ऑफबीट दुनियेतला गोरखगड !!!

पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेली एक अजस्त्र डोंगररांग….!!!! कराल… पातळस्पर्शी… बुलंद वगैरे अलंकारांनाही सहज पुरून उरणारी !!! दिसते त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी अभेद्य भासणारी आणि खालून माथ्याकडे नुसती नजर जरी टाकली तरी डोळे दिपवणारी !!! पावसाळ्यात हिच्या माथ्यावरून कोकणात खोल कोसळणारे धबधबे नुसत्या दर्शनानेच मनुष्याला मंत्रमुग्ध करतात तर हिवाळ्यात या कड्यांच्या माथ्यावरून नुसती खाली नजर जरी फिरवली तरी त्या खोलीचे अंदाजही माणसाच्या काळजाच्या ठोका चुकवतात. आजही या डोंगररांगेच्या घाटातून देश - कोकणात स्थानिक लोक ये - जा करतात. पावसाळ्यात तर कधी हिवाळ्यातही या घाटमाथ्यावरून कोकणात दृष्टी फिरवली की सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळे झालेले आणि आभाळात बाणासारखे घुसू पाहणारे दोन बेलाग सुळके दिसतात…. !!! त्यातल्या एकाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात तर माथ्यावर एक छोटं मंदिर. दुसरा सुळका मात्र सह्याद्रीचं अस्तित्व ख-या अर्थाने दाखवून देतो. गिर्यारोहकांच्या "फेव्हरेट लिस्ट" मध्ये असलेला हा अप्रतिम आणि आडवाटेचा घाट म्हणजे आहुपे घाट आणि त्याच्या माथ्यावरून सच्च्या सह्यप्रेमीला मनापासून साद घालणारे ते दोन सुळके म्हणजे गोरखगड आणि मच्छिंद्रगड !!!!
आम्ही गोरखगडाची दोन दिवसाच्या निवांत ट्रेकसाठीची बिनविरोध निवड करण्यामागे एवढी कारणं पुरेशी होती !!! त्याचं झालं असं की डिसेंबरच्या शेवटच्या आठवडयात दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे एकतरी २ - ३ दिवसांचा ट्रेक करायचा हे ठरलेलं होतं. पण यावर्षीची निवड मात्र साधीसुधी नव्हती. तर ते किल्ले होते नगर - नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवरचे आणि कळसुबाई रांगेतले तीन "ड्रीम डेस्टीनेशन्स " अर्थात अलंग - मदन आणि कुलंग !!! सह्याद्रीतली एक खडतर पण सर्वांगसुंदर डोंगरयात्रा !!!! गिर्यारोहकाचा शारीरिक आणि मानसिक कस बघणा-या या ट्रेकच्या आधी पुरेसा सराव आवश्यकच होता. आणि म्हणूनच या कठीण वार्षिक परीक्षेच्या आधीची " टेस्ट सिरीज " म्हणून गोरखगडाची निवड झाली होती. अहुप्यावरून या दोन गडांचं झालेलं दर्शनचं आम्हाला त्यांच्याकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरलं होतं. त्यामुळे अलंग - मदनच्या आधीचा प्रॅक्टिस ट्रेक म्हणून गोरखगडावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि १५ - १६ डिसेंबर हा मुहूर्त ठरला !!!  या ट्रेकचे शिलेदार म्हणजे आम्ही पंचमहाभूतं !!!! नितीन प्रभुदेसाई (अण्णा),आमोद साने (सान्या),पुष्कर फणसळकर,नितीन मसुरकर(आयुर्वेदाचार्य उर्फ हॅपी थॉट्स उर्फ मसु-या) आणि अस्मादिक !!! सान्याच्या ऑल्टोने शनिवारी आम्हा पाचही जणांना आपल्या हृदयात जागा दिली तेव्हा बाहेरून या कारमध्ये नक्की माणसं भरलीयेत का धान्याची पोती हेच कळत नव्हतं !!! अण्णांच्या घरून सकाळी आरामात चहा,वडा सांबार आणि पोहे हादडून निघालो तेव्हा घड्याळाचा काटा आठवर स्थिरावत होता. एकतर दोन दिवसात एकच किल्ला आणि त्यातही आज गोरखगडवर रात्रीपर्यंत मुक्कामालाच जायचं असल्याने अज्जिबात घाई नव्हती. मुंबई पुणे हायवेने गाडी भन्नाट सुटली होती. सान्याचं सारथ्य म्हणजे काय वर्णावं !!! याचं ड्रायव्हिंग बघून साक्षात श्रीकृष्णानेही आपली मान लज्जेने खाली घातली असती !!! हा महाभारतात अर्जुनाच्या रोलमध्ये असता (म्हणजे ख-या महाभारतात….डीडी वन वरच्या नव्हे !!!) तर प्रतेक्ष श्रीकृष्णाने याच्याच हाती रथ सोपवून स्वत:ची प्रतिज्ञा मोडत रणांगणावर धुमाकूळ घातला असता !!! आम्ही पाचही जण आमच्या सॅक्ससकट गाडीत कोंबून बसलेले असूनही गाडीचा काटा सान्याने खोपोली येईपर्यंत शंभरच्या खाली उतरू दिला नव्हता.त्यामुळे साडेदहाच्या सुमारास कर्जत - नेरळ फाट्याच्या चौकात जी वडापावची दुकानं आहेत तिथे कोणीही न सांगता गाडी थांबली. पुढे मुरबाड रस्ता - म्हसा आणि गोरखगड पायथा देहरी असा बराच प्रवास बाकी असल्याने मोजून अर्ध्या तासात आटपायचा ब्रेक अण्णांच्या,सान्याच्या आणि मसू-याच्या "अलंग - मदन साठीची आवश्यक शारीरिक आणि मानसिक तयारी,ट्रेकमधील संभाव्य धोके आणि खबरदा-या" वगैरे शीर्षकरहित विषयाच्या रवंथाने सव्वा तासांपर्यंत गेला. पुष्करच्या गिर्यारोहण कारकीर्दीचा गोरखगड हा उद्घाटनपर ट्रेक असल्याने तो या तिघांच्याही तोंडांकडे बालवाडीतल्या पोराला "जागतिकीकरणाचे वाढते धोके आणि सदोष मनुष्यबळाची तात्विक कारणमीमांसा" असल्या विषयावरच्या चर्चेला आणून बसवल्यासारखा बघत होता !!! अस्मादिकांचं लक्ष अर्थातच वडापावांकडे आणि "अजून काही सांगायचंय का" याकडेच होतं. अखेर साडेअकराला आमच्या चतुष्पादरथाने कर्जत सोडलं आणि गाडी म्हसाच्या दिशेला धावू लागली. 
कर्जत - म्हसा देहरी हा प्रवास नितांत सुंदर आहे !! चारही बाजूने वेढलेले सह्याद्रीचे कडे….त्यातही उजवीकडे डोकावणारी भीमाशंकराची डोंगररांग…कोथळीगड आणि पदरगडाचं होणारं सुरम्य दर्शन आणि डावीकडे मागे पडत चालेलेले माथेरान….पेब… चंदेरी - म्हैसमाळचे सुळके !!! अतिशय दिलखुलास असा तो अनुभव होता !! त्यात सान्यासारखा दर्दी माणूस बरोबर असल्याने रफी - लताची सोबत आम्हाला शेवटपर्यंत होती. अखेर उन्हं डोक्यावर चढून भाजून काढू लागली तेव्हा आम्ही म्हसामध्ये दाखल झालो. म्हसाहून डावीकडचा रस्ता कल्याण - मुरबाड तर उजवीकडचा धसईमार्गे माळशेज घाटात जातो. म्हसाच्या लोकांना आम्ही गोरखगडचा रस्ता विचारला तेव्हा अचूक पत्त्याबरोबर "कुठे उन्हाचं तडमडायला जाताय…घरदार नाही व्हय तुम्हाला !!!" वगैरे वाक्यही सप्रेम भेट मिळाली. पण आपण ट्रेकर्स पडलो गेंड्याच्या कातडीचे !! निमुटपणे आम्ही देहरीची वाट धरली. बोरवाडीचा फाटा जवळ आल्यावर उजवीकडे सिद्धगडाचं त्रिकोणी आकारात आणि एका वेगळ्याच अंगाने झालेलं दर्शन डोळ्यात भरणारं होतं. त्याच्या कातळकड्यावरची रेघ अन रेघ सह्याद्रीचा महिमा सांगत होती !!! केवळ अप्रतिम !!! अखेर दुपारी तीन वाजता आम्ही देहरीत दाखल झालो आणि देहरीचे प्रतिष्टीत गृहस्थ श्री. हमीदभाई पटेल यांच्या घराजवळ आमच्या रथाला दोन दिवसांसाठी विश्रांती दिली. हमीद पटेल म्हणजे ट्रेकर्सचे आधारस्तंभ. यांचं घर म्हणजे गोरखगडावर येणा-या ट्रेकर्ससाठीची हक्काची जागा. जेवण आणि मुक्कामाची अल्पदरात आणि अप्रतिम सोय हमीदभाईंकडे आहे. तसंच येणा-या जाणा-या प्रत्येक ग्रुपची लेखी नोंद त्यांच्याकडे केली जाते. गोरखगडाचं पावित्र्य आणि ट्रेकर्सचं मन दोन्हीही हमीदभाईं उत्तमरीत्या जपलं आहे !!! त्यांच्याकडे आवश्यक ती नोंद करून आम्ही त्यांना वाट दाखवायला माणूस देण्याची विनंती केली आणि पाच मिनिटाच्या आत बाबू देशमुख यांची आमच्या मार्गदर्शकपदी निवड करण्यात आली. देहरीतून गोरख - मच्छिंद्रचे आभाळस्पर्शी सुळके ध्यानस्थ ऋषीमुनींसारखे भासत होते. यातला उजवीकडचा गोरखगड आणि डावीकडचा मच्छिंद्रगड (खरं तर याला मच्छिंद्र सुळका म्हणणं जास्त योग्य आहे. कारण इथे किल्ल्याचं कुठलंही बांधकाम नाही. पण सोयीसाठी आपण इथे त्याला मच्छिंद्रगड म्हणू). गोरखगडाला त्याच्या उजवीकडून पूर्ण वळसा घालून जावं लागतं. सॅकचे बंद बांधले गेले…बुटांच्या नाड्या आवळल्या गेल्या आणि बाबूच्या मागून आता आम्ही मुख्य मोहिमेवर निघालो.

सर्व फोटो : © ओंकार ओक
 मिशन गोरखगड !!!!

बोरवाडी फाट्यावरून होणारं सिद्धगडाचं बेलाग दर्शन  

 देहरीतून डावीकडे मच्छिंद्रगड आणि उजवीकडे गोरखगड 
  
 देहरीतील गोरक्षनाथ मंदिर… मुक्कामासाठी अप्रतिम…याच्या शेजारून किल्ल्याला वाट गेली आहे 

गोरखगडाच्या वाटेवरून दिसणारा मच्छिंद्रगड

चढाईच्या मुख्य पायवाटेवरून दिसणारा गोरखगड


देहरीतून निघून गोरखगडावर पोहोचेपर्यंत त्याचा प्रत्येक टप्प्यावर बदलत जाणारा वैशिष्टयपूर्ण आकार हे या ट्रेकमधलं खास आकर्षण !! नुसत्या गोरख - मच्छिंद्रच्या फोटोंनाच या मार्गावर कितीतरी वाव आहे. दुपारचं उन रणरणत होतं. किल्ल्याची पायवाट मात्र ठसठशीत मळलेली असून वाटेवर अनेक ठिकाणी जंगल असल्याने ब-यापैकी वाटचाल सावलीतूनच होत असते. गोरक्षनाथांच्या साधनेचं ठिकाण म्हणजे हा गोरक्षगड उर्फ गोरखगड. त्यामुळेच गोरक्षनाथांचं मंदिर किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर बांधलेलं आहे. खरं तर स्थानिक असल्याने ही माहिती बाबू कडून आम्हाला अपेक्षित होती पण तो म्हणजे भलताच शांत माणूस निघाला. अगदी स्वत:च्याच दुनियेत हरवल्यासारखा. आम्ही विचारल्याशिवाय एक अक्षरही बोलत नव्हता. शेवटी न राहवून मी त्याच्या मौनव्रताचं कारण विचारलं आणि सौ. माहेरी गेल्याने याचं लक्ष लागत नसल्याचा उलगडा झाला !!! पुष्करचा आयुष्यातला पहिलाच ट्रेक. त्यात गोरखगडाची चढण खडी होत चालली होती. त्यामुळे अखेर न राहवून त्याने बाबुला " अजून किती वेळ लागेल ??" हा ट्रेकर्सजमातीला सुपरिचित असलेला प्रश्न विचारला आणि "आता मोजा की तुम्हीच…. मी तरी काय सांगू " या बाबूच्या निर्विकार पण (आठवणीमुळे) दर्दभ-या आवाजातल्या उत्तराने पुष्करचा उरलासुरला मार्गही दुष्कर झाला !!! शेवटी एका छोट्या सपाटीवर आम्ही विश्रांतीसाठी थांबलो आणि आयुर्वेदाचार्य मसु-याने परंपरेप्रमाणे थर्मासमधून आणलेला फर्मास गवती चहा आणि कर्जतहून(एवढं खाऊनही !!) पार्सल आणलेले परहेड दोन वडापाव यांचा फडशा पाडल्यावर आमचा आत्मा थंड झाला. त्या गवती चहाच्या स्वर्गीय चवीने बाबुही माणसात आला आणि मी त्याच्या मौनाला त्याच्या नोकरीविषयक वगैरे प्रश्नांनी वाचा फोडली !!! त्याचा परिणाम इतका झाला की काही वेळाने आता याला पुन्हा सायलेंट मोडमध्ये ढकलण्यासाठी काय पाजावं हा विचार करण्यासारखी परिस्थिती उद्भवली !!! गोरखगडाची मुख्य चढण संपवून आम्ही एका पठारावर येउन पोचलो होतो. समोर आहुपे घाटाचे रौद्रभीषण कडे आम्हाला आमच्या खुजेपणाची जाणीव करून देत होते. गोरखगडाच्या इतका वेळ सुळकेवजा दिसणा-या आकाराचं कातळभिंतीत रुपांतर झालं होतं. उजवीकडे सिद्धगडही पूर्णपणे दृष्टीपथात आला होता. मुख्य चढाई संपली होती. आता शेवटचा टप्पा बाकी होता !!!

