गिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग एक


कोणत्याही गोष्टीत यश मिळवायचं असेल तर त्याची नशा चढावी लागते असं म्हणतात. एकदा का त्या गोष्टीनं तुम्हाला झपाटून टाकलं की ती तडीस नेण्याची मजाच वेगळी असते.महाराष्ट्रातल्या तमाम गिर्यारोहकांवर असंच एक गारुड स्वार झालंय. त्याचं नाव आहे "सह्याद्री" !!! आज सह्याद्री प्रत्येक गिर्यारोहकाचा केवळ छंदच नाही तर आयुष्य बनला आहे. त्याच्या द-याखो-यातून रानोमाळ भटकण्याचं लागलेलं व्यसन हे जगातलं सगळ्यात "पॉझीटिव्ह" व्यसन असावं आणि ते सुटावं अशी अपेक्षाही नाही !!!
नाशिक जिल्हा !!! महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त डोंगरी किल्ले उराशी बाळगणारा प्रदेश म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या जिल्ह्याची बातच काही और आहे !! हातगड - अचला पासून ते साल्हेर - मुल्हेर पर्यंत आणि आड - पट्ट्यापासून ते गाळणा - कंकराळ्या पर्यंत एकापेक्षा एक सरस आणि सुरम्य गिरिदुर्ग या नाशिक जिल्ह्याने धारण केले आहेत. या जिल्ह्यातल्या डोंगररांगा सुद्धा तितक्याच वेधक. सेलबारी - डोलबारी असो किंवा त्र्यंबक - वाघेरा ची रांग…स्वत:च आपलं एक खास वैशिष्ट्य आहे. पण या सगळ्याची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणजे सातमाळा रांग !!! चौदा अभेद्य आणि 'एक से एक' गिरिदुर्गांची मालिका या रांगेला सह्याद्रीने बहाल केली आहे. यातला एक एक दुर्ग म्हणजे प्रत्येक गिर्यारोहकाचं 'ड्रीम डेस्टिनेशन'!!! जानेवारी २०१३ मध्ये मार्कंडया,रवळ्या - जवळया,सप्तशृंगच्या रूपाने अस्मादिकांनी या रांगेच्या शुभारंभाचा नारळ फोडला होता. तेव्हापासूनच या रांगेतल्या प्रत्येक डोंगराने जणू काही झपाटून टाकलं. जून महिना उजाडला. पहिल्याच आठवडयात पावसाने पुण्यात थैमान घालायला सुरुवात केली. त्यामुळे दोन दिवसांची सुट्टी सत्कारणी लावायला सातमाळेसारखा ऑप्शन शोधूनही सापडला नसता. नाशिक जिल्ह्यात त्या आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण अगदी नगण्य होतं. अखेर फोन खणाणले…पर्याय निवडले… होकार मिळाले आणि मोहीम ठरली. दोन दिवसात सातमाळा रांगेतले बिनीचे किल्ले अर्थात हातगड,अचला,अहिवंत आणि रांगेच्या थोडासा शेवटच्या भागात वसलेला कण्हेरा उर्फ कण्हेरगड !! चार किल्ल्यांची परिपूर्ण डोंगरयात्रा !! या ट्रेकच्या मॅनेजमेंटची जबाबदारी अर्थातच माझ्यावर येउन पडलेली. त्यामुळे दोन दिवसांचा 'पिल्यान' बाकीच्या पंचमहाभूतांना समजावून सांगण्याकरता गुरुवारी जेव्हा आम्ही 'बेडेकर' वर जमलो तेव्हा उपस्थितांच्या चेहे-यावर इंजिनियरिंगच्या पोरांना भारताची राज्यघटना लिहायला सांगितल्यासारखे काहीतरी विचित्र भाव होते. अखेर आपल्याला दोन दिवसात एव्हरेस्ट सर करायचे नसून सह्याद्रीतले चार किल्लेच बघायचे आहेत हे त्यांना पटवून द्यायला मला अर्धा तास लागला. पुढच्या कहाणीला सुरुवात करण्याआधी मला या बाकीच्या टाळक्यांची ओळख करून द्यावी लागेल. 
चिन्मय कानडे - चिन्या - आमच्यातलं त्यातल्या त्यात स्कॉलर कार्ट. सध्या रशियात डॉक्टर व्हायचा प्रयत्न करतोय (पण आम्ही सुचवलेल्या विषयावर स्पेशलायझेशन करण्याचा सल्ला मात्र त्याने साफ नाकारला आहे !!!). 
निखिल फडके - पका - इंजिनियरिंगची एक सीट वाया घालवणारा विद्यार्थी. आम्ही याला 'पका' हे नाव का पाडलं याचा शोध आम्हालाही आजपर्यंत लागलेला नाही.'इंजिनियरिंग का करू नये' यावर याचं अनुभवात्मक व्याख्यान ठेवल्यास इंजिनियरिंगच्या एखाद्या नामवंत कॉलेजने स्थापनेपासून जेवढा नफा कमावला नसेल तेवढा नफा ह्या व्याख्यानाचे संयोजक काही तासात कमावतील !!  
ओंकार गोखले - गोखले - इंजिनियरिंग पूर्ण झालं आहे. ह्याचा आमच्याबरोबरचा आणि आयुष्यातलाही चौथा पाचवा ट्रेक. त्यामुळे तसा नवीन गडी. अत्यंत शांत आणि गरीब स्वभावाचं गुणी बाळ. ट्रेकमधलं गि-हाईक. याच्या गरीब स्वभावाचा फायदा चिन्मयने कसा घेतला हे पुढे येइलंच. 
ऋग्वेद गुपचूप - (कधीपासून) सी.ए. करतोय. पण ' बॅलन्स शिट मध्ये लॉस आल्यावर तो नक्की कुठे टाकावा ' याचं उत्तर याला शेवटपर्यंत सापडलं नाही. पकाच्या बिल्डींगमध्ये राहतो. पण याचं गडगडाटी हास्य ऐकून दुर्योधानानंही लज्जेनं मान खाली घातली असती यावर आमचं एकमत झालं आहे. 
ऋतुराज सफई - ऋत्या -  इंजिनियरिंग पूर्ण झालं आहे. ऑफिसमध्ये आणि ट्रेकमध्येही बॉसच्या तुडुंब शिव्या खाणारा गुणवंत कामगार. फिटनेस उत्तम. 
आणि
अस्मादिक - स्वमुखे स्वस्तुती करू नये असं समर्थांनी लिहून ठेवलं आहे !!!
यातले मी, चिन्मय आणि पका एकाच शाळेतले,एकाच वर्गातले आणि एकाच बॅचचे विद्यार्थी. बाकीचे तीन आमच्याच शाळेतले पण आमच्यापेक्षा वयाने (आणि अनुभवानेही !!) लहान. याशिवाय अजून एक मेंबर आमच्यात ऐनवेळी वाढला होता. यशवंत चौधरी उर्फ काका. आमच्या गाडीचे ड्रायव्हर. एकदम मस्त माणूस आणि कुशल सारथी. संपूर्ण ट्रेकमध्ये वागण्याबोलण्यातून कुठेही ' डायवरी गुर्मी ' आम्हाला कधीही जाणवली नाही. ट्रेक वेळेत पूर्ण करण्यात काकांचाही सिंहाचा वाटा होता. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता आम्ही पुणं सोडलं तेव्हा पावसाची रिपरिप सुरूच होती. आपण शहरातून कधी एकदा बाहेर पडतोय याची घाई काकांपेक्षा चिन्मयलाच जास्त झाली होती. कारण चाकणला पोहोचताचक्षणी त्याने विचारलेल्या 'एकशे एकोणतीस वॅट + पस्तीस कोलंब  = किती गिगाबाईट ' या 'पाच पेरू  + तीन वडे = किती अंडी ' असल्या धर्तीवरच्या प्रश्नाने गोखलेला ए.सी. सुरु असतानाही दरदरून घाम फुटला !! हा प्रश्न म्हणजे गोखलेवर भविष्यात होणा-या मानसिक अत्याचारांचं चिन्मयानंदांनी केलेलं जाहीर सुतोवाच होतं. मग शाळेतल्या शिक्षकांच्या बोलण्याच्या विशिष्ट पद्धती,शाळेतले अविवाहित शिक्षक आणि शिक्षिका आणि त्यांची (ब-याचदा आपापसातही) फसलेली प्रेमप्रकरणं,जीव तोडून शिकवणारे शिक्षक विरुद्ध जीव घ्यायला टपलेले शिक्षक असल्या विषयांचा आमच्याकडे कसलाही तुटवडा नव्हता. हे चर्चासत्र चंदनापुरी घाटातल्या आमच्या आवडत्या ' लक्ष्मी ' ढाब्यावर गाडी जेवणासाठी थांबेपर्यंत सुरु राहिलं. लक्ष्मी ढाबा हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो. चोवीस तास सुरु असणारं हे हॉटेल दिवस आणि रात्रीचे आचारी वेगळे असूनही अप्रतिम चवीचं जेवण सदासर्वदा कसंकाय देऊ शकतं हे मला आजपर्यंत न सुटलेलं कोडं आहे. आपण ' नाशिक ' जिल्ह्याच्या ट्रेकला आलो आहोत हे विसरून उपस्थितांनी यथेच्छ हादडलं. जेवणानंतर तरी गाडीतला गोंधळ कमी होईल हा माझा अंदाज साफ खोटा ठरवत पोटात चार घास गेल्याने हा आवाज चारपटीने वाढला. नाशिक रोडला आम्ही पोचलो तेव्हा नाशिक जिल्ह्यातल्या किल्ल्यांवर अप्रतिम पुस्तक लिहिणारे माझे गिर्यारोहक मित्र आणि नाशिकच्या 'वैनतेय' गिर्यारोहण संस्थेचे पदाधिकारी श्री. संजय अमृतकर यांनी (रात्री बारा वाजलेले असूनही) त्यांच्या घरी येण्याचा केलेला प्रेमळ आग्रह मात्र माझ्याकडून मोडवला गेला नाही. पुढचा मार्ग नीट समजावून घेवून आम्ही नाशिक रोड सोडलं. गाडी आता दिंडोरीमार्गे सापुतारा रस्त्याला लागली होती. आजचा पहिला किल्ला होता हातगड !!
सापुतारा हे गुजरातमधलं सुप्रसिद्ध हिल स्टेशन. गुजरात आणि नाशिककडच्या पर्यटकांचं महाबळेश्वर !! याच सापुता-याच्या अलीकडे पाच किलोमीटर्स वर महाराष्ट्र - गुजरातच्या सीमेवरचा हातगड हा छोटासा किल्ला वसला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला हातगड याच नावाचं गाव आहे . हातगड गावाच्या मारुती मंदिराबाहेर साडेपाच वाजता चहाची तयारी करायला म्हणून आम्ही चुलीसाठी काटक्या जमवू लागलो. चहाचं सामान घरून आणण्याची जबाबदारी गोखलेवर सोपवण्यात आली होती. पण त्याने आणलेल्या पातेल्याचा आकार बघून यात प्रत्येकाला  वैयक्तिकरित्या स्वत:चा चहा बनवून घ्यावा लागेल याविषयी कोणाचंही दुमत नव्हतं. गोखले आपण घरात चहासाठी वापरतो तसलं पातेलं घेऊन आला  होता !!! ट्रेकच्या पहिल्याच सकाळी चिन्मयच्या टीकात्मक शिव्या खाण्याचा बहुमान गोखलेनं कोणीही न सांगता पटकावला होता. शेवटी सापुतारा रोडवरच्या एका चहावाल्याचा आश्रय घेणं आम्हाला भाग पडलं. पण त्या महापुरुषाने सात जणांचा चहा बनवण्यासाठी जेवढा वेळ घेतला त्या वेळात चिन्मयच्या हस्ते एखादी बायपास सर्जरी सहज पार पडली असती. त्याने गवती चहाच्या नावाखाली दिलेलं रसायन बघून आपण मॅगीच्या मसाल्याचं पाणी चहा समजून प्यायलं असतं तर किती बरं झालं असतं हा विचार प्रत्येकाच्या मनाला त्या परिस्थितीतही शिवून गेला !!! या सगळ्यामध्ये एकाच गोष्ट आनंद देणारी होती आणि ती म्हणजे हातगड किल्ल्याच्या नव्वद टक्के भागापर्यंत गाडीचा लाल मातीचा रस्ता गेला आहे. सध्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरु असून पुढच्या वर्षी किल्ल्याच्या पाय-यांपर्यंत डांबरी रस्ता होणार असल्याची माहिती चहावाल्याने पुरवली. वणीच्या बाजूने आपण सापुतारा कडे यायला लागलो की मध्ये बोरगाव हे तसं मोठं असलेलं गाव लागतं.  बोरगाव पासून सापुता-याकडे जातानाच हातगडचा चौकोनी आकार नजरेत भरतो. सापुतारा चार - पाच किलोमीटर्सवर राहिलेलं असताना उजवीकडे कळवण,सटाणा,अभोणा या गावांकडे जाणारा रस्ता व त्याची दिशादर्शक कमान दिसते. या कमानीतून आत गेल्यावर हातगड गाव आहे. पण हातगड किल्ल्यावर जायला हातगड गावात जाण्याचं काहीच कारण नाही. या कमानीतून न वळता आपण सापुता-याच्या दिशेने जाऊ लागलो की उजवीकडे 'आनंदो रिसोर्ट' नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलच्या लगेचच पुढे उजवीकडे गेलेला लाल मातीचा रस्ता किल्ल्यावर गेला आहे. सध्या मिनीबस सहज जाऊ शकेल इतक्या रुंदीचा हा रस्ता बनविण्यात आला आहे. हा रस्ता थेट किल्ल्याच्या पाय-या जिथे सुरु होतात तिथपर्यंत गेला आहे. 

सर्व फोटोज © ओंकार ओक

हातगडकडे जाताना दिसणारा अचला किल्ला (उजवीकडे) आणि तौला शिखर (डावीकडे)
हातगड गावातून हातगड किल्ला
  
हातगड किल्ल्यावर गेलेला गाडीचा रस्ता.

गाडीरस्ता जिथे संपतो तिथून लगेचच पुढे किल्ल्याच्या पाय-या सुरु होतात. या पाय-यांकडे जाताना उजवीकडे थोडसं वरच्या बाजूला कातळाच्या पोटात पाण्याचं भलंमोठं टाकं आहे. किल्ल्याच्या पाय-या चढून गेल्यावर समोर गडाचा पहिला कमान हरवलेला दरवाजा असून त्याच्यावरच शरभाचं शिल्प कोरलेलं आहे. त्याला सध्या शेंदूर फासण्यात आलेला आहे. दरवाजातून आत गेलं की लगेचच डावीकडे दोन मराठी शिलालेख दिसतात. त्यांच्यावरची अक्षरं मात्र अस्पष्ट झाली आहेत. पुढे आपण काही पाय-या चढून गेलो की गडाचा पूर्णपणे कातळात खोदून काढलेला तिसरा दरवाजा असून त्याच्यापुढे हरिहर किंवा गोरखगडासारखा भुयारी मार्ग आहे. याच दरवाजात उजवीकडे एक छोटी गुहा असून तिथे सध्या एका साधुबाबांनी आपला संसार मांडला आहे. तिस-या दरवाजातून पाय-या चढून पुढे जाताना उजवीकडे आपल्याला खांब असलेल्या छोटया गुहा पाहायला मिळतात तर याच वाटेवर डावीकडे शेंदूर फसलेली मारुतीची कातळात कोरलेली मूर्ती देखील आहे. हातगडाचं चौथं प्रवेशद्वार मात्र देखणं असून त्यातून पुढे पाय-या चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. शेवटच्या काही पाय-या चढताना उजवीकडे एक कोरीव दगड बघण्यासारखा आहे. 


 हातगडाचे पहिले व दुसरे प्रवेशद्वार 


पहिल्या दरवाजावरील शरभशिल्प

पहिल्या दरवाजा जवळील मराठी शिलालेख

हातगडाचे तिसरे प्रवेशद्वार

 हातगडाचा चौथा दरवाजा 

चौथ्या दरवाजातून आपण हातगडाच्या माथ्यावर प्रवेश केल्या केल्या गडाचा एकूणच विस्तार आपल्या लक्षात येतो. गडमाथ्यावर पोहोचल्यावर डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन वाटा गेलेल्या आहेत. डावीकडच्या वाटेने गेल्यावर गडाची एकसलग तटबंदी असून तिच्यात एक छोटीशी कमानही आहे. या बाजूला एका पीराचे स्थान असून त्याच्या मागेच गडाच्या तटबंदीवर बांधलेल्या सुरेख चर्या आहेत. पाण्याची काही टाकीही आपल्याला या बाजूला बघायला मिळतात. 

हातगडावरील एकसलग तटबंदी

तटबंदीच्या भागातील बांधकामांचे अवशेष

गडाच्या तटबंदीवरील चर्या 

हातगडाचा संपूर्ण गाभा हा त्याच्या बालेकिल्ल्याच्या परिसरात सामावला आहे. बालेकिल्ल्याच्या परिसरात अवशेषांची अक्षरश: रेलचेल असून त्यात दोन कोठारं,पाण्याची टाकी,एक अतिशय सुंदर असा तलाव,शिवलिंग व नंदी, एक सुटा बुरुज,राजवाड्याचे व इतर बांधकामांचे भग्नावशेष आणि इतर ब-याच गोष्टी आहेत. हातगड किल्ल्यावरच्या सगळ्याच वस्तूंचे फोटो इथे देता येणं शक्य नाही कारण किल्ल्यावर इतक्या वास्तू आहेत की संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघायला कमीत कमी एक ते दीड तास लागतो. हातगडवरच्या काही वास्तू डोळ्याचं पारणं फेडणा-या आहेत !! आकाराने लहान असला तरी हातगड एकाच भेटीत बरंच काही देऊन जातो. वणी - सापुतारा सारख्या प्रमुख वाहतुकीच्या मार्गावर वसलेला हा किल्ला जवळपास वरपर्यंत गाडी जात असल्याने सहकुटुंबही अगदी सहज भेट देण्यासारखा आहे !!!

 हातगड किल्ल्यावरील तलाव 

हातगड किल्ल्यावरील कोठार व त्याच्या शेजारी असलेली छोटेखानी कमान 


हातगड किल्ल्यावरील उध्वस्त वास्तूंचे अवशेष 

किल्ल्यावरील आणखी एक कोठार

हातगड किल्ल्याची माची

किल्ल्यावरील बांधकामाचे अवशेष आणि पाण्याचे टाके

किल्ल्यावरील सुटा बुरुज

बालेकिल्ल्यावरील उध्वस्त बांधकामे

हातगड गावाचा कोवळ्या उन्हातील सुंदर नजारा

हातगड बघून साडेनऊच्या सुमारास आम्ही पिंपरी अचलाच्या फाट्याजवळ पोहोचलो तेव्हा डावीकडे दिसणा-या अचला आणि तौलाच्या अजस्त्र आकाराने आम्हाला धडकीच भरली. दिवसाची सुरुवातच हातगड सारख्या सुखवस्तू किल्ल्याने झालेली. त्यात अचला सारखा सातमाळा रांगेतल्या ' दादा ' किल्ल्यांपैकी एक किल्ला चढायची आपली शारीरिक आणि मानसिक तयारी झाली आहे की नाही हा विचार करण्यातच आमचा बराच वेळ गेला !! पिंपरी अचलाच्या फाट्यावर साईराज नावाचं ट्रेकर्सना चहा नाष्ट्या साठी उत्तम असं हॉटेल आहे. हॉटेलचे मालकही पिंपरी अचला गावचेच निघाले.  "ह्यो किल्ला ??? दिवस खातो. दिसतो तेवढा सोपा नाही. लय वंगाळ चढावं लागतं. " ह्या त्यांच्या अनुभवात्मक वाक्यांनी म्हणा किंवा हॉटेलच्या शेडमधून दिसणा-या आणि आभाळात घुसलेल्या अचला आणि तौलाच्या आकाराने म्हणा,  आम्हाला मिसळीचे दोन घास नकळतपणे कमी गेले हे बहुदा त्यांच्याही लक्षात आलं असावं !! नाशिकहून वणी मार्गे सापुता-याला जाताना बोरगावच्या अलीकडे उजवीकडे पिंपरी अचला गावाचा फाटा आहे. ह्या फाट्याहून आतमध्ये शिरलं की पिंपरी अचला उर्फ स्थानिक भाषेत 'पिंपरी आंचल' नावाचं गाव लागतं. गावातून सरळ जाणारा रस्ता हा अहिवंतवाडी मार्गे वणी - नांदुरी - कळवण रस्त्याला जाउन मिळाला आहे तर डावीकडचा रस्ता अचला पायथ्याच्या 'दगड पिंप्री' या गावात जाउन थांबला आहेत. या फाट्यावर वळताना दिसणा-या आणि सुमारे सहा -सात फुट उंचीच्या वीरगळीही प्रेक्षणीय आहेत. दगड पिंप्रीच्या सुनील भुसारला मी गाडीतूनच फोन लावला. "दादा,मी वणीला आलोय. पण गावात माझं नाव सांगा. कोनी पन तुमाला गडावर घेऊन जाईल . " इति सुनील. दगड पिंप्री गावातलं अजून एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे रवी डंबाळे. कोणत्याही गिर्यारोहकाला गडावर घेऊन जायचं म्हटलं तर गावातले लोक आधी रवीचंच नाव सुचवतात. पण आम्ही गावात पोहोचून चौकशी केली तेव्हा रवीसुद्धा कामानिमित्त बाहेर गेला होता. तसं अचला किल्ल्याची वाट दाखवायला स्थानिक माणसाची गरज नाही. पण अचानक दाटून आलेलं आभाळ आणि नवखा प्रदेश यामुळे आम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती. वर वाटेत समजा पावसानं झोडपलं आणि त्यात जर गडावर धुकं आलं तर हाताशी असलेला वेळही फुकट जाण्याची शक्यता होती. शनिवार असल्याने गावातली बाकीची तरुण मंडळीही कामावर गेल्याने सध्या तुम्हाला गडावर घेऊन जायला कोणीही नाही असा निर्वाळा देऊन दगड पिंप्रीच्या ग्रामस्थांनी असमर्थता दर्शवली.  नाईलाजाने आम्ही गडाचा रस्ता विचारून घेतला आणि गडाच्या दिशेची शेतं तुडवायला सुरुवात केली. गावापासून मोजून पाचशे फुट गेलो असू आणि तितक्यात मागून गावक-यांच्या हाका ऐकू यायला लागल्या, "दादा थांबा,रवी आलाय बाहेरून. तो येतोय तुमच्या बरोबर." व्वा !!! याला म्हणतात नशीब. रवी आणि त्याचा गुलाब चौधरी नावाचा एक मित्र असे दोघं आमच्या टोळक्यात सामील झाले. आम्ही आता अचलाच्या खिंडीची वाट धरली. 
दगड पिंप्रीच्या वाटेवरून तौला आणि अचला

दगड पिंप्रीच्या मारुती मंदिरा बाहेरील कीर्तीसुरमुख शिल्प  

अचला किल्ला

दगड पिंप्रीमधून अचला कडे पाहिलं की त्याच्या उजवीकडे एक खिंड दिसते आणि त्या खिंडीत एक झेंडा लावलेला दिसतो. दगड पिंप्रीतून निघाल्यापासून अर्ध्यातासात आम्ही त्या खिंडीत पोहोचलो. या खिंडीत पत्र्याचं छप्पर असलेलं एक मंदिर असून मंदिराच्या मागून गेलेली वाट एक खिंड पार करून पलीकडच्या बिलवडी गावात उतरते आणि तिथून अहिवंतगडावर जाते. सध्या या वाटेवर रस्ता करण्याचं काम सुरु आहे. या मंदिरापासून वीसेक मिनिटांचा छोटा चढ चढला की आपण अचलाच्या वाटेवरच्या एका मोठ्या पठारावर येउन पोहोचतो. या पठारावर मारुतीची शेंदूर लावलेली एक मूर्ती असून इथून दिसणारा अचलाचा भव्य कातळकडा मात्र नजरेत भरतो. गडाची चाळीस टक्के चढाई संपल्याची खूण म्हणजे हे पठार. भर्राट वा-याचा झोत सुखावायला लागला. विश्रांतीची संधी साधून पका आणि मंडळी गोखलेची शाळा घायला सुरुवात करणार इतक्यात मी मुद्दयाला हात घातला.
"काय करतोस तू ??" मी रवीला विचारलं. 
'बारावी पास झालोय. आता कॉलेजात जायचंय. " रवी. 
"किती टक्के पडले बारावीत ???" आता जो प्रश्न मी मुद्दाम टाळण्याचा प्रयत्न करत होतो नेमका तोच प्रश्न ग्रुपातल्या कोणाच्या तरी तोंडून निघून माझ्या आणि रवीच्या कानावर येउन आदळला. 
"सत्तर.डिस्टिंक्शन आहे !!!" बसमध्ये किंवा लोकलमध्ये नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीशी बोलता बोलता सहज गणिताचा विषय निघावा आणि आपण केवळ त्याचं नॉलेज तपासून बघण्यासाठी कुत्सितपणे M2 M3 च्या लेव्हलचं गणित विचारल्यावर "मी ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी मधून गणितात गोल्ड मेडल मिळवलं आहे. " हे त्याचं उत्तर ऐकून आपली काय अवस्था होईल तसले काहीतरी भाव प्रश्नकर्त्याच्या चेहे-यावर उमटले !!!
"बराच वेळ राहिलाय का रे अजून ??" लज्जेखातर झालेल्या या विषयबदलातील अगतिकता बहुतेक रवीच्याही लक्षात आली. कारण पुस्तक समोर ठेवून जरी आपल्याला बारावीचे पेपर लिहायला लावले तरी इतके टक्के आपल्याला सात जन्मातही पडणार नाहीत असला काहीतरी पडेल सूर त्या प्रश्नात होता !!!
"ह्ये काय इथंच. ह्ये टयेपाड चढलं की मंग आडवीच वाट आहे. " अचलाच्या कातळपोटाशी जाउन विसावणा-या एका खड्या चढणीकडे रवीनं बोट दाखवलं. त्या चढाचा अंश बघतचक्षणी हा चढ आपला घाम काढणार हे समस्तांच्या लक्षात आलं. रवी आणि गुलाबच्या मागून बारा पावलं आता निमूटपणे अचलाच्या धारेचा चढ चढू लागली. दहा - पंधरा मिनिटातच फुललेल्या श्वासांचे आवाज कानी पडू लागले. पाऊस नसला तरी हवेतल्या दमटपणाने चढ नकोसा केला होता. पाच - दहा पावलांनंतर दोन - तीन मिनिटांच्या विश्रांतीसाठीचे थांबे होऊ लागले. अचलाचा कातळमाथा आता अंगावर येऊ लागला. पूर्वेकडे त्रिकोणी आकाराचा भैरोबा डोंगर आणि त्याच्या मागच्या अहिवंतचा विस्तारही नजरेत भरला. वा-याचे झोत सुरु झाले. शेवटच्या टप्प्यात कातळाच्या पोटातल्या खोदीव पावट्या लागल्या आणि अखेर फार कुठेही वेळ न घालवता आम्ही अचला माथ्याकडे नेणा-या आडव्या वाटेच्या सुरुवातीलाच असलेल्या छोटया गुहेत विसावलो. पूर्वेला अहिवंत,त्याच्या मागे मार्कंडया,सप्तशृंग,रवळ्या - जवळयाचं सुरेख दर्शन झालं.  पठारावरून निघाल्यापासून पंचवीस मिनिटात आम्ही तो चढ पार केला होता. खड्या चढाची कृपा कारण त्याने आम्हाला मोठ्या विश्रांतीचा मौकाच दिला नव्हता !!

अचलाच्या पहिल्या खिंडीतलं मंदिर. याच्या मागून गेलेली वाट बिलवडी मार्गे अहिवंतवर गेली आहे.  

भैरोबा डोंगर आणि मागे अहिवंतगड. भैरोबा डोंगराच्या पायथ्याला कच्चा गाडी रस्ता दिसतोय. 

अचलाच्या पहिल्या पठारावरचं मारुतीचं शिल्प आणि मागे अचला किल्ला  

अचला किल्ल्याचा अंगावर येणारा खडा चढ

अचलाच्या कातळकड्याच्या पोटातून माथ्याकडे नेणारी आडवी वाट. वाटेवर पुढे रवी आणि मागे गुलाब. 

कातळकड्याच्या पोटातून गेलेली आडवी वाट काही वेळाने पुन्हा चढाचं रूप धारण करते आणि शेवटी गडमाथ्यावर जाउन विसावते. या वाटेवर गडाच्या काही पाय-या सुरु होतात. गडमाथ्याकडे जाताना वाटेत पाण्याची काही कोरडी टाकी आहेत. पण मुख्य माथ्याच्या थोडसं खाली पाण्याच्या जोडटाक्यांचा समूह असून शेजारीच एका झाडाखाली काही मूर्त्या ठेवल्या आहेत. अचलाच्या माथ्यावरची टाकी बारमाही नसावीत कारण आम्ही जूनच्या पहिल्या आठवडयात जाऊनही गडाच्या एकाही टाक्यात पाणी मिळालं नाही. याचा अर्थ मागचा उन्हाळा आणि हिवाळ्यातही गडावर पाण्याची वानवा असावी. त्यामुळे गडावर फक्त पावसाळ्यात पाणी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. या पाण्याच्या टाक्यांपासून गडमाथा फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर आहे. शेवटची खडी चढण पार झाली आणि अखेर दगड पिंप्रीहून निघाल्यापासून दोन तासात आम्ही गडमाथा गाठण्यात यशस्वी झालो होतो. आनंदवनभुवनी !!! गडमाथ्यावर सध्या काहीही अवशेष नाहीत पण वरून पश्चिमेकडे दिसणा-या तौला शिखराचा देखावा मात्र केवळ अविस्मरणीय आहे. भर्राट वा-यात विसावलेल्या आम्हा सुखी जीवांना सह्याद्रीने पण त्याची अनेक रुपं अचला माथ्यावरून उलगडून दाखवली !! साडेअकरा वाजत आले होते. आमच्या आधीच्या प्लॅनप्रमाणे आज हातगड आणि अचला बघून अहिवंतच्या पायथ्याच्या दरेगावात मुक्कामी जायचं होतं. पण अपेक्षेपेक्षा हातगड आणि अचला वेळेच्या आत बघून झाले होते. पूर्ण दिवस हातात होता. त्यामुळे आजच कण्हेरा करून उद्या अहिवंत बरोबर आणखी एखादा किल्ला जोडता येईल असा प्रस्ताव मी बाकीच्यांसमोर मांडला. सातमाळेतला आणखी एक किल्ला विनासायास बोनस मिळतोय म्हणल्यावर त्याला नकार येण्याचा प्रश्नच नव्हता. लागलीच आम्ही अचला उतरायला सुरुवात केली. ढगांचा गडगडाट सुरु झाला. पण आता त्याची फिकीर नव्हती. सातमाळा रांगेतला आणखी एक बहारदार किल्ला आज खात्यात जमा झाला होता !!!

अचला माथ्याकडे नेणा-या खोदीव पाय-या 


अचला माथ्याकडे जाताना लागणारं पाण्याचं कोरडं टाकं

अचलावरील टाकीसमूह 

किल्ल्याचा सर्वोच्च माथा

अचला माथ्यावरून होणारं तौला शिखराचं लाजवाब दर्शन...!!

दगड पिंप्रीमधील कोरीव स्तंभ

किल्ले अचला… एक दिलखुलास अनुभव !!!

आम्ही दगड पिंप्रीमध्ये परतलो. रवी आणि गुलाबला त्याची बक्षिसी दिली आणि गावात कपडेवाटपाचा कार्यक्रमही पार पाडला. सह्याद्रीच्या द-याखो-यांमध्ये राहणा-या या भूमिपुत्रांच्या प्रती असलेली एक कृतज्ञता म्हणून आम्ही जवळपास प्रत्येक ट्रेकमध्ये कपडे किंवा खाऊवाटप करत असतो. त्यांच्या चेहे-यावरून ओसंडून वाहणारा निरागस आनंद हीच आपण त्यांच्याप्रती ठेवलेल्या जाणीवेची खरी पावती असते !!!
पिंपरी अचला गावामधून आम्ही अहिवंतवाडीमार्गे वणी - नांदुरी - कळवण रस्त्याकडे निघालो तेव्हा दीड वाजला होता. पिंपरी अचला सोडताचक्षणी इतका वेळ मौनावस्थेत असलेलं चिन्मय आणि पकाचं तोंड गोखलेच्या दिशेने फिरलं आणि तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असे प्रश्न 'कंपल्सरी भोगायचे भोग' या नावाखाली गोखलेच्या नशिबी आले !!! पिंपरी अचला ते कण्हेरा पायथा या सुमारे तासा - दीड तासाच्या प्रवासात गोखलेवर अक्षरश: फायर झालेले काही प्रश्न पुढीलप्रमाणे - 

"गुजरातच्या नैऋत्येला काय आहे आणि गुजरात कशाच्या वायव्येला आहे ??"
"गीतेमध्ये विशद केलेला कर्मयोगाचा सिद्धांत आणि त्यावर लोकमान्यांनी गीतारहस्यातून केलेली मीमांसा यावर पाच मिनिटं बोलून दाखव. "
"सेंद्रिय खताची निर्मिती आणि गांडूळखताचे व्यवस्थापन यातले फरक स्पष्ट कर. "
"हृदयविकार आणि मलेरिया यात काय साम्य आहे याचं संदर्भासहित विश्लेषण दे.
"राहुल रॉयचे दहा सुपरहिट सिनेमे कोणते ?? (याचं उत्तर खुद्द राहुल रॉयही देऊ शकणार नाही !!!). "
"कसाब आणि अफझल गुरुची वंशावळ सांग."
"समजा फेसबुक गुगलने टेकओव्हर केलं तर गुगल फेसबुकला किती गुडविल देईल याची बॅलन्स शिट तीस सेकंदात मांडून दाखव. "
"गब्बरसिंग,मोगॅम्बो आणि शक्ती कपूर यांचे कोणते गुण तुझ्यासाठी आदर्श आहेत ??? " 
(पुढचे प्रश्न इथे सांगण्यासारखे नाहीत !!!)
पुढचा एक तास गाडीमध्ये फक्त हास्याचे स्फोट होत होते कारण हे प्रश्न ऐकून गोखले पूर्णपणे कोमात गेला होता !!! त्याची मानसिक स्थिती ढासळण्यामागे या प्रश्नांचा खूप मोठा वाटा होता. कारण उत्तर चुकलं की चिन्मय मोबाईलमधून गुगल ओपन करून असे काहीतरी प्रश्न शोधायचा की गोखलेची वेड लागण्याची पातळी अचानक वाढायची !!! हा प्रकार पार कण्हेरा पायथ्याचं सादड विहीर गाव येईपर्यंत सुरु होता. नाशिकहून थेट कण्हेराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. नाशिकहून ओतूर मार्गे कण्हेरवाडी या पायथ्याच्या गावामार्गे किल्ला चढायचा किंवा वणी - नांदुरी - कळवण रस्त्यावरचं आठंबा हे गाव गाठून तिथून सादड विहीरमार्गे कण्हेरावर जायचं. यातला ओतूरमार्गे जाणारा रस्ता मार्कंडया आणि रवळ्या - जवळयाच्या खिंडीतून जात असल्याने ज्या ट्रेकर्सना हे किल्ले करून कण्हेरा करायचा आहे त्यांच्यासाठी सोयीचा आहे. तर सादड विहीर गावाचा मार्ग ज्या भटक्यांना अचला - अहिवंत करून कण्हेरा गाठायचा आहे त्यांच्यासाठी योग्य आहे. सादड विहीर किंवा कण्हेरवाडी कुठूनही गेलं तरी कण्हेरा आणि त्याच्या शेजारचा डोंगर यांच्यातली खिंड चढावीच लागते. दोन्ही वाटा या खिंडीत येउन मिळतात आणि पुढे दोन्हीची मिळून एकच वाट कण्हेरा माथ्यावर जाते. आम्ही आठंबामार्गे जेव्हा सादड विहीर गावात पोहोचलो तेव्हा तीन वाजले होते. आपल्या गावातला किल्ला बघायला जणू काही परग्रहावरचे लोक आले आहेत असे भाव चेहे-यावर घेऊन गावातल्या लोकांनी गाडीभोवती कोंडाळं केलं. "कुटं जायचंय ?? कनेर किल्ल्यावर का ?? " उपस्थितांमधून प्रश्न आला.
"हो.वाट कुठून आहे ??" 
"ह्ये काय ह्यी डावीकडची धार दिसतीये ना तिथून सरळ जायचं वरती. अर्ध्या तासात किल्ल्यावर पोचाल. दीड तासात गावात परत." कण्हेराच्या डावीकडे दिसणा-या ठळक पायवाटेकडे अंगुलीनिर्देश झाला. "आत्ता भारत - पाकिस्तान  मॅच हाये नायतर मीच आलो असतो संगती. " गावातल्या तरुणाचं हे शेवटचं वाक्य ऐकताच टेनिसवर अतोनात प्रेम आणि क्रिकेटचा अतोनात तिरस्कार करणा-या ऋग्वेदने गाडीत बसल्या बसल्याच क्रिकेटच्या विरोधात असहकाराचा नारा सुरु केला !! 
(पुढची वाक्य मधु मलुष्टेच्या आवाजात वाचा. म्हणजे "माणुसकीचे अंश जर कुठे असतील तर ते खेड्यात…." च्या चालीवर )
"आपल्या गावात पाहुणे आलेत आणि याला मॅचची पडलीये. ठेवलंय काय त्या क्रिकेटमध्ये. जो माणूस काही वर्षांपूर्वी मुस्काडात खातो तोच निलाजरा आता स्पॉट फिक्सिंग करतो ?? आणि एवढं होऊनही लोक क्रिकेट बघतात ??? याला काय अर्थ आहे ?? अथिति देवो भव वगैरे सबकुछ झूट आहे. काय होणारे या देशाचं ते देवालाच (म्हणजे फेडररला) माहित !!!" रेडयामुखी वदलेले हे 'ऋग्वेद' बहुदा त्या तरुणाच्याही कानी गेले असावेत. कारण "आपल्याला येकच ग्येम कळतो आन तो म्हंजे क्रिकेट. ते फुडबॉल आन टयेनिस काय **** कळत नाय आपल्याला."  ह्या त्याच्या वाक्यांनी टेनिस विरुद्ध क्रिकेट हा न संपणारा वाद तिथे विनाकारण पेटण्याची चिन्हं दिसायला लागली. आम्ही दोघांनाही आवरतं घेतलं आणि गाडी थेट कण्हेराची पायवाट सुरु होते तिथे नेउन उभी केली.सादड विहीर गावातून सरळ गेलेला रस्ता पिंप्रीपाडा या गावामार्गे पुन्हा वणी - नांदुरी - कळवण रस्त्याला जाऊन मिळाला आहे. या रस्त्यावरून जाताना वाटेतच डावीकडे कण्हेराच्या माथ्यावर नेणारी मळलेली पायवाट दिसते. साडेतीन वाजत आले होते. पहिला झाडो-यातून जाणारा चढ चढून आम्ही कण्हेरा आणि त्याच्या शेजारच्या डोंगराच्या खिंडीत पोहोचलो. खिंडीत पोहोचताचक्षणी पलीकडे समोर धोडप आणि ईखारा सुळक्याचं जे काही दृश्य दिसलं त्याला जवाब नाही. मागच्या काही मिनिटांचा थकवा क्षणार्धात त्या दृश्याने पार घालवून टाकला. ढगांमध्ये घुसलेलं धोडपचं ते अस्मानी शिखर म्हणजे सातमाळा रांगेचा मेरुमणीच !!!! धोडपच्या दृश्यासाठी काही मिनिटांची विश्रांती इथे आता भागच होती. कण्हेराचा बुरुज डोक्यावर दिसत होता. फक्त शेवटचा टप्पा आणि आपण किल्ल्यावर वीसेक मिनिटांच्या आत असू हा आमचा समज कण्हेरा आता खोटा ठरवणार होता !!!

 सादड विहीरमधून कण्हेरा 

 सादड विहीर - पिंप्रीपाडा रस्त्यावरून कण्हेरा. हा डांबरी रस्ता पुढे वणी - कळवण रस्त्याला जाऊन मिळाला आहे.

कण्हेराच्या शेजारील डोंगर. याच्या आणि कण्हेराच्या खिंडीत डावीकडून येणारी वाट सादड विहीर मधून तर उजवीकडून येणारी वाट कण्हेरवाडीतून आली आहे. 

खिंडीतून दिसणारा कण्हेराचा बुरुज आणि त्याकडे नेणारा खडा चढ

दुरून डोंगर साजरे म्हणतात ते काय उगाच नाही. कण्हेराच्या खिंडीतून दिसणा-या बुरुजाकडे पाहून "हे काय आलंच . आता फक्त शेवटचा अर्धा तास." ह्या आमच्या भ्रामक समजुतीचा कण्हेराच्या चढाने पहिल्या पंधरा मिनिटातच निकाल लावला. खिंडीतून बुरुजाकडे जाणारा चढ हा साठ - सत्तर अंशातला आणि प्रचंड मुरमाड घसा-याने भरलेला होता. मी चिन्मय आणि ऋतुराजने खिंडीतून वर चढायला सुरुवात केली तेव्हा पका आणि ऋग्वेद गोखलेच्या बरोबर खिंडीतच थांबले होते. जसंजसं वर जाऊ तसतसा कण्हेराचा चढ खडाच होत चालला होता. पायाखालची मुरमाड माती अजूनच खाली सरकायला लागली. वर बघितलं तर चढाचा कोन आणखीनच वाढला होता. विश्रांतीसाठी थांबू म्हटलं तर मुरमाड घसा-यामुळे जिथं धड उभं रहायला जागा नव्हती तिथे बसायचा तर सवालच येत नव्हता. इतका वेळ वाहणारा वाराही एकदम  बंद झाला. सरळसोट उभी चढण आता घाम काढू लागली होती. आम्ही दोन चार पावलं पुढे गेलो आणि इतक्यात अचानक मागून पकाच्या हाका ऐकू येऊ लागल्या "अरे जरा थांबा. गोखलेला खूपच दम लागलाय. तो वर येणार नाही म्हणतोय. त्याला चक्कर येतीये….!!!" आम्ही थोडं वर जाऊन पाहिलं तेव्हा गोखले निर्जीव झाल्यासारखा त्या मुरमाड चढावर कसाबसा झोपला होता आणि ऋग्वेद त्याला पाणी पाजत होता. गोखलेची परिस्थिती फारच बिकट होती. पंधरा वीस मिनिटांची विश्रांती झाल्यावर त्याला थोडं बरं वाटू लागलं. म्हणजे निदान चक्कर येणं तरी थांबलं होतं. पण त्याने दम लागणं थोडंच कमी होतंय. दिलेरखानाच्या तोंडाला आणला नसेल इतका फेस कण्हेराने गोखलेच्या तोंडाला आणला. आमची हालत गोखलेइतकी खराब नसली तरी त्याच्यापेक्षा वेगळी नव्हती. जरा कुठे आडवी वाट घ्यायला गेलो तर मुरमाड माती पुढे सरकूच देत नव्हती. पाच - दहा पावलांनंतर पाचेक मिनिटांची उभ्या उभ्याच विश्रांती होऊ लागली. आसमंतावर संध्याकाळच्या कोवळ्या उन्हाचे कवडसे पडू लागले होते. उजवीकडे इतका वेळ दिसणारा धोडप आणि त्याच्या शेजारी दिसणारे राजदेहेर आणि कोळदेहेर आता पूर्णपणे धुक्यात बुडाले. अचला किल्ल्याच्या बरोब्बर उलटा अनुभव कण्हेरा चढताना येत होता. आम्हाला वाटला तेवढा अचला अवघड निघाला नाही आणि कण्हेराच्या आकारावर जाऊन त्याच्याविषयी बांधलेले सगळे आडाखे कण्हेराच्या दम काढणा-या चढाने धुळीला मिळवले. अखेर खिंडीतून निघाल्यापासून पाऊण तासाच्या जीवघेण्या चढाईनंतर कण्हेराच्या पहिल्या बुरुजाजवळच्या खोदीव पावट्या लागल्या आणि शेवटचे काही फुट चढून आम्ही त्या बुरुजापाशी जाउन विसावलो !!! कित्येक मिनिटं छातीचे ठोके धडधडतच होते.हा पहिला बुरुज बहुदा गडाच्या पहिल्या भग्न दरवाजाचा असावा. गडाचा दरवाजा पार झाला होता. आम्ही लढाई जिंकली होती (असा आमचा समज होता !!!). 

 कण्हेराच्या खिंडीतून डावीकडे ईखारा सुळका आणि उजवीकडे धोडप 

कण्हेरा किल्ल्याचा पहिला बुरुज

 कण्हेरा किल्ल्याचा सरळसोट खडा चढ. हा फोटो अर्ध्या चढावरून काढला आहे. बुरुजापर्यंत अजून असाच अर्धा चढ बाकी आहे !!!

बुरुजाच्या जवळच्या खोदीव पावट्या

बुरुजाच्या डावीकडून आम्ही पुढे आलो आणि समोर बघितलं तेव्हा….कण्हेराचा माथा अजून अर्ध्या तासाच्या अंतरावर होता. पायातले त्राण आता संपत आले होते. किल्ला अजून लांब आहे हे शारीरिकदृष्ट्या नाही पण मानसिकदृष्ट्या पचवणं अवघड जात होतं !!! कण्हेराच्या बालेकिल्ल्याकडे जाताना मधेच एक पाण्याचे टाके असून त्याच्याच पुढे डावीकडे गडाचं छोटेसं नेढं आहे. इथे बसलो नसतो तर स्वत:ला कधीच माफ करू शकलो नसतो. नेढ्यातून पलीकडे दिसणा-या डोंगररांगा,नांदुरी जवळच्या मोहनदरी किल्ल्याचं स्पष्टपणे दिसणारं नेढं हा देखावा अप्रतिमच होता. पका आणि मंडळी तर दिसतही नव्हती. घड्याळाचे काटे हळूहळू पुढे सरकत होते. नेढ्यापासून काही पाय-या चढून आपण वर आलो की उजवीकडची वाट नेढ्याच्या माथ्यावर जाते तर डावीकडची वाट बालेकिल्ल्यावर. बालेकिल्ल्यावर दोन छोटे दगडी स्तंभ उभे राहिलेले दिसतात. त्यांचं प्रयोजन मात्र कळत नाही. 
कण्हेराची तटबंदी  
        
कन्हेरा किल्ल्याचं नेढं. श्रमपरिहारासाठीची अप्रतिम जागा !!!    

कण्हेरा माथ्याकडे जाताना लागणारं पाण्याचं टाकं 

कण्हेराचा बालेकिल्ला आणि त्याच्या माथ्यावर दिसणारे दोन दगडी स्तंभ

पहिल्या बुरुजाकडून माथ्याकडे येणारा मार्ग. डावीकडे खाली सादड विहीर गाव

बालेकिल्ल्याच्या सुरुवातीचे दोन दगडी स्तंभ

नेढ्यातून निघाल्यापासून वीसेक मिनिटात आपण बालेकिल्ल्यावर येउन पोहोचतो. बालेकिल्ल्यावर प्रवेश करताचक्षणी कण्हेराचं विस्तीर्ण पठार नजरेत भरतं. कण्हेराच्या माथ्यावर सुरुवातीलाच पाण्याची काही टाकी आहेत. पुढे गडाच्या मुख्य पठारावर उध्वस्त वास्तूंचे अनेक अवशेष पसरलेले आहेत. गडाच्या उजव्या बाजूच्या कड्याजवळ एक झेंडा असून त्याच्या जवळच एक वृंदावन आहे. वृंदावनाच्या मागच्या बाजुलाही एक पडक्या वाड्याचं बांधकाम दिसतं. या वृंदावनाच्या मागे गडाची माची पसरलेली असून त्याच्यावर मात्र कोणतेही अवशेष नाहीत. या माचीला धोडप किल्ल्यासारखी एक खाच असून ही बहुदा 'डाईक' प्रकारातील रचना आहे. गडाचा विस्तार ब-यापैकी असून संपूर्ण गडमाथा फिरायला एक तास सहज लागतो.

 कण्हेरा किल्ल्यावरील भग्नावशेष 

कण्हेरा वरील झेंडा व वृंदावनाचे अवशेष

 गडावरील वृंदावन व नंदी 

कण्हेरा किल्ल्यावरच्या वृंदावनाशेजारील वाड्याचे अवशेष 


 कण्हेरा वरील पाण्याची टाकी 

 कण्हेरा किल्ल्यावरून आजूबाजूचा प्रदेश आणि पायथ्याला सादड विहीर गाव 

कण्हेरा माथ्यावरून दिसणा-या कळवण भागातल्या सह्याद्रीच्या रांगा. उजवीकडे चौल्हेर व डावीकडे प्रेमगिरी,इंद्रमाळ,दीर - भावजय डोंगर. 

 कळवण शहर व मागे चौल्हेर किल्ला 

पावणेपाच वाजत आले होते. आसमंतात पसरलेल्या अप्रतिम सूर्यप्रकाशाने वातावरण मंत्रमुग्ध करून टाकलं होतं. गडावरच्या थंडगार वा-याचा झोताने गड चढताना घेतलेले सगळे कष्ट कुठल्या कुठे विसरायला लावले. आम्ही पुन्हा गडाच्या मुख्य पठारावर आलो. आणि अचानक गडावरचं वातावरण बदललं. पहिले कधीच झाले नाहीत असे काहीतरी विचित्र भास होऊ लागले. आपल्याबरोबर काय होतंय तेच कळेना. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. कसलाही पत्ता लागायच्या आत सहाही जणांचे पाय अचानक खेचले गेले आणि आम्ही लांबवर कुठेतरी फेकले जात असतानाच सहस्त्र मुखातून उमटलेल्या हर हर महादेवच्या रणगर्जना कानावर पडू लागल्या…. !!!!!
इ. स. १६७१ ऑक्टोबर महिन्यात औरंगजेबाच्या आदेशावरून दिलेर आणि बहादूर ही खानजोडी बागलाणात घुसली होती. मुघलांच्या सैन्याने सर्वप्रथम महाराष्ट्राच्या दुर्गेंद्राला अर्थात साल्हेरला वेढा घातला. इकडे साल्हेरच्या वेढ्यातील काही मुघल सैन्य घेऊन दिलेरखानाने रवळ्या किल्ल्याकडे मोर्चा वळवला. मुघलांच्या सवयीप्रमाणं त्याने रवळ्याला वेढा घातला. ह्या वेढयाची बातमी समजताच मोरोपंत पिंगळयांनी बारा हजारांचं सैन्य रवळ्याच्या दिशेने पाठवलं. परंपरेप्रमाणं रवळ्याला वेढा घालून बसलेल्या मुघल सैन्यावर मराठ्यांनी वेळी - अवेळी छापे टाकायला सुरुवात केली. दिलेरने हे छापे रोखण्याचे अतोनात प्रयत्न केले पण हा प्रकार काही थांबेचना. अखेर कंटाळून दिलेरखानाने रवळ्याचा नाद सोडला. आता त्याच्या डोळ्यासमोर होता कण्हेरा उर्फ कण्हेरगड !!!!
सातमाळा रांगेतला एक छोटेखानी दुर्ग…कण्हेरगड. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यात वसलेला आणि ह्या परिसरातल्या इतर किल्ल्यांच्या मानाने अगदीच कमी उंचीचा असणारा आणि तितकाच अल्पपरिचित असलेला  !! दिलेरखान मुघल सैन्यासह कण्हेराच्या दिशेने चालून येऊ लागला. त्या वेळी कण्हेराचा किल्लेदार होता रामाजी पांगेरा. अफझलखानवधाच्या वेळी प्रतापगडावरून इशारा मिळताच ज्या पाच मराठा सरदारांनी आदिलशाही सैन्यावर प्रचंड हल्ला चढवला त्या पाच सरदारांमध्ये कमळोजी साळुंके,तानाजी मालुसरे,येसाजी कंक,कोंडाजी वरडवले यांच्याबरोबर रामाजीही पांगेराही होता. कवींद्र परमानंदांनी शिवभारतात रामाजीला 'अग्निसारखा शूर' असं म्हणून गौरवलं आहे. कण्हेरगडावर त्यावेळी हजारच्या आसपास मावळे होते. रामाजीने कण्हेरगडावरून मुघलांचा सेनासागर पहिला. आता युद्ध अटळ आहे हे त्याला कळून चुकलं होतं. गडावरच्या मराठ्यांपुढे त्याने सवाल टाकला " निदान करावयाचे. आपले सोबती असतील ते उभे रहाणे. " सरसर सातशे मावळा उभा राहिला. रामाजीने फक्त कटीवस्त्र नेसलं. बाकीच्या मराठ्यांनी त्याचं अनुकरण केलं.  मुघल सैन्य आता गडाच्या जवळ येउन पोहोचलं होतं. रामाजीने तीनशे मावळे गडावरच ठेवले. सिंहाच्या काळजाचे सातशे मराठे वीर प्राण पणाला लावून कण्हेरगडाचं रक्षण करायला सर्वार्थाने सिद्ध झाले होते !!!
दिलेरच्या मुघल सैन्याने गडाला वेढा घालायला सुरुवात केली होती. उंचीने अगदीच नगण्य असलेला हा किल्ला आपण काही तासात जिंकून घेऊ असा विचार दिलेरखानाच्या डोक्यात सुरु होता. आणि अचानक गडाचे दरवाजे उघडले गेले…. हर हर महादेव अशी रणगर्जना प्रचंड आवाज करत आसमंतात घुमली आणि हातात नंग्या तलवारी घेतलेल्या सातशे उघडयाबोडक्या काळ्याकभिन्न आकृत्या वीज कोसळावी त्या वेगाने मुघल सैन्यावर तुटून पडल्या. रामाजी आणि त्याच्याबरोबरच्या मराठयांच्या तो आवेश बघून मुघल सैन्याचा ठोकाच चुकला. महाभयंकर रणकंदन सुरु झालं. मराठयांच्या तलवारी सपासप मुघल सैन्याला कापत सुटल्या होत्या. मराठयांचा अवतार आवरणं मुघलांना कठीण जाऊ लागलं. सभासदाने तर आपल्या बखरीत या लढाईविषयी लिहून ठेवलंय की " टिपरी जैसी सिमगीयाची दणाणते तैसे मराठे कडाडले ." सिमगीयाच्या म्हणजेच शिमग्याच्या दिवशी जसं टिपरु ताडताड करत दणाणतं तसा आवाज आसमंतात घुमत होता. मराठयांनी पराक्रमाची शिकस्त चालवली होती. रामाजीच्या अंगात तर साक्षात रणचंडिकाच संचारली होती. देहभान विसरून तो समोर दिसेल त्या मुघल सैनिकाला कापत चालला होता. रामाजीचा तो आवेश बघून दिलेरखान थक्क झाला आणि पुरंदरच्या वेळी मुरारबाजीचा रणसंग्राम बघून "या अल्ला,ये कैसा सिपाही तुने पैदा किया."  असं म्हणत तोंडात गेलेली त्याची बोटं आज रामाजीचा रणावेश बघून पुन्हा एकदा तशीच तोंडात गेली !!! संख्येने कमी असूनही मराठे मागे हटायला तयार नव्हते. तीन तास कण्हेरगडाच्या परिसरात हे प्रचंड रणकंदन सुरु होतं अखेर दिलेरखानाच्या सैन्यातल्या पठाणांनी मराठयांना घेरलं. एका एका मराठयाला वीस - वीस तीस - तीस जखमा झाल्या. दिलेरखान या सगळ्या प्रकाराने मात्र अक्षरश: स्तिमित झाला होता. अवघ्या सातशे मावळ्यांनी बाराशे मुघलांना नरकाचा रस्ता दाखवला. रामाजी आणि त्याच्या मराठयांनी शौर्याची कमाल केली. विस्मृतीत गेलेला कण्हेरगड मराठयांच्या अतुनलीय पराक्रमाने इतिहासात अमर झाला. सुवर्णाक्षरात कोरला गेला !!!
कण्हेराच्या माथ्यावर या लढाईचं वर्णन सांगताना माझ्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला आणि आज हा प्रसंग लिहितानाही सर्वांगावर रोमांच उभे राहिलेत !!! त्या प्रसंगाशी एकरूप झालेले माझे पाच सवंगडीही देहभान विसरून मराठयांच्या शौर्याची ही कथा ऐकत होते… स्वत:लाच कुठेतरी शोधत होते !!!! एखाद्या गडाच्या माथ्यावर फिरताना त्याच्याशी जडलेल्या अपूर्व इतिहासाच्या पाऊलखुणांचाही मागोवा घ्यावा आणि स्वत्व विसरून त्यात रंगून जावं. माझ्या मते कुठल्याही परिपूर्ण डोंगरयात्रेची हीच खरी फलश्रुती आहे !! 

वाट रोजची चालणे; वाट रोजची पाहणे; मिळो सुख माझ्या घरा; देवा इतुकेच मागणे !!!

आम्ही नांदुरीत परतलो तेव्हा सात वाजत आले होते. नांदुरीतल्या वडापाववाल्याचा दिवसभराचा धंदा करून द्यायचा लेखी करार केल्यासारख्या धडाधड ऑर्डर्स सुटल्या. त्याची पळता भुई थोडी झाली हे वेगळं सांगायला नकोच !!! उद्या पहायचा कण्हेरगड आजच पाहून झाल्याने आम्ही सप्तशृंगच्या बरोब्बर समोर असलेल्या आणि आपल्या भव्य नेढ्यामुळे कुठल्याही गिर्यारोहकाचं सहज लक्ष वेधून घेणा-या मोहिन्द्री उर्फ मोहनदरी किल्ल्याचा आमच्या प्लॅन मध्ये समावेश केला. आजच्या दिवसाचं टार्गेट पूर्ण झाल्याने आम्ही आता एकदम निवांत होतो. 
"तुम्ही वणीच्या देवीला गेला आहात ??" बोलता बोलता काकांनी विचारलं. तीन मान होकारार्थी डोलल्या आणि तीन नकारार्थी. माझं याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात सातमाळा ट्रेकच्या निमित्ताने दर्शन झालेलं होतं तर पका आणि ऋतुराज खूप आधी येउन गेले होते. त्यामुळे आमच्यात सप्तशृंगला न आलेल्यांचीच मेजॉरीटी होती. "मंदिर किती वाजेपर्यंत उघडं असतं ??" मी हॉटेलवाल्याला विचारलं. "आठ वाजता." समोरून उत्तर आलं. पावणेसात वाजले होते. अवचित काहीतरी हाती गवसल्याच्या आनंदात सगळ्यांचे डोळे चमकले. सप्तशृंगच्या इतक्या जवळ येउन देवीचं दर्शन न घेण्याचं पाप मात्र आम्हाला आमच्या माथी लागू द्यायचं नव्हतं. पुढच्या सगळ्या ऑर्डर्स डायरेक्ट कॅन्सल करून आम्ही गाडीकडे धाव घेतली. वणीची सप्तशृंगी देवी म्हणजे महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ. अवघ्या महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र !!! आज दिवसभरात अचला - कण्हेरा सारखे किल्ले होऊनही त्या आदिमायेच्या दर्शनाच्या ओढीनं आम्हाला एक नवा उत्साह मिळवून दिला. गाडी आता सप्तशृंगचा घाट चढू लागली. दहा किलोमीटर्सचा तो वळणावळणाचा घाटरस्ता देखील आम्हाला आणखीनच दूर भासत होता. सप्तशृंगची अस्मानी शिखरं आता धुक्यात बुडाली होती. अंधार झपाटयाने पसरत चालला होता. संधीप्रकाशाचे अंधुकसे रंग लांब कुठेतरी पुसट होताना दिसत होते. आता शेवटचे दोन किलोमीटर्स राहिले होते. सप्तशृंगवरून परतणा-या गाडयांचे प्रकाशझोत त्या मिट्ट काळोखात डोळे दिपवून टाकत होते. आणि शेवटचं एक किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही सप्तश्रुंग गावात पोहोचलो तेव्हा पावणेआठ वाजले होते. शेवटची पंधरा मिनिटं !!! अचला - कण्हेराच्या खड्या चढाईनंतर आता सप्तशृंगच्या पाचशे पाय-यांचं आव्हान  समोर होतं. कसलाही विचार न करता आम्ही पाय-या चढायला सुरुवात केली. पण पहिल्या पन्नास पाय-यांनंतरच पायात पेटके येऊ लागले. हे जमेल की नाही ?? इतक्या लांब येउन दर्शन होईल ना ?? वेळेत पोहोचलो नाही तर ??? अनेक प्रश्न आणि अनेक शंका मनातून सर्रकन निघून गेल्या. त्या स्थितीतही त्या वेदना झुगारून आम्ही चढतच होतो. दर्शन झालेली भक्तमंडळी घराच्या ओढीनं पाय-या उतरत होती. शंभर…दोनशे… तीनशे… साडेतीनशे…. साडेचारशे…. आता फक्त शेवटच्या पन्नास पाय-या !!! चढ उभा होत चालला होता. छातीच्या ठोक्यांनी कमालीचा वेग घेतला. वेळ झपाट्यानं पुढे सरकत होती. आता फक्त दहा पाय-यांचं अंतर उरलं. मुख्य मंदिर जवळ येऊ लागलं होतं.वरच्या बाजूंने देवीच्या जयजयकाराचे घोष कानी पडायला लागले. आणि अखेर शेवटच्या दोन पाय-या पार करून आम्ही धपापत्या उरांनी जेव्हा गाभा-यात प्रवेश केला तेव्हा घड्याळाचा काटा बरोब्बर आठवर स्थिरावत होता !!!! सह्याद्रीच्या अभेद्य कड्यात प्रकट झालेली अठरा हातांची भव्य आकृती नजरेसमोर उभी होती !!! अंगावर रोमांचाची एक लहर नकळतपणे उठून गेली. दुष्टांचा संहार करणारं आणि भाबडया भक्तांचा कैवार घेणारं ते निर्गुण,निराकार रूप आम्ही कितीतरी वेळ बघत होतो…. मनात साठवून घेत होतो !!! पुन्हा एकदा आनंद !!!! सह्याद्रीच्या या वेडया भक्तांची आपल्याशी भेट व्हावी हे कदाचित त्या जगदंबेच्याच मनात असावं !!!! भक्तांची गर्दी आता ओसरायला लागली होती. आणि अखेर भारावलेल्या मनानी जेव्हा पाय-या उतरायला सुरुवात केली तेव्हा गाभारा बंद होण्याची सूचना कानावर पडत होती !!!!  सप्तशृंगच्या या देवीवर गिर्यारोहकांची मात्र विशेष श्रद्धा आहे. ही श्रद्धा सप्तशृंगी देवी सह्याद्रीच्या कड्यात प्रकट झाली असल्याने त्याबद्दल तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त तिच्या दर्शनासाठी गिर्यारोहणाचा मूळ धर्म आचरण्यासाठीही आहे. आमच्यामध्ये सगळ्यात भाग्यवान मी ठरलो होतो कारण माझं एकाच वर्षी सहा महिन्यांच्या आत दुस-यांदा दर्शन झालं होतं. आमच्यामुळे इथे पहिल्यांदाच आलेल्या ऋग्वेद,गोखले,चिन्मय आणि काकांच्याही नशिबी देवीच्या दर्शनाचा योग लिहिला गेला !!! पावसाचे टपोरे थेंब दुकानांच्या पत्र्यावर ताडताड आवाज करत बरसू लागले. आजच्या दिवसात पावसापासून लांब राहण्याची उणीव दिवसाच्या शेवटी भरून निघाली. नांदुरीपासून फक्त दहा किलोमीटर्सचं अंतर……शेवटच्या पंधरा मिनिटांचा हाताशी असलेला वेळ….मनात उठलेलं शंकाकुशंकांचं वावटळ… आणि अखेरच्या क्षणी समोर प्रकट झालेलं आदिमायेचं मनोहारी रूप…सगळा पूर्वसंचिताचा खेळ !!! अद्भुत…अवचित आणि अविस्मरणीय !!! सध्या भक्तांच्या सोयीसाठी सप्तश्रुंगी देवी ट्रस्टने अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. गडावर सुसज्ज अशा भक्तनिवासाचीही सुविधा उपलब्ध असून सप्तशृंग गाव ते मुख्य मंदिर इथपर्यंत रोपवेचं कामही सुरु आहे. याविषयीची अधिक माहिती www.saptashrungi.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 
साडेनऊ वाजता वणी - नांदुरी रस्त्यावरच्या 'गुलमोहोर गार्डन' मध्ये जेव्हा जेवणासाठी टेबल लावलं गेलं तेव्हा सगळ्यांच्या चेहे- यावर (पुण्यातून) एका दिवसात एव्हरेस्ट चढून आल्याचे भाव होते. आमच्यात सगळ्यात वाईट हालत होती ती म्हणजे गोखलेची. त्याला मळमळ,पित्त,डोकेदुखी,कसकस वगैरे वैद्यकीय व्याधी एकाच वेळी सुरु झाल्या होत्या. आमची परिस्थिती गोखलेपेक्षा जरा बरी होती. त्यात गोखलेचा दोन दिवसाचा आणि अचला - अहिवंत सारखे बलाढ्य किल्ले असलेला हा पहिलाच ट्रेक असल्याने त्याची परिस्थिती आम्ही समजू शकत होतो. त्यामुळे शेवटपर्यंत त्याला सगळ्यांनीच व्यवस्थित सांभाळून घेतलं होतं. गुलमोहोर मधलं जेवण मात्र अप्रतिम होतं. गोखले दोन रोट्या यायच्या मधल्या वेळेतही पेंगत होता आणि याला (काका धरून) बाकीची समस्त टाळकी साक्षीदार आहेत. कालपासून नसलेली झोप,आज दिवसभराचे श्रम, दुपारचं जेवण म्हणून खाल्लेले  फक्त दोन चार ब्रेड - बटर,भडंग आणि बिस्किटं आणि त्या थंडीत गरमागरम दोन घास पोटात गेल्यावर येणारी गुंगी यामुळे ही अवस्था स्वाभाविक होती. पकाने त्या परिस्थितीतही एक निर्लज्ज प्रकार करून दाखवला. गोखलेने ताटात नुकत्याच आलेल्या बटर रोटीचे दोन घास खाल्ले आणि तो पुन्हा पेंगला. पकाने नेमकी हीच संधी साधून त्याच्या ताटातली रोटी आपल्या ताटात घेतली. आठ - दहा सेकंदांनंतर गोखले उठला आणि " मी रोटी बहुतेक तुमच्या आधी संपवली आहे. माझ्यासाठी अजून एक मागवा आणि आल्यावर प्लीज मला झोपेतून उठवा " असं सांगून तो परत झोपला.  त्याला जाग आली ती गुलमोहोर गार्डनचं छप्पर भेदून बाहेर गेलेल्या हास्याच्या प्रचंड स्फोटाने !!!! गोखले आत्ता सातासमुद्रापार पोहोचला आहे याचं भन्नाट उदाहरण म्हणजे हा प्रसंग होता !!! आत्ताही मला हा प्रसंग लिहिताना हसू आवरणं कठीण जातंय !!! पकाने प्रामाणिकपणे गोखलेचा वाटा त्याला परत दिला हा मुद्दा वेगळा. पण या प्रकारामुळे गोखलेला गाडीत छळायला मात्र आम्हाला आता एक नवीन विषय मिळाला होता !!! 
भोजनोत्तर आम्ही पुन्हा नांदुरीत आलो. नांदुरीचा एस. टी.  स्टॅंड  पार करून आपण पुढे आलो की डावीकडे कनाशी,अभोणा मार्गे सापुता-याला जाणारा फाटा आहे. या फाट्यावरून डावीकडे वळालो की पाच - सात किलोमीटर्स नंतर एक छोटा चढ आहे. या चढाच्या शेवटी इंग्रजी T आकाराचा फाटा आहे. उजवीकडचा रस्ता अभोणा तर डावीकडचा मोहनदरी गावात गेला आहे. याच फाट्यावरून डावीकडे मोहनदरी गावाकडे वळताना एका झाडाखाली शेंदूर लावलेल्या काही वीरगळ आहेत. इथून थोडं पुढे गेलं की डावीकडे खालच्या बाजूला गेलेला रस्ता मोहनदरी गावात जातो तर उजवीकडचा रस्ता मोहनदरीच्या आश्रमशाळेपाशी जाउन थांबतो. मोहनदरी किल्ल्याची चढण या आश्रमशाळेपासूनच होत असल्याने गावात जायचं काही कारण नाही. या आश्रमशाळेच्या मागच्या बाजूला नव्या कॉलेजचं आणि एका सुसज्ज अशा हॉस्टेलचं काम सुरु आहे. किमान हजार विद्यार्थ्यांची सोय होऊ शकेल इतकं मोठं हॉस्टेल बांधण्याचा विचार सुरु असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. आम्ही आश्रमशाळेत पोहोचलो तेव्हा पावणेबारा वाजले होते. आता मात्र झोप आवरणं कठीण होऊ लागलं. आश्रमशाळेच्या कर्मचा-याने आम्हाला एका व्हरांड्यात जागा करून दिली आणि सकाळी चहा घ्यायला या असं आमंत्रण देऊन निघून गेला. आमच्याशिवाय त्या व्हरांड्यात आश्रमशाळेचे दोन वॉचमनही झोपले होते. अंथरुणाला पाठ टेकली टेकताचक्षणी स्वर्गीय सुख काय असू शकतं याची  जाणीव मात्र मनापासून झाली !!! आजचा दिवस एखाद्या कॅलिडोस्कॉप सारखा नजरेसमोर तरळत  होता. आकाराने छोटा असूनही अनेक अप्रतिम वास्तुशिल्प उराशी जपलेला हातगड…अचला किल्ल्यावरून तौला शिखराचं दिसलेलं रौद्रसुंदर रूप….कण्हेरगडावर साक्षात भेटलेला रामाजी पांगेरा आणि सप्तशृंगी देवीचं झालेलं अनपेक्षित पण अविस्मरणीय दर्शन !!!! सह्याद्रीच्या कुशीतला एक दिवस आज सत्कारणी लागला होता. सभोवतालचं सारं विश्व जेव्हा झोपेच्या स्वाधीन झालं तेव्हा दूर कुठेतरी पहाटेला जाग येत होती !!!! 
   
क्रमश:  

इथे वाचा.Comments

  1. मस्त लिहिलेय रे ओंकार...

    ReplyDelete
  2. simply superb !! waiting was worth !! now IInd waiting waiting for next part :)

    ReplyDelete
  3. मस्तचं लिहिलंय , कण्हेर गडावर नसलो तरी गनिमांना भिडलेले मराठे आणि रामजी पांगेरा दिसत होता

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड