गिरीदुर्गांचा षटकार - दिवस दुसरा - उत्तरार्ध

गिरीदुर्गांचा षटकार - दिवस पहिला - एक नाट्यमय सुरुवात  इथून पुढे….

सकाळचे साडेसहा वाजले असावेत (आम्ही अर्थातच झोपेत होतो !!!!). आमच्या बंगल्याची बेल सारखी कोणीतरी वाजवतंय असा भास मला त्या अर्धवट झोपेतही होत होता. कडाक्याची थंडी पडली होती.  शेवटी "मरू दे…किती वेळ वाजवणारे…कंटाळून जाईल निघून !!" या दुष्ट विचाराला आवर घालून अखेर मी दरवाजा उघडला.माझ्या अर्धवट उघडलेल्या डोळ्यांना आधी समोर फक्त वाफच दिसली आणि मागोमाग "साहेब चहा आणि बिस्कीटं आणलीयेत " या शब्दांनी मला निद्रागडाच्या कोकणकड्यावरून जोरात ढकललं आणि मी पूर्णपणे भानावर आलो !!! दिनेशने आम्ही फोन करायच्या आधीच चहा पाठवून दिला होता. विनयला मी महत्प्रयासाने उठवलं (हे आजच्या दिवसातलं सर्वात अवघड काम होतं !!!). आज गोविंदगड बघून कुंभार्ली घाटामार्गे गुणवंतगड आणि दातेगड पाहून पुणं गाठायचं  होतं. कोणत्याही ओव्हरनाईट ट्रेकच्या शेवटच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या मनात पहिला विचार जर कोणता येत असेल तर "आज घरी जायचंय" हा !!!! हाडाच्या भटक्यांसाठी ह्याच्यासारखं वेदनादायक वाक्य दुसरं कोणतंही नसावं !!! आपल्यासाठी एका अर्थाने पूर्ण दिवस नैराश्यात घालवणारा हा विचार कटू असला तरी  सत्य असतो आणि तो पाळावाच लागतो !!! चिपळूणच्या या छोटयाश्या गोविंदगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक तर करंजेश्वरी देवीच्या मंदिरापासून पाय-यांच्या मार्गाने १५ मिनिटात किल्ला गाठायचा किंवा बाईक किंवा कार सारखं छोटं वाहन असेल तर मंदिरापासून थोडं पुढे जाऊन उजवीकडच्या कच्च्या रस्त्याने पाच मिनिटात माथा गाठायचा.आम्ही दुसरा पर्याय निवडला आणि गोविंदगडाच्या माथ्यावर येउन दाखल झालो. गोविंदगडाचा पूर्ण परिसर धुक्याने वेढलेला होता. दिनेशच्या घरासमोरच्या वाशिष्ठी नदीच्या पात्रातूनही धुक्याचे लोट वर येत होते. एक मंत्रमुग्ध करणारी सकाळ त्या दिवशी गोविंदगड अनुभवत होता. किल्ल्याचा विस्तार तसा लहानच असून माथ्यावर बांधकामाची काही जोती,एक मध्यम आकाराचा बांधीव पण कोरडा तलाव,काही प्रमाणात सुस्थितीत असलेली तटबंदी आणि दोन तोफा आहेत. आपण करंजेश्वरी मंदिराकडून पाय-यांच्या मार्गाने जर आलो तर त्या वाटेवर दरवाज्याचे अवशेषही आहेत. गोविंदगडाच्या माथ्यावर देवीचे एक नवीन बांधलेले मंदिर असून तिला विंझाई किंवा रेडजाई असं नाव आहे. किल्ल्यावर पाणी मात्र अजिबात नाही. अर्ध्या पाऊण तासात आपला गोविंदगड बघून पूर्ण होतो. आम्ही किल्ला उतरून दिनेशच्या घरी आलो तेव्हा आठ वाजत आले होते. अख्खा कुंभार्ली चढून गुणवंतगड गाठायचा होता.दिनेशने अत्यंत निरपेक्षपणे आणि आपुलकीने आमची अतिशय सुंदर व्यवस्था केल्याबद्दल मी त्याला प्रेमाच्या आणि आग्रहाच्या मानधनाची रक्कम देण्याचा प्रयत्न करताच "आत्ता पैसे दिलेस तर पुढच्या वेळी घरात घेणार नाही" अशी हक्काची धमकीच दिल्याने मला हात आवरता घेणं भाग पडलं !!! भारावलेल्या मनाने आम्ही दिनेशचा निरोप घेतला.आता आमच्या मोहिमेतले शेवटचे दोन शिलेदार बाकी होते…. किल्ले दातेगड आणि गुणवंतगड !!!! जिल्हा सातारा !!!

एक सुंदर सकाळ… गोविंदगड….

धुक्याने वेढलेला गोविंदगडाचा माथा 

गोविंदगडावर जाणारा कच्चा गाडीरस्ता 

गोविंदगडाची तटबंदी 

तटबंदीवरची तोफ…गोविंदगड 

विंझाई उर्फ रेडजाई देवी मंदिर… .  

किल्ल्यावरील जोत्यांचे अवशेष 

किल्ल्यावरची दुसरी तोफ 

काल घरातून निघाल्यापासून सुमारे बत्तीस तासांनी आम्ही अखेर देशावर यायला निघालो होतो. गुणवंतगड उर्फ मोरगिरी आणि दातेगड हे पाटण तालुक्यातले दोन छोटेखानी किल्ले. उंब्रज अथवा कराडवरून कोयनानगरला येताना पाटणच्या एस. टी. स्टॅंडच्या मागे दातेगड दिसतो तर थोडं पुढे गेल्यावर डावीकडच्या मोरगिरी फाट्याला काळीकभीन्न कातळटोपी चढवलेला गुणवंतगड दिसतो. आम्ही मोरगिरी मध्ये पोचलो. एक दीड तासात गुणवंत करून दातेगडाकडे सुटायचं  होतं. गुणवंतच्या पायथ्याला भैरवाचं एक सुंदर मंदिर आहे. त्याच्या मागेच साने आडनावाच्या कुटुंबाचं घर असून तिथे आम्ही आमचा रथ पार्क केला. गाडीचा आवाज ऐकून सान्यांचा विराज नावाचा सात आठ वर्षाचा मुलगा बाहेर आला आणि आम्ही काही बोलायच्या आधीच "आई - बाबा बाहेर गेलेत. नंतर या.  " असं सांगून घरात पळून गेला !!!! आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघतच बसलो. तेवढ्यात त्याची आज्जी बाहेर आली आणि आम्हाला पाणी आणि विराजला शिव्या दिल्यावर आमची चौकशी सुरु झाली.मग कुठून आलात,काय करता वगैरे प्रश्न झाल्यावर आम्ही खास गुणवंत बघायला पुण्याहून तडमडत आलोय हे ऐकल्यावर त्यांना मानसिक भोवळ आली असावी (का ते फोटोंमध्ये कळेलच !!!). त्यांच्याच घरात असलेल्या विराजच्या काकाने "काही नाहीये वर… अख्खा किल्ला जमीनदोस्त झालाय. कशाला वेळ घालवता" वगैरे किल्ल्याचं निगेटिव्ह मार्केटींग करायला सुरुवात केली होती. पण आम्ही तरी लेकाचे कसले ऐकतोय !!! त्यांना न जुमानता आम्ही थेट गुणवंतची पायवाट तुडवायला लागलो. मुरमाड घसारा आणि अंगावर येणारा चढ.तरीही सान्यांच्या घरातून निघाल्यापासून आम्ही पंचवीस मिनिटात किल्ल्याचा (नसलेला) दरवाजा वाजवला. किल्ल्याच्या पायथ्यापासून किल्ल्याच्या कातळकड्याच्या मध्यभागी पाहिलं की एक झाड दिसतं. तोच गडाचा भग्न दरवाजा असून तिथे पाय-याही आहेत. आम्ही गडावर पाऊल ठेवलं आणि…विराजच्या काकांच्या वाक्यांमधली सत्यता पटायला लागली. अक्षरश: जमीनदोस्त झालेले भग्नावशेष… रखरखीत पठार… पाण्याचा एक थेंब नाही आणि इतस्तत:विखुरलेले भग्न जोत्यांचे दगड…. मन सुन्न करणारा नजारा…गुणवंतची अवस्था खरंच दयनीय आहे. नवीन माणसाला तर आपण अर्धा तास फुकट घालवला असं वाटावं इतकी बिकट स्थिती या किल्ल्याची आहे. पाण्याची एकदोन कोरडी टाकी हाच एकमेव किल्ला असल्याचा पुरावा !!!!  किल्ला बघायला (?) वीस मिनिटे पुरे !!!! किल्ला फक्त नावालाच "गुणवंत" आहे याचा प्रत्यय इथे आल्यावर येतो !!! पावसाळ्यात आलात तर हिरवळीमुळे जरा तरी गुणवंतची चढाई सुसह्य होऊ शकते. इतर वेळेस दिसतील ते फक्त आभाळाकडे डोळे लावून बसलेले उध्वस्त रखरखीत पुरावे !!!! 

मोरगिरी गावातून गुणवंतगड 
    
गुणवंतगडाचा माथा… 

 गुणवंत वरील ढासळलेले अवशेष 

किल्ल्यावरील अजून एक भग्न जोते… उजव्या कोप-यात दिसणारा दातेगड….  


डोळ्यात वाच माझ्या…. !!!!

आम्ही गावात परतलो. आमचे उतरलेले चेहेरे बहुदा साने आज्जींच्या लक्षात आले असावेत. त्यामुळे आम्ही न मागताच पाण्याऐवजी डायरेक्ट फ्रीजमधल्या थंडगार कोकम सरबताचे ग्लासच आमच्या हातात आले आणि मागून खाऊ सुद्धा आला !!!! विराजच्या काकांनीच मग दातेगड (गुणवंतपेक्षा ) किती सुंदर आहे आणि त्यावरची विहीर तर काय अप्रतिम आहे वगैरे सांगायला सुरुवात करून दातेगडाचं पॉझिटीव्ह मार्केटींग करायला सुरुवात केली !!! शेवटी त्यांचा निरोप घेऊन आम्ही मोरगिरी गाव सोडलं आणि पाटणचा मुख्य चौक गाठला. पाटणच्या एस. टी. स्टॅंडपासून समोर पाहिलं  की डोंगरावर एक पीर दिसतो. दातेगडावर जे टोळेवाडी नावाचं छोटं गाव आहे तिथलाच हा पीर असून त्याला "टोळेवाडीचा पीर" असंच म्हटलं जातं. पाटण पासून चालत सुमारे तासाभरात टोळेवाडी गाठता येते (सध्या टोळेवाडीपर्यंत डांबरी रस्ता झाल्याचं ऐकिवात आहे ). सध्या जर हा रस्ता पूर्ण झाला नाही असा गृहीत धरलं तर अजून एक रस्ता ज्यांच्याकडे स्वत:ची गाडी आहे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. पाटणहून आतल्या बाजूने एक रस्ता साता-याला जातो. सुमारे ५० कि.मी. चे हे अंतर आहे. याला चाफोली रोड किंवा पवनचक्की रोड असे नाव असून हा रस्ता दातेगडाला खेटून पुढे चाळकेवाडीच्या पवनचक्क्यांच्या मार्गाने सज्जनगडाच्या पायाला स्पर्श करून साता-यात जाउन विसावतो. म्हणून याचे नाव पवनचक्की रोड. पाटणहून आम्ही हाच मार्ग अवलंबायचं ठरलं. पाटणवरून पहिला घाट पार करून आम्ही थोड्या सपाटीवर आलो. समोर दातेगडाचं सुंदर दर्शन होत होतं. या सपाटीच्या रस्त्यानंतर आता पुन्हा एक छोटा घाट सुरु झाला होता. ह्या घाटाची चढण जिथे संपते आणि घाट साता-याकडे जाण्यासाठी उजवीकडे वळतो त्याच पॉईंटला डावीकडे दातेगडाचा रस्ता गेला आहे. अखेरीस पाटणहून निघाल्यापासून अर्ध्या - पाउण तासांच्या प्रवासानंतर आम्ही एकदाचे दातेगडाच्या कातळकड्याखाली येउन पोचलो. शेळ्यांना चरायला सोडून दुपारच्या उन्हात गावकरी बायांची तारसप्तकात चालू असणारी बडबड आमच्या येण्याने अचानक थांबली आणि बारा - चौदा डोळे आमच्याकडे एकाच वेळेस रोखले गेले. 
"गडावर जायचंय जनु"… त्यातलीच एक सिनियर सिटीझन म्हणाली !!!! 
"हो…. कुठून जाऊ ?"
"गाडी लावा हिथच. ए हेमन्या जा दादांना गडावर घेऊन. जावा हेमन्याच्या मागं तो सोडेल तुम्हाला."
(मला शेवटपर्यंत हेमन्याचं या नावाचं मूळ रूप समजलं नाही !!!). 
अखेरीस मी विनय आणि सहा वर्षाचे हेमनेश्वर असे तिघं जण दातेगडाच्या कातळकड्यातल्या फुटक्या तटबंदीला भिडलो आणि गाडी जिथे लावली होती तिथून अवघ्या दहा मिनिटात आम्ही गडमाथा गाठला. "मी निघू का… आज्जी बोंब मारतीये." हेमन्याने आमचा निरोप घेतला आणि त्याच्या हातावर भेळेचं एक  पाकीट आणि काही गोळ्या टिकवून आम्ही पुढे निघालो. दातेगडावर पोहोचेपर्यंत साडेबारा होऊन गेले होते. आता याही किल्ल्यावर गुणवंतसारखच दृश्य बघायला मिळेल या आमच्या गैरसमजाला दातेगडाने चांगलाच हिसका दाखवला आणि बघता बघता सातारा जिल्ह्यातल्या या एका अतिशय सुंदर किल्ल्याचं एक नवं रूप उलगडत गेलं. किल्ल्याचा विस्तार ब-यापैकी मोठा असून टोळेवाडीतून गडाच्या विरुद्ध बाजूला असणा-या दरवाज्यामार्गेही किल्ल्यावर प्रवेश करता येतो. सकाळी चिपळूणहून निघाल्यापासून आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो अखेर ती गोष्ट आमच्यासमोर प्रकट झाली होती आणि ती म्हणजे दातेगडाची सुप्रसिद्ध विहीर. काय बोलावं या स्थापत्यशास्त्राबद्दल…. केवळ अप्रतिम आणि अविस्मरणीय. सुमारे पन्नास  फुट खोल असलेल्या या विहिरीमध्ये जाण्यासाठी भक्कम पाय-यांची व्यवस्था असून यातली एक एक पायरी उतरताना एका रहस्यमय विवरात आपण खोल खोल चाललोय असा भास आम्हाला होत होता. जसजसं आतमध्ये जाऊ तसतसा गारवा वाढतच चालला होता. अखेर आम्ही त्या विहिरीच्या तळाशी पोचलो आणि त्या नैसर्गिक थंडाव्याने जे काही सुख दिलं ते अवर्णनीय होतं !!!!! जब्बरदस्त !!!! किती तरी वेळ आम्ही तो गारवा अनुभवत होतो आणि मन काही केल्या तृप्त व्हायला तयार नव्हतं !!!! कमळगडावरच्या कावेच्या विहिरीची आठवण करून देणारी ही  विहीर हेच दातेगडाचं प्रमुख आकर्षण आहे.  दातेगडावर पाण्याचा हा एकच स्त्रोत असून पाणी वरून खराब दिसत असलं तरी गाळून प्यायला हरकत नाही. या विहीरच्या शेवटच्या पाय-यांच्या जवळ एक छोटे शिवलिंग आहे. विहिरीतून वर आल्यानंतर दातेगडाच्या विरुद्ध बाजूला आपण गेलो की आपल्याला काही पाय-या दिसतात आणि त्या उतरल्यावर गडाचा कमान हरवलेला दरवाजा दिसतो. दरवाज्या जवळच मारुती आणि गणपती यांच्या अतिशय सुंदर मुर्त्या दगडात कोरलेल्या आहेत. टोळेवाडीतून गडावर एक वाट याच दरवाज्याच्या मार्गाने येते. दातेगडाच्या मुख्य पठारावर कोरडा पडलेला एक खोदीव तलाव,पाण्याची काही कोरडी खोदीव टाकी,जोत्यांचे भग्नावशेष आणि फुटकी तटबंदी आहे. किल्ल्यावरून समोरच मोरना नदीचा परिसर आणि गुणवंतगड दिसतो. पावसाळ्यात मात्र दातेगडाची सफर मात्र अटळ आहे. या किल्ल्याला बहाल झालेलं "सुंदरगड" हे नाव सार्थ ठरवणारा हा किल्ला आहे. अतिशय सुंदर लोकेशन आणि ब-यापैकी अवशेष लाभलेला हा दातेगड पावसाळ्यात बहरल्यावर जे आपलं जे काही देखणं रूप पेश करेल ते शब्दांच्या पलीकडचं असेल हे मात्र निश्चित !!!!

किल्ले दातेगड  

 दातेगड क्लोजअप 

किल्ल्याच्या मुख्य दरवाजा जवळची हनुमान मूर्ती  

 किल्ल्याच्या मुख्य दरवाजा जवळचं गणरायाचं देखणं शिल्प…. 

मुख्य दरवाज्याकडे नेणा-या पाय-या  

दातेगडाचा पाय-यांचा मार्ग 

दातेगडाची सुप्रसिद्ध विहीर !!!!

दातेगडाची विहीर व त्यात उतरणा-या पाय-या … वरच्या बाजूने 

किल्ल्यावरील पाण्याची खोदीव कोरडी टाकी 

दातेगडावरचा कोरडा तलाव व मागे वाड्याचे भग्नावशेष 

दगडावर दगड रचून बांधलेली तटबंदी  दातेगडावरून गुणवंतगड 

प्रसन्न मानाने आम्ही दातेगड उतरायला सुरुवात केली. गुणवंतगडाने केलेल्या थोड्याफार निराशेचं सावट दातेगडाच्या विहिरीने आणि एकूणच अनुभवाने त्या निळ्या आभाळात कधीच विरून टाकलेलं होतं. काल सकाळपासून ते आत्ता या क्षणापर्यंतचा सगळा प्रवासपट माझ्या डोळ्यासमोरून भरभर सरकत होता. कुठे ती कालची मनावर दडपण आणणारी निराशाजनक पहाट आणि कुठे ही दातेगडाची मनाला तजेला देणारी अविस्मरणीय भेट !!! मंडणगडावरच्या छोट्या "राज ठाकरे" पासून ते गोविंदगडाच्या आमच्या दिनेश पर्यंत…कितीतरी माणसं या कोकण बाईक एक्सपीडीशनने जोडली होती. सह्याद्रीचा आणि आमचा एक नवा परिचय करून दिला होता… आणि अर्थातच विनयला विसरून कसं चालेल… काल पहाटे गाडीतला पेट्रोलचा काटा खाली गेलेला दिसत असूनही "काळजी करू नकोस. पुढचं पुढे बघू" असं अतिशय समजुतदारपणे सांगणारा विनय आणि दातेगडाच्या विहिरीत स्थळकाळाचं भान विसरून लहान मुलासारख्या मनसोक्त उड्या घेणारा विनय… एकाच व्यक्तीची दोन अनोखी  रूपं !!!! या सफारीने आम्हाला फक्त सहा किल्लेच दाखवले नाहीत तर सहा मुलुखातली माणसं दाखवली… त्यांची निरागस…प्रामाणिक मनं दाखवली आणि अनेक अविस्मरणीय अनुभवांची शिदोरी आयुष्यभरासाठी दिली. आम्हा दोन डोंगरवेड्यांची ही मुशाफिरी इथंच संपत नाही…कारण ही तर आमच्या जुन्या मैत्रीची नव्यानं झालेली एक सुंदर सुरुवात आहे  !!!!

ओंकार ओक 
oakonkar@gmail.com 


Comments

  1. Masta Masta Masta...... its nice to read... hope me u be there very soon.....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड