गिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग दोन (उत्तरार्ध)

गिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग एक     
इथून पुढे…. 


"पका…ए पका…उठ. सहा वाजत आलेत. साडेसहाला निघायचंय आपल्याला. वर जाऊन झोप परत. आज अजून एक किल्ला बाकी आहे. उठ लवकर (हे शेवटचं जरा ओरडून !!) " 
" चिन्या ****च्या. गप झोपू दे मला. आयला एकतर कालपासून झोप नाही. त्यात रात्री फर्स्टक्लास जेवण झालंय आणि आत्ता थंडी पण आहे. मी सात वाजता उठणारे. तुला एकट्याला जायचं तर जा !! "
" पका…पाच मिनिटाच्या आत जर उठला नाहीस तर जो भाग वर करून झोपला आहेस तो असा सूजवेन की गाडीच्या सीटवर बसायची पण बोंब होईल !!!" 
चिन्मयचं हे निर्वाणीचं वाक्य ऐकून पकाच काय पण गाडीची अर्धी काच खाली करून झोपलेले काकाही ताडकन उठले !!! बघतो तर चिन्मय कालच्या त्या रखवालदारांची फुटभर काठी हातात घेऊन उभा होता. त्याच्या मते माणसाने सहा तासांपेक्षा जास्त झोपल्यास त्याला बुद्धीमांद्य येतं आणि ते वयोमानाप्रमाणे वाढत जातं. हे तत्वज्ञान चिन्मयला त्याच्या रशियन मास्तराने स्वानुभवावरून शिकवलं असावं !!! कारण हे तत्व भारतात लागू  झाल्यास शिक्षणव्यवस्था किंवा नोक-या यांच्यामध्ये केवळ नॉर्मल लोकांसाठी आरक्षण ठेवायची वेळ सरकारवर येईल !!! चिन्मयच्या आरडाओरडीचा परिणाम 'लेकी बोले सुने लागे' असला काहीतरी झाला आणि पकासकट सगळ्यांच्याच डोळ्यावरची झोप कुठच्या कुठे उडाली. एव्हाना उजाडलं होतं. सहा तासांच्या का होईना पण कमालीच्या शांततेत मिळालेल्या त्या झोपेने कालचा थकवा मात्र पार घालवला होता. काल रात्री धुक्यात पूर्णपणे बुडालेला मोहनदरी किल्ला आज मात्र सकाळच्या कोवळ्या उन्हात लख्ख चमकत होता. त्याचं ते भलंमोठं नेढंही आता जागं झालं होतं. सकाळचा अप्रतिम चवीचा चहा घेऊन बरोबर साडेसहा वाजता आम्ही मोहनदरीची पायवाट तुडवू लागलो (बाय द वे चहा मी बनवला होता !!!).

सर्व फोटोज © ओंकार ओक 
 मोहनदरी गावातून दिसणारा मोहनदरी उर्फ स्थानिक भाषेत 'शिडका' किल्ला 

वरच्या फोटोत दिसतंय त्याप्रमाणे नेढ्याच्या डावीकडे एक कातळकडा आहे आणि उजवीकडे एक कातळकडा आहे. उजव्या कातळकड्यावर पाण्याची टाकी असून डावीकडच्या कातळकड्यावर कसलेही अवशेष नाहीत. गावातून निघालो की आधी पाण्याची टाकी बघून आपण नेढ्याकडे जाऊ शकतो किंवा आधी नेढं बघून उजव्या कातळकड्याला डावीकडे ठेवत त्याच्या पोटातून आडवं जात शेवटी जिथे वाट संपते तिथून त्याचा माथा गाठू शकतो. मोहनदरी गावातून थेट नेढ्यात जायचं असेल तर एक तासभर पुरे. नेढ्यात जाण्यासाठी मळलेली अशी पाऊलवाट नसून तिथपर्यंत जाणा-या चढावर अनेक ढोरवाटा फुटल्या आहेत. त्यामुळे त्यातली एखादी योग्य वाट निवडायची आणि नेढं गाठायचं. या नेढ्याची कथा अशी सांगितली जाते - एकदा सप्तशृंगी देवी आणि एका असुराचं तुंबळ युद्ध सुरु होतं. कित्येक दिवस हे युद्ध चाललं. अखेर देवीचं सामर्थ्य सहन न होऊन त्या असुराने पळ काढायला सुरुवात केली. देवीने त्याचा पाठलाग सुरु केला. आणि तितक्यात देवीच्या आणि त्या असुराच्या वाटेत मोहनदरीच्या या डोंगराचा हा कातळकडा आला.  देवीने या कातळकड्याला लाथ मारली आणि त्या लाथेच्या प्रहारामुळे या कातळकड्याला हे भलंमोठं छिद्र (नेढं) पडलं अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे हे नेढंही आजूबाजूच्या परिसरात पवित्र मानलं जातं. मोहनदरीच्या या नेढयाची जागा मात्र लाजवाब आहे !!! सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून उन्मत्तपणे आणि बेभान होऊन विहरणारा वारा इथे बसूनच अनुभवावा !! एक कधीच विसरता न येणारा अनुभव म्हणजे तुम्ही या नेढ्यात घालवलेले काही क्षण.  नेढ्यात पोचण्यासाठी दहा - बारा फुटांचा एक किंचित अवघड असा पॅच आहे. तसंच नेढ्याच्या वरच्या बाजूला मधमाशांची पोळी असल्याने इथे योग्य ती खबरदारी घेणं आवश्यकच आहे.


मोहनदरी गावातून किल्ल्याचं नेढं आणि त्यावरचा झेंडा  


नेढयाकडे नेणारी शेवटची चढण  


नेढयापासून समोर दिसणारा दिलखुलास देखावा. धुक्यात बुडालेला सप्तशृंग आणि पायथ्याला मोहनदरी गाव !! 

नेढयापासून किल्ल्याच्या डाव्या कातळककडयाच्या माथ्यावर जायचं असेल तर त्याच्या पायथ्यातून अर्धा तास आडवं गेलो की उजवीकडे माथ्याकडे नेणारी वाट दिसते आणि आपला माथ्यावर प्रवेश होतो. मोहनदरीच्या माथ्यावरून दिसणा-या बागलाण बाजूच्या विस्तृत प्रदेशाचं दृश्य मात्र केवळ अवर्णनीय आहे. पलीकडच्या गावांमधील शेतं,त्यांची कौलारू घरं,चणकापूर धरण हा नजारा अप्रतिम !!! भान विसरून कितीतरी वेळ आम्ही ते दृश्य बघत होतो. मोहनदरी किल्ल्याचा पलीकडचा कातळकडाही या पठारावरून सुरेख दिसत होता. नशीब चांगलं असेल तर साल्हेर - सालोटया पर्यंतचा मुलुख दिसू शकतो. अवशेषांच्या आणि पुरेशा पुराव्यांच्या अभावामुळे मोहनदरीच्या या डोंगराला किल्ला म्हणावं की नाही याबाबतीत अभ्यासकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. पण सह्याद्रीच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या रांगांचं कमालीचं सुंदर दृश्य पेश करणारा मोहनदरी किल्ला मात्र आयुष्यात एकदा तरी भेट द्यावा असाच आहे !!
मोहनदरी किल्ल्याचा माथा


 मोहनदरीच्या माथ्यावर झालेलं अविस्मरणीय स्वागत !!!
मोहनदरीचा उजवीकडचा कातळकडा आणि मध्यभागी नेढं 

 मोहनदरी वरून कण्हेरा किल्ला

लांबलचक कातळकडयाचा मोहनदरी किल्ला !!!

नऊ वाजले होते. सातमाळा रांगेतला एक अतिशय देखणा आणि आमच्या डोंगरयात्रेतलाही शेवटचा किल्ला अर्थात अहिवंतगड हा आमचं पुढचं लक्ष्य होता. नांदुरीवरून आपण वणीच्या दिशेने जाऊ लागलो की एक छोटीशी खिंड लागते. त्या खिंडीच्या थोडसंच अलीकडे उजव्या बाजूला दरेगाव फाटा आहे (वणीकडून येताना खिंड ओलांडल्यानंतर डावीकडचा पहिला फाटा). या फाट्यावर दरेगावची दिशा दाखवणारी कोणतीही पाटी नसून या फाट्याच्या सुरुवातीला एका अ‍ॅग्रिकल्चर रिसोर्टचं काम सुरु आहे हीच दरेगाव फाट्याची एकमेव खूण. नांदुरीकडून येताना मात्र अहिवंत समोरच दिसत असल्याने हा फाटा ओळखता येणं सोपं आहे. आम्ही दरेगावात पोहोचलो. अहिवंतचा माथा पूर्णपणे धुक्यात बुडाला होता. "दादा रस्ता दाखवायला याल का गडावर ??" मी आमच्या गाडीकडे कुतूहलाने बघणा-या एका मध्यमवयीन गृहस्थाला विचारलं.  "आवो काय बी गरज नाय माणूस संगत न्यायची. हितून तिकडं…." " दादा आम्ही पहिल्यांदाच आलोय इथे." मी त्याचं वाक्य मधेच तोडलं. "किल्ला आकाराने प्रचंड आहे हे आम्हाला माहित आहे. त्यात वर धुकं आहे.आणि आजच आम्हाला पुण्याला निघायचंय. त्यामुळे तुम्ही गावातला एखादा माहितगार माणूस बरोबर द्या. आम्ही त्याची बक्षिसी त्याला देऊ. " आता मात्र त्यांचाही निरुपाय झाला. "थांबा कोनी मिळतंय का बघून येतो. " ते गृहस्थ आमची फिल्डिंग लावायच्या मोहिमेवर निघाले . वेळ जशीजशी पुढं सरकत होती तसं ढगांआडून सूर्यकिरणं अहिवंतच्या माथ्यावर अधून मधून पडू लागली. पंधरा - वीस मिनिटं हा उन सावलीचा खेळ सुरु होता. अहिवंतचा आकार डोळ्यात तर सोडाच पण कॅमे-याच्या सिंगल फ्रेममधेही मावत नव्हता !!! अहिवंतच्या पायथ्याला मधोमध उभं राहिलं तर दोन्ही बाजूंनी त्याचे कडे आपल्याला गिळंकृत करायला निघाल्याचा भास व्हावा इतका अहिवंतचा आकार प्रचंड आणि अस्ताव्यस्त आहे. अहिवंतच्या डाव्या कडयाला चिकटलेला बुध्या डोंगर ते अहिवंतचा उजव्या बाजूचा कडा हे संपूर्ण अंतर बघण्यासाठी जवळपास १८० अंशामध्ये मान फिरवावी लागते !!! हा किल्ला एक भन्नाट अनुभव ठरणार आहे याची प्रचीती पायथ्यापासूनच यायला लागली होती. 

पिंपरी अचला - नांदुरी रस्त्यावरून दिसणारा अहिवंतचा अनोखा आकार. उजवीकडे बुध्या डोंगर 


वणी - नांदुरी रस्त्यावरून अहिवंत

"दादा,ह्यांला घेऊन जा गडावर. सगळं माहित हाये ह्यांना. अख्खा गड फिरवून आणतील तुमाला."  दरेगावच्या त्या गावक-याचा आवाज आला. मी मागं वळून पाहिलं तर कोणी दिसेचना. नंतर बघितलं तर तीन - साडेतीन फुट उंचीच्या आणि आठ - दहा वर्षांच्या तीन पोरांना ते महाशय घेऊन आले होते !!!  एखाद्या किल्ल्याची गावातल्या पोक्त आणि अनुभवी माणसाला नसेल तितकी माहिती ह्या "किडोज" ना असते हा पूर्वानुभव असल्याने मला त्यांच्यावर अविश्वास ठेवायचं कारण उरलं नाही. "नावं काय तुमची ???" मी त्यांना प्रश्न केला. "ह्यो सुनील,मी सुरेश अन हा सागर. तीन येस (तीन S !!!!). "  ही पोरं 'एक्स्ट्राऑर्डीनरी' आहेत याविषयी आता माझी खात्रीच पटली होती !!! पाण्याच्या बाटल्या भरून आम्ही गडाची वाट पायाखालून घालायला सुरुवात केली. आज आमच्या ग्रुपात एक लईच भारी बदल झाला होता. काल शारीरिक परिस्थिती बिघडलेला गोखले आज पुन्हा बरं न वाटू लागल्याने गाडीची चौकीदारी करत गावातच थांबला आणि दस्तुरखुद्द काका आमच्याबरोबर अहिवंतवर यायला निघाले !!! आजच्या दिवसातला आश्चर्याचा पहिला धक्का. "घरदार आणि कामधंदे सोडून कुठं कशाला तडमडायला जाता तुम्ही" हे आमच्या मृगगडच्या ट्रेकच्या वेळी म्हणणारा ड्रायव्हर एकीकडे आणि "तुमच्या किल्ल्यांविषयीच्या चर्चा आणि इथल्या डोंगरांचे आकार बघून मलाही तुमच्याबरोबर यावंसं वाटलं !!" हे म्हणणारे काका एकीकडे. एकाच व्यवसायाच्या दोन व्यक्तींची दोन टोकाची रूपं !!! ट्रेकिंगविषयी सुतराम कल्पना नसलेल्या एखाद्या माणसालाही सह्याद्री त्याच्या काही टक्केच दर्शनानं कसं स्वत:च्या प्रेमात पाडतो याचं काका म्हणजे उत्तम उदाहरण होतं !!! न जाणो उद्या या काकांना कोकणकड्यावर,राजगडाच्या बालेकिल्ल्यावर किंवा अलंग - मदन वर घेऊन गेलो तर स्वत:चा रथ चालवण्याचा उद्योग बंद करून ते आमच्या ग्रुपची लाईफटाईम मेंबरशीप घेतील याविषयी आता माझ्या मनात कसलीच शंका उरली नव्हती !!! 

दरेगावचे त्रिदेव !!! डावीकडून सुनील,सुरेश आणि सागर.


दरेगाव मधून (डावीकडे) बुध्या डोंगर आणि (उजवीकडे ) अहिवंत

बुध्या डोंगर क्लोजअप

दरेगावमधून किल्ल्याकडे पाहिलं की अहिवंतच्या डावीकडे असलेल्या बुध्याच्या पायथ्यापर्यंत जाणारी एक सोंड गावातल्या शेतात उतरलेली दिसते. दरेगावमधून निघाल्यावर पंधरा वीस मिनिटात आम्ही त्या सोंडेवरून चढायला सुरुवात केली. पहिली पाचेक मिनिटं सोडली तर पुढचा चढ खडाच होत चालला होता. गावातली पोरं तर त्या चढावर मेंढरं धावावीत तशी सैरावैरा धावत होती आणि त्यांच्यामागून जवळपास पंधरा वीस मिनिटांनी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत होतो. त्या तिघांच्या मानानं आमचा स्पीड बघता पुण्यातून ज्येष्ठ नागरिकांची पावसाळी सहल अहिवंतवर आली आहे असं कोणाही नवख्या माणसाला वाटून गेलं असतं. सफर सातमाळा रांगेची - दिवस दुसरा.. यातलं  पहिलंच वाक्य बघा. नाशिक जिल्ह्यातल्या किल्ल्यांना सह्याद्रीने एक अचाट वैशिष्ट्य प्रदान केलं आहे.यातला कोणताही किल्ला चढून वर आलो की " हा किल्लाच राक्षसी होता का आपणच दिवसेंदिवस खच्ची होत चाललोय " हा प्रश्न ट्रेकरच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय रहात नाही !!! हे बुध्याच्या पायथ्याला जाईपर्यंत दर दोन मिनिटांनी आठवत होतं. बुध्याच्या पायथ्यापर्यंतचा चढ ब-यापैकी उभा आहे. पण ट्रेकमधला शेवटचा किल्ला काहीतरी स्पेशल वागणूक देणारंच हे डोक्यात ठेवून आम्ही पावलं उचलत होतो. सुनील,सुरेश आणि सागरने तर कमालच चालवली होती. त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आम्ही दिसलो की आमच्या नजरेच्या टप्प्याच्या बाहेर जाईपर्यंत ते कुठेतरी पळत जायचे आणि आम्ही दिसत नाहीये हे त्यांना कळालं की पुन्हा तेवढंच अंतर कापून मागे (अर्थातच पळत) यायचे आणि त्यानंतर आमच्याबरोबर पुन्हा त्याच रस्त्यावरून त्याच वेगाने चढाई सुरु !!! (देवा…. प्लीज मला एवढा फिटनेस दे. मी पिझ्झा खाणं सोडून देईन !!!).  तिघांनाही अर्थातच दम लागणं वगैरे प्रकार माहीतच नसावा. त्यामुळे एखाद्या छातीवरच्या चढानंतर आम्ही जरा कुठे टेकलो की ते तिघं आम्ही काहीतरी भयानक पाप केलं आहे असल्या काहीतरी नजरेनं आमच्याकडे बघत राहायचे. शेवटपर्यंत आम्ही त्यांना गाठू शकलो नाही हे तितकंच कटू सत्य आहे !!!
बुध्याच्या पायथ्याला आम्ही आता येउन पोहोचलो होतो. समोरच्या मोहनदरी किल्ल्याचं नेढं आणि उजवीकडची सप्तशृंगची ढगांच्या मागून डोकावणारी शिखरं आता स्पष्ट दिसत होती. दरेगावही बरंच खाली दिसत होतं एवढीच काय ती अचिव्हमेंट !! काकांचं मात्र करावं तेवढं कौतुक कमी आहे. दोन दिवस गाडीचं यशस्वी सारथ्य करूनही सगळ्यात पुढे राहण्याचं कसब आम्ही अहिवंतचा माथा गाठेपर्यंत त्यांनी अगदी 'बरकरार' ठेवलं होतं.
"गडावर रोज येता का तुम्ही??" दरेगावातल्या त्या समद्विभूज त्रिकोणाला मी विचारलं. 
"पावसाळ्यात रोज नाय पण बाकी वेळा गडावर क्रिकेट खेळायला जातो !!!"  हे त्यांचं वाक्य ऐकताच हे तिघं जणू गावातली बाकीची वानरसेना घेऊन मंगळावर क्रिकेट खेळायला जात असावीत असल्या नजरेने आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. वास्तविक अहिवंतचा आकार बघता त्याच्या माथ्यावर क्रिकेट आणि फुटबॉलच्या मॅचेस एकाच वेळी होऊ शकतील याविषयी दुमत असण्याचं काही कारण नाही. बुध्याच्या पायथ्यापर्यंतचा चढ संपून त्याच्या आणि अहिवंतच्या खिंडीतली आडवी वाट आता सुरु झाली होती. ही वाट जिथे संपते तिथे उजवीकडे वरती अहिवंतच्या कड्यात एक छोटी गुहा खोडलेली आहे. इथून डावीकडे वळलो की मात्र अहिवंत आणि बुध्या यांच्या खिंडीतली अत्यंत खड्या आणि पूर्णपणे अंगावर येण्या-या चढाची नाळ सुरु होते. सत्तर अंश कोनातली ही नाळ चढायला जरी पंधरा वीस मिनिटांची असली तरी पायाखालच्या सुट्या दगडांमुळे आणि भुसभुशीत वाळूमुळे आपल्या तोंडाला चांगलाच फेस आणते. त्रिदेव ती नाळ पार करून पळत पळत जेव्हा बुध्या आणि अहिवंतच्या खिंडीत पोहोचले तेव्हा आम्ही फक्त नाळेचे पहिले पाच फुट चढलो होतो !!! सागर आम्हाला घ्यायला पुन्हा ती नाळ उतरून आला तेव्हा उपस्थितांना भरून आलं असावं !!! दरेगावातून निघाल्यापासून दीड तासांच्या खड्या आणि घाम काढणा-या चढाईनंतर आम्ही आता बुध्या - अहिवंत खिंडीत येउन पोहोचलो होतो . शेजारीच अहिवंत माथ्याकडे  नेणा-या पाय-या सुरु होत होत्या. नव्वद टक्के चढ संपला होता !!!
बुध्याकडे जाताना…

अहिवंत माथ्यावरून बुध्या

धुक्यात बुडालेला अहिवंतचा माथा  

अहिवंतवरील छोटा तलाव

अहिवंत वरील उध्वस्त अवशेष

बुध्या - अहिवंत खिंडीतून अहिवंतच्या खोदीव पावट्या चढून आम्ही अर्ध्या तासात अहिवंत माथा गाठला. बुध्यावरही पाय-या तटबंदी,एक भक्कम बुरुज आणि पाण्याच्या जोड टाक्यांची मालिका आहे. त्यामुळे दरेगावातून अहिवंत चढल्यास बुध्या अजिबात चुकवू नये असा आहे. हे अवशेष लक्षात घेता बुध्याला अहिवंतचा उपदुर्ग म्हणायला हरकत नाही. अहिवंतचा विस्तार मात्र पायथ्यापासून दिसतो त्यापेक्षा जरा जास्तच प्रचंड आहे. गडाच्या माच्या चारही दिशांना अस्ताव्यस्त पसरल्या आहेत. अहिवंतच्या मुख्य पठाराच्या मध्यभागी एक छोटी टेकडी दिसते. या टेकडीवर कसलेही अवशेष नाहीत. पण टेकडीकडे जाताना अहिवंतच्या उध्वस्त वाड्याचे अवशेष आपल्याला दिसतात. गडावर ढासळलेली अनेक जोती आहेत. टेकडीच्या पायथ्याला पोहोचण्याच्या थोडं आधी एक तलाव असून त्याच्या पलीकडच्या काठावर मारुती आणि सप्तश्रुंगी देवीशी साधर्म्य असणारी एक मूर्ती आहे. अहिवंतच्या टेकडीकडे जाताना डाव्या बाजूच्या कड्याच्या पोटात एक मुक्कामायोग्य गुहा आहे. पण स्थानिक व्यक्ती बरोबर असल्याशिवाय ती गुहा सापडणं जरा कठीण आहे. अहिवंतच्या मुख्य पठारावर वास्तूंचे अनेक अवशेष पसरले आहेत. टेकडी जिथे बरोब्बर आपल्या उजव्या हाताला येते तिथे पिण्यायोग्य पाण्याचं एक छोटं कुंड असून या कुंडाच्या शेजारीच खंडोबाची एक मूर्ती दगडात कोरली आहे. इथून समोर दिसणारा अचला,तौला आणि भैरोबा डोंगराचा नजारा एकदम झकास. भैरोबा डोंगराच्या पायथ्यातून सतीबारी किंवा सत्तीबारी नावाच्या खिंडीतून बिलवडीला येणारा रस्ताही अप्रतिम दिसत होता. दरेगावमधून 'दरेगाव बारी' नावाची एक छोटीशी खिंड फोडून दरेगाव - बिलवडी अशा रस्त्याचे काम सध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे पुढच्या दीड - दोन वर्षात ट्रेकर्सना हातगड करून व दगड पिंप्री मार्गे अचला बघून पुढे या गाडीरस्त्याने बिलवडी मार्गे दरेगावला येणं सहज शक्य होणार आहे. अचला वरून अहिवंत करण्यासाठी वणी - नांदुरी रस्त्यामार्गे दरेगाव हा सध्याचा मोठा वळसा यामुळे वाचणार आहे. 
अहिवंत वरील गुहा 

अहिवंतवरील मुक्कामायोग्य गुहा

अहिवंतवरील भग्न झालेला वाडा

अहिवंत वरचा अजून एक तलाव आणि त्याच्या पलीकडे झाडाखाली दिसणा-या देवी आणि मारुतीच्या मूर्ती

अहिवंतवरील देवी आणि मारुतीची मूर्ती. माझ्याकडचा फोटो व्यवस्थित न आल्याने माझे नाशिककर गिर्यारोहक मित्र श्री. मयुरेश जोशी यांच्या पोतडीतून साभार. 

अहिवंतवरील पाण्याचे कुंड. फोटो - मयुरेश जोशी

कुंडाच्या शेजारील खंडोबाची मूर्ती

"तुमच्या दृष्टीने एका मुंगळ्याची किंमत काय आहे ???" मी उपस्थितांना विचारलं. त्रिमूर्तींसकट सगळे जण माझ्याकडे 'याला नक्कीच गडावरच्या टाक्यातलं पाणी चढलं आहे' असल्या विचित्र नजरेने बघायला लागले !!!
 "मुंगळ्याला काय किंमत असणारे. पायाखाली चिरडून टाकण्याच्या लायकीचा असतो." पका. 
"पण समजा हा मुंगळा तुमचं भविष्य सांगत असेल तर ???" मी. रस्त्यावरच्या हात बघणा-या ज्योतिषांनी पोपट सोडून मुंगळ्याची प्लेसमेंट कधी केली असला विचार सगळ्यांच्या मनात येउन गेला असावा !!!
"मुंगळा भविष्य सांगतो ??? म्हणजे ??" ऋतुराज. 
जास्त कसलीही चर्चा न करता मी सगळ्यांना एक मस्त जागा बघून तिथं बसायला लावलं. गडावरचं धुकं हळूहळू कमी होत चाललं  होतं. वातावरण स्पष्ट होत होतं. वा-याचा वेग आणि आवाज वाढू लागला. त्या वाहत्या वा-याने इतिहासाची पानं आता उलगडली होती……
इ.स. १६७० उजाडलं. मुघलांच्या प्रांतात झंझावातासारख्या घुसलेल्या मराठयांनी एक एक करत पुरंदरच्या तहात दिलेले २३ किल्ले परत जिंकून घेतले. पुन्हा एकदा सुरत लुटली आणि व-हाडातलं कारंजा नावाचं गावही लुटून फस्त केलं. पण मराठे एवढयावरच थांबले नाहीत. नाशिक बागलाणच्या प्रदेशात असलेल्या साल्हेर,मार्कंडया,रवळ्या - जवळया,अहिवंत यांसारखे बुलंद दुर्ग मराठयांनी मुघलांकडून अक्षरश: ओरबाडून घेतले. मुघलांची चहु बाजूनं कोंडी झाली होती. औरंगजेब दिल्लीत डोक्याला हात लावून बसला होता. मराठयांच्या विजयाच्या बातम्या येतच होत्या. हे प्रकरण जर वेळीच रोखलं नाही तर मराठे पुढच्या काही दिवसात दिल्लीवरही हल्ला करतील असं चित्र औरंगजेबाला दिसू लागलं. एखादी मोठी मोहीम काढणं आता भागच होतं. त्याने तातडीनं गुजरातचा सुभेदार असलेल्या बहादूरखान कोकलताश याला आणि बु-हाणपुरात तळ ठोकून बसलेल्या महाबतखानाला मराठयांनी जिंकलेला बागलाणचा मुलुख पुन्हा जिंकून घेण्याचं फर्मान सोडलं. महाबतखान १६७१ च्या जानेवारीमध्ये चांदवडला पोहोचला. चांदवडला त्या वेळी मुघलांची छावणी होती. त्या छावणीचा प्रमुख असलेल्या दाऊदखान कुरेशीची त्यानं भेट घेतली. दोन्ही खान आता मोहिमेच्या कामावर लागले. सल्लामसलत सुरु झाली आणि बराच विचार करून दोघांनी मोहीम निश्चित केली…अहिवंतगड !!!
नाशिक जिल्ह्यातल्या सातमाळा रांगेत वसलेला अहिवंतगड. उंचीने आणि विस्ताराने प्रचंड असलेलं एक बेलाग दुर्गशिल्प !!! खुद्द शिवाजीमहाराजांनी तंजावरच्या व्यंकोजीराजांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटलं आहे " अहिवंत किल्ला म्हणजे जैसा काही पन्हाळा,त्याचे बरोबरी समतुल्य आहे. किल्ला नामोश्याचा. पुरातन जागा आहे." स्वराज्यात पन्हाळ्याच्या बरोबरीने अहिवंतही तितकाच महत्वाचा होता हे या पत्राने अधोरेखित केलं आहे. असा हा प्रतिपन्हाळा जिंकून घ्यायला दाऊद आणि महाबत ही खानजोडी आता निघाली. इ.स. १६७१ च्या जानेवारी महिन्यात दोन्ही खान प्रचंड सैन्यासह अहिवंतच्या पायथ्याला पोहोचले. गडावरच्या सगळ्या वाटा मुघलांनी चौकीनाके आणि मोर्चे लावून बंद करून टाकल्या. गडावरचे मराठे एक ना एक दिवस अन्न - पाणी संपल्यावर आपल्याला शरण येतीलच हा विचार करून दोन्ही खानांनी गडाला वेढा घातला. दाऊदखानाने आपले मोर्चे गडाच्या एका बुरुजापाशी उभारले. हे मोर्चे गडावरून येणा-या तोफगोळ्यांच्या आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या मा-यापासून लांब राहतील अशा रीतीने बांधले गेले. महाबतने आपला मोर्चा गडाच्या दरवाजाच्या दिशेला उभारला. अहिवंतचा किल्लेदार कोण होता ह्याची माहिती इतिहासात माहिती उपलब्ध नाही. पण या अनामिक किल्लेदाराने अहिवंतवरून तोफा - बंदुकांचा प्रचंड मारा करत मुघल सैन्याला किल्ल्याच्या जवळपासही फिरकू दिलं नाही. 
अहिवंतला वेढा घालून आता एक महिना उलटला होता. पण गड ताब्यात यायची काहीच चिन्हं दिसत नव्हती. दाऊदखान चिंतेत बुडाला. हे असंच सुरु राहिलं तर काही दिवसांनी मोहीम सोडून द्यायची वेळ येईल. औरंगजेबाला काय तोंड दाखवणार आपण ?? नाही  नाही… काहीतरी केलंच पाहिजे !! दाऊदखान विचार करू लागला. आता उपाययोजना आवश्यकच होती. एक दिवस दाऊदखान त्याच्या छावणीत बसलेला असताना एक सैनिक आतमध्ये आला. त्याने दाऊदला सांगितलं "आपल्याकडे एक अतिशय निष्णात असा ज्योतिषी आहे. भविष्य सांगण्यात त्याचा हातखंडा आहे. किल्ला आपल्या हातात कधी येईल याचं अचूक भविष्य फक्त तोच सांगू शकेल. " दाऊदचे डोळे आनंदानं चमकले. आपले आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न सुरूच आहेत. कर्तव्यात कसलीही कमतरता नाही. तेव्हा बघू ज्योतिषी काय म्हणतोय असा विचार करून दाऊदखानाने ज्योतिषाला समोर हजर करण्याचा आदेश दिला. ज्योतिषी दाऊदखानच्या छावणीत आला. "किल्ला कधी आणि कसा जिंकला जाईल ते सांग." दाऊदने ज्योतिषाला विचारलं. ज्योतिषाने थोडी साखर आणायला सांगितली. त्याने त्या साखरेच्या मदतीनं जमिनीवर अहिवंतगडाचा नकाशा काढायला सुरुवात केली. त्याने गडावरचे बुरुज जिथे होते तिथे साखरेचे छोटे त्रिकोण काढले. तसंच मुघलांच्या पहा-याच्या जागाही  नकाशात दाखवल्या.जिथे महाबतखानाचे मोर्चे होते तिथे त्याने साखरेचे छोटे ढिगारे काढले आणि जिथे दाऊदखानाचे मोर्चे होते तिथेही त्यानं साखरेचे ढिगारे काढले. साखरेने काढलेला अहिवंतचा तो नकाशा पूर्ण झाल्यावर त्याने आपल्याजवळ ठेवलेला एक मुंगळा बाहेर काढला आणि त्याने तो त्या साखरेच्या नकाशात सोडला. श्वास रोखून मुघल सैन्य हा प्रकार बघत होतं.  तो मुंगळा सुरुवातीला महाबतखानाचे मोर्चे जिथे होते तिथून आत गेला आणि परत बाहेर आला. नंतर तो दाऊदखानाचे मोर्चे जिथे होते त्या भागात गेला आणि पुन्हा बाहेर आला. असं दोन तीन वेळा झाल्यावर तो पुन्हा एकदा दाऊदखानाच्या मोर्च्यांपाशी गेला आणि शेवटी तिथून त्याने किल्ल्यात प्रवेश केला. ज्योतिषाच्या चेहे-यावर आता हास्य उमटलं होतं. त्याने चटाचटा कागदावर गणितं मांडली आणि भविष्य वर्तवलं "आजपासून सहा दिवसांनी महाबतखान किल्ल्यावर जोरदार हल्ला करेल पण किल्ला तुमच्या बाजूने ताब्यात येईल."  दाऊदखानाला ही भविष्यवाणी पटेचना. आभाळाला भिडलेला तो अहिवंताचा किल्ला. आपण एक महिनाभर प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. त्यात महाबतखान आता किल्ल्याच्या दरवाजाजवळ जाउन पोहचला आहे आणि तरीही हा ज्योतिषी म्हणतोय की गड आपल्या बाजूने ताब्यात येईल ?? अशक्य !!! 
सहावा दिवस उजाडला आणि ज्योतिषाने भविष्य वर्तवल्याप्रमाणे महाबतखानाने अहिवंतगडावर जोरदार हल्ला चढवला. मुघल सैन्य आता इरेला पेटलं होतं. गडावरच्या मराठयांनी मुघलांचा तो आवेश बघितला. गडावरचं धान्यही संपत आलं होतं . महिनाभराच्या हल्ल्यांमध्ये मराठयांचे अनेक लोकही मारले गेले होते. या परिस्थितीत किल्ला लढवणं कठीणच होतं.  आता शरण जाणं हा एकच पर्याय मराठ्यांकडे उरला. पण समजा महाबतखानाच्या बाजूने शरण गेलो तर ते लोक आपल्याला जिवंत सोडणार नाहीत हे किल्लेदाराच्या लक्षात आलं. अखेर त्यानं गडावरची काही मातब्बर माणसं दाऊदखानाचे मोर्चे ज्या बुरुजासमोर होते त्या बुरूजाजवळून जाणा-या एका बारीक पायवाटेने दाऊदखानाकडे पाठवून दिली. जिवंत जाऊ देत असाल तर किल्ला तुमच्या हवाली करतो असा प्रस्ताव त्यांनी दाऊदखानासमोर मांडला. दाऊदखानाचं नशिबच फळफळलं !!! शामियान्यात बसून किल्ला हातात येतोय हे बघून त्याने तत्काळ मराठयांची विनंती मान्य केली. आपलं सैन्य पाठवून त्यानं गडाचा ताबा घेतला आणि महाबतखान ज्या दरवाजासमोर मोर्चे लावून बसला होता त्याच दरवाजातून त्यानं मराठयांना गडाखाली जाण्याची वाट दिली. महाबतखानाला हा प्रकार समजला आणि तो चकितच झाला. गेले महिनाभर शर्थीचे प्रयत्न करून हाती येत नसलेला अहिवंतगड आज दाऊदखानाने इतक्या सहजपणे कसा काय ताब्यात घेतला ?? गडावर सगळ्यात जास्त हल्ला आपल्या बाजूने झाला आणि मराठे दाऊदखानाला कसे काय शरण गेले हेच त्याला कळेना. आपल्याला गड मिळाल्याची साधी बातमीही दाऊदखानाला देता आली नाही ?? त्याला एकटयाने निर्णय घ्यायला कोणी सांगितलं होत ??? संतापाने महाबतखान थरथर कापत होता. प्रयत्नांची शिकस्त महाबतखानाने करूनही अहिवंतच्या विजयाचं श्रेय मात्र दाऊदखानाला मिळालं होतं. यावरून त्याची आणि दाऊदखानची अहिवंतच्या पायथ्याला प्रचंड भांडणं झाली. अखेर चिडलेला महाबतखान तिथून निघाला आणि नाशिकला जाऊन राहिला !!!
इकडे दाऊदखानाची मात्र दिवाळी सुरु होती. औरंगजेबाकडून आता किताब,सन्मानही मिळणार होता. दाऊदखानानं  किल्ल्याचं भविष्य सांगणा-या ज्योतिषाला प्रचंड मोठं इनाम दिलं. महिनाभरापूर्वी जिंकण्यासाठी केवळ अशक्य वाटणारा अहिवंतगड एका मुंगळ्याच्या करामतीनं मुघलांच्या ताब्यात आला होता !!!!         
अहिवंतसारख्या महाबलाढ्य किल्ल्याची ही कथा केवळ एक दंतकथा नसून प्रत्यक्षात घडलेली एक सत्यघटना आहे. जेधे शकावली आणि खुद्द मुघलांचा समकालीन इतिहासकार असलेल्या भीमसेन सक्सेना याने लिहिलेला "तारीखे दिल्कुशा" यांसारखी अस्सल समकालीन साधनं या घटनेची साक्षीदार आहेत !!!    
गोष्ट संपून दोन तीन मिनिटं झाली तरी कोणाच्या तोंडून शब्दच फुटेना. त्यांना बहुदा दोन प्रश्न पडले असावेत. 
१.  एक मुंगळा एखाद्या किल्ल्याचं भविष्य कसंकाय सांगू शकतो ??
आणि  
२ . इतिहास इतका मनोरंजक असू शकतो ??
त्यांच्या चेहे-यावर हे भाव अगदी स्पष्ट दिसून येत होते. आश्चर्याचा सगळ्यात मोठा धक्का बसला होता तो सुनील,सुरेश आणि सागरला !!!! ज्या गडाच्या पायथ्याला आपण राहतो त्याचा इतिहास इतका रोमांचक आहे यावर विश्वास ठेवणं त्यांना कठीण जात असावं. "दादा,आजपर्यंत इतक्या लोकांना गडावर घेऊन आलो पण ही गोष्ट फक्त तुम्हीच सांगितलीत. आता आम्ही यापुढे जे लोक येतील त्यांना पण हा इतिहास सांगू !!!"  ही त्यांची प्रतिक्रिया म्हणजे मी हा इतिहास सांगताना केलेल्या वेळेच्या गुंतवणुकीचं ख-या अर्थाने झालेलं चीज होतं !!!

अहिवंत वरून दिसणारा अचला किल्ला. पायथ्याला बिलवडी गाव


अहिवंतची ईशान्येकडील (दरेगावाच्या उजवीकडील) माची.

अहिवंतमाचीवरील भग्न दरवाजा व पाय-या

अहिवंतमाचीवरील पाण्याचं टाकं


माचीवरून दिसणारा अहिवंतगडाचा विस्तार व बुध्या डोंगर

त्रिदेवांनी "आमी तुमाला सगळा किल्ला फिरवून पलीकडून खाली उतरवू" अशी गॅरंटी दरेगावातून निघतानाच दिली होती. अहिवंतमाचीवरून एका गुहेमार्गे खाली उतरणा-या रस्त्यामार्गे आपण बिलवडी गावात जाऊ शकतो किंवा पुन्हा दरेगावातही येऊ शकतो. अहिवंतमाचीकडे जातानाही बरीच उध्वस्त बांधकामं दिसतात.त्रिदेवांना मुंगळ्याची गोष्ट ऐकल्यापासून इतिहासात भलताच रस निर्माण झाला होता. त्यामुळे अहिवंतमाचीकडे जाता जाता त्यांना सिंहगडाच्या तीन हत्तींची गोष्ट,रामसेजच्या वेढ्याच्या वेळी मुघलांनी केलेली काळी जादू, औरंगजेबाने तंतुवाद्यांची काढलेली अंतयात्रा वगैरे गोष्टी मी त्यांना सांगत होतो. अहिवंतचा ईशान्येकडचा दरवाजा जवळ येत चालला होता. चिन्मय आणि सेना मागून येत होती. अचानक डावीकडे दिसणा-या सह्याद्रीच्या कड्यांवरचं ढगांचं आवरण हळू हळू बाजूला होऊ लागलं. क्षणार्धात माझ्या काहीतरी लक्षात आलं.एखाद्या अनामिक शक्तीने रोखल्यासारखा मी जागीच खिळून थांबलो. पाच मिनिटं अशीच गेली आणि…….आजी म्या ब्रम्ह पाहिले !!! ढगांच्या आवरणातून आपलं सह्याद्रीतलं दुस-या क्रमांकाचं शिखर उत्तुंगपणे उंचावत साक्षात गिर्यारोहकांच्या पंढरीनं आम्हाला दर्शन दिलं. क्षितीजरेषेवर महाराष्ट्राचा दुर्गसम्राट अर्थात साल्हेर किल्ला ढगांच्या आडून बाहेर आला होता !!!! आनंदवनभुवनी !!! ट्रेकच्या पहिल्या मिनिटापासून असलेली इच्छा ट्रेकच्या शेवटच्या क्षणी पूर्ण झाली होती. शेजारचा सालोटा आणि त्याच्या उजवीकडे मुल्हेर - हरगडही आता पूर्णपणे स्पष्ट झाले होते. साल्हेरच्या मागे आपलं बोट उंचावलेला 'टकारा' सुळकाही स्वच्छ दिसत होता. भान हरपायला लावणारं एक दृश्य !!! केवळ अप्रतिम !!! डोळे भरून आम्ही कितीतरी वेळ हा नजारा आम्ही बघत होतो. कॅमे-याच्या टप्प्याच्या पलीकडे असले तरी साल्हेर - मुल्हेर डोळ्याला मात्र स्पष्ट दिसत होते. एक अविस्मरणीय अनुभूती आज मिळाली होती. संपूर्ण ट्रेकचं या एका दृश्याने सार्थक केलं होतं  !!! मंत्रमुग्ध होऊन आम्ही आता पायथ्याला परतत होतो !!! 

अहिवंतमाचीच्या कडयातली गुहा. ही गुहा जनावरांनी खराब केल्याने मुक्कामायोग्य नाही.

अहिवंतमाची - खालच्या बाजूने

अहिवंतची ईशान्य माची अर्ध्या पाऊण उतरून आम्ही खालच्या डांबरी रस्त्याला लागलो. अचानक माझ्या लक्षात आलं की काल दगड पिंप्रीच्या सुनील भुसारने ट्रेक कसा झाला हे कळवण्यासाठी फोन करायला सांगितलं होतं. मी सुनील,सुरेश आणि सागर बरोबर बराच पुढे आलो होतो. त्यामुळे बाकीचे येईपर्यंत फोन करून घेऊ असं म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली टेकलो आणि सुनीलला फोन केला. ट्रेक छानच झाला,रवी आणि गुलाबनं खूप मदत केली वगैरेही सांगितलं. फोन ठेवताना सुनीलनं विचारलं "दादा तुमचा ई - मेल आयडी काय आहे ???" नाशिक जिल्ह्याच्या एका कोप-यात वसलेल्या दगड पिंप्रीसारख्या छोटयाश्या गावातल्या तरुणाच्या तोंडून 'ई - मेल आयडी' वगैरे शब्द ऐकून नवीन माणसाला धक्काच बसला असता. पण रायगड जिल्ह्यातल्या माणिकगडाच्या पायथ्याचं निम्मं वडगाव माझ्या फेसबुकच्या फ्रेंडलिस्ट मध्ये आहे आणि त्यांच्याशी माझा रोजचा संपर्क असतो. त्यामुळे सुनीलचा प्रश्न ऐकून मला फार काही वेगळं वाटलं नाही. मी त्याला मेल आयडी कशासाठी हवाय असं विचारल्यावर त्यानं सांगितलं " दादा,आत्ताच बारावी चांगल्या मार्कांनी पास झालोय. सध्या MHCIT चा कोर्स करतोय. कालच त्या कोर्सच्या सरांनी ई - मेल कशी करायची ते शिकवलं. आता पहिली मेल तुम्हालाच करणार आहे !!!" ट्रेक संपताना मिळालेलं अजून एक मोठ्ठं सरप्राईज !!! मी त्याला मेल आयडी दिला आणि "पुढच्या शिक्षणासाठी कसलीही मदत लागली तर नक्की कळव." असं सांगून फोन ठेवला !! दरेगाव आता फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर राहिलं होतं.  हे अंतर कापत असताना मनातले विचार मात्र काही केल्या थांबत नव्हते. किती रूपं सह्याद्रीने ह्या दोन दिवसात आपल्याला दाखवली. मग ते अचलाचं तौला शिखर असो किंवा मोहनदरीचं नेढं. अहिवंतचा डोळ्यात न मावणारा प्रचंड विस्तार असो किंवा साल्हेरचं आभाळाला भिडलेलं परशुराम शिखर !!!  कितीही म्हणलं तरी सह्याद्रीचं देणं या जन्मात तरी फिटायचं नाही. आणि ते फेडणारे आपण कोण !!! सह्याद्रीच्या अस्मानी कड्यांपुढे कायम नतमस्तक असणारे आपण कायम त्याचे कृतज्ञच राहणार आहोत. खरं तर ट्रेकचा दोन दिवसाचा कालावधी म्हणजे फार काही मोठा नव्हे. पण या दोन दिवसात सातमाळेच्या सहा गिरिदुर्गांनी सह्याद्रीचं एक नवं साम्राज्य उलगडून दाखवलं होतं. निसर्गाचे अनेक रंग दाखवले होते.समाधानाचं स्मितहास्य नकळतपणे ओठांवर येत होतं.  एक परिपूर्ण डोंगरयात्रा आज सफल झाली होती !!!


शुभास्ते पंथान: सन्तु !!!    

ओंकार ओक

Comments

 1. WONDERFUL !!!!! Just wonderful. Attishay awadla he warnan. I couldnt stop till I had read the entire post. Beautifully written. Mala donglyachi story titkich ranjak watli jitki tridevanna watli asel. Never knew about it. Great work ! Keep it up. Photos sudha mastach as always.

  ReplyDelete
 2. Bhavishya vartavnarya jyotishyacha/munglyacha itihas ani tevdhach purpur mahiti denara lekh.....mast....

  ReplyDelete
 3. apratim lekh... suru kelyavar thambu shakatch nahi... Keep up the good work Onkar

  ReplyDelete
 4. superb yaar.. ! tuzya tondun pratyaxaat itihas aikyla avdel mitra.. keep it up.. mast lihitoys.. mast bhatkanti

  ReplyDelete
 5. Sahi re! Mast zalay lekh! :)

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड