादर्शक भाव अगदी स्पष्ट दिसला !!!!
"वाजले किती ???"….हॉस्टेल वर राहणा-या सुंदर तरुणीने रात्री बारा वाजता हळूच मेन गेट उघडून चोरपावलाने आत शिरण्याचा प्रयत्न करावा आणि मागून रेक्टरने अचानक मानगूट पकडल्यावर तो ज्या आवाजात त्या तरुणीला हा प्रश्न विचारेल अगदी तशाच बेरकी आवाजात ह्या अस्सल कोकणी माणसाने आमच्याकडे रोखून बघत आम्हाला विचारलं !!!!
"म्हणजे ???" विनय.  
"दुपारचे तीन वाजून गेले अन तुम्ही विचारताय जेवायला मिळेल का"……. तेवढयात त्याचं लक्ष आमच्या बाईकच्या "MH १२" कडे गेलं आणि "तरीच !!!" हे आम्हाला मुद्दाम स्पष्ट ऐकू जाईल अशा आवाजात त्याने उच्चारलं !!!!   
"पाव्हणे दिसताय… सगळं बंद झालं आता… आता थेट रात्रीचं जेवण. " पानाला चुना लावत तो म्हणाला. 
"वडापाव पण नाही मिळणार का कुठे ???" विनयच्या या "निर्लज्ज" प्रश्नावर त्याने " आता निघताय का तुम्हालाही अडकित्त्यात सोलून काढू !!!" असला जहाल लुक आम्हाला दिल्यावर मी विनयचं तोंड आणि पुढचा वाद दोन्ही आवरतं घेतलं आणि दुस-याच एकाला रसाळगडाची वाट विचारून गाडीची चाकं त्या दिशेने सोडली !!!! 
" **** साला… काय चुकीचं विचारलं होतं मी"   विनयेश्वर उवाच !!!!
मी काहीही बोललो नाही !!!! आधीच सकाळी ट्रेकची सुरुवात अशी झालेली…पोटात अन्नाचा कण नाही आणि त्यात त्या पानवाल्याने अजूनच डोकं फिरवलं होतं !!!! शेवटी एका दुकानातून पारले - जी चे   तीन पुडे,पेप्सीची एक बाटली आणि शाळेचा विषय चालल्याने तो माहोल क्रिएट व्हावा म्हणून बॉबीची चार पाकीटं अशा  "बिलो पॉवर्टी"  भांडवलावर समाधान मानून आम्ही आता रसाळगड नजरेसमोर ठेवून निघालो.

तळे - झापाडी - निमणी अशा कोकणी वाड्यांना वळसा घालत गाडी घाट चढू लागली. डावीकडे वर संध्याकाळची उन्हं खाणारा रसाळगड ओळखणं अज्जिबात कठीण गेलं नाही !!!


सह्याद्रीच्या राकटपणाचा थरार आता जाणवू लागला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून सुटावलेल्या महिपतगड - सुमारगड आणि त्यांच्या खणखणीत उंची लाभलेल्या सख्या  - शेजा-यांनी नजरेला कमालीचा तजेला दिला.


पानसा डोंगरामागून सुमारगडाची गोलाकार कातळटोपी खुणावून गेली. क्षणभर राजगडाच्या बालेकील्ल्याचाच भास व्हावा !!!

निमणी गावानंतरचा जवळपास अर्ध्या किलोमीटरचा खड्या चढाईचा घाट रसाळगडाच्या कड्यापाशी संपला. समोर गडाच्या मध्यावर वसलेल्या पेठ रसाळगड किंवा रसाळवाडी गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची  काळी कुळकुळीत सिंथेटिकची टाकी स्पष्ट दिसत होती. गडाच्या कड्याला उजवीकडे आणि दरीला डावीकडे ठेवत अरुंद पायवाट वीस मिनिटात त्या टाकीपाशी घेऊन गेली.  टाकीच्या पारावर आपल्या दीड वर्षाच्या पिल्लाला घेऊन रसाळवाडीचा सचिन सावंत निवांतपणे संध्याकाळची उन्हं खात मोबाईलवर गाणी ऐकत बसला होता.  आस्थेने आमची विचारपूस झाली. पुढचा प्लॅन विचारून झाला आणि रात्रीच्या जेवणाचं निमंत्रणही आपसूकच आलं !!! पण वेळेच्या मर्यादेला प्रमाण मानून गोविंदगडाच्या पायथ्याला मुक्काम करायचा असल्याने नम्रपणे त्याला नकार दिला आणि त्या लहानग्याच्या हातात बिस्किटांचा पुडा ठेवून रसाळगडाच्या पाय-या चढू लागलो !!!

भक्कम बुरुजांच्या मध्ये लपलेला गडाचा हा पहिला दरवाजा. सध्या मात्र सिमेंटीकरण झालेला. 


वाटेतला अंजनेय म्हणजे इथल्या द-याखो-यात बेभान भटकंती करणा-या सह्याद्रीमित्रांचा पाठीराखाच !!! त्यांच्या पावलात बळ देणारा !! कमरेला खंजीर आणि मिशा असणारी अशा प्रकारची मूर्ती तशी दुर्मिळच. मी पाहिलीये ती तिकोना,मुल्हेर,सुरगड इत्यादी किल्ल्यांवर   

रसाळगडाच्या दुस-या दरवाजाने कमानीपासून वेगळेपण स्वीकारलंय !!! हा तिसरा दरवाजा मात्र सुरेख !!! अगदी "फोटोजेनिक" 

गडाच्या पठारावर पाऊल ठेवताचक्षणी त्याचा नावाप्रमाणेच असलेला मधाळ रसाळ परिसर समोर तरळतो !! किल्ला अवशेषांच्या बाबतीतही श्रीमंत….रसाळगडावरच्या तोफा मोजाव्यात तर तब्बल अठरा भरतात !!! एखाद दुस-या तोफेवर काही तारखा आणि नक्षीकामही आढळतं.  रत्नागिरी जिल्ह्यातला सर्वात सुंदर आणि सर्वगुणसंपन्न गिरिदुर्ग हेच खरं !!!
पुढे गेल्यावर निपचित अवस्थेत आभाळाकडे डोळे लावून बसलेली काही जोती दिसतात. 


रसाळगडावर पूर्णपणे तग धरून राहिलेल्या वास्तू अगदीच मोजक्या. बाकीच्यांच्या भाळी भग्नावशेषांच्या रुपात दिवस काढण्याचं दुर्दैव आलेलं !!!  गडाचं विस्तृत पठार तुडवताना जुन्या ट्रेक्सच्या गप्पा चाललेल्या….शाळेच्या आठवणींना उधाण आलेलं…केवळ आम्हालाच माहित असलेल्या कोणत्यातरी जोक्सवर खिदळण्याचा आवाज पाSSर महिपतगडापर्यंत पोचलेला….रात्रीच्या मनसोक्त खादाडीचे लागलेले वेध आणि मध्येच कुणा आभाळवेड्या बहिरी ससाण्याच्या उत्तुंग भरारीने सण्णकन नजरेचा घेतलेला ठाव !! एकूणच काय…भटकंतीची मैफल उत्तरोत्तर रंगात येऊ लागली होती  !!!

मग समोर दिसलं धान्यकोठार !! भितींना अजूनही वृद्धत्वाचा शाप लागलेला नाही. पण पटांगणात मात्र अजब प्रकार दिसला. एक तोफ उलटी पुरून ठेवलेली…चटकन लक्षात न येणारी ही भन्नाट करामत !!!


कोठाराच्या कमानीवर विघ्नहर्त्याची सुरेख मूर्ती दिसली  !!! आजही तितकीच आखीव रेखीव असलेली !!!


रसाळगडाच्या गवताळ पठारामागे चकदेव,पर्वत आणि महिमंडणगड ह्यांची चाहूल लागली. डोळ्यात भरावी अशी भव्यता !!! 
गडाच्या तटबंदीलगत एक भक्कम चौथरा दिसला. कदाचित पहा-याची जागा असावी 


जवळच आहे एक शेवाळलेला पाणवठा. पिण्यासाठी तसा निरुपयोगीच पण आजूबाजूच्या शुष्क वृक्षांचं रेखीव प्रतिबिंब मात्र सुरेखपणे चितारणारा !!  


पुढे किल्लेदार वाड्याचे आणि इतर काही इमारतींचे भग्नावशेष आहेत 

समोर पानसा डोंगर आणि त्यामागून महिपतगडाचं टोक डोकावलं !!! रसाळगडाच्या परिसरात काय विलक्षण जादू भरलीये कुणास ठाऊक….पण इथून काही केल्या पाय निघत नाहीत हेच खरं !!! एखाद्या कड्यावर निवांत वारा खात दोन घटका थांबण्याची मनात प्रचंड इच्छा असताना हाताशी मर्यादित असणा-या वेळेसारखा दुसरा जालीम शत्रू नाही !!! पण रसाळगडाची एक वारी मात्र तृप्तता देत नाही हेच खरं !!! 


गडावरील एका भरभक्कम वास्तूचा हा बुरुजासामान भाग मात्र लक्षवेधी ठरला 


गडावरील झोलाई मंदिराशेजारी हा जीवंत झरा असलेला पाणीसाठा अवचित गवसला. निव्वळशंख आणि रुचकर चवीच्या जळाने घशाला पडलेल्या कोरडीची जागा घेतली !! 


रसाळगडाची अधिष्ठात्री म्हणजे झोलाई देवी. रसाळगड - मकरंदगड परिसरातील झोलाई खिंड ह्याच देवीच्या नावावरून प्रसिद्ध आहे.  सध्या ह्या मंदिराचा पूर्णपणे जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिर मात्र कमालीचं प्रशस्त आणि अतिशय प्रसन्न. ह्या मंदिरातला मुक्काम म्हणजे केवळ अविस्मरणीय आणि परमोच्च आनंद मिळवून देणारा !!! कोणत्याही भटक्याने चुकवू नयेच असा !!!

गडावरच्या दगडी दीपमाळेलाही संजीवनी देण्यात आली आहे. एकूणच काय गडाने आता बाळसं धरलंय  


रसाळगड भटक्यांमध्ये प्रसिद्ध आहे तो त्याच्या महिपतगड - सुमारगड - रसाळगड ह्या भन्नाट ट्रेकसाठी. ही डोंगरयात्रा व्यवस्थित पार पाडायला तीन चार दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. पण हा ट्रेक करताना शक्यतो महिपत - सुमार - रसाळ ह्या क्रमाने करावा. कारण रसाळवरून महिपत - सुमारला जाताना अंगावरचा चढ असून एका मर्यादेनंतर रणरणत्या उन्हात हा चढ नकोसा होतो. त्यामुळे खेडहून तळे मार्गे दहिवली या महिपतच्या पायथ्याच्या गावाला येउन तिथून महिपत चढून त्या दिवशी गडावर मुक्काम करावा. दुस-या दिवशी सकाळी लवकर महिपतवरून निघून आणि वाटेतला सुमारगड पाहून रसाळवर मुक्कामाला यावं. सुमारगड मात्र जरा कठीण श्रेणीतला किल्ला असून सुरक्षिततेच्या सर्व साधनांशिवाय तो चढण्याचा प्रयत्न करू नये. रसाळगडाच्याच्या रसाळवाडीत जेवणाची माफक दरात अप्रतिम सोय होते. तसेच महिपतगडावरून रसाळगडाला येताना वाट सोपी आणि उताराची असल्याने अनावश्यक दमछाकही टाळता येते. 

प्रसन्न मनाने आम्ही रसाळगडाचा निरोप घेतला तो काही अपूर्व आठवणींची शिदोरी सोबत घेऊनच !! आजचा मुक्काम चिपळूणच्या गोविंदगड उर्फ गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याला होता. गोविंदगडाच्या पायथ्याला करंजेश्वरी देवीचं प्रशस्त मंदिर आहे. तिथे राहायला मिळालं तर सगळाच प्रश्न सुटणार होता. पण मंदिर किल्ल्याच्या पायथ्याला असलं तरी चिपळूणसारख्या शहरात असल्याने मंदिराच्या विश्वस्तांना शोधून त्यांची परवानगी काढून मगच राहावं लागणार होतं. त्यामुळे हे कामही सोपं नव्हतं. पण ध्यानी - मनी नसतानाही कोकणातल्या हळव्या आणि आतिथ्यशील मनांचा सुंदर प्रत्यय कसा आला त्याचा हा किस्सा ऐकाच !!!
आम्ही चिपळूण मध्ये पोचलो आणि गोवळकोट गावाचा रस्ता विचारायला मी रस्त्यावरून चालणा-या एका तरुणाच्या शेजारी नेउन गाडी थांबवली आणि इष्ट प्रश्नाचा नंबर फिरवला. त्याने आधी विनयच्या हातातल्या कॅरीमॅटकडे आणि नंतर आमच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना बांधलेल्या सॅक्सकडे नजर टाकली आणि थेट प्रश्न केला "ट्रेकर आहात का?". 
चिपळूणसारख्या…जिथे एक छोटा किल्ला आहे हे ट्रेकर्सना तर सोडाच पण ब-याच स्थानिकांनाही माहित नाही… अशा शहरात हा प्रश्न अतिशय अनपेक्षित होता!!! मी त्याला आमच्या येण्याचं कारण प्रयोजन सांगितल्यावर त्याने खिशातून मोबाईल काढला आणि बोलायला सुरुवात केली…  
"हॅलो दिनेश…मी बोलतोय…पुण्याहून माझे दोन मित्र आलेत आपला किल्ला बघायला. त्यांची राहण्याची सोय कर. बाय !!!!!". आम्ही हिप्नॉटाइज झाल्यासारखं त्याचं फोनवरचं बोलणं ऐकत होतो.  कोण कुठले आम्ही… त्याला फक्त किल्ल्याचा रस्ता विचारतो काय आणि आमची थेट राहण्याची सोय होते काय  !!! सगळंच अविश्वसनीय !!! ह्या देवदूतासारख्या भेटलेल्या मित्राचं नाव राहुल कदम आणि त्याने ज्याला फोन लावला होता तो साक्षात गोविंदगड पायथ्याच्या करंजेश्वरी देवीच्या पालखीचा भोई आणि मंदिराच्या कमिटीचा एक माननीय सभासद…. नाव दिनेश जुवळे. राहुलचे शतश: आभार आभार मानून (खरं तर ते पण कमीच होते !!!) चिपळूणच्या सुप्रसिद्ध अभिषेक हॉटेलमध्ये यथेच्छ मासे हादडले आणि गोवळकोट मध्ये पोचलो. दिनेश आमची वाटच पाहत होता. त्याने आम्हाला त्याच्या राहत्या घराच्या मागच्या बाजूला नेलं आणि स्वत:च्याच एका नव्याको-या आणि वेल फर्निश्ड बंगल्यात राहण्याची उत्कृष्ट व्यवस्था केली आणि सकाळी उठल्यावर फोन करा आमचा माणूस चहा आणून देईल असं सांगून निघून गेला !!!! आमची दिनेशशी ना कुठली पूर्वीची ओळख ना कुठलं रक्ताचं नातं…पण त्याच्या या निखळ आणि निस्वार्थी आदरतिथ्याने आमच्या नव्या मैत्रीचे ऋणानुबंध मात्र कायमचे जोडले गेले  होते !!!
क्रमश:

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड