जुन्नरची मुशाफिरी - भाग एक

नोव्हेंबर महिन्याचे अखेरचे दिवस !! गिर्यारोहणाचा सर्वांगसुंदर काळ. पण गेल्या सप्टेंबर - ऑक्टोबरपासून परीक्षा,सबमिशन्स,व्हायवा इत्यादी शैक्षणिक आणि वैयक्तिक आयुष्यात कमालीची उदासीनता आणणा-या षडरिपूंनी  अगदी नको त्याच वेळेसच वक्री होऊन त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला सुरुवात केलेली !!  सुरळीत चाललेल्या ट्रेकिंगचं अखंडत्व भंग करण्यात ज्यांनी मेनकेचा रोल अगदी समर्थपणे निभावलाय अशा या गोष्टींमुळे दगडावर शेवाळं साचावं तसं पचवलेलं अन्न पोटावर साचायला लागलं होतं. त्यामुळे आता ख-या अर्थाने "चरबी उतरवण्याची" वेळ येउन ठेपली होती. जुन्नर विभागातल्या हडसर,चावंड आणि सिंदोळा या सह्याद्रीच्या सगळ्याच विविधतांनी संपन्न असलेल्या गिरीदुर्गांवर ब-याच विचारांती मोहीम ठरवण्यात आली. पण जमलेले लोक ऐन वेळी कॅन्सल नाही झाले तर त्याला ट्रेक कसं म्हणता येईल !!! त्यामुळे शुक्रवार उजाडेपर्यंत या ट्रेकमध्ये मला ओळखणारा असा फक्त मीच उरलो !!! पण एखादा ट्रेक व्हावा हे बहुदा विधिलिखितच असल्याने फेसबुकवर नुकतीच ओळख झालेल्या आणि पिंपरी - चिंचवडचे सन्माननीय रहिवासी असणा-या प्रीतम आणि राजेशचा सहजच फोन आला आणि जुन्नरच्या या किल्ल्यांचं अगदी भरभरून वर्णन करत त्या बापड्यांना बाटलीत उतरवण्यात मी अगदी कमालीचा यशस्वी झालो !!!
शनिवारी पहाटे चार वाजता घरातून निघून पाच वाजता चाकणला पोहोचलो तेव्हा हे दोन वीर वाटच बघत होते. डिसेंबर नुकताच सुरु झालेला. थंडीमुळे शरीराचं आईस्क्रीम झालं होतं !!! चाकणला फक्कड चहा ढोसला आणि जुन्नरच्या दिशेने सुसाट निघालो. MH १४ वर ते दोघं आणि आमच्या रथावर मी एकटाच (गाडीची मागची सीट रिकामी असण्याचा आमचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे !!). जुन्नरला पोहोचलो तेव्हा सकाळची कोवळी उन्हं शिवजन्मस्थानावर पसरली होती. कदाचित ते जीर्णनगर उर्फ जुन्नर रोजच तो "सोनियाचा दिवस" अनुभवत असावं !! एस. टी स्थानकाच्या समोरच्या "हाटेलात" "तेल - पाव" कसाबसा घशाखाली उतरवला आणि माळशेजच्या रस्त्याकडे आता चाकं वळाली (त्या हॉटेलवाल्या महात्म्याने मिसळीच्या नावाखाली तेलात तिखट मीठ टाकून दिलेलं होतं !!). माणिकडोह धरणाचा फाटा डावीकडे सोडत गणेशखिंड जवळ येऊ लागली तेव्हा कुठे थंडावलेल्या शरीरावर "व्हिटॅमीन - डी" चा भरपूर मारा झाला. गणेशखिंडीतल्या थंडगार सावलीतून बाहेर पडून उताराला लागलो तेव्हा समोर पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरच्या पार्श्वभूमीवर सिंदोळयाचा करकरीत पहाड उन्हं सोसत उभा होता.  डावीकडे हडसर - निमगिरी आणि समोर मढ पारगावची खिंडही आता दृष्टीपथात आली.
जुन्नरवरून थेट माळशेज घाटात जाणा-या रस्त्यावर मढ - पारगाव हे पिंपळगाव जोगा धरणाच्या काठावर वसलेलं टुमदार खेडं !! जुन्नरवरून गणेशखिंड नावाचा छोटासा घाट पार केला की साधारण २५-३० किलोमीटर नंतर आपण पारगावमध्ये येउन पोहोचतो. आळेफाटा मार्गे माळशेज घाटातून कल्याणला जाणारा रस्ता जुन्नरच्या रस्त्याला इथेच येउन मिळतो आणि मग दोन्ही रस्ते हातात हात घालून हरिश्चंद्रगड,मोरोशीचा भैरवगड,जीवधन - नाणेघाट इत्यादी दिग्गजांच्या साक्षीने कल्याणला जातात. पारगाव फाट्यावरून डावीकडे वळून आम्ही आता सिंदोळयाचा पायथा असणा-या बगाडवाडीची वाट धरली. सिंदोळयाला येण्यासाठी मुंबईकरांना सोयीची अशी वाट माळशेज घाट संपताना लागणा-या करंजाळे गावातूनही आहे. ही वाट सिंदोळयाच्या खांद्यावर बगाडवाडीच्या रस्त्याला येउन मिळते आणि पुढे एकच वाट माथ्यावर जाते.
आम्ही बगाडवाडीत पोहोचलो तेव्हा नऊ वाजत आले होते. गावातली पोरं टायर खेळण्यात रमलेली तर  गावच्या पारावर पिकलेल्या पानांच्या गप्पा सुरु होत्या.  दोन बाईकवाले आलेले बघताच गप्पा थांबल्या आणि आम्हाला सिंदोळयावर जायचं आहे हे ऐकताच बॉम्ब पडावा तसे गावक-यांचे चेहेरे झाले !!!

"अबाबाबा… ह्यो शिंदोळ्याचा कडा ??? लय अवघड आहे बघा… ब्येकार चडाव अन मुरमाड निसारडं !!! आमीबी कंदी जात न्हाई. कशाला जीव धोक्यात घालताय ?? शाने असाल तर माघारी फिरा. न्हाई जमायचं तुमच्यानं."
"अहो काका आम्ही असे बरेच किल्ले पाहिले आहेत. सवय आहे आम्हाला याची. शिवाय दोर पण आहेच की. तुम्ही फक्त वाट दाखवायला माणूस द्या. बाकीचं आम्ही बघतो. "
"ह्ये बघा. आमी सांगायचं काम केलं. फुडं तुमची मर्जी. वाट दावायला कोन बी येनार न्हाई. "

आता मात्र बॉम्ब पडल्यासारखे चेहेरे करण्याची पाळी आमच्यावर आली होती. गावक-यांनी सरळसरळ असहकार पुकारला होता. खरं तर सिंदोळा हा गिर्यारोहकांच्या यादीत अनुपस्थित असलेला किल्ला. मध्यम आणि अवघड यांच्या ओढाताणीत सापडलेला. गावक-यांच्या मते वर्षातून फक्त २०-३० ट्रेकर किल्ल्यावर येतात. पण आता ते म्हणतात म्हणून परत फिरणं तत्वात बसत नव्हतं. सिंदोळयाची एक धार गावातल्या डांबरी रस्त्याला भेटायला आली होती. गावाकडे पाठ फिरवून आम्ही त्या दिशेने निघालो आणि पाचच मिनिटात मागून हाका ऐकू येऊ लागल्या. बघतो तर गावातले दोन तरुण आमचा निर्धार बघून गावक-यांचा विरोध न जुमानता आमच्याच दिशेने पळत येत होते. नावं सुनील आणि ज्ञानेश्वर !!! त्यांच्यामुळेच आता आमचा वाट शोधायचा त्रास वाचणार होता. सिंदोळयाच्या मुशाफिरीला आता सुरुवात झाली होती.


बगाडवाडीतून निघाल्यापासून अर्ध्या - पाउण तासाने एका पठारावर पोहोचलो. इथपर्यंतची वात अगदी ठसठशीत मळलेली होती. त्रिमूर्ती सारखा भासणारा सिंदोळा रणरणत्या उन्हात ताठ मानेने उभा होता.    


पहिल्या पठारापासून अर्ध्या तासात आम्ही आता दुस-या पठारावर पोहोचलो. गवताचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं होतं. वाळक्या गवताने मळलेली वाटही निसरडी झाली होती. सिंदोळ्याचा कातळकडा आता डोक्यावर आला होता.


दुस-या पठारापासून खड्या चढाईने जीव काढला. वाळलेल्या गवताने धोका देण्याचे केलेले अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. अखेरीस किल्ल्याच्या अखेरच्या टप्प्यात आम्ही येउन पोहोचलो. समोर दिसणा-या घळीत एक छोटीशी गुहा आणि एक थंड पाण्याचा झरा आहे.

पूर्वेला पिंपळगाव जोगा धरण दृष्टीपथात आलं. समोर सर्वात डावीकडून तेलीण सुळका,हटकेश्वर आणि घाटनदेवीचा डोंगर.

सिंदोळ्याच्या खांदयावर एव्हाना आम्ही येउन पोहोचलो होतो. ऐंशी टक्के चढण संपली होती. तळपत्या उन्हातच पाणी पिण्यासाठी बसकण मारली. आपल्या सर्वांच्याच सह्याद्रीतल्या भटकंतीच्या दरम्यान अनेक मजेदार घटना घडत असतात. त्यातल्या काही तर आवर्जून लक्षात राहाव्यात इतक्या अविस्मरणीय असतात. या ट्रेकमधला पहिला भन्नाट किस्सा याच पठारावर घडला !!!  

सिंदोळ्याच्या या पठारावर ब-यापैकी सपाटी आहे. अचानक सापासारखं काहीतरी दिसलं म्हणून सुनील तिकडे पळाला. त्या पठारावर आम्ही तिघेही  गवतावर निवांत पडलेलो असताना का कुणास ठाऊक… राजेशला अचानक काहीतरी सुचलं आणि शेजारी बसलेल्या ज्ञानेश्वरला त्यानं विचारलं… 

"फेसबुकवर अकाऊंट आहे का रे तुझं ??" 
हल्ली लहानशा खेडेगावातील मुलांकडेही स्मार्टफोन्स असल्याने हा प्रश्न चुकीचा असण्याचं कारण नव्हतं.  ब-याचश्या किल्ल्यांच्या पायथ्याला राहणारे माझे अनेक स्थानिक मित्र आपण जेवढं वापरत नाही तेवढं फेसबुक वापरतात ही  सत्य परिस्थिती आहे !!
"न्हाय बा. काय असतं ते ??" ज्ञानेश्वर बहुदा या व्यसनाविषयी अनभिज्ञ असावा. 
"अरे ते एक प्रकारचं अकाऊंट असतं. प्रत्येकाचंच असतं ते. तुझंही लवकर उघडून टाक. " प्रीतमने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. आता जिथे या पामराला इंटरनेट म्हणजे काय तेही माहित नाही तिथे फेसबुक काय माहित असणार !!!
 "थांबा. मी इचारून बघतो. " गावापासून ब-यापैकी उंचीवर आल्याने मोबाईलला रेंज होती.  त्याने कोणालातरी फोन लावला. 
"ओ साहेब. च्यायला कळत न्हाई म्हणून फशीवता काय गरिबाला. काय @#@@ समजलात का ?? मायला एवढे पैसे भरून अकाऊंट उघडायला लावलं तुम्ही अन ह्ये फेसबुकचं लफडं सांगता आलं न्हाई का ??" ज्ञानेश्वरचा आवाज एवढा चढला होता की तो खालच्या बगाडवाडीतही ऐकू गेला असावा.  मला तितक्यात काहीतरी शंका आली आणि मी त्याला थांबवलं. 
"अरे थांब. तू कोणाला फोन लावला आहेस  ??? " 
"ब्यांकेत लावलाय. माझं पैशाचं अकाऊंट उघडलं एवढे पैसे घेऊन आणि फेसबुकचं उघडायला धाड भरली होती का **** ला …(पुढे असंख्य फुल्या !!!!)"
पुढच्या काही सेकंदात सिंदोळ्याच्या परिसरात अणुबॉम्ब फुटावा तसा हास्याचा अक्षरश: स्फोट झाला !!!! जवळपासचे सगळे डोंगर,किल्ले आमच्या गडगडाटी हसण्याने जागच्या जागी हलत आहेत असं दृश्य आम्हाला दिसू लागलं.  सकाळची मिसळ आता पोटातलं व्हायब्रेशन असह्य होतून बाहेर उसळी घेईन का काय अशी भीती वाटू लागली होती. आजपर्यंतच्या ट्रेकमधला सगळ्यात जबरदस्त आणि अफलातून प्रसंग या ट्रेकच्या पहिल्याच किल्ल्यावर घडला होता. त्या बँकेच्या बापड्याची काहीही चूक नसताना त्याला दिवसाच्या पहिल्या प्रहारातच नको ते शब्द ऐकायला लागले होते आणि आम्ही मात्र ओढवून घेतलेल्या पोटदुखीचं खापर ज्ञानेश्वरवर फोडत होतो !!!!

किल्ल्याच्या शेवटच्या पठारावरून मुख्य कातळकड्याच्या पायथ्यातून आडवं गेल्यावर वीसेक मिनिटांनी अखेरची खडी नाळ सुरु झाली. इथे प्रचंड घसारा असून अतिशय जपून चढाई करावी लागते. गावक-यांनी आम्हाला किल्ल्यावर जाण्यास का विरोध केला हे इथे आल्यावर समजलं.  अर्धा तास सत्तर अंश कोनातली अंगावरची चढण आहे. शेवटी काही खोदीव पाय-याही आहेत. 

सिंदोळ्याच्या दरवाजातील बुरुज. 

दरवाज्याच्या कमानीचा आणखी एक बुरुज.

दरवाजातच गणराय विराजमान झाले आहेत. 

जवळच अजून एक शिल्प आहे.

दरवाजातून सरळ गेल्यावर हे शेवाळलेलं टाकं आहे. 

टाक्यापासून सरळ गेलं की पिण्यायोग्य पाण्याच्या टाक्यांचा समूह दिसतो. मागे हटकेश्वर डोंगर.

सिंदोळ्याच्या माथ्यावर बघावं तिथे कारवीचं आणि खाज-या झुडूपांचं साम्राज्य पसरलेलं होतं. त्यातून मार्ग काढत सर्वोच्च माथ्याची छोटीशी टेकडी गाठतानाही नाकी नऊ आले !!!

 सर्वोच्च माथ्यावरून पत्त्यांचा कॅट उलगडावा तसं असीम सुंदर दृश्य समोर अवतरलं. सर्वात पुढे तळेरानच्या बोरवाडीचा देवाचा डोंगर (सुनील - ज्ञानेश्वरच्या मतानुसार),मागे माळशेज मधील अनामिक कातळभिंत आणि सर्वात शेवटी दोन शिरं असलेला व विमान अपघातामुळे परिचित असलेला देवदांडया डोंगर. 

उत्तरेला अथांग पसरलेलं निळंशार पिंपळगाव जोगा धरण आणि मागे अजस्त्र असा कारकाई पर्वत व सर्वात मागे अस्पष्ट कुंजरगड !!! सिंदोळ्यावरून विस्तीर्ण प्रदेश दिसत असल्याने आणि माळशेज घाटासारख्या अतिशय महत्वाच्या आणि मोक्याच्या ठिकाणावर करडी नजर ठेवल्याने या किल्ल्याचा उपयोग एक अतिशय सक्षम असं टेहळणीचं ठिकाण म्हणून केला जात असे. माथ्यावर वाड्याचे अथवा इतर बांधकामांचे विशेष अवशेष नजरेस पडले नाहीत.   


कारकाई पर्वतावरून नजर अजून पश्चिमेकडे फिरली… आणि तिथेच अंतरीची खूण पटली !!! हीच ती… गिर्यारोहकांची पंढरी… नवख्यांचं आदरस्थान आणि कसलेल्या शैलभ्रमरांचं स्फूर्तीस्थळ !!!
डोळ्यात न सामावणारा हरिश्चंद्रगड… त्याचं ते तारामती शिखर,टोलारखिंड,बालेकिल्ला,रोहिदास शिखर,न्हाप्ता,घोडीशेप सुळके,जरासा नजरेआड झालेला कोकणकडा आणि सर्वात शेवटी पुसटसा दिसणारा आजापर्वत उर्फ आजोबा !!
खाली दिसणारी माळशेज घाटाची सुंदर सर्पाकार वळणं,त्यावरून धावणा-या आणि खेळण्यासमान भासणा-या गाड्या…तिथली छोटीशी कौलारू गावं आणि दुर्मिळ असलेली आणि आपलीशी करणारी निरागस मनं… हा अथांग सह्यसागर नजरेत साठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत असताना डोळ्याचं पारणं फिटावं तसं इथल्या गिरिपुत्रांच्या साधेपणानी आपल्याच काळजाला कधीकधी हात घातला जातो…मनात असंख्य कोडी घेऊन एखादा पर्वत सर करावा… आणि  बेभान करणा-या एखादया दृश्याने सगळे प्रश्न कसे क्षणार्धात सुटावेत… !!
 आपलं आणि ह्या सह्याद्रीचं नि:शब्द करणारं बोलकं नातं इथे पाऊल ठेवल्याशिवाय नाही कळायचं !!!

सिंदोळ्याच्या मुरमाड घसरड्या वाटेवरून कसरत करत वरपर्यंत आलेल्या शरीराला माथ्यावरून दिसणा-या अपूर्व दृश्याने कित्येक पटीने उभारी दिली. बराच वेळ त्या अभेद्य सह्याद्रीला डोळ्यात साठवून घेतलं आणि शेवटी भानावर येउन बगाडवाडीची वाट धरली. कितीही प्रयत्न केला तरी मध्ये मध्ये असलेल्या वाळक्या गवतावरून आणि भुसभुशीत वाळूवरून उतताना हबेलहंडी उडालीच !!!

आम्ही बगाडवाडीत पोहोचलो तेव्हा सूर्य भाजून काढत होता. ट्रेकमधलं पाहिलं लक्ष्य यशस्वीपणे पार पडलं होतं. न भूतो न भविष्यती अशा नितांत सुंदर अनुभव दिलेल्या सिंदोळ्याकडे एकटक पाहताना त्याच्याविषयीचा दृष्टीकोन अजूनच उंचावला. सुनील आणि ज्ञानेश्वरला त्याचं बक्षीस देऊन आम्ही आता जुन्नरच्या दिशने निघालो. सकाळच्या तेल - पावानंतर गडमाथ्यावर बिस्किटं आणि थोड्याश्या तिखटमिठाच्या पु-या एवढंच काय ते इंधन मिळालं होतं. पारगाव फाट्याला पेट्रोल पंपाशेजारच्या अंबर धाब्यावर एका कोंबडीला मनोभावे श्रद्धांजली अर्पण केली तेव्हा कुठे जीव "हंडीत" पडला !!!

जुन्नरवरून आपटाळे मार्गे जेव्हा चावंड गावात पोहोचलो तेव्हा दिवेलागण झाली होती. संपूर्ण अंधारात लख्ख दिव्यांनी उजळून निघालेलं चावंड गाव कमालीचं मोहक दिसत होतं. गावातल्या कवटे काकांना आधीच फोन करून ठेवल्याने आता सगळी राजेशाही सोय होणार होती. नऊच्या सुमारास कोबीची भाजी,गरमागरम तांदुळाची भाकरी,झुणका,अस्सल गावरान असा वाफाळलेला आंबेमोहोर भात आणि "नाद्खुळ्या" चवीची आमटी जेव्हा पोटात गेली तेव्हा कुठे घरी असल्याचा भास झाला !!! ह्याशिवाय चटणी,पापड,कुरडई,लोणचं इत्यादी "तुषार कपूर" पदार्थ होतेच (तुषार कपूर पदार्थ म्हणजे जेवणात साईड रोल असलेले आयटेम्स. जे ताटात असले तर चव असते पण नुसते अजिबात खाल्ले जाऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ तुषार कपूरचे चित्रपट !!!). चावंडच्या प्रशस्त आश्रमशाळेत गादी,उश्या,पांघरुणं आणि दिवे यांच्यासकट राजेशाही सोय झाली. दुस-या दिवशीच्या नाश्त्याचं निमंत्रणही मिळालं. पाठ टेकताचक्षणी जेव्हा डोळ्याला डोळा लागला तेव्हा चावंडच्या माथ्यावर त्या विलक्षण वातावरणाला साजेशी चांदणभूल पसरली होती  !!!

क्रमश:

Comments

 1. हाहाहा… ज्ञानेश्वरच्या फेसबुकच्या अकाउंटचा किस्सा अगदीच अफलातून लिहिलास … कोंबडी ला श्रद्धांजली अर्पण केली तेव्हा कुठे जीव "हंडीत" पडला आणि तुषार कपूर पदार्थ … हाहाहा … अगदीच बढीया…वर्णन आणि फोटो बढीया… एकंदरीतचं अगदीच ब… ढी… या…

  टीप : पुढच्या वर्षी तुझ्या गाडीची मागची सीट कदाचित रिकामी नसेल...

  ReplyDelete
 2. ओंकार, तू परफेक्ट स्टोरीटेलर आहेस.. शंकाच नाही.
  ज्ञानेश्वरचं बँक-फेसबूक अकौंट किस्सा कम्माल!!!
  काही वाक्प्रचार – शैक्षणिक अन् वैयक्तिक आयुष्यातल्या मेनका, सोनियाचा दिवस, ट्रेकर दोस्तांना बाटलीत उतरवणे, तुषार कपूर पदार्थ, कोंबडीला श्रद्धांजली देवून जीव हंडीत पडणे - अत्यंत ‘वरीजनल’!!!
  पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड