अनवट चौकडीची स्वच्छंद भ्रमंती : दिवस पहिला

"विन्या उठलास का. चार वाजलेत. साडेपाचला येतोय तुझ्या घराखाली. आवर पटकन." शनिवार सकाळचा अत्यंत परिचित असणारा हा संवाद. विनयला अलार्म कॉल करून झाल्यावर मीही तयारीला लागलो. संदर्भ पुस्तकं, नकाशे,खादाडीचं सामान आणि इतर आवश्यक वस्तू सॅकमध्ये आपापल्या जागी जाउन स्थानापन्न झाल्या. बुटाच्या नाड्या आवळल्या गेल्या…बाईक सुरु केल्याचा आवाज हाटेच्या शांत वातावरणाला क्षणार्धात चिरत गेला...आणि नाशिकच्या दिशेने एका अनवट सफरीची  सुरुवात झाली !!
नगर जिल्ह्यातल्या भैरोबा दुर्ग - पेमगिरी आणि नाशिक जिल्ह्यातल्या बहुला - त्रिंगलवाडी या परिचित - अपरिचित गिरीदुर्गांच्या भेटीची ओढ लागून जवळपास महिना उलटला होता.पण चांगल्या कामांना योग्य वेळी योग्य मुहूर्त सापडतोच असं नाही. सबमिशन्स,क्लासेस,परीक्षा आणि धून मधून घरच्यांनी आमच्या नावाने उधळलेली मुक्ताफळं ह्या सगळ्या गोष्टी एकदाच्या विनासायास पार पडल्या आणि नोव्हेंबर महिन्यातल्या एका शनिवार - रविवारी दोन दिवसात चार किल्ल्यांच्या ट्रेकवर अखेर शिक्कामोर्तब झालं. शनिवारी पहाटे घरातून बाहेर पडताना मातोश्रींनी टोला हाणलाच...
"दर रविवारी उनाडक्या करता. काही लाज लज्जा शरम वगैरे आहे की नाही ??"
"आहे ना. पण जी काही आहे ती ट्रेकला बरोबरच घेऊन चाललोय !!!"
विनयला नाशिक फाट्यावरून उचललं आणि नारायणगाव जवळच्या एका ढाब्यावर तर्रीबाज रस्सावडा आणि मिसळ हादडून बोटा गावामार्गे कोतूळ रस्त्याला लागलो. आज भैरोबादुर्ग आणि त्रिंगलवाडी किल्ला बघून बहुला पायथ्याला मुक्काम टाकायचा होता. कोतूळहून भैरोबा दुर्गाच्या पायथ्याला पोचताना विहीर गावापाशी डावीकडे कुंजरगडाची भव्यता मात्र नजरेत भरली. कोतूळवरून भैरोबा दुर्गाचं पायथा असणारं कोथळे गाव हे हरिश्चंद्रगडाच्या टोलारखिंडीचा विरुद्ध दिशेचा पायथा. ट्रेकर्स सामान्यत: खिरेश्वर बाजूने टोलारखिंड चढून हरिश्चंद्रगडावर पोहोचतात. पण कोथळे गावातून जाणारा मार्ग हा खिरेश्वर बाजूने येणा-या रस्त्याला टोलारखिंडीत येउन मिळतो आणि पुढे दोन्ही वाटा हातात हात घालून गडावर प्रवेश करतात.
कोथळयापासून भैरोबा दुर्गाचा छोटासा कातळकडा सहज नजरेत भरला आणि किल्ल्यावर आपली एन्ट्री सुकर करणारी शिडीही दृष्टीस पडली. कोथळे गावापासून किल्ल्याचा पायथा अगदी जवळ आहे. पायथ्याच्या दोन झापांपाशी पोहोचताना डावीकडे टोलारखिंडीचा मार्ग दाखवणारी पाटीही दिसली. हरिश्चंद्रगडाचं घनदाट जंगल हे कळसूबाई - हरिश्चंद्र अभयारण्याअंतर्गत संरक्षित केलं आहे. भीमाशंकर अभयारण्याचं प्रमुख वैशिष्ट्य असलेली शेकरू खार या परिसरातही सापडत असल्याने ह्या जंगलाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
    
विहीर गावातून कुंजरगड 


कोथळे गावातून भैरोबा दुर्ग


भैरोबा दुर्ग


 भैरोबा दुर्ग  क्लोजअप व त्याच्या दोन कातळकड्यांच्या मध्ये पुसटशी दिसणारी लोखंडी शिडी

भैरोबा दुर्गाच्या कुशीतील एक निवांत ठिकाण

गडाच्या वाटेवरून दिसणारं कोथळे गाव

गडाच्या वाटेवरची पहिली शिडी


गडाच्या कातळपोटातील गुहा आणि शेजारी भव्य आकाराची शिडी


गडावरील दुसरी शिडी. ही चढून गेल्यावर खोदीव पावट्यांच्या वाटेने आपला गडात प्रवेश होतो. 


भैरोबा दुर्गाच्या माथ्यावर प्रवेश करताच उजवीकडे भैरोबाचं देऊळ आणि समोर दोन दगडी दीपमाळा दिसतात 

                                    भैरोबा दुर्गाच्या डावीकडील डोंगरामागे हरिश्चंद्राचं तारामती शिखर स्पष्ट दिसत होतं 


  भैरव मंदिरासमोरील पाण्याचे टाके व मागे तारामती शिखर


भैरोबा दुर्गाच्या माथ्यावरून राजूरच्या दिशेच्या डोंगरांनी सहज लक्ष वेधलं. फोटोच्या बरोब्बर मध्ये दिसणारा बुटका कातळकड्याचा डोंगर म्हणजे शिरपुंज्याचा / आंबीतचा भैरवगड आणि त्याच्या डावीकडे अजस्त्र आकाराचा घनचक्कर


मंदिरापासून डावीकडच्या कड्याजवळची स्वच्छ पाण्याची जोडटाकी.बाकी किल्ल्यावर फार अवशेष नाहीत 


साद सह्याद्रीची… कुंजरगड व उजवीकडे कारकाई डोंगर 


गडाच्या वाटेवरील छोटी गुहा


भैरोबा दुर्गाच्या उजवीकडचा रांजणाच्या आकाराचा डोंगर. याच्या कातळपोटात नैसर्गिक गुहा दिसतायेत 


कोथळे - राजूर मार्गावरून कुंजरगड


कोथळयाहून राजूरला जातानाचा पाचनई फाटा. कलाडगड करायचा असल्यास इथून डावीकडे तर 
भंडारद-यासाठी उजवीकडे वळावे.     


कोथळयातून अर्ध्या तासात भैरोबा दुर्गाचा माथा आम्ही गाठला. वर बघायला फार काही नसतानाही खिळवून ठेवणा-या दृश्यांनी मात्र आमचा बराच वेळ खाल्ला !! पायथ्याशी परत येताना सरकारी कर्मचारी असूनही इमानेइतबारे काम करणारे दोन वनसंरक्षक भेटले. या भागात बिबट्यांचे प्रमाण ब-यापैकी आहे. शेकरुही दिसतात आणि औषधी वनस्पतीही मोठया प्रमाणात आहेत अशी माहिती मिळाली. पायथ्यापासून भैरोबा दुर्ग पाहून पुन्हा खाली यायला दोन तास पुरतात.कोथळयाहून सुमारे पंचवीस किलोमीटर्सचं अंतर पार करून आम्ही राजूर गाठलं तेव्हा एक वाजत आला होता. राजूरला पोचतानाच पोटात खड्डा पडल्याने एस. टी स्टॅन्डजवळच्या शुभम नावाच्या हॉटेलमध्ये घुसलो आणि "राजूर" हे नाव काढल्यावर आयुष्यभर लक्षात राहील असा प्रसंग घडला.
"जेवण तयार आहे" अशी पाटी वाचून आम्ही आत गेलो. पाचेक मिनिटं कोणाचाच पत्ता नाही. बहुदा हॉटेलच्या कर्मचा-यांना आम्ही आलेलो कळलं नसेल म्हणून विनयने हाक मारली तेव्हा आतून बनियन घातलेला एक माणूस डोळे चोळत आणि जांभया देत बाहेर आला. बहुदा मालक असावा. ग्राहक या नात्याने आम्ही त्याची झोपमोड करून महत्पाप केलं होतं  !!!
"काय पायजे ??" आपल्या सुटलेल्या पोटावरून हात फिरवत त्या हॉटेलच्या मालकाने एक अतिशय असंबद्ध प्रश्न विचारला. आता हॉटेलमध्ये आम्ही काय आमची फाटलेली पॅन्ट शिवायला आलो होतो ??
"काय पायजे म्हणजे ??"
"काय पायजे म्हणजे काय पायजे ??" पुन्हा तेच
"अहो जेवण मिळेल का. आम्ही त्याकरताच आलोय. "
"नाय. आचारी पोरगा इमर्जन्सीमुळे घरी गेलाय. जेवण बनवायला कोणबी नाहीये.बायको हाये पण ती पण झोपलीये.हॉटेल बंद झालंय." आता मात्र आमची वाचाच खुंटली. कारण दार सताड उघडं असताना हॉटेल बंद असतं हा शोध आम्हाला पहिल्यांदाच लागला होता. 
"अहो पण बाहेर तुम्ही पाटी लावलीये जेवण तयार आहे म्हणून"
"त्याज्यायला …ते चुकून राहिली भायेरच. एक काम करा,गावाबाहेर अकोले रोडला मातोश्री ढाबा आहे. तिकडे जावा. कधीपण जेवण मिळतं." ह्या महापुरुषाने स्वत:च्या ऐवजी दुस-याच्या हॉटेलचं मार्केटिंग करून शब्दश: आमच्या पोटावर पाय दिला.
चरफडत आणि त्याच्या अनास्थेला शिव्यांच्या भरगच्च लाखोल्या वाहात आम्ही बाहेर पडलो. पण मातोश्री मधल्या शेवभाजीचा पहिला घास घेतला आणि त्या शुभमच्या मालकाला आमची सरबराई न केल्याबद्दल प्रचंड धन्यवाद दिले. केवळ लाजवाब !! सटाण्याच्या "पुष्पांजली" हॉटेल नंतर इतक्या भन्नाट आणि अप्रतिम चवीची शेवभाजी आम्ही पहिल्यांदाच चाखत होतो. न जाणो शुभममध्ये जेवलो असतो तर या सुखाला कायमचे मुकलो असतो. जे होतं ते चांगल्यासाठीच ही उक्ती पुन्हा एकदा इथे सार्थ ठरली !!! भरलेली पोटं आणि तृप्त झालेलं मन घेऊन आम्ही आता घोटीच्या दिशेने सुसाट निघालो. भंडारदरा धरणाच्या पार्श्वभूमीवर रतनगड आणि पाबरगड कमालीचे उठून दिसत होते. समोरचं कळसुबाई शिखर आभाळात झेपावलं होतं. पश्चिमेकडे अलंगचा विस्तार स्पष्टपणे जाणवत होता. बारी गावापाशी आल्यावर रतनगडाच्या मागे कात्राबाई खिंडीनही दर्शन दिलं तर नैऋत्येला आजोबाच्या शिखरानंही डोकं वर काढलं. बारी गावाची खिंड आम्ही ओलांडली आणि….जादूची कांडी फिरावी तसं दृश्य समोर अवतरलं !!! पश्चिमेला कळसुबाई,अलंग - मदन - कुलंग,पूर्वेला बितनगड,शेणीत सुळका,महांकाळ डोंगर,पट्टा,औंढा,म्हैसवळण घाट आणि टाकेद - देवळालीचा प्रदेश,वायव्येला मोरधन तर ईशान्येला बहुला आणि कावनई…...आंबेवाडी फाट्याला स्तंभित होऊन आम्ही हे दृश्य बघतच बसलो. जिथे नजर जावी तिथे फक्त सह्याद्रीच !!! आभाळाला भिडलेल्या त्या रौद्र कड्यांपुढे आपण किती क्षुल्लक आहोत याची क्षणार्धात जाणीव झाली. सह्याद्रीची ही रंगलेली मैफल संपूच नये असं क्षणभर वाटून गेलं. नकळत दुखावला जाणारं 'अहं' आणि तत्वांशी एकनिष्ठ असणारं 'स्वत्व' धाडकन कोसळून पडल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला. भरून आलेलं मन आणि सर्वांगावर उभे राहिलेले रोमांच…सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपसूकच मिळाली होती !!
घोटी गावातून मुंबई - आग्रा महामार्ग ओलांडून टाके फाट्यामार्गे आम्ही त्रिंगलवाडीकडे निघालो तेव्हा उन्हं कलायला लागली होती. म्हाळुंग्याच्या अजस्त्र डोंगराला वळसा घालून पुढे आलो तेव्हा त्रिंगलवाडी किल्ला त्रिंगलवाडी जलाशयात स्वत:चच रूप न्याहाळीत उभा होता. त्रिंगलवाडी गावातून पुढे येउन किल्ल्याच्या Actual पायथ्याला गाडी लावली तेव्हा शेजारच्या घरांमधली पोरं आणि बाया बाहेर डोकावल्या. "लेणी आणि किल्ला दाखवतो. शंभर रुपये द्या फक्त." सोमनाथ नावाच्या षोडशवर्षीयाने आपणहूनच तयारी दाखवली. त्याला बरोबर घेऊन गावाची शेतं तुडवत निघालो.             


त्रिंगलवाडी गावातून त्रिंगलवाडी किल्ला 
    


अर्धा तास चढल्यावर दहाव्या शतकातील हे जैन लेणं समोर आलं. 




लेण्यांमधील भगवान गौतम बुद्धांची मूर्ती


लेण्यांमधील कोरीव नक्षीकाम 


लेण्यांपासून त्रिंगलवाडी किल्ला एखाद्या सुस्तावलेल्या अजगरासारखा दिसत होता. दहा मिनिटे चढल्यावर पहिल्या पठारावर पोहोचलो.  


त्रिंगलवाडी किल्ल्याच्या वाटेवरचं विस्तीर्ण पठार 

संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात उजळून निघालेला कातळकडा कमालीचा सुंदर दिसत होता. याच्या डावीकडून आणि उजवीकडून दोन्ही बाजूने माथा गाठता येतो. डावीकडच्या पायवाटेने सरळ गेल्यावर वीस मिनिटात गडाच्या दरवाजाकडे नेणा-या पाय-या सुरु होतात. डावीकडून दरवाजातून किल्ल्यावर पोचून उतरताना उजव्या कातळकड्यावरून येता येईल.


कातळकड्यातील देवाचे ठाणे


डावीकडच्या पायवाटेने सुमारे २० मिनिटे आडवं गेल्यावर दरवाजाच्या पाय-या सुरु होतात


दरवाजाजवळील मारुतीरायांची "पुच्छ ते मुरडिले माथा" या प्रकारातली आणि दैत्याला पायाखाली चिरडणारी रेखीव आणि सुंदर मूर्ती


त्रिंगलवाडीचा कातळकोरीव असा देखणा दरवाजा


गडाच्या दक्षिणेला एकेकाळच्या भव्य वाड्याचे अवशेष आढळतात. मागे म्हाळुंगा डोंगर व डावीकडे मोरधन  


गडावरील पाण्याचे खांबटाके 


गडावरील अजून एक खोदीव टाके 


किल्ल्यावरील उध्वस्त अवशेष


उत्तरेकडच्या भागात शिवमंदिर आहे. मागे क्षितिजावर पुसटशी त्रिंबक रांग 

मंदिराबाहेरील शिवपिंड 


डावीकडे हरिहर उर्फ हर्षगड व उजवीकडे ब्रम्हा डोंगर 


किल्ल्याच्या उजव्या कातळकड्याजवळील खोदीव पाय-या. किल्ला चढताना दरवाजाच्या बाजूने गेल्यास परत येताना या पाय-यांनी उतरता येते.


त्रिंगलवाडी तलाव व मागे शंकूच्या आकाराचा बुध्या डोंगर,त्याच्या शेजारी गाभाड्या डोंगर व सर्वात डावीकडे कावनई किल्ला व त्याचा बुधला

त्रिंगलवाडी किल्ल्यावर पाण्याची तशी वानवाच आहे. पण किल्ल्यावरून चारही बाजूंना सुंदर दृश्य मात्र मिळालं.भास्करगड,उतवड,ढो-या डोंगर,वैतरणा धरणाजवळील डोंगररांगा,कसारा घाटाचा प्रदेश आणि सर्वात सुखावून जाणारे कळसूबाई,अलंग - मदन - कुलंग !! किल्ला उतरून साडेसहाच्या सुमारास आम्ही घोटीला पोहोचलो तेव्हा पश्चिमेकडे एक विलक्षण सुंदर दृश्य साकारलं होतं. निरभ्र आकाशाच्या कॅनव्हास वर जांभळ्या - गुलाबी रंगांची झालेली स्वैर उधळण,त्या रंगपंचमीत स्वत:ला चिंब भिजवणारे कळसूबाई,अलंग - मदन - कुलंग,संध्याकाळचा सुटलेला गार वारा आणि योगायोगाने नेमकं त्याच वेळी आयपॉडवर लागलेलं लतादीदींच्या स्वर्गीय आवाजातलं "तिन्ही सांजा सखे मिळाल्या"....एक अविस्मरणीय संध्याकाळ And a Well Spent Day !!!
नाशिक जिल्ह्यातल्या विल्होळी गावाजवळच्या आंबे बहुला गावात आज आमचा मुक्काम असणार होता. वाकी फाट्यावरवरच्या एका ढाब्यावर अफलातून चवीचा जायफळयुक्त चहा आणि पुण्याहून आणलेला आणि खास याच Moment साठी राखून ठेवलेला बन - मस्का हाणताना डावीकडचा कावनई आणि त्याचा बुधला पूर्णपणे अंधारात बुडलेले दिसत होते. पण त्यांना पडलेली चांदणभूल मात्र आमच्याही नजरेतून सुटली नाही !!! त्या धाब्यावर वेळेचे सगळे नियम धाब्यावर बसवत बर्राच वेळ टाईमपास केला आणि शेवटी भानावर येउन नाशिकच्या दिशेने सुसाट निघालो. आज रात्री किमान दहाच्या आत तरी आंबे बहुला गावातलं मंदिर मुक्कामासाठी गाठणं आवश्यकच होतं.मुंबई आग्रा हायवेवर वाडीव्हरेच्या अलीकडे एका पंक्चरच्या दुकानात आम्ही जेव्हा "आंबे बहुला" गावाचा पत्ता विचारला तेव्हा दुकानमालक आणि त्याच्या पो-याने फक्त मख्ख चेहेरे करून एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या चेहे-यावर आमच्या तोंडून "वाडीव्हरेहून न्यूजर्सीला जाणारी जीप किती वाजता मिळेल हो ??" असला काहीतरी अचाट आणि अगम्य प्रश्न ऐकल्यासारखे भाव उमटले. दहा - बारा सेकंद अशीच शांततेत गेली आणि अचानक काहीतरी आठवून त्या तेजस्वी महापुरुषाच्या ओजस्वी वाणीतून शब्द्फुलं प्रकटली….."हमे मालूम नाही !!!". आता मख्ख चेहेरे करण्याची वेळ आमच्यावर आली होती. त्या सत्पुरुषाच्या मेंदूतलं GPS नाशिक जिल्ह्यात कुठेतरी भरकटल्याने त्याने आम्हालाही Stand By वर टाकून दिलं होतं. अंधारात बुडालेला मुंबई - आग्रा महामार्ग,त्यावरून सुसाट धावणा-या गाडया आणि त्यातला किमान एक तरी दुर्दैवात्मा याचक बनून आपला धंदा करून द्यायला येईल या अपेक्षेने त्या सुनसान जागेत उभा असलेला तो पंक्चरवाला.बाकी त्या रस्त्यावर (जीवंत) माणसाचा मागमूसही नव्हता. तेवढयात विनय माझ्या कानात कुजबुजला "अबे त्याच्याकडून दोन्ही चाकात हवा भरून घे…मग त्याला बरोबर आठवेल !!!" मला त्या परिस्थितीतही फिस्सकन हसू आलं. इतक्यात आमच्या सुदैवाने एक माणूस हवा भरायला त्या दुकानात आला. तो वाडीव्हरेचाच राहणारा असल्याने त्याने आम्हाला आंबे बहुलाचा अचूक पत्ता सांगितला. मुंबईहून नाशिककडे जाताना घोटीहून अंदाजे पंधरा किलोमीटरवर वाडीव्हरे गाव आहे. या गावानंतर नाशिकच्या दिशेने सरळ गेल्यावर रायगडनगर नावाची एक कॉलनी लागते. इथूनच रस्ता ओलांडायचा आणि पलीकडच्या आंबे बहुला फाट्यावरून बहुला पायथा गाठायचा. नाशिकहून विल्होळी गावानंतर अंदाजे दोन किलोमीटरवर आंबे बहुला फाटा आहे (थोडक्यात वाडीव्हरे आणि विल्होळीच्या मध्ये आंबे बहुला फाटा आहे).या फाट्यावरचं "विजयानंद हॉटेल" हे या फाट्याची मुख्य खूण (आज सहा वर्षांनंतरही ते हॉटेल त्याच जागी आणि चालू स्थितीत असावं अशी अपेक्षा आहे !!). त्या बाईकवाल्या तारणहाराचे आभार मानून आम्ही आता नाशिकच्या दिशेने निघालो. वीसेक मिनिटांनंतर शेवटी एकदाचं ते रायगडनगर सापडलं,त्याच्या पुढचं ते विजयानंद हॉटेल सापडलं,त्या हॉटेलला चिकटून आत जाणारा आंबे बहुलाचा रस्ता सापडला आणि त्या रस्त्याची दिशादर्शक पाटीही सापडली !!!
साडेनऊच्या सुमारास आम्ही आंबे बहुलामध्ये पोचलो तेव्हा गावातल्या विठ्ठल मंदिरातलं भजन कमालीचं रंगात आलं होतं. विठुनामाचा गजर अगदी टिपेला पोचला होता. मंदिराच्या बरोब्बर समोर असलेल्या किराणा मालाच्या दुकानात आम्ही मंदिरात राहू का असं विचारल्यावर अर्थातच होकार आला. आता भजन संपण्याची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. पण साडेनऊला सुरु झालेलं भजन बारा वाजले तरी संपेचना !! शेवटी साडेबाराच्या सुमारास सगळी आवरावर झाल्यावर आमची रवानगी मंदिराच्या वरच्या अतिशय स्वच्छ अशा माळ्यावर झाली आणि मागून अंथरूण - पांघरुण आणि पाण्याची कळशीही पुरविण्यात आली. साडेनऊ ते साडेबारा या तीन तासाच्या दीर्घांकात दुकानाच्या कट्ट्यावर रंगलेल्या आमच्या गप्पांचा हा परिणाम. दुकानाचा मालक (दुर्दैवाने आत्ता त्याचं नाव माझ्या लक्षात नाही पण प्रमोद असावं असं पुसटसं आठवतंय) म्हणजे साधारण तिशीतला भलताच मनमिळावू आणि अत्यंत आतिथ्यशील स्वभावाचा माणूस. त्याने त्याच्या तुकाराम ढगे नावाच्या मित्राला आणि गावातल्या बाकीच्या तरुण पोरांनाही आमच्या सभेत सामावून घेतलं आणि साडेबारापर्यंतचा आमचा वेळ अगदी सुसह्य झाला. 
मंदिर मोकळं होताच विनय झोपायला पळाला आणि आमच्या गप्पा तशाच पुढे सुमारे दीड वाजेपर्यंत रंगल्या. त्यात मग नाशिक आणि परिसरातल्या किल्ल्यांच्या इतिहासापासून ते शहरातील नोकरीच्या संधी इथपर्यंत अनेक विषयांचा समावेश होता. प्रमोद आणि सेनेला मात्र आम्ही पुण्याहून बाईकवर इतक्या लांब आल्याचं भारीच कौतुक वाटत होतं. उद्या हेच मंडळ आमच्याबरोबर किल्ल्यावर येणार होतं. त्यांचा निरोप घेतला. रात्री अंथरुणाला पाठ टेकली त्याचक्षणी स्वर्गीय सुखाची लहर शरीरात स्पष्टपणे जाणवली. ट्रेकचं अर्ध टार्गेट आज पूर्ण झालं होतं. उद्याचा दिवस आता आमची वाट पाहत होता !!  

क्रमश:  



Comments

  1. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली लेणी ही जैन लेणी आहेत. त्यामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती असणे शक्य वाटत नाही. जाणकारांकडून माहित करून घ्यावे.

    ReplyDelete
  2. ​अ...फा...ट … ​​नेहमीप्रमाणे किल्ल्यांची सखोल माहिती दिलीस … झकास वर्णन … ​
    शुभम हॉटेल आणि ​​'पमचर' वाल्याचा किस्सा … फ़ुल्ल दंगा ​...​​उत्तरार्धाची वाट बघत आहे… ​

    ReplyDelete
  3. Kupach mast aahe tumchi bhatakanti.

    ReplyDelete
  4. ओंकार, खूप भारी बाईक-ट्रेक..
    किल्ले चांगलेच लांब-लांबचे निवडलेत..
    प्रसंग डोळ्यासमोर उभे करण्यात कोण तुझा हात (की कीबोर्ड) धरणार ;)

    ReplyDelete
  5. Superb as usual.. surekh lihila aahes mitra

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अरण्यवाटा.... !! - भाग एक

अरण्यवाटा.... !! - भाग दोन : अंतिम

पाऊस असा रुणझुणता.....