 गोरख - मच्छिंद्रचा बदललेला आकार 

गोरखगड क्लोजप

पहिल्या चढाईच्या शेवटी लागणा-या पठारावरून दिसणारे आहुपे घाटाचे रौद्रभीषण कडे !!!

गोरखगडाचं कातळभिंतीत झालेलं रुपांतर


गोरखगडाच्या शेवटच्या चढाईकडे जाताना लागणारं पश्चिमनाथ मंदिर

गोरखगड चढाईचा पाय-यांचा अंतिम टप्पा…या पाय-यांच्या शेवटी कातळात खोदलेला चौकोनी दरवाजाही दिसतोय

 गोरखगडाच्या पाय-यांच्या वाटेवरच्या एका पायरीवर खोदलेला देवनागरी शिलालेख 

गोरखगडाच्या पाय-यांवरून मच्छिंद्रगडाचं धडकी भरवणारं दर्शन !!! 

गोरखगडाच्या दरवाजाचा भुयारी मार्ग


गोरखगडाचा मुख्य सुळका… रॅपलिंगसाठीची सर्वोत्तम जागा !!!!

वरच्या फोटोतल्या पश्चिमनाथ मंदिरापासून थोडं पुढे गेलं की गोरखगडाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेची अंतिम चढाई सुरु होते. या मार्गावर संपूर्णपणे खड्या चढाईच्या पाय-या खोदलेल्या असून या पाय-यांना आवश्यक तिथे पकड घेण्यासाठी खोबण्याही आहेत. काही ठिकाणी मात्र पूर्ण पायरी नसून केवळ अरुंद अशा खोदीव पावट्या आहेत. खरं तर गोरखगडाच्या लोकप्रियतेचं गमक म्हणजे त्याची मुख्य दरवाजापर्यंतची आणि शेवटची सर्वोच्च माथ्यासाठीची थरारक चढाई. गोरखगडाच्या या प्रवेशद्वाराच्या टप्प्यात तर या पाय-यांच्या दोन्ही बाजूला खोल खाई असून तिकडे नुसती नजर गेली तरी डोळे फिरतात. यातील एका पायरीवर देवनागरीतला शिलालेख कोरलेला असून सध्या त्याची अक्षरं अस्पष्ट झाली आहेत . आम्ही हा टप्पा चढत असतानाच अचानक वरच्या बाजूने कोलाहल ऐकू येऊ लागला. बघतो तर वीस बावीस अत्यंत उनाड पोरांचा एक ग्रुप नुकताच किल्ला बघून परतत होता. त्यांच्यातल्या एक - दोघांनी उतरताना दरीकडे तोंड केल्याने आधीच त्यांची तंतरली होती. त्यात बाकीचे महाभाग त्या बापड्यांना मानसिकदृष्ट्या यथोचित खच्ची करत होते. संध्याकाळच्या शांत वातावरणात त्यांच्या त्या मर्कटलीला मात्र असह्य होऊ लागल्या होत्या. शेवटी अण्णांनी संताप अनावर होऊन आपलं वय त्यांच्यापेक्षा जास्त आहे हे लक्षात आल्यावर अशी काही झणझणीत शब्दांची फोडणी त्यांच्या माथी मारली की त्याचा परिणाम म्हणून आम्ही त्यांच्या दृष्टीपाथातून नाहीसे होईपर्यंत पंचवीसपैकी एकाही तोंडातून पुढच्या अर्ध्या तासात अवाक्षर उच्चारलं गेलं नाही. त्यातल्या पीडित मुलांनी अण्णांना मनोमन लाखो दुवा दिल्या असतील !!!! अण्णांच्या या "दादागिरी" चा पुष्करवर मात्र भलताच परिणाम झाला आणि आता घाबरून उगाच हा टप्पा पार करायला वेळ लावला तर ज्या सूर्यास्तासाठी एवढा खटाटोप चालवला आहे तो जर (आपण वेळ लावल्यामुळे ) चुकला तर हीच खरमरीत शब्दांची फोडणी आपल्याही नशिबी येईल हे ओळखून त्याने थेट बाबूला गाठलं आणि विनासायास त्याच्या दृष्टीने कठीण असलेला हा टप्पा पार केला !!! गोरखगडाच्या दरवाजाची रचना खासच आहे. दरवाजाच्या मुख्य चौकटीतून आत गेलो की नाशिक जिल्ह्यातल्या हरिहर उर्फ हर्षगडासारखा भुयारी मार्ग त्याला कोरण्यात आला आहे. या भुयारी मार्गात पाय-या आहेत. हा मार्ग पार करून आपण पुढे गेलो की समोर उभी राहते एक उंच कातळभिंत. सुमारे दीडेकशे फुटांच्या या कातळभिंतीवरून रॅपलिंगचा थरार जगावेगळा असेल एवढं मात्र नक्की !!! दरवाजातून शेवटच्या काही पाय-या चढून आपण पुढे गेलो की समोर येते गोरखगडाच्या कातळात खोदलेली एक भव्य आकाराची गुहा !!! शंभरेक लोकांची मुक्कामाची अप्रतिम सोय करू शकेल  अशा या गुहेला स्थानिक भाषेत "मंडप" म्हणतात. या गुहेची स्टोरी बाबुकडून ऐकण्यासाठी मात्र मी कमालीचा उत्सुक होतो.आणि त्या स्थानिक इतिहासकारानंही माझं यथोचित शंकानिरसन केलं. "ही गुहा (अर्थातच) पांडवांनी एका रात्रीत खोदली आणि सकाळ झाल्यावर सीता लव कुशांना घेऊन आजोबाच्या डोंगरावर निघून गेली." हे त्याचं ज्ञान ऐकून मी कोलमडायलाच आलो होतो. रामाने किंवा भीमाने हे वाक्य चुकून जरी ऐकलं असतं तर या बाबूमोशायला चौदा वर्षाच्या वनवासाबरोबर आयुष्यभराचा अज्ञातवास अगदी फुकटात बंपर गिफ्ट म्हणून दिला असता !!! गोरखगडाच्या गुहेत मी डोकावून पहिलं मात्र…आणि माझे डोळेच फिरले. मगाशी खाली उतरत असलेल्या त्या यंगिस्तानने सुमारे दहा एक किलोचा कचरा आमच्या स्वागतासाठी तयार ठेवला होता. गुहेत स्वछतेचा लवलेशही दिसत नव्हता. बाबूबरोबर मी सर्वात पुढे आल्याने बाकीचं मंडळ अजून दरवाजातच टाईमपास करत बसलं होतं. पुष्करही कुठेतरी फोटो काढण्यात गुंतला होता. सूर्यास्त व्हायला अजून किमान अर्धा तास बाकी होता. शेवटी न राहवून मी बाबुला विचारलं "बाबूमहाराज,तुमच्या किल्ल्याची लोकांनी काय अवस्था करून ठेवलीये बघा. हमीदभाईंच्या घरातून लोक निघताना तुम्ही गावकरी त्यांना काहीतरी समज का देत नाही की हे एक पवित्र ठिकाण आहे. आजूबाजूच्या परिसराचं श्रद्धास्थान आहे. इथले मूलभूत नियम तरी पाळत जा म्हणून. तुमच्या किल्ल्यावर होणारे हे प्रकार थांबवणं तुमच्याच हातात आहे की नाही…. "
"आमचा किल्ला ??? (आमची येष्टी ??? च्या सुरात !!!)." अहो दिवसभर हितं शेकडोने लोक येत असत्यात. कोनाकडे लक्ष ठेवायचं. आणि लोकांना पण अक्कल पायजे का नको. का मेंदू घरीच इसरून यायचा." इति बाबू.
त्याच्या उत्तरात अगतिकता होती एवढं मात्र नक्की. आपण लोकांची हरप्रकारे खातिरदारी करूनही लोक आपल्या जागेची पुरती दुर्दशा करून ठेवतात हे त्याच्या आवाजातून स्पष्ट जाणवत होतं. माझ्याकडेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं.
गोरखगडाच्या पश्चिमेकडे म्हणजे ज्या दिशेला सिद्धगड आहे त्या दिशेला अजून एक छोटीशी गुहावजा खोली आहे. गोरखगडावरून दिसणारा सूर्यास्ताचा अपूर्व सोहळा अनुभवावा तो याच ठिकाणाहून !!! बाबू मला त्या गुहेपाशी घेऊन गेला आणि मागून अण्णा आणि पुष्कर अवतरले. बाबुला तिथेच निरोप आणि बक्षिसी देऊन त्याचा निरोप घेतला आणि तीन कॅमेरे आपोआप बाहेर निघाले. पश्चिम क्षितिजावर केशरी रंगांची झालेली उधळण आणि त्यात मनसोक्त न्हाणारा सिद्धगड या दृश्याला तोड नव्हती. सायंकाळच्या त्या सोनेरी शलाका अंगावर घेताना सिद्धगडाच्या अंगावरही शहारा आला असेल !! एक अप्रतिम सूर्यास्त त्या दिवशी अनुभवायला मिळाला होता. एवढ्या तंगडतोडीचं ख-या अर्थाने झालेलं ते सार्थक होतं. संधीप्रकाशाचा पाठलाग करत अंधार आसमंतावर पसरत होता. मुग्ध झालेले आम्ही गुहेकडे प्रसन्न मनाने परतत होतो.


संधीप्रकाशात न्हाऊन निघालेला सिद्धगड !!!


गोरखगडाच्या पश्चिमेकडील गुहेतून दिसणारा सिद्धगड आणि सूर्यास्त !!!

गडद होत जाणारे पश्चिमरंग !!!
गोरखगडावर आत्तापर्यंत जितक्या ट्रेकर्सनी मुक्काम केला असेल त्यांच्यापैकी खूप कमी जण असे असतील की त्यांच्या मुक्कामाच्या वेळी संपूर्ण गडावर फक्त तेच असतील आणि बाकी एकाही माणसाचा मागमूस नाही. आम्ही अशाच काही ज्ञात - अज्ञात भाग्यवंतांपैकी एक झालो होतो. संपूर्ण गडावर नीरव शांतता पसरली होती. कसला गोंगाट नाही की कसली रहदारी नाही !!! चुलीचा भगभगणारा प्रकाश तेवढा उजेड निर्माण करत होता. बल्लवाचार्य सान्याने नव्या दमाच्या पुष्करला एकाच ट्रेकमध्ये सगळं काही शिकवण्याचा पण केला असावा. त्यामुळे लाकडं जमवण्यापासून ते चूल पेटवून खिचडी शिजेपर्यंतचे सगळे उद्योग पुष्करने (कसलीही कटकट न करता) सान्याच्या आदेशानुसार अगदी विनासायास पार पाडले होते. भोजनोत्तर पाचही जण गुहेपुढच्या अंगणात येउन विसावलो. आसमंतात माणसाचा पायरवही नव्हता आणि त्याच कमालीच्या शांत वातावरणात आम्ही भुतासारखे कसलाही उजेड न करता त्या अंगणात बसलो होतो. एकही शब्द न बोलता !!! रात्रीचं पिठूर चांदणं पडलं होतं. नभांगणात साम्राज्य होतं ते फक्त आणि फक्त लुकलुकणा-या ता-यांचं !!!!! त्यांच्या शीतल प्रकाशानेच सगळा आसमंत भारून टाकलेला होता. दूरवर कुठेतरी दिसणारे छोटे छोटे दिवे….तारांगणात पसरलेल्या त्या अगणित चांदण्यांच्या,नक्षत्रांच्या आणि ग्रहगोलांच्या प्रकाशात चिंब भिजलेला गोरखगडाचा माथा हे सारं अवर्णनीयच होतं.एरवी मिट्ट काळोखात भयाण..भेसूर वाटणारे आणि जास्तच अंगावर येणारे ते अहुप्याचे अजस्त्र कडे आज मात्र स्वत:लाच त्या चांदण्या रात्रीत शोधत होते !!! कसलेही विचार नाहीत की कसलेही त्रास नाहीत. तिथे ना भूतकाळाच्या कटु आठवणी होत्या ना भविष्याच्या सतावणा-या चिंता. ना कोणाचे रुसवे - फुगवे होते ना अर्धवट राहिलेल्या अपेक्षा !!! त-हेवाईक रहाटगाडग्याच्या शहरी वातावरणापासून आम्ही कित्येक कोस दूर आलो होतो. पुन्हा कधीच त्या चक्रात न अडकण्यासाठी !!! कृत्रिम बांधकामांच्या दुनियेत राहणा-या आपल्यासारख्यांना या नैसर्गिक कलाकृतींचं मोल काय आहे हे इथे आल्यावरच समजतं. लाखो ता-यांनी उजळून गेलेलं (कृत्रिम) नभांगण पाहायला कुठल्या बांधीव तारांगणाची गरजच काय !!! एकदा सह्याद्रीच्या कुठल्याही कड्यावर चांदण्या रात्रीत काही क्षण स्वत:ला विसरून बघा…त्या मानवनिर्मित तारांगणातला फोलपणा तुमचा तुम्हालाच जाणवेल. शहरात एकटे असल्याची नकोशी आणि खायला उठणारी जाणीव इथे आल्यावर हवीहवीशी का वाटू लागते ?? आपली वाटणारी माणसं अचानक निघून जातात तेव्हा नात्यांमधली दरी जाणवायला लागते पण असंख्य द-याखो-यांचा सम्राट असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत निवांत विसावलेलो असताना मात्र जवळची माणसंही काही क्षण दूर जावीत असं का वाटू लागतं ?? दाटून आलेल्या भावना...न संपणारे प्रश्न आणि त्यावरची अनुत्तरीत उत्तरं !!!  नीरव..नि:शब्द शांततेला हलकेच छेडणारे रातकिड्यांचे आवाज…गार वा-याची अंगावरून हलकीच जाणारी झुळूक…आज दिवसभराच्या स्मरणा-या असंख्य आठवणी… दुधात साखर असणारा आणि वातावरणाशी एकरूप झालेला हरिप्रसादांचा पहाडी आणि शिवकुमारांचा अंतर्ध्वनी…आयुष्याचं सार्थक झालं होतं !!!!!!   
सूर्योदयाचा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी आम्हाला झोपेतून जागं करायला कुठल्या गजराची गरज नव्हती !! सकाळी साडेपाचला उठून गुहेच्या बाहेर येउन बसलो तेव्हा पहाटेच्या गार वा-यांनी थंडीमध्ये भर घातली होती. हळू हळू तांबडं फुटू लागलं आणि तो अपूर्व सोहळा सुरु झाला !! अंधारात बुडालेल्या अहुप्याच्या त्या रौद्र रांगांमागून रंगांचे धुमारे फुटू लागले….सप्तरंगांची उधळण पूर्वक्षितिजावर सुरु झाली…मंत्रमुग्ध वातावरणाची जादू त्या वातावरणात पसरली…निसर्गाने तेजोनिधीच्या स्वागताची तयारी सुरु केली !!! बघता बघता वातावरण उजळून निघालं आणि तो तेजोभास्कर सह्याद्रीच्या कड्यांमागून प्रकटला !!! ते सारं फक्त अनुभवण्यासाठी होतं. व्यक्त करायला तेव्हाही शब्द नव्हते नि आत्ताही नाहीत…मनात ते चित्र पूर्णपणे रेखाटलं गेलंय…पण काय लिहू…शब्दच हरवलेत !!!

सूर्योदयाच्या सोहळ्याची सुरुवात !!!!


तांबड्या - गुलाबी रंगांची चालू झालेली उधळण !!!

एक नि:शब्द करणारं दृश्य !!!!

गोरखगडाच्या गुहेपाशी पिण्याच्या पाण्याची टाकी असली तरी ती खराब आहेत. गुहेपासून आपण डावीकडे गेलो की त्या वाटेवर डावीकडे पाण्याची टाकी आढळतात. हे पाणी मात्र पिण्यायोग्य आहे. गुहेपासून इथपर्यंतची वाट मात्र ब-यापैकी अरुंद असून इथे खबरदारी आवश्यकच आहे. या टाक्यांपासून पुढे गेलो की उजवीकडे दगडांवर एक झेंडा लावलेला असून इथे वाट डावीकडे वळते. ह्या झेंड्याच्या समोरच गोरखगडाच्या माथ्यावर जाण्यासाठी पाय-या खोदलेल्या असून आपण जर या डावीकडच्या वाटेने पुढे गेलो तर काल सूर्यास्त बघितलेल्या छोट्या गुहेजवळ म्हणजेच गडाच्या पश्चिम बाजूला येतो. गोरखगडाच्या माथ्याची ही पाय-यांची चढाई कमालीची थरारक आहे. मागे आ वासून बघणारी खोल दरी आणि त्यातून उठवलेला बेलाग मच्छिंद्रगड !!! यातल्या अर्ध्या वाटेवर एक गुहा खोदलेली आहे. या जवळपास सगळ्याच पाय-यांवर आरपार खोबण्या केलेल्या असून त्या आधारासाठी मात्र एकदम परफेक्ट आहेत. वीस मिनिटाच्या चढाईनंतर गोरखगडाच्या माथ्यावर आम्ही पाऊल टाकलं. देहरी गावातून दुर्लंघ्य वाटणारं हे शिखर प्रत्यक्षात तितकं कठीण नसलं तरी काही ठिकाणी काळजाचा ठोका चुकवणारं नक्कीच आहे. गोरखगडाचा माथा अगदीच निमुळता असून वर एक केशरी रंगाचं गोरक्षनाथांच समाधी असलेलं छोटेखानी मंदिर आहे. बाकी माथ्यावर अवशेष नाहीत. वरून नजारा मात्र अप्रतिम आहे. शेजारचा अभेद्य मच्छिंद्रगड,गोरखगडाचे पाठीराखे असलेले अहुप्याचे कडे,त्यांच्या पूर्वेकडे दिसणारे धाकोबा,दा-या घाट,जीवधन आणि नाणेघाट,पश्चिमेकडचा बुलंद आकाराचा सिद्धगड आणि वातावरण स्वछ असल्यास दिसणारे चंदेरी - म्हैसमाळ,मलंग आणि माहुली हा देखावा  अविस्मरणीय आहे !!

 गोरखगडाची मुख्य गुहा


गुहेच्या वरच्या बाजूला प्रस्तरारोहकांनी मारलेले बोल्ट्स आणि धातूच्या थाळ्या

गुहेतून दिसणारा मच्छिंद्रगड

गोरखगडाच्या माथ्याकडे नेणा-या पाय-या

पाय-यांचा खडा चढ

गोरखगडाच्या माथ्यावरचं गोरक्षनाथांचं मंदिर

गोरखगडाच्या माथ्यावरून दिसणारा मच्छिंद्रगड

गोरखगडाच्या माथ्यावरून सिद्धगड

आम्ही गुहेत परतलो. सान्याने अर्थातच पुष्करला हाताशी घेऊन पोह्यांची तयारी सुरु केली होती. त्या आधी अर्थातच कचरा साफ करण्याचा कार्यक्रम यथासांग पार पडला होता. आपल्या पुढच्या ट्रेकर्सना तरी निदान स्वच्छ गुहेचा आनंद लुटता यावा यासाठी !!!  रविवारचा दिवस असल्याने गडाच्या मार्गावर ट्रेकर्सची वर्दळ सुरु झाली होती. भोजनवेळेत देहरीत परतलो आणि हमीदभाईंच्या घरी मनसोक्त हादडलं. परतीच्या प्रवासाची तयारी सुरु झाली होती. आम्ही मात्र गोरखगडाच्या माथ्यावरच रेंगाळत होतो !!! कालचा मनोहारी सूर्यास्त…चांदण्या रात्रीतले ते अविस्मरणीय क्षण…त्यावेळी दाटून आलेल्या भावनांची गर्दी आणि त्याला त्या आसमंताने दिलेला न्याय…आजचा सूर्योदयाचा विलोभनीय सोहळा…आणि असं कितीतरी !!!! देहरीतून निघताना गोरखगडाकडे आपसूकच नजर गेली. गाडीने आता परतीचा प्रवास सुरु केला होता. रस्ता मागे पडत होता… वेळ पुढे सरकत होती आणि मन मात्र अजूनही गोरखगडाकडेच खेचलं जात होतं !!!

ओंकार ओक 

Comments

 1. Lai Bharrriiiiiiiii........!!!!!!!!!!!

  ReplyDelete
 2. Apratim varnan ani sundar Chchaayachitre....HPC ch Pahadi ani SKS ch Antardhwani aiklas ani to suddha Gorakhgadavar?.....chyayla nashibvaan ahes tu....mazya trek group madhlya ekahi mitrala Classical chi ajibaat aawad nahi...kimbahuna classical wagaire kaay asta hyachi kahich mahitich naahi...trek madhye classical aiknyachi maja kahi aurch....uchch tandri laagte Pt.SKS hyanchi Antardhwani aaiktaana....ani saathila Pt.Bhavani Shankar hyanche Pakhwaaj...ani ho to Cave madhun Sandhyakalch Suryast ch snap afaat aalay.....bhareee....

  ReplyDelete
 3. Best Marathi blog I have ever read! Each word is a gold! Keep it up, Onkar! I wish I could write so beautifully in Marathi!

  ReplyDelete
 4. Aprateem Lihitos re baba ! no words.

  ReplyDelete
 5. कृत्रिम बांधकामांच्या दुनियेत राहणा-या आपल्यासारख्यांना या नैसर्गिक कलाकृतींचं मोल काय आहे हे इथे आल्यावरच समजतं. लाखो ता-यांनी उजळून गेलेलं (कृत्रिम) नभांगण पाहायला कुठल्या बांधीव तारांगणाची गरजच काय !!! एकदा सह्याद्रीच्या कुठल्याही कड्यावर चांदण्या रात्रीत काही क्षण स्वत:ला विसरून बघा…त्या मानवनिर्मित तारांगणातला फोलपणा तुमचा तुम्हालाच जाणवेल. शहरात एकटे असल्याची नकोशी आणि खायला उठणारी जाणीव इथे आल्यावर हवीहवीशी का वाटू लागते ?? आपली वाटणारी माणसं अचानक निघून जातात तेव्हा नात्यांमधली दरी जाणवायला लागते पण असंख्य द-याखो-यांचा सम्राट असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत निवांत विसावलेलो असताना मात्र जवळची माणसंही काही क्षण दूर जावीत असं का वाटू लागतं ?? दाटून आलेल्या भावना...न संपणारे प्रश्न आणि त्यावरची अनुत्तरीत उत्तरं !!!

  Very nice!!

  ReplyDelete
 6. Hi,
  Excellent article.Can you paste some photos of the small cave facing Siddhagad..also, how to reach that cave?

  ReplyDelete
 7. अतिशय सुंदर वर्णन..
  गोरखगडच्या ट्रेकसाठी मला आत्ता पर्यंत तीन ते चार वेळा बोलावण्यात आल होत पण जाण्याचा योग अजुन तरी काही जुळून आलेला नाही.. आणि कधी जुळून येणार तेही माहीत नाही पण तू जे वर्णन केले आहेस त्यामुळे नकळत मी सुद्धा ह्या ट्रेकचा एक भाग असल्याची जाणीव झाली..
  आभारी आहे मित्रा इतके छान वर्णन केलेस त्याबद्दल..

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड