जावे स्मार्टफोनच्या देशा….

"मोबाईल ही आता गरज राहिलेली नसून आता एक सवय झाली आहे !!!" मुंबई - पुणे - मुंबई चित्रपटातील हे वाक्य म्हणजे आजच्या Smartphone Addiction ची मूर्तिमंत पावती !! मोबाईल वापरणारा माणूस आणि स्मार्टफोन हे समीकरण आता चितळे आणि बाकरवडीइतकं Obvious झालंय. त्यामुळे आत्ताच्या जमान्यात ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही तो एकतर अंग्रेज के जमानेका तरी समजला जातो किंवा आर्थिक स्थितीने Unsmart बनवलेला तरी !! मी यातल्या दोन्ही प्रकारात मोडत नव्हतो कारण स्मार्टफोन ही माझी तत्कालीन गरज नव्हती. घरी अनलिमिटेड इंटरनेट,आयडीयाच्या कृपेने कॉलिंग रेट कमी आणि Daily १०० SMS या सगळ्या श्रीमंतीमध्ये मी अगदी सुखाने जगत होतो. पण नशिबात योग लिहिलेला असताना तुम्ही काही हालचाल केली नाहीत तर देवच तुमच्याकडून ती करवून घेतो आणि तुम्हाला तो योग अनुभवायला किंवा ते दु:ख भोगायला लावतोच. माझ्या बाबतीत दुसरी गोष्ट आधी झाली आणि पहिली त्याच्या नंतर !!!

सॅमसंग कंपनीने Android चे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे फोन बाजारात अगदी नगण्य किंमतीला आणले आणि तिथेच पारंपारिक नोकियाचा जवळपास कडेलोट झाला. "स्टेटस सिम्बॉल" किंवा अगदीच स्पष्ट म्हणजे अगदीच इज्जत का फालुदा होऊ नये म्हणून का होईना पण बघावं त्याच्या हातात स्मार्टफोन दिसू लागले. पण कालांतराने यातही दुफळी माजली. तंत्रज्ञानाचं उत्तम ज्ञान असणा-यांकडे सॅमसंगचे स्मार्टफोन किंवा साक्षात कुबेराने ज्यांच्या फायनॅन्शियल मॅनेजमेंटची जबाबदारी स्वखुशीने आपल्या शिरावर धारण केली आहे त्यांच्याकडे डायरेक्ट आयफोन आले. ज्यांच्याकडे पैसा आहे पण डोकं नाही अशांकडे कार्बन,लाव्हा आणि तत्सम वाळीत टाकलेले मोबाईल दिसले !! जरा कुठे पाच मिनिटं जरी एकटे किंवा लाईनमध्ये उभे असलो की गेलाच हात खिशात. तत्व महत्वाची !!! त्यात आपला फोन जगाला दिसलाच पाहिजे असा अट्टाहास असणा-यांकडे टॅबलेट नामक खिशात (न) मावणारा लॅपटॉप येउन दाखल झाला. हे लोक असलं धूड घेऊन भरगच्च ट्रेन किंवा बसमध्ये प्रवास कसा करतात हे मला आजपर्यंत न उलगडलेलं कोडं आहे. काही असो, स्मार्टफोनने लोकांच्या प्रायोरिटीज मध्ये कमालीची क्रांती घडवून आणली.

हे फोनेटीक वादळ हळूहळू माझ्याही आजूबाजूला येऊन दाखल झालं. इतकं की खालच्या मजल्यावर राहणा-या षोडशवर्षीय बालकाला त्याच्या जन्मदात्यांनी त्याच्या "बड्डे" निमित्त आयफोन ४ घेऊन दिला. त्यानंतर ते कार्टं कुणाशीही बोलताना उगाच त्याच्या मोबाईलच्या सर्वांगावर बोटं आपटत फिरायला लागलं. आम्ही मात्र अजूनही नोकियाकरवी आमची बोटं दुखवून घेत होतो. वर्षभरापूर्वीची शपथेवर सांगण्यासारखी परिस्थिती म्हणजे मला एक्सपीरिया,गॅलक्सी आणि आयफोन ह्यांच्या कंपन्या कोणत्या हेही माहित नव्हतं. यावरून अनेकदा चेष्टाही करून घेतली. आमच्या एका ट्रेकला दहावीत शिकणा-या एका सर्वज्ञ पोराने माझा फोन बघून (आणि स्वत:चा Galaxy Note दाखवत) अत्यंत कुत्सितपणे "दादा… तुझ्याकडे Android नाही ???" असा Disguise मिश्रित सवाल केल्यावर माझा सपशेल पराभव झाला !!! पण शर्ट घ्यायचा नसेल तर फुकटची विंडो शॉपिंग करायची नाही या तत्वानुसार आत्ता फोनची गरज नाही तर उगाच नॉलेज म्हणून सुद्धा चांभारचौकशा करायच्या नाहीत हे धोरण अगदी अढळ होतं.  गेल्या दोन तीन वर्षात आपल्याकडे स्मार्टफोन नाही याचा आत्यंतिक आनंद आणि अपार दु:ख होण्याचे अनेक प्रसंग मी अनुभवले !! आमच्या ओळखीच्या एकाचा नवा कोरा Galaxy S४ चोरीला गेला. एकाच्या सोनीच्या २५००० च्या फोनने कोकणात जलसमाधी घेतली तर अनेकांच्या फोनांनी दर अर्ध्या तासाने पाचेक मिनिटांसाठी रुसण्याचे प्रकार सुरु केले. कोणाचा डिस्प्ले कालांतराने "उडाला" तर काहींच्या इंटरनेटने असहकार पुकारला. मी मात्र जगातला सर्वात सुखी प्राणी होतो. कारण वर उल्लेख केलेली एकपण कटकट माझ्या नशिबात नव्हती. दुर्ग - धाकोबाच्या ट्रेकला दिवसभर मुसळधार पावसात नखशिखांत भिजूनही आमच्या नोकियाने ठणठणीत असल्याची किमया दाखवल्यावर माझा त्याच्याविषयीचा अभिमान,आदर,जिव्हाळा वगैरे अजूनच ज्वलंत झाला. मात्र या आनंदाला तडा गेला तो सातमाळा रांगेच्या ट्रेकला !!!

जून महिन्यात झालेल्या या ट्रेकमध्ये आम्हा सात जणांपैकी मी एकटाच असा प्राणी होतो ज्याच्याकडे स्मार्टफोन नव्हता. त्यामुळे मी सोडून बाकीची सगळी टाळकी कोणताही किल्ला बघून खाली गाडीत बसलो की एकतर Whats App आणि फेसबुकच्या आश्रयाला तरी जायची किंवा सारखं आपण कुठे आहोत हे "चेक इन" करण्यात वेळ घालवायची. कहर म्हणजे आमच्या डायवरकडेही २०,००० चा फोन निघाला !! अर्थात हल्ली तुमचा पेशा आणि फोनचा काडीमात्रही संबंध नाही हे तितकंच खरं. नांदुरीजवळ आम्ही कण्हेराचा रस्ता विचारण्यासाठी पांढरा शर्ट,पायजमा आणि गांधीटोपी असा टिप्पिकल गावरान "लूक" असलेल्या एका मध्यमवयीन गृहस्थाला थांबवलं. पुढील प्रसंग घडला तो असा… 

त्याने कण्हेराचा रस्ता सांगितल्यावर मी भविष्यात उपयोगी पडेल म्हणून त्याला विचारलं
"दादा तुझा नंबर दे ना. पुढच्या वेळी फोन करून येईन."
""आयला. थांबा. मी पन नवीनच म्वोबाईल घेतलाय. यसयमयस मध्ये शेव (Save) केलाय. बगून सांगतो. "
असं म्हणून त्याने खिशातून मोबाईल बाहेर काढला. मला त्या क्षणी फक्त भोवळ यायची बाकी होती कारण तिशीतल्या त्या ग्रामीण महापुरुषाच्या हातात Samsung Galaxy Grand होता !!! मला माझा मोबाईल त्याच्यासमोर काढायची विलक्षण लाज वाटू लागली. 
"थांब मी नंबर लिहून घेतो. " मी वही पेन काढू लागलो. 
"काय साहेब. मोबाईल न्हाय वय तुमच्याकडं" अत्यंत आश्चर्यमिश्रित चेहेरा करत त्याने विचारलं. 
"आहे ना. बॅटरी संपलीये !!" चेहे-यावरची लज्जा लपवत मी त्याला म्हणालो. 
"आवो आता वणी मधून हा नवीन मोबाईल घेतला. नेट पन घेतलंय. उद्या मित्र ते Whats App शिकीवणारे. मला बी जास्त माहिती नाहीये. हळू हळू शिकायचं सगळं  !!!"
कण्हेराच्या  पायथ्याला जाईपर्यंत माझी अवस्था स्टेजवर येऊन गाणं विसरलेल्या गायकासारखी झाली होती !!!

पण या प्रसंगाने मात्र माझी उत्सुकता कमालीची ताणली गेली. स्मार्टफोन बद्दलचं कुतूहल प्रचंड वाढलं. असं काय असतं या स्मार्टफोन्समध्ये ??? का लोकांना मोबाईल कॅमेरा आणि बाकीच्या Apps ची बेंबीच्या देठापासून गरज भासू शकते ?? शहराचं ठीक आहे पण ग्रामीण भागातही इतक्या महाग स्मार्टफोन्सचं एवढं आकर्षण कसं यावर माझं अश्मयुगीन मन जरा जास्तच खोलात विचार करू लागलं. आणि शेवटी अनेक चौकशांनंतर आणि पुरेश्या ऑनलाईन रिसर्च नंतर मला स्मार्टफोनच्या लोकप्रिय (आणि महाग) असण्याचं रहस्य उलगडलं आणि आपण काळाच्या मागे असल्याची बोचरी जाणीव सर्वार्थाने झाली !!! आजच्या जगात स्मार्टफोनला पर्याय नाही हे प्रकर्षाने उमगलं. आपण नोकियाचा फोन वापरतो या स्वाभिमानाचं रुपांतर स्व - दोषात झालं आणि दुस-यांचे स्मार्टफोन पाहिल्यावर उगाचच कमीपणा जाणवू लागला. एका सहृदयी मित्रातर्फे "टचस्क्रीनच्या जमान्यात अजून टाईपरायटरच वापरा" वगैरे मुक्ताफळंही उधळून झाली. Whats App वर नसणं म्हणजे राज्यद्रोहाचा गुन्हा करण्याएवढं गंभीर आहे हेही नव्यानेच कळून चुकलं. ट्रेकर्सना तर एकवेळ Action Trekking नसले तरी चालतील पण GPS आणि बाकीची अतिशय उपयुक्त आणि कमालीची दर्जेदार Applications वापरण्यासाठी या स्मार्ट उपकरणाची प्रचंड गरज आहे हे कळालं. त्यात माझ्या या "जखमेवर मीठ" चोळण्याचं पुण्यदायी काम आमचे मित्र जितेंद्र बंकापुरे यांनी स्वखुशीने स्वीकारलं !!! आमच्या प्रत्येक फोनला माझ्याकडे स्मार्टफोन नसल्याचा किमान एकतरी टोमणा बसू लागला. Whats App वर किती मस्त संवाद साधता येतो यावर दीर्घ परिसंवाद होऊ लागला. "आम्ही ट्रेकला जातो याची बातमी तुला मिळत नाही कारण तू Whats App वर नाहीस." वगैरे वाक्य माझ्या "बाबा आझमच्या जमान्यात" जगणा-या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली. आणि अखेर "काही नाही तर निदान कार्बनचा तरी फोन घे !!" ह्या जितुच्या वाक्याने माझा अक्षरश: कडेलोट केला आणि माझा पेशन्स ख-या अर्थाने संपला !! बास्स…लय बिल झालं. आता Android आलाच पाहिजे. तसंही गेली सहा वर्ष जुन्या नोकियाने माझ्या डोकीयाला कोणताही ताप न देत अगदी पतिव्रता स्त्रीसारखी माझी मनोभावे सेवा केली होती. त्या फोनचं मॉडेल मी विकत घेतलं त्यावेळी सर्वात उच्चपदावर होतं. पण आता त्याचं आयुष्य, अस्तित्व आणि महत्व काहीसं संपुष्टात आलं होतं म्हणा किंवा आता अपग्रेड होण्याची वेळ आली होती म्हणा, मी स्मार्टफोन घेण्याचा निश्चय केला आणि ही सुवार्ता (माझ्या नोकिया वरूनच !!) जितेंद्रला कळवली.  
(आमचा व्हिडियो कॉल नसूनही माझ्यापेक्षा जास्त त्याला झालेला आनंदही मला अंतर्दृष्टीने अगदी व्यवस्थित दिसला !!!). 

आता मोहीम होती ती बजेट आणि गरजेनुसार उत्कृष्ट फोन निवडण्याची. अस्मादिकांच्या तोकड्या ज्ञानात कमालीची भर घालून माझी शोधमोहीम जितेंद्र,निनाद बारटक्के,नितीन तिडके आणि परममित्र देवेश यांनी जणू घरचंच कार्य असल्यासारखी स्वीकारली. सुमारे महिनाभर माझ्या बजेटच्या सर्व मोबाईल्सना "दाखवण्याचा" कार्यक्रम पार पडला. त्यातले फीचर्स, उपयोग, आपल्याच नातेवाईकांशी (त्याच कंपनीचे मोबाईल) आणि त्यानंतर इतर जमातींशी (दुस-या कंपन्यांशी) तुलना करून झाल्या. त्यात नेमका मी निवडलेला फोनच बकवास निघायचा !!! मग "तू गप रे. मी आहे ना. मी सांगतो कुठला घे आणि कुठून घे." आमच्या आयुष्यात ही एकच मोहीम युद्धपातळीवर सुरु असल्याने "काय घे" हे सांगावं लागलं नाही. फेसबुकच्या चॅटमध्ये किंवा फोनवर नुसतं "घेतला का " एवढं विचारलं तरी कळून जायचं !!! अशात दिवाळी उजाडली. आता ख-या अर्थाने माझ्या आयुष्यातला नोकियामय अंध:कार दूर करायची वेळ जवळ येउन ठेपली होती. "फ्लिपकार्ट वर ऑर्डर केलीस तर स्वस्त पडेल आणि डिलिव्हरी पण फास्ट असते." इंचभराने माझ्या (अ)ज्ञानात भर पडली. नोकिया लुमिया, मायक्रोमॅक्स कॅनव्हास,गुगलचा स्वस्तातला नेक्सस आणि सोनी एक्सपिरीया या चार खंडांची मनसोक्त सफर झाल्यानंतर मी सॅम "संग" जाण्याचा निर्णय घेतला !! निर्णयाचं धडाक्यात स्वागत झालं. "होऊ दे खर्च" चे एसएमएस चालू झाले. "लवकर Whats App वर ये" अशी सहर्ष निमंत्रणं मिळू लागली. आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मी फ्लिपकार्ट वर ऑर्डर नोंदवून टाकली !!! फ्लिपकार्टनेही आपण या क्षेत्रात किती बाप आहोत याचा उत्कृष्ट नमुना दाखवत दुस-याच  दिवशी आमच्या घराचं माप ओलांडलं आणि मी ख-या अर्थानं "स्मार्ट" झालो. 

लास्ट बट नॉट द लिस्ट. या सगळ्याचं पूर्ण श्रेय जितेंद्र,निनाद,नितीन, देवेशला आणि सर्वात शेवटी माझं "रियल इन्सपिरेशन" ठरलेल्या नांदुरी मधल्या त्या मित्राला. आज स्मार्टफोन वरून बोटं फिरवताना काय सुख मिळतंय ते शब्दात सांगता येणार नाही. अनेक अप्रतिम सुविधा या मोबाईलने उपलब्ध करून दिल्या आहेत आणि मुख्य म्हणजे मला "माणसात" आणलं आहे. तत्वांशी एकनिष्ठ असणं हे जरी महत्वाचं असलं तरी काळ आणि तंत्रज्ञानाबरोबर जगण्याला पर्याय नाही हे आज स्मार्टफोनच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.


ओंकार ओक 
Comments

 1. jabri lihilas... awadlelay... kharya arthane 'smart' zalas....

  ReplyDelete
 2. best re...Zakas lihilyes....Samsung S Duos ka? maza pan toch ahe :P

  ReplyDelete
 3. ya phase madhun mi geloy mitra ! same to same. Maza mazya nokia E series warcha abhimaan wishwaas tilmaatr kami zala nahiye bar ka pan... fakt tyachi prakruti divsendivas khaalawat geli ani mag.... ek divas mi sudha sparsh-patal wala phone ghetlach. Market was so compelling that there was no good qwerty phone available at all. My wish to get a full keyboard business phone is just 'postponed'... for some years.

  baki tu bhari lihilays yar!...... laiii awadla.

  ReplyDelete
 4. खुप भारी लिहिले आहेस.... स्मार्ट जगात तुझे स्वागत... असो... माला हे माहिती नहीं की तू कोणता फोन वापरत होतास.. पण gps अणि whatsapp मी 3 वर्ष जुन्य नोकिया फोन वरच पहिल्यांदा वापरले. अजुनही काही वेळा मी 2फोन घेउन जातो... नोकिया फोन वर gps चालू करून ठेवतो. battery जास्त वेळ टिकते..

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड