सह्याद्रीचं "माणिक"

संध्याकाळचे सहा वाजत आले होते. आभाळाला टेकलेल्या त्या लिंगोबाच्या डोंगराचा अर्थात कर्नाळा किल्ल्याचा उत्तुंग सुळका मावळतीची कोवळी किरणं अंगावर झेलत शांतपणे उभा होता. सा-या आसमंतावरच एक प्रकारची जादू झाल्यासारखं झालं होतं. त्या सोनेरी शलाकांमध्ये न्हाऊन निघालेले सह्याद्रीचे ते रौद्र कडे मात्र निखालस सुंदर दिसत होते. पण कर्नाळ्यावरून दिसणा-या प्रबळ,इर्षाळ,कलावंतीण,चंदेरी,म्हैसमाळ,मलंग या परिचितांमध्ये एक खडा पहाड मात्र स्वत:च्याच धुंदीत संध्याकाळचा गार वारा अंगावर घेत खडा होता. त्याच्या पहाडाला एक छोटा लिंगीसारखा सुळकाही चिकटून उभा होता. एखाद्या रत्नावर कोवळ्या उन्हाचा कवडसा पडल्यावर ते रत्न ज्याप्रमाणे उजळून निघेल तसा आभास त्या बुलंद आकाराच्या डोंगराने निर्माण केला होता. कर्नाळ्यावरून अनुभवलेल्या त्या धुंद संध्याकाळेचा साक्षीदार असणा-या त्या अजस्त्र आकाराच्या गिरीदुर्गाचं नाव "माणिकगड"!!!!! आकार सह्याद्रीच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असा पण नाव मात्र एखाद्या बावनकशी रत्नासारखं !!!!
कर्नाळ्यावरून परतल्यापासूनच रायगड जिल्ह्यातल्या या आडवाटेवरच्या किल्ल्यानं मनात घर केलं होतं. पण उत्तरवर्षाकालीन (मराठीत Post Monsoon !!!) भटकंतीच्या यादीमध्ये या किल्ल्याचा नंबर कुठे लावावा हा विचार चालू असतानाच अस्मादिकांचा मोबाईल वाजला.  " ******….काय करतोयस ?? " समोरच्याने फोन उचलल्यावर "हॅलो" च्या ऐवजी एखादी जहाल शिवी हासडून "कॉनव्हर्सेशन" ची निराळीच सुरुवात करणारा या पृथ्वीतलावरचा एकच माणूस माझ्या ओळखीचा आहे…. माननीय अतुल प्रभावळकर !!!! " या रविवारी काय करतोय.जायचं का कुठे ??"…. संधी आयती चालून येते म्हणतात ना ते हेच असावं. मी तत्काळ होकार भरला आणि त्याला माणिकगडला जाऊ असं सांगितलं. अतुलच्याही लिस्टमध्ये खूप पूर्वीपासून या किल्ल्याची हजेरी लागल्याने आमचं बिनविरोध एकमत झालं आणि शनिवारी रात्री निघून ट्रेक तडीस न्यायचा प्लॅन ठरला. ट्रेकचे एकूण मेंबर… आम्ही दोघंच !!! कर्मधर्मसंयोगाने अतुलच्या भावाची नवी कोरी बजाज डिस्कव्हरसुद्धा सीमोल्लंघनाला कुठेतरी न्यायचीच होती. त्यामुळे तोही प्रश्न सुटला. पण शनिवारी रात्री अतुल हापिसातून आल्यानंतर सुमारे दहाच्या सुमारास निघायचं होतं आणि सुमारे चार तासाच्या प्रवासानंतर मध्यरात्री पायथ्याच्या गावात मंदिर शोधायचा त्रास होणारच होता. शेवटी मी माझे मित्र आणि पनवेलच्या "दुर्गमित्र" चे अजय गाडगीळ यांना फोन करून माणिकगड पायथ्याचा एखादा नंबर देण्याची विनंती केली. माझा फोन बंद व्हायच्या आत गाडगीळ सरांनी नंबर पाठवून दिला होता !!!! ते नाव होतं राहुल जांभूळकर… वडगाव !!! राहुलला फोन करून मी रात्री येत असल्याची माहिती दिली आणि आमच्या राहण्याची सोय कर अशी विनंती केली. "तुम्ही या फक्त. मध्यरात्री कितीही वाजता फोन करा. मी तुम्हाला न्यायला येईन " !!! इति राहुल. ट्रेकची सुरुवात मस्त झाली होती. अतुलच्या घरून आम्ही रात्री १० वाजता निघालो. "आरामात चालव. राहायची सोय झाली आहे. काही घाई नाहीये. " या माझ्या सूचनेकडे अतुलने निव्वळ दुर्लक्ष केलेलं होतं. त्याने म्हणजे आपल्या भावाची बाईक आपण चोरून आणलीये आणि भावाने आपल्यामागे सोडलेले  पोलिस हे आता आपली साथ येरवडा जेलपर्यंत करणार आहेत अशा वेगात गाडीला मोकळ्यावर सोडलं होतं. कारण लोणावळ्यात पोचेपर्यंत आमच्या गाडीचा ब्रेक आरामात झोपला होता !!!! पण अतुलच्या कृपेने आम्ही माणिकगड पायथ्याच्या वडगावला एक वाजताच पोहोचलो. आमच्या नशिबाने आम्ही नेमकी राहुल आणि वडगावातली बाकीची तरुण मंडळी झोपलेल्या मारुती मंदिरासमोरच गाडी थांबवली होती. वडगावातलं हे मारुती मंदिर म्हणजे मुक्कामाला अप्रतिम जागा. स्वछ तर आहेच पण आत लाईटची पण सोय आहे. राहुल जागाच होता. त्याला भेटलो आणि मंदिराच्या थंडगार फरशीवर ताणून दिली. 
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेने पुण्या - मुंबईच्या ट्रेकर्सना प्रबळ,इर्षाळ,कलावंतीण,चंदेरी,म्हैसमाळ इत्यादी किल्ल्यांच्या रुपात जे वरदान दिलंय त्यातलं एक म्हणजे माणिकगड. पुण्या - मुंबईहून एका दिवसात बघता येणा-या किल्ल्यांपैकी माणिकगड हा एक किल्ला असून त्याच्या पायथ्यापर्यंत अगदी विनासायास पोहोचता येतं. पुण्याकडच्या पब्लिकने लोणावळा - खोपोली नंतर जुन्या एक्स्प्रेस हायवेवर जो चौक फाटा लागतो तिथून आत चौक गावात जावं. चौक मधून माणिकगड पायथ्याचं वडगाव फक्त ८ कि.मी वर आहे. मुंबईकडच्या ट्रेकर्सनी पनवेल नंतर रसायनीला यावं. रसायनीमध्ये "पाताळगंगा इंडस्ट्रीयल एरिया" या नावाचा अनेक औद्योगिक कारखाने असलेला भाग आहे. रसायनीच्या टोल नाक्यानंतर डावीकडे वाशिवली फाटा असून या फाट्यावर पाताळगंगा इंडस्ट्रीयल एरियातल्या अनेक कंपन्यांच्या पाट्या आहेत. ही खूण लक्षात ठेवावी.  इथून आपण आतमध्ये वळालो की चांभार्ली,बोरीवली मार्गे वाशिवली गाठायचं. वाशिवली गाव संपताना लगेचच उजवीकडे वडगावचा फाटा असून या फाट्यापासून वडगाव २ - ३ कि. मी. आहे. वडगाव ब-यापैकी मोठं गाव असून वर उल्लेख केल्याप्रमाणे गावातलं मारुती मंदिर मुक्कामाला अप्रतिम आहे. 
सकाळी सहा वाजताच उठलो. आकाशात काळे ढग दाटून आले होते. मंदिरातून बाहेर पडलो आणि राहुलच्या घरात आमच्या सॅक ठेवल्या. राहुल जांभूळकर म्हणजे एक भन्नाट प्रकरण आहे. पंचविशीतला हा मुलगा पाताळगंगा इंडस्ट्रीयल एरियातल्याच सिप्ला कंपनीत जॉब करतो.विशेष म्हणजे राहुल हा मला आत्तापर्यंत कोणत्याही किल्ल्याच्या पायथ्याला भेटलेल्या स्थानिक व्यक्तींपैकी एकमेव माणूस आहे ज्याच्याकडे स्वत:चा निकॉन कंपनीचा डिजिटल कॅमेरा असून अतिशय उच्च दर्जाची फोटोग्राफी राहुलने आत्मसात केली आहे. फोटोग्राफीचं कोणताही फॉर्मल प्रशिक्षण घेतलेलं नसतानाही त्याने स्वत:च्याच अंगणातले म्हणजेच माणिकगड परिसरातले काढलेले अनेक प्रकारच्या किडे,पक्षी फुलं,फुलपाखरं आणि असंख्य लॅन्डस्केप्स यांचे काढलेले फोटोज म्हणजे केवळ बघत राहावे असे आहेत.आणखी एक मुख्य गोष्ट म्हणजे राहुल एक प्रशिक्षित कत्थक डान्सर असून संपूर्ण रायगड जिल्ह्यातला एकमेव पुरुष कत्थक डान्सर होण्याचा मान त्याला मिळाला आहे. फॅशन डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केलेल्या राहुलची ही चौफेर फटकेबाजी आम्ही भान विसरून ऐकत होतो.  वडगावसारख्या छोट्या गावात राहून स्वत:चं  एक जगावेगळं व्यक्तिमत्व जपणा-या राहुलला आम्ही मनोमन सलाम ठोकला. राहुल म्हणजे माणिकगडाचा ख-या अर्थाने एन्सायक्लोपेडिया !!!! माणिकगडाचा दगड अन दगड पाठ असलेला हा डोंगरमित्र म्हणजे खरोखरंच एक "युनिक पर्सनॅलिटी" आहे. 
आम्ही ज्या दिवशी माणिकगडला गेलो नेमकं त्याच दिवशी राहुलला एका डान्सच्या कार्यक्रमाला जायचं असल्याने त्याने आमच्याबरोबर येण्यात असमर्थता दर्शविली. पण त्याने आपल्या चुलतभावाला…रामदासला आमच्याबरोबर पाठवलं आणि आमचा प्रश्न सुटला. सात वाजत आले होते. आभाळ मात्र भरून आलं होतं. आम्ही रामदासला बरोबर घेऊन वडगावच्या शेतातून बाहेर पडलो आणि पावसाने आम्हाला पहिल्या अर्ध्या तासातच असा काही तडाखा दिला की आपण आजच्या दिवसात माणिकगडाच्या माथ्यावर पोहचू का नाही ही शंका पहिल्या पंधरा मिनिटातच आमच्या मनाला चाटून गेली. एक मात्र आहे. माणिकगडला पहिल्यांदा जात असल्यास आणि हाताशी वेळ कमी असल्यास गावातून एखादा माहितगार माणूस घेण्यात जराही कुचराई करू नये. वडगावातून माणिकगड सुमारे साडेतीन तासांच्या अंतरावर असून या मार्गावर लागणा-या जंगलानंतर अनेक फसव्या वाटा असल्याने स्थानिक व्यक्ती अत्यंत आवश्यक आहे. आम्ही गावातून निघाल्यापासून सुमारे अर्ध्या तासात एका पठारावर आलो आणि माणिकगडाचं जे काही दर्शन आम्हाला घडलं ते शब्दात वर्णन करणं खरोखरच कठीण आहे. हिरव्यागार कातळकड्याचा साज चढवलेला तो बेलाग दुर्ग नुकताच ढगांच्या पुंजक्यातून बाहेर येत होता. त्याच्या दोन्ही बाजूचे पहाडाचे पदरही केवळ विलक्षण !!!!! सकाळची कोवळी सूर्यकिरणं अंगावर घेत असलेल्या आणि कृष्णमेघांचं सावट आपल्या डोईवर धारण केलेलं माणिकगडाचं ते मनोहारी रूप आम्ही कितीतरी वेळ डोळ्यात साठवत उभे होतो. पाऊसही एव्हाना पूर्ण थांबला होता.आम्ही ज्या पठारावर उभे होतो तिथे पूर्वी एक धनगरवाडा होता. नोकरी - व्यवसायानिमित्त इथल्या धनगर वस्तीने जवळच्या गावांमध्ये स्थलांतर केलं आणि कधीकाळी बोलका असलेला हा भाग पूर्णपणे शांत झाला. सध्या इथे धनगरवाडयाच्या शाळेची इमारत तेवढी दिवस मोजत एकटीच उभी आहे.


सर्व फोटो : © ओंकार ओक 


धनगरवाडयाच्या पठारावरून झालेलं माणिकगडाचं पाहिलं दर्शन !!! 

माणिकगडाचं एक विलोभनीय रूप…किल्ल्याच्या डोक्यावर अर्ध्या भागात काळे ढग तर अर्ध्या भागात निरभ्र आकाश !!!

      माणिकगड क्लोजअप  

धनगरवाडयाच्या पठाराकडे जाताना दिसणारं वडगाव  

धनगरवाडयाच्या पठारापासून आपल्याला माणिकगडाची जी बाजू दिसते त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूने किल्ल्याची मुख्य पायवाट आहे. दुस-या फोटोमध्ये किल्ल्याच्या पायथ्याला जे जंगल दिसतंय त्यातून बरीच चाल आहे. किल्ल्याचा कातळकडा या जंगलातून जाताना सदैव आपल्या डावीकडे राहतो एवढं लक्षात ठेवलं तरी वाट चुकायची शक्यता कमी आहे. आठ वाजत आले होते. सकाळचं कोवळं उन आता बोचरं होऊ लागलं होतं. त्यामुळे ऑक्टोबरच्या उन्हाचे चटके बसायच्या आत आपण माथा गाठला पाहिजे असा सर्वथा योग्य सल्ला रामदासने आम्हाला दिला आणि आम्ही आमची फोटोग्राफी आवरती घेतली. धनगरवाड्याच्या पठारापासून लगेचच पुढे माणिकगडाच्या घनदाट जंगलाला सुरुवात होते. माणिकगडला पावसाळ्यात आल्यास या जंगलाच्या वाटेवर अनेक सुंदर झरे आहेत. सुमारे दिडेक तासाच्या या पायपिटीमध्ये डावीकडे दिसणा-या माणिकगडाचा सतत बदलत जाणारा आकार हे या ट्रेकचं अनोखं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या जंगलामधली संपूर्ण वाटचाल ही सरळसोट असून मध्ये कुठेही चढण नाही. ही गोष्ट बहुदा असह्य होऊन माझा अंदाज अचूक ठरवत अतुलने आपल्या प्रवचनाला प्रारंभ केला !!! सुरुवातीला शिवाजीमहाराजांचे आरमार,त्यांची रणनीती,अफझलखान वध इथपासून सुरु झालेली आमची चर्चा कोकणकड्यावरून दिसणारं इंद्रवज्र,साल्हेरवरून दिसणारा सूर्यास्त अशी वळणं घेत शेवटी प्रचितगडच्या जंगलात वाट चुकून सध्याचे भ्रष्ट राजकारणी आणि त्यांचा काळा पैसा इथपर्यंत येउन थांबली !!!! या चर्चेच्या शेवटच्या सत्रात आमच्या रामदास स्वामींनी त्यांच्या मनाचे श्लोक ऐकवल्यावर आम्ही त्यांना फक्त साष्टांग दंडवत घालायचे बाकी होतो !!!! काय नॉलेज असतं राव एकेकाचं. मग माणिकगडाचं जंगल,त्यात आढळणारे वृक्ष,बिबट्याचं अचानक झालेलं दर्शन आणि अनेक सर्पकथा रामदासांनी आपल्या निरुपणात ऐकवल्या. आम्ही चालत असलेल्या वाटेवर जंगल जरी असलं तरी उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली होती. अखेर सुमारे तासाभरानंतर आम्ही एका मोकळ्या पठारावर आलो आणि माणिकच्या भव्य कातळकड्याचं सुरेख दर्शन झालं. माणिकच्या मुख्य पहाडाला उजवीकडे एक आणि डावीकडे एक असे दोन छोटे सुळके चिकटले आहेत. यातला डावीकडचा सुळका म्हणजे " माणिकची लिंगी ". कर्नाळ्यावरून किंवा आजूबाजूच्या परिसरातून माणिकच्या शेजारी दिसणारा हाच तो सुळका. खरं तर माणिकगडाचा माथा गाठायला किल्ल्याचा मुख्य पहाड आणि माणिकची लिंगी यांच्यामधल्या अरुंद घळीतून अतिशय अवघड वाट आहे. सुरक्षेची साधनं तुमच्याकडे नसतील तर सरळ या वाटेकडे दुर्लक्ष करावं. माहितगार व्यक्तीशिवाय ही वाट सापडणंही थोडं अवघड आहे.आपण चालत आलेली पायवाट हाच माणिकगडाचा राजमार्ग असून तो किल्ल्याला उजवीकडून पूर्णपणे वळसा घालून माणिकगड आणि त्याच्या शेजारचा डोंगर यांच्या खिंडीतून किल्ल्याच्या माथ्यावर जाऊन विसावला आहे. आम्ही उभ्या असलेल्या या मोकळ्या पठाराच्या जवळच मारुतीचं एक छोटेखानी मंदिर असून आपली वाट बरोबर आहे हे सांगणारा हा एक मुख्य पुरावा आहे !!!   

जंगलातील वाटेवरून जाताना दिसणारा माणिकगड      

          
माणिकगडाचा भव्य कातळकडा आणि डावीकडे माणिकची लिंगी (उजवीकडच्या सुळक्याला बहुदा नाव नाही )


किल्ल्याच्या वाटेवरचं मारुती मंदिर  

आम्ही मारुती मंदिर मागे टाकलं आणि रामदासने किल्ल्याच्या दिशेने मोर्चा वळवला. किल्ल्याची चढण आता ख-या अर्थाने सुरु झाली होती. माणिकच्या मागच्या बाजूला असलेला डोंगर उजवीकडे आणि माणिकचा कातळकडा डावीकडे ठेवत ही वाट जाते. वाट मळलेली असली तरी ती अरुंद असून काही ठिकाणी खड्या चढणीची आहे. साधारणपणे तासाभरानंतर आपण किल्ल्याच्या खालच्या तटबंदीवर पोहोचतो. माणिकगडाचं एक वैशिष्टय म्हणजे चारही बाजूने ताशीव कडे असताना किल्ल्याला ठराविक अंतरावर दुहेरी स्तरातील तटबंदी दिसते. आपण ज्या खालच्या बाजूच्या तटबंदीवर पोहोचतो तिथे सुरुवातीलाच पाण्याचे टाके आहे. इथून किल्ल्याच्या वरच्या भागातील तटबंदीचे दोन बुरुज स्पष्ट दिसतात. आपण चालत आलेल्या पायवाटेवरून गडाचा माथा उजवीकडे ठेवत पुढे जायचं आणि गडाच्या सर्वोच्च माथ्याला एक डावीकडून छोटा वळसा घालून अखेर तीन साडेतीन तासाच्या मनसोक्त तंगडतोडीनंतर आपला प्रवेश माणिकगड माथ्यावर होतो. वडगावमधून सात वाजता निघालेलो आम्ही बरोब्बर १० वाजता माणिकगड माथ्यावर प्रविष्ट झालो होतो. ऑक्टोबर महिन्यात कोकणातल्या या सर्वांगसुंदर किल्ल्याला भेट देण्याचं सार्थक केलं ते गडावर पसरलेल्या पिवळ्याधमक सोनकीच्या फुलांच्या गालिच्याने !!!! पाउस पडण्याची सुतराम शक्यता नव्हती. वातावरण स्वच्छ होतं. निळ्या आभाळाखाली माणिकच्या विस्तीर्ण पठारावर निसर्गाने पांघरलेला तो रानफुलांचा शेला म्हणजे सह्याद्रीचं खरं सौंदर्य !!! हे बघायला तर सह्याद्रीच्या आडवाटांना आपलंसं करायचं आणि हे दृश्य मन भरेपर्यंत डोळ्यात साठवून घायचं !!!  माणिकगडाच्या माथ्यावर आपण पोहोचलो की लगेचच डावीकडे चुन्याचा एक मोठा घाणा उघड्यावर पडलेला आहे.  या चुन्याच्या घाण्याच्या समोरच माणिकगडाचं चौकोनी चौकोनी आकाराचं छोटंसं प्रवेशद्वार असून त्याच्या माथ्यावरच्या पट्टीवर कोरलेली गणपतीची मूर्ती अतिशय रेखीव आणि सुंदर आहे. दरवाज्याच्या शेजारीच एक छोटेखानी घुमटी आहे. दरवाज्यातून आपण सरळ पुढे गेलो की माणिकच्या सर्वोच्च माथ्यावर आपण येउन पोचतो. किल्ल्यावर पोहोचताचक्षणी त्या पावसाळी व-याचा भर्राट झोत अंगावर घेतल्यावर जे काही सुख मिळतं ना त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. माणिकगडाचं भौगोलिक स्थान मात्र अप्रतिम आहे. सर्वोच्च माथ्यावर पाउल ठेवल्या ठेवल्या समोरच कर्नाळ्याचा उत्तुंग सुळका बोट उंचावून " वेल डन " म्हणत आपलं सहर्ष स्वागत करतो आणि त्याच क्षणी आपल्या या तीन तासांच्या श्रमाचं ख-या अर्थानं चीज होतं !!!!  


माणिकगडावर प्रवेश करताना लागलेलं पहिलं टाकं  
    
माणिकगडाची खालच्या स्तरातली तटबंदी. हिच्यावरून चालत जाऊन उजवीकडे वळलो की गडाचा सर्वोच्च माथा आहे.  


माणिकगडाच्या माथ्यावर पोहोचताना सोनकीच्या या रानफुलांनी केलेलं स्वागत !!!!

                                  खालच्या तटबंदीवरच्या पाण्याच्या टाक्यापासून दिसणारे माणिकगडाच्या वरच्या स्तरातल्या तटबंदीचे बुरुज 

किल्ल्याच्या माथ्यावरचा चुन्याचा घाणा 

                                                                               माणिकगडाचं माथ्यावर गणेशपट्टी असलेलं प्रवेशद्वार  

 दरवाज्याशेजारची छोटी घुमटी 

माणिकगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारचा तट.  

आपण दरवाजातून सरळ किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो की समोरच एक मोठया आकाराचं पण शेवाळलेल्या पाण्याचं टाकं  आहे. थंडीच्या दिवसात हे टाकं कोरडं पडत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या मोठया टाक्याशेजारीच एक छोटं टाकं असून आम्ही पावसाळ्याच्या नंतर लगेचच गेलेलो असल्याने ते पाण्याने तुडुंब भरलेलं होतं. माणिकगडावर पाण्याचा साठा मात्र बारमाही नसून इथे फक्त नोव्हेंबर पर्यंत पाणी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा सोडून इतर वेळी गेल्यास आपल्याबरोबर किमान तीन लिटर पाण्याचा साठा ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर भग्नावस्थेतल्या काही जोत्यांचे अवशेष असून त्यांच्या शेजारून एक बारीक वाट खाली उतरते. सुरुवातीला काही खोदीव पावट्या आपण उतरून गेलो की वाट डावीकडे वळते आणि इथेच एक शिवलिंग आणि पाण्याची काही टाकी आहेत. या ठिकाणी पोहोचायची खुण म्हणजे माणिकगडावरून प्रबळगड व इर्शाळगड ज्या दिशेला दिसतात त्याच दिशेला थोडंसं उतरलं की हे अवशेष आहेत.महाशिवरात्रीला किल्ल्यावर खूप मोठी जत्रा भरते तेव्हा अख्खं वडगाव किल्ल्यावर येतं.किल्ल्याचा हा भाग बघून झाला की तिथून थोडी चक्कर मारायची आणि पुन्हा मघाच्या मोठया टाक्यापाशी यायचं. साधारण अर्ध्या तासात माणिकगडाची ही छोटी गडफेरी पूर्ण होते.
रामदासांच्या कृपेने आम्ही माणिकगड सहजगत्या सर केला होता. रामदासचं आजूबाजूच्या परिसराचं ज्ञानही खरोखरंच लक्षणीय होतं. कारण आम्ही काही बोलायच्या आत तो आम्हाला कर्नाळा,प्रबळ,कलावंतीण आणि इर्षाळगड दाखवून मोकळा झाला होता !!!! आणि मुख्य म्हणजे त्याने ही नावं सांगताना कसलीही चूक केली नाही. किल्ल्याच्या या मोठया टाक्यापाशी उभं राहिलं की  उजवीकडे प्रबळ - इर्शाळच्या पायथ्याला मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे, समोर कर्नाळा, डावीकडे सांकशी किल्ला आणि मि-या डोंगर आणि तुमच्या नशिबाने वातावरण कमालीचं स्वच्छ असेल तर चंदेरी,म्हैसमाळ,मलंग आणि (रामदासच्या मते) मुंबईची किनारही दिसू शकते. 
साडेअकरा वाजले होते. किल्ल्यावर त्या थंडगार व-याचा झोत अशा काही भन्नाट वेगात सुटला होता की त्या स्वर्गीय वातावरणातून हलायची इच्छाच काही केल्या होत नव्हती. खरंच मंत्रमुग्ध करणारं वातावरण आम्ही त्या दिवशी माणिकगडावर अनुभवलं होतं. डोक्यावरचं निळाशार आकाश,थंडगार वा-याचे सुखावून जाणारे झोत,किल्ल्यावर रानफुलांनी काढलेली पिवळीधमक वेलबुट्टी,हिरवाईने बहरलेला आसमंत आणि कुठेही न अनुभवायला मिळणारी एक अस्पर्श शांतता !!!!! बस्स !!!! काय हवं अजून !!!!    

                        
 माणिकगडाच्या माथ्यावरून दिसणारा कर्नाळा 

माथ्यावरचं मोठया आकाराचं टाकं  

याचसाठी केला अट्टाहास !!!!!!


किल्ल्यावरील शिवलिंग 

                                                           सोनकीच्या रानफुलांनी बहरलेली माणिकगडाची तटबंदी !!!! एक अविस्मरणीय दृश्य !!!!


किल्ल्याची तटबंदी आणि जोत्याचे अवशेष 

माणिकगडाच्या माथ्यावरून दिसणारा प्रबळगड आणि कलावंतीण सुळका (डावीकडे) आणि इर्शाळगड (उजवीकडे )

माणिकगडावरच्या मोठया टाक्याशेजारचं छोटं टाकं आणि त्यात पडलेलं आभाळाचं  निळंशार प्रतिबिंब !!! 

साडेअकरा वाजले होते. आभाळ पुन्हा भरून यायला सुरुवात झाली होती. आम्हाला समाधान एकाच गोष्टीचं होतं आणि ते म्हणजे माणिकगड चढताना आणि वरती भटकताना पावसाचा व्यत्यय कुठेही आला नव्हता !!!! भारावलेल्या मनानं आम्ही या निखालस सुंदर किल्ल्याचा निरोप घेतला आणि उतरायला सुरुवात केली. सह्याद्रीने जे दुर्गरुपी अलंकार आपल्या अंगाखांद्यावर धारण केले आहेत त्यापैकी दुर्लक्षित असलेलं पण सर्वांगसुंदर रत्न म्हणजे माणिकगड. एका दिवसाच्या ट्रेकसाठी यासारखी जागा शोधूनही सापडणार नाही. माणिकगडाला भेट द्यायचा सर्वोत्कृष्ट ऋतु म्हणजे सप्टेंबर ते फेब्रुवारी. माणिकगडाचं देखणं सौंदर्य याच ऋतूत ख-या अर्थाने बहरतं !!! उन्हाळ्यात मात्र माणिकगड चढण्यास अत्यंत जिकिरीचा असून कोकणातल्या दमट हवेमुळे तसेच किल्ल्याच्या एकूण तीन तासाच्या प्रदीर्घ चालीमुळे हा काळ अजिबात संयुक्तिक नाही. वर पाण्याच्या कमतरतेचा प्रश्न तर आहेच. तसंच भर पावसाळ्यातही शक्यतो इथे भेट देणं टाळावं. एकतर धुक्यामुळे वाट चुकण्याची दाट शक्यता आहे आणि माणिकचं हिरवाईने बहरलेलं देखणं रूप,त्याच्या सर्वांगावर फुललेली रानफुलांची सभा आणि मुख्य म्हणजे त्याच्या माथ्यावरून दिसणारा सह्याद्रीचा सुंदर नजारा भर पावसाळ्यात धुक्यामुळे अनुभवता येत नाही. पायथ्याच्या वडगावपर्यंतही चौक तसंच रसायनी वरून खासगी वाहनांची भरपूर सोय आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यावर लगेच ह्या किल्ल्याची भेट अगदी मस्ट आहे !!!!
आम्ही माणिकगडाचं जंगल पार करून धनगरवाडयाच्या पठाराजवळ पोहोचलो.पावसाची भुरभूर सुरु होती पण त्याच वेळी उन्हाच्या नाजूक कवडशांनी त्या आसमंतावर एक निराळाच माहोल निर्माण केला होता. त्या धुंद वातावरणात निसर्गाने एक निराळीच जादू भरली होती. मागे वळून बघितलं आणि एक अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल या किल्ल्याला मनोमन सलाम ठोकला. आभाळातल्या कृष्णमेघांचा गडगडाट पुन्हा एकदा सुरु झाला. वडगावची ओली कौलं आता दिसू लागली होती. ऊनपावसाचा खेळ अजूनही सुरूच होता !!!!

माणिकची लिंगी क्लोजअप 


माणिकगडाचा एक विलक्षण सुंदर नजारा….   
         
माणिकगड…. मागे वळून पाहताना  


सह्याद्रीचं देखणं दुर्गरत्न… माणिकगड !!!!! 


ओंकार ओक 

Comments

 1. सुंदर सुरवात.. सुंदर वर्णन.. सुंदर फोटो.. नि सुंदर माणिकगड !बस्स.. उद्या पाउस पडून जावा नि गडावर भटकोनी यावे असे वाटू लागले आता.. उन्हाळ्यात असे हिरवेगार फोटो नि सदाबहार वर्णन खूप गारवा देणारे आहेत ! :)

  ReplyDelete
 2. Superb re!! Jabardast lihitos!!
  Jhoplela brake..n bhavane mage lavlel police tar bhannat!
  N Rahul Jambhulkar la tar bhetlech pahije!!

  ReplyDelete
 3. Khup chan re... mast watla wachun. Hya varshi bhet nakki keli ahe apali Manikgadashi.

  ReplyDelete
 4. Mast Jamlaay Lekh. Keep it up..

  ReplyDelete
 5. Mala tuze navin blogs mail karat ja... avi11dec@yahoo.com

  ReplyDelete
 6. Dear Madam,

  My Name is Nilesh Bhutambre From Prabalgad Village (I am called "Bhau" by those close to me, especially by everyone in my village) I run a small scale tourist service wherein I provide food, lodging facilities and guide services to tourists who visit Prabal Machi.( All Information of Prabalgad and Kalavantin Durg ) The URL of my website is: http://prabalgad.jigsy.com/ .

  With Regards

  Nilesh Bhutambara
  Mob:08056186321

  ReplyDelete
 7. वा छान वर्णन आणि मस्त लेख आहे, आम्ही माणिकगडला ला गेलो होतो खुपच तंगडतोड आहे.
  माणिकगडाच्या मागच्या बाजूने (वडगाव च्या बाजूने) सुद्धा एका वाट आहे, नळीची वाट म्हणू शकतो तिला आगदी तशी वाट आहे, येतांना आम्ही त्या वाटेने उतरलो होतो, ती वाट आपल्याया डायरेक्ट खालच्या पठारावर घेऊन येते. पुन्हा कधी गेलास तर ट्ट्राय कर

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड