अनवट चौकडीची स्वच्छंद भ्रमंती - भाग दोन (अंतिम)

अनवट चौकडीची स्वच्छंद भ्रमंती : दिवस पहिला  
इथून पुढे…

एखादा दिवस अविस्मरणीय ठरणार असेल तर त्या दिवसाच्या अगदी पहिल्या क्षणापासूनच काहीतरी भन्नाट घडायला सुरुवात होते. आंबे बहुला गावातल्या त्या दिवसाची सुरुवात फारच इंटरेस्टींग होती. सकाळी साडेपाच वाजता आम्ही झोपलेल्या मंदिरात आंबे बहुलामधला कोणी भाबडा भक्त पंढरीच्या विठ्ठलाच्याही कानठळ्या बसतील इतक्या मोठया आवाजात कुठलसं भजन गात होता. त्याच्या भजनाच्या पहिल्या तीन - चार सेकंदातच आम्ही खाड्कन उठून बसलो आणि त्यानंतर पुन्हा झोपायची हिम्मतच होईना. का कुणास ठाउक पण त्या तीन - चार सेकंदात आंबे बहुलामधल्या विठ्ठलासकट जगातल्या सगळ्या विठ्ठल मूर्तींनी आपापले कमरेवरचे हात काढून कानावर ठेवलेत असं दृश्य माझ्या डोळ्यासमोर अवतरलं !!! आम्ही त्या भक्तापासून ऊर्ध्व दिशेला अवघ्या काही फुटांवरच होतो. पण जिथे ते सावळं परब्रम्ह नाही बचावलं तिथे आम्हा पामरांची काय कथा !! त्याचं भजन सुमारे वीसेक मिनिटांनंतर संपलं आणि त्यानंतरच आमची खाली जायची हिम्मत झाली. एव्हाना उजाडू लागलं होतं.  प्रमोदला आम्ही झोपेतून जागे झालोय याचं बहुदा स्वप्न पडलं असावं कारण आम्हाला दिवसातलं पहिलं दर्शन त्याचंच झालं. सकाळची कामं उरकली आणि सॅक प्रमोदच्या दुकानात आणून ठेवल्या. "चला माझ्याबरोबर. ताजं दूध बनवलंय तुमच्यासाठी." कालच्या सेनेपैकी कुणाच्यातरी घरी प्रमोद आम्हाला घेऊन जाऊ लागला. इतक्यात काहीतरी आठवून मी विनयला म्हणालो "अरे आपल्याकडे ते नाश्त्यासाठी रेडी पदार्थ आहेत. ते घेऊन जाऊ. नाश्ता करूनच किल्ल्यावर निघू."
"दादा….आईला सकाळीच पोहे बनवून ठेवायला सांगितलेत. दूध घेऊन झालं की आमच्या घरी जायचंय नाश्ता करायला… !!" 
आम्ही प्रमोदकडे बघतच बसलो. कोण कुठले आम्ही…रात्री न मागता अंथरूण - पांघरूण काय येतं… सकाळी ताजं दूध आणि त्यानंतर नाश्ता ?? सह्याद्रीत का फिरावं याचं क्षणार्धात उत्तर मिळालेला हा प्रसंग. (मला आठवतंय. यावर्षीच्या कोकण ट्रीपमध्ये गुहागरला ज्यांच्या घरी मुक्काम होता त्यांनी सकाळी पोह्यांच्या पहिल्या डिशनंतर अजून एकदा घासभर घेतलेल्या पोह्यांचे आठ रुपये बिलमध्ये लावले. याला म्हणतात खरं "आदरातिथ्य" !!!). प्रमोदच्या मित्राच्या घरी पंजाबी लोक लस्सी पितात तेवढया आकाराच्या ग्लासमध्ये गरमागरम आलंयुक्त दूध समोर आलं. कमालीची तरतरी आली. नंतर प्रमोदच्या घरी पोह्यांचा कार्यक्रम झाला (इथे पहिल्या डिशचेही पैसे द्यायला लागत नाहीत बरं का !!). सात वाजत आले होते.आवश्यक सामान बरोबर घेऊन प्रमोद आणि त्याच्या मंडळाबरोबर बहुल्याच्या दिशेने आता पावलं पडू लागली.

आंबे बहुला पासून पायी चार किलोमीटर अंतर कापलं की बहुला किल्ल्याचा खरा पायथा येतो. बहुला किल्ल्याच्या मागच्या बाजूला देवळालीचा मिलिटरी कॅम्प असून रणगाड्याच्या तोफांच्या मारगिरीचा (फायरिंगचा) सराव करण्यासाठी त्यांनी बहुला किल्ल्याला निवडलं आहे. त्यामुळे बहुला किल्ल्याची निम्मी तटबंदी त्या बॉम्बगोळ्यांमुळे ढासळली आहे. सोमवार ते शनिवार हा सराव सुरु असल्याने किल्ल्यावर जायला परवानगी नाही. रविवारी हा सराव बंद असल्याने किल्ला बघता येतो. पण आठवड्याच्या इतर दिवशी किंवा शनिवारी चुकून जरी तुम्ही समजा किल्ल्यावर सापडलात तरी आर्मीच्या कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल तुम्हाला "लंबे के लिये" "चक्की पिसिंग And पिसिंग" करावं लागेल अशी माहिती प्रमोदने पुरवली.  अभिमानाची गोष्ट म्हणजे आंबे बहुलामधले अनेक तरुण आज आर्मीमध्ये भरती आहेत. आमच्याबरोबर असलेला तुकाराम ढगे हाही आम्ही गेलो त्यावेळेस आर्मीच्या शारीरिक चाचणीसाठीची तयारी करत होता. साहजिकच त्या तरुणाईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि आमचीही मान क्षणभर उंचावली.

                                                                              बहुला किल्ल्याचा नकाशा. सौजन्य : Trekshitiz.com


सिन्नर - घोटी रस्त्यावरून उजवीकडे बहुला किल्ला व डावीकडे रायगड डोंगर. याच्या पायथ्याला देवळालीचा आर्मी कॅम्प असून पलीकडच्या बाजूला आंबे बहुला गाव आहे. किल्ला अपरिचित असल्याने या रस्त्यावरून जाताना त्याच्याकडे आपले लक्ष जात नाही. पण आता मात्र आठवणीने एक कटाक्ष बहुल्याकडे टाकला जाईलच.  


बहुलाच्या  वाटेवर ही सुंदर सकाळ उजळलेली दिसली. 


बहुलाच्या मार्गावरून उजवीकडे दिसणारा गडगडा / घरगड किल्ला,अघेरा डोंगर आणि डांग्या सुळका 

पायथ्याला पोचताना गडाचा विस्तार नजरेत भरला होता. 

बहुला शेजारच्या रायगड डोंगराचा पणतीसारखा दिसणारा आकार.कॅमेराचा झूम मर्यादित असल्याने फोटोमध्ये Noise आला आहे.   

 आंबे बहुलातून कमरेएवढया गवतातून तासाभराच्या आडव्या चालीनंतर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. उजवीकडचा किल्ला आणि त्याच्या डावीकडचा डोंगर यांचा खिंडीत नेणारी अर्ध्या पाउण तासाची चढणही घाम काढून गेली. खिंडीतून बहुला किल्ला अप्रतिम दिसत होता.


बहुला क्लोजअप. समोर दिसणा-या या छोटया उंचावट्याच्या मधोमध एक खाच दिसतीये. तिथे एक छोटासा सोपा रॉकपॅच चढावा लागतो.    


खिंडीतून बहुलाच्या डावीकडील डोंगर व मागे पांडवलेण्यांची टेकडी 


किल्ल्याच्या वाटेवर हे एक भुयारासारखं काहीतरी दिसलं. स्थानिक लोकांच्या मते "चोरवाट"

 रॉकपॅच चढून आल्यावर त्याच कातळावर काही पोस्ट होल्स दिसले  


किल्ल्याचा अभेद्य कातळमाथा उन्हं सोसत उभा होता. त्याच्या बरोब्बर मध्ये जी एक छोटी घळ दिसतीये त्यात पाय-या आहेत 


अर्ध्या तासानंतर किल्ल्याच्या कातळाच्या सावलीत येउन विसावलो. डावीकडे ह्या खोदीव गुहा दिसल्या. स्थानिक लोकांच्या मते ही घोड्याची पागा आहे. 


गुहेमधून दिसणारा आंबे बहुलाचा प्रदेश


गुहांपासून पुढे आल्यानंतर किल्ल्याचं प्रमुख आकर्षण असणा-या सुंदर अशा खोदीव आणि उभ्या चढाईच्या पाय-या सुरु झाल्या 


 किल्ल्यावरील पाण्याची खोदीव टाकी.हे टाके रायगड डोंगराच्या दिशेला म्हणजेच पश्चिमेकडे आहे 


 किल्ल्यावरील अजून एक खोदीव टाके. 


बहुला किल्ल्याची पश्चिमेकडील तटबंदी. मागे रायगड डोंगर    

किल्ल्यावर तुरळक तटबंदी,पाण्याची टाकी आणि थोडेफार उध्वस्त अवशेष सोडले तर बाकी विशेष बघण्यासारखं फार काही नाही. पण माथ्यावरून चौफेर अप्रतिम दृश्य मिळालं. साधारण पूर्वेला औंढा,पट्टा,बितनगड,शेणीत सुळका,महांकाळ डोंगर,पश्चिमेला कळसूबाई,अलंग - मदन - कुलंग,वायव्येला रायगड डोंगर, गडगडा,डांग्या सुळका,इगतपुरीचा प्रदेश,उत्तरेला रांजणगिरी आणि अंजनेरी,ईशान्येला पांडवलेणी आणि विस्तीर्ण असं नाशिक शहर !!! अत्यंत अपरिचित असूनही बहुलाने एक अफलातून अनुभव दिला होता.        
आम्ही बहुलावर गेलो तेव्हा माझ्या ओळखीत बहुला किल्ला पाहिलेला असा फक्त मीच होतो. तृप्त झालेलं मन घेऊन खाली उतरलो. गुहांपाशी आल्यावर विश्रांती भागच होती. तुकारामने तर दिवाळी नुकतीच होऊन गेल्याने चिवडा,चकली आणि शेवेचा संपूर्ण डबाच त्याच्याकडच्या पिशवीत भरून आणला होता. किल्ला चढताना अनेकदा विचारूनही त्याने त्या पिशवीत काय आहे याचं उत्तर द्यायचं टाळलं होतं. "आधीच सांगितलं असतं तर मंग त्यात काय मजा राहिली असती." असं म्हणून त्याने नैवेद्य ठेवावा तशी ती अख्खी पिशवीच आमच्यासमोर ठेवली (माणुसकीचे अंश जर कुठे असतील…तर ते खेडयात !!!). साडेअकराच्या सुमारास आम्ही गावात परतलो. प्रमोदने तर कमालच केली होती. "आईला सकाळीच जेवायचं करून ठेवायला सांगितलंय. जेवल्याशिवाय गेलात तर बघा." असा दम देऊन त्याने आमची बोलतीच बंद केली.काही केल्या तो आणि बाकीचं मंडळ ऐकेचना. पण कितीही म्हणलं तरी तो प्रेमळ आग्रह स्वीकारता येणार नव्हता. कारण आता इथून नाशिकमार्गे संगमनेर गाठून आणि पुढे पेमगिरी किल्ला बघून रात्री अकरा पर्यंततरी पुणं गाठणं भागच होतं. मोठया मुश्किलीने त्याची समजूत काढली तीही पुन्हा फक्त बहुलाला यायच्या अटीवर !! भाबडया प्रेमाचा आणि मूर्तिमंत माणुसकीचा अविष्कार आंबे बहुलामध्ये अनुभवायला मिळाला. ना कुठली जन्मोजन्मीची ओळख ना कुठलीरक्ताची नाती…पण आपण माणसं आहोत ही जाणीवच पुरेशी असते. एका परिपूर्ण दुर्गयात्रेचं समाधान लाभलं होतं. भरून आलेली मनं घेऊन आंबे बहुला सोडलं. (मला त्यावेळी प्रमोदचा किंवा तुकारामचा फोन नंबर आणणं शक्य झालं नाही. पण हा ब्लॉग वाचून जर आपल्यातलं कोणी बहुला किल्ल्यावर गेलं तर कृपया माझ्यासाठी गावातल्या विठ्ठल मंदिरासमोरच्या किराणा मालाच्या दुकानदाराचं नाव आणि नंबर घेऊन या ही कळकळीची आणि नम्र विनंती). 

नाशिकहून संगमनेरकडे जाताना रस्ता तसा गजबजलेलाच होता. ट्रेकमधलं शेवटचं लक्ष्य आता बाकी होतं.  आम्ही नाशिक क्रॉस करून सिन्नरजवळ पोहोचलो आणि त्याच वेळी आजच्या दिवसातला अविस्मरणीय प्रसंग घडला.
सिन्नरच्या थोडं अलीकडे काही कारणांनी नाकाबंदी करण्यात आली होती. प्रवासी वाहनांची तपासणी करण्यासाठी आठ दहा साधे पोलिस आणि त्यांच्याबरोबर त्यांचा एक "बाप" उर्फ त्या भागाचा वाहतूक अधिकारी अशी मोठी वानरसेना तैनात झाली होती. अख्खं जग त्या रस्त्यावरून सुसाट निघालेलं असतानाही त्यांना नेमकी आमचीच गाडी दिसली आणि आता गाडीखाली येउन आत्महत्या करतोय की काय असं वाटावं इतकं आडवं येउन एका पोलिसाने आम्हाला थांबवलं. कदाचित आमच्या आधी आमच्या वयाच्या पोरांनी इतकं अडवूनही पळ काढला असावा.

"गाडी साईडला घ्या" …घेतली.
"लायसन अन गाडीची कागदं दाखवा." आमच्याकडे होतीच. त्याला दाखवली.
"पुन्याहून एवढया लांब कशाला आला ??"  डोक्यावरच्या रणरणत्या उन्हाची जराही पर्वा न करता त्याने सवाल केला.
"आम्ही ट्रेकर आहोत. इथले किल्ले बघायला आलोय."
"च्यायला. काय कामधंदे नाहीत का. अन या ब्यागेत काये ??" गाडीच्या दोन्ही बाजूला अडकवलेल्या सॅककडे बघत त्यानं विचारलं. आता ट्रेकला आम्ही  काय उदबत्त्या विकायला आलो होतो ??
"काये म्हणजे ?? सामान आहे ट्रेकचं."
(शप्पत घेऊन सांगतो "सामान" हा शब्द ऐकल्यावर त्याच्या डोळ्यात कमालीचे इरसाल भाव उमटले !!)
"तुमी दोघंजन अन अन येवढ्या मोठया ब्यागा… येकाच गाडीवर ??
हे वाक्य ऐकताच सगळी अदब आणि लाजलज्जा बाजूला ठेवून आणि पुढच्या परिणामांची पर्वा न करता मी त्याला म्हणालो… "आता दोघांसाठी रेल्वे नाही ना मिळत. काय करणार. "
"मंग आता??" आमच्याकडे रोखून बघत एक अतिशय पानचट प्रश्न त्याने विचारला. आमचाही संयम आता सुटायला लागला होता. एकतर त्याने आम्हाला बाहेरगावची गाडी असल्याने उगाच अडवलं होतं, त्यात बळंच विचारपूस आणि त्यात फुकटच्या चांभारचौकशा. हे म्हणजे गोविंदाचा सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये जाउन  बघण्यासारखं होतं.     
"आता काय सोडा की. सगळी कागदपत्रं दाखवली की तुम्हाला. हेल्मेट पण आहे. अजून काय हवंय ?? आता (तुमच्या दुर्दैवानं) बाईकला नेमका सीटबेल्ट नाहीये. नाहीतर त्याचा दंड दिला असता  !! "
त्याजायला… सुकाळीचे… चांगले सापडले होते. पण आपणच तोंडावर पडलो असे भाव स्पष्टपणे त्याच्या चेहे-यावर दाटून आले.  
"यावेळी सोडतोय. लक्षात ठेवा. फुडच्या वेळी पावती फाडल्याबिगर सोडनार नाय." जणू काही आम्हाला आपल्या मुलीच्या लग्नातल्या मानाच्या पंगतीचं आमंत्रण द्यावं अशा आवाजात तो म्हणाला !!

काहीही कारण नसताना अर्धा तास उग्गाच वाया गेला होता. कुठेही वेळ न घालवता आम्ही आता थेट संगमनेर गाठलं. दोन वाजत आले होते. संगमनेर - अकोले रस्त्यावर कळस नावाचं गाव आहे. त्या गावातून डावीकडे गेलं की रस्ता थेट पेमगिरी गावात जाउन थांबतो. पेमगिरी किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या भागात सेम एकसारखे दिसणारे तीन डोंगर असल्याने पायथ्याला पोहोचेपर्यंत किल्ला कोणता ते कळत नाही. किल्ल्यावर पेमादेवीचं मोठं मंदिर असल्याने किल्ल्याच्या नव्वद टक्के भागापर्यंत रस्ता करण्यात आला आहे (आम्ही गेलो तेव्हा कच्चा रस्ता होता. आतापर्यंत बहुदा डांबरीकरण झालं असावं).

पेमगिरीच्या कच्च्या रस्त्यावरून पेमगिरी किल्ला. याशिवाय गडावर पायी येण्यासाठीही पायवाट आहे. या रस्त्याने अवघ्या पंधरा मिनिटात आम्ही गडावर पोहोचलो. रस्ता संपल्यावर किल्ल्यावर जाण्यासाठी काही खोदीव पावट्या आहेत. 


 किल्ल्यावरील प्रमुख देवता आणि जिच्या नावाने किल्ल्याला "पेमगिरी" हे नाव मिळाले त्या पेमादेवीचे मंदिर. पेमादेवी ज्या गिरिवर (डोंगरावर) वास करते तो पेमगिरी. 
     
मंदिराच्या समोर ही अलीकडच्या काळात दगडी दीपमाळ उभी केली आहे.


मंदिरातील पेमादेवीची अष्टभुजा मूर्ती


पेमादेविच्या मंदिराशेजारी ही खोदीव टाकी आहेत. खोल असली तरीही तिथे शेजारी एक झोपडे असून तिथून पाणी काढण्यासाठी दोर व बादली मिळते. दुस-या टाक्यात आतमध्ये उतरण्यासाठी शिडी ठेवलेली दिसली. 


मंदिरापासून डावीकडे म्हणजे किल्ल्याच्या दक्षिण भागात हे पाण्याचे टाके सापडले


किल्ल्याच्या उत्तरेकडील पीर


किल्ल्याच्या पश्चिमेकडून म्हणजे पेमगिरी गावातून किल्ल्यावर पायवाट येते. विनय किल्ल्यावर लावलेली गाडी घेऊन गावात आला आणि मी ह्या पायवाटेने गड उतरलो.


उतरताना सुरुवातीलाच हा लोखंडी जिना लावलेला आहे.


पेमगिरी गावातून दिसणारा तासलेल्या कातळाचा पेमगिरी किल्ला

पेमगिरी किल्ला दक्षिणोत्तर पसरला असून किल्ल्यावर वरील अवशेषांशिवाय पाण्याची टाकी आणि घरांची जोतीही आढळतात.पण पेमगिरी किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला तो शहाजीराजांच्या पराक्रमामुळे. १ मार्च १६३३ रोजी मुघल सरदार महाबतखानाने निजामशाहीची राजधानी असलेल्या दौलताबाद उर्फ देवगिरी किल्ल्याला वेढा घातला. निजामशाही संपवण्याचा आदेश शहाजहानने महाबतखानाला दिला होता. शहाजीराजे तेव्हा निजामशहाच्या चाकरीत होते. राजांनी निजामशाही वाचवण्यासाठी पराक्रमाची शिकस्त केली पण त्यात त्यांना यश आलं नाही. अखेर शहाजीराजांनी मुरार जगदेवांच्या मदतीने जीवधन किल्ल्यावर मुघलांच्या कैदेत असलेल्या निजामशाहीच्या तीन वर्षाच्या वारसदाराला म्हणजेच मूर्तिजा निजामशाहाला सोडवून आणले आणि पेमगिरी किल्ल्यावर स्वत:च्या मांडीवर बसवून त्याचा राज्याभिषेक केला. मूर्तिजा अल्पवयीन असल्याने शहाजीराजे निजामशाहीचा वजीर म्हणून काम पाहू लागले. पण नंतरच्या काळात निजामशाही पूर्ण बुडाली. मूर्तिजा निजाम म्हणजेच बादशहा या किल्ल्यावर वास्तव्यास असल्याने या गडाला "शहागड" असेही एक नाव आहे. बखरीमध्ये पेमगिरीचा "भीमगड" याही नावाने उल्लेख सापडतो. पण सद्यस्थितीत भीमगड नावाचा किल्ला रायगड जिल्ह्यात कर्जत पासून सहा किलोमीटरवर वदप गावाजवळ असून त्याला सामान्यपणे "भिवगड" म्हटलं जातं.
पण पेमगिरीचं महत्व एवढयावरच थांबत नाही. पेमगिरी गावात महाराष्ट्रातील सर्वात जास्त विस्ताराचा वटवृक्ष असून झाडाचा बुंधाच जवळपास वीस ते तीस मीटर इतका प्रचंड आहे. बॉटनीचा अभ्यास करणा-यांसाठी हे झाड म्हणजे कायमच एक अप्रूप बनून राहिलं आहे. किंबहुना या पेमगिरी किल्ल्यापेक्षा हे झाडच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे आणि याच झाडाने पेमगिरी गावाला स्वत:ची एक वेगळी ओळख दिली आहे. याशिवाय गावात इ. स. १७०६ मध्ये बांधलेले पुरातन आणि भव्य विठ्ठल मंदिर असून त्याच्याजवळ पाय-यांची विहीर आणि तिच्या बांधणीसंबंधातील एक शिलालेखही बघायला मिळतो. वेळेअभावी आम्हाला हे मंदिर मात्र पाहता आले नाही. पण आपण पेमगिरीला गेल्यावर हे मंदिर,वटवृक्ष आणि मंदिराजवळील विहीर आणि शिलालेख नक्की पाहून या.
साडेसहा वाजले होते. अंधारातच गावक-यांनी सुचवलेल्या एका शॉर्टकटने गाडीबरोबर आमचीही हाडं खिळखिळी करून दीड तासात बोटा गाठलं. या आडवाटेच्या,सर्वगुणसंपन्न आणि अविस्मरणीय भ्रमंतीची सांगता सहभोजनाने करू अशी इच्छा विनयने व्यक्त केली. Peak Hours मध्ये नाशिक हायवेच्या एखाद्या ब-या हॉटेलमध्ये जागा मिळेल की नाही ही शंका मोडून काढत नारायणगाव जवळच्या एका हॉटेलमध्ये मस्तपैकी जागा मिळाली, कमालीची फास्ट सर्व्हिसही मिळाली आणि बोटं चाटत रहावीत असं अफलातून चवीचं जेवणही मिळालं. तिथे हॉटेलचं दार उघडं असूनही हॉटेल सुरूच होतं (!!!) आणि येताना कुठेही फुकटची सरकारी चौकशी झाली नाही. देणे रघुनाथाचे… दुसरे काय. 

 ओंकार ओक Comments

 1. अफलातून … "फोलीस" मामांचा अनाठायी घडलेला किस्सा जमलेलाय …

  सह्याद्रीतल्या गावांकडील स्थानिक गावकऱ्यांनी मनापासून केलेले आदरातिथ्य … जगात इतरत्र कुठेही शोधून सापडणार नाही … _/\_

  नेहमीप्रमाणे सरस्वतीने पुन्हा क्लास उघडलेला दिसतोय … अप्रतिम लेख आणि झकास फोटू …

  ट्रेकळावे,

  दत्तू तुपे

  ReplyDelete
 2. Masta re Onkar...Had a nice tour of both the forts by sitting in the AC office and that too after the lunch :D

  ReplyDelete
 3. mast mast mast :)

  ReplyDelete
 4. ओंकार ओक मित्रा खरच खूप छान लिहिले आहेस रे.. पोलिसाचा किस्सा तर लाई भारी होता भाऊ.
  आणि आंबे बहुला गावातील त्या अनोळखी मित्राच्या माणुसकी बद्दल ऐकून डोळे भरून आले रे.. खरच शहरातली माणुसकी संपत आली आहे पण खेड्यातली माणुसकी अजूनही शिल्लक आहे..
  खूप खूप छान लिहिले आहेस...

  ReplyDelete
 5. नेहमीप्रमाणेच 'ब्येष्ट' !!
  बहुला, भैरोबा यासारखे कधी फारसे न ऐकलेल्या किल्ल्यांबद्दल चांगली माहिती मिळाली.
  तुझ्यामुळेच आम्हाला अश्या कित्येक ठिकाणांची माहिती समजते. keep it up !!!!
  पुढच्यावेळी रेल्वे बुक करून न्या !
  आणि जागा असली तर आम्हालापण बोलवा !! :D :P

  ReplyDelete
 6. आणि शेवटचा फोटू खतरनाक !!

  ReplyDelete
 7. ओंकार, सुंदर ट्रेक अन् वर्णन!!!
  भन्नाट किस्से..
  विशेषत: बहुला मिलिटरी एरियामुळे आवाक्यात नाही, असं मानतो. त्याचं द्वार उघडलंस..
  अन् बहुल्याचे फोटोज पण पहिल्यांदाच बघितले..
  पेमगिरीचा थोरला भाऊ बाळेश्वरला जाणं, कित्येक वर्ष उग्गाच हुलकावणी देतंय...

  ReplyDelete
 8. Sunder Sakal Ujalaleli -- surekh photo...sahyadrichi maya jagat kothech milat nahi he nakki... pramod aka kirana malacha dukadar cha number aanayala kadhi jayache?... tu sobat asane aavashyak nahi tar mamane dilele nimantran kase purn karnar :)

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड