जुन्नरची मुशाफिरी : भाग दोन : अंतिम

जुन्नरची मुशाफिरी - भाग एक  

इथून पुढे….

"दादा ओ दादा…उठलात का ?? बाबांनी बोलीवलय नाष्टा करायला अन मला सांगितलंय तुमाला गडावर घेऊन जा म्हनून. घरी या लवकर. वाट बघतोय…!! "
सकाळी सहाच्या सुमारास चावंड परिसरात भूकंप व्हावा अशा रीतीने आश्रमशाळेच्या खोलीचं दार वाजत होतं. त्या भयानक आवाजामुळे खडबडून जागे होत आम्ही जे अंथरुणावर उठून बसलो त्यानंतर झोपायची इच्छाच झोपली !!! कवटे काकांचा मुलगा बाहेरून अशा पद्धतीने दार वाजवत होता की जणू काही आम्ही झोपायच्या ऐवजी कित्येक महिन्यांपासून कोमात आहोत आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाहीये !!! वैतागून दार उघडलं तेव्हा आमचे चेहेरे बघून त्याने अन त्याच्या दोन मित्रांनी तिथून सरळ पळ काढला. सकाळचे कार्यक्रम उरकले तेव्हा नुकतंच कुठे पूर्व दिशेचं दार उघडत होतं. कवटे काकांनी मात्र आदरातिथ्यात कसलीही कसूर सोडली नव्हती. सकाळी सात वाजता गरमागरम कांदेपोहे आणि वाफाळता चहा घेतल्यावर आमचा चावंड चढाईचा उत्साह कित्येक पटीने वाढला. कवटे काकांचे चिरंजीव आणि त्याचे तीन मित्र खाटकाने बोकडाची वाट बघावी तसे चेहेरे करून आमच्याकडे पहात होते. त्यांच्यावर आम्हाला गड फिरवण्याची जबाबदारी येउन पडलेली. त्यामुळे सकाळचा क्रिकेटचा मौल्यवान वेळ असल्या "वायफळ" कामात फुकट जात असलेला बघून त्यांची झालेली सात्विक चिडचिड आम्हालाही कळत होती. खरं तर चावंडला माहितगार माणूस न्यायची अज्जिबातच गरज नाही. सरळसोट वाट आहे (सध्या तर तिथे सिमेंटच्या पाय-या तयार करण्यात आल्या आहेत). पण कालपासून आमचं सगळं "कंत्राट" कवटे कुटुंबाकडे असल्यानं त्यांनी काम पूर्ण करण्याचा पणच केला होता. साडेसातच्या सुमारास आम्ही चावंडच्या वाटेवर पाऊल ठेवलं. वातावरणात सुखावून जाणारा गारठा होता !!!
ट्रेकच्या दहाव्या मिनिटाला का कोण जाणे… पण मागे वळून पाहिलं तेव्हा पश्चिमेच्या शंभू डोंगराचं डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य समोर अवतरलं होतं !!! या एका नजा-याने चावंडचं "प्रसन्नगड" हे आणखी एक नाव सार्थ ठरलं होतं.  झाडांच्या गर्द सावलीतून समोर दिसणा-या आणि सकाळच्या कोवळ्या सोनेरी किरणात न्हाऊन निघालेल्या या देखाव्याने मनाला मात्र कायमचीच भुरळ घातली. 


खाली छोटंसं चावंड गाव आणि त्यामागे उत्तरेला देवदांडया डोंगर, निमगिरी - हनुमंतगडाची जोडगोळी आणि पायथ्याशी पसरलेला माणिकडोह्चा जलाशयही दृष्टीपथात आला.

चढाच्या शेवटच्या टप्प्यात चावंडच्या पाय-या आणि आधारासाठी लावलेलं रेलिंगही दिसून आलं. हे रेलिंग तुटल्याने नुकतंच पुण्याच्या "शिवाजी ट्रेल" या संस्थेने ट्रेकर्सच्या सुरक्षिततेसाठी पाय-यांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत भक्कम आणि नवंकोरं लोखंडी रेलिंग बसवलं आहे.   


शिवाजी ट्रेल संस्थेने बसवलेले रेलिंग. फोटो : योगेश जगताप

पाय-यांच्या वाटेवर आधारासाठी ही छोटी तोफ पुरण्यात आली आहे.या तोफेला जंबुरका असं म्हणतात. 


चावंडच्या शेवटच्या पाय-या व डावीकडे तटबंदी. याच्या दरवाजाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की या पाय-या चढून शत्रू आल्यास त्याच्यासमोर प्रवेशद्वार न राहता केवळ एक तटबंदीयुक्त भिंत उभी राहील आणि या छोटयाश्या जागेत त्याची पूर्णपणे कोंडी करता येऊ शकते.

पाय-या संपल्यानंतर वाट डावीकडे वळली आणि चावंडचा गणेशप्रतिमेने नटलेला सुंदर दरवाजा समोर दिसला

दरवाजाच्या पुढील पाय-या चढून माथ्यावर प्रवेश झाला. पश्चिमेकडे नजर गेली तेव्हा शंभू डोंगर,त्याच्या पायथ्याचे खडकवाडी गाव आणि उजवीकडे एकसंध अशी व-हाडाची डोंगररांग उर्फ भोरांड्याचं दारही दृष्टीपथात आलं. 

माथ्यावरच्या अवशेषांना आता सुरुवात झाली.


माथ्यावरील तटबंदी

चावंडवरील दगडी पात्र


चावंड गावातील वानरसेना बरोबर असल्याने चावंडवरील प्रमुख आकर्षण असणारी सप्तकुंड सापडायला वेळ लागला नाही. पण दुर्दैवाने माझ्याकडचे सप्तकुंडाचे फोटो व्यवस्थित न आल्याने सप्तकुंडाचे खालील सर्व फोटोज आमचे मायबोलीकर मित्र,ट्रेकर व उत्कृष्ट फोटोग्राफर श्री. योगेश जगताप यांच्या  पोतडीतून साभार
चावंडच्या माथ्यावर गडदेवता चामुंडा मातेचे मंदिर आहे. खरं तर चावंड हे नाव चामुंडा या नावाचा अपभ्रंश आहे असं मानलं जातं. पण तज्ञांच्या मते या किल्ल्याचं मूळ व कागदोपत्री असलेलं नाव जुंड…त्याचा अपभ्रंश चुंड व त्यातून सध्याचं चावंड हे नाव तयार झालं. महाराजांनी किल्ला ताब्यात घेतल्यावर या गडाला "प्रसन्नगड" असं सुंदर नाव बहाल केलं.

गडदेवता चामुंडा देवीची मूर्ती

मंदिरासमोरील दीपमाळ

माथ्यावरून दिसणारं किल्ल्यावरील तळं 

व-हाडाची रांग उर्फ भोरांड्याचे दार

"प्रसन्न" मनाने आम्ही चावंड उतरला व आश्रमशाळेत पोहोचलो

गावातील वानरसेना

गावात परतलो तेव्हा साडेनऊ वाजले होते. खोलीतलं सगळं सामान आवरून आम्ही आश्रमशाळेच्या बाहेर पडलो. कालच्या जेवणाचे आणि आज सकाळच्या चहा नाष्ट्याचे पैसे द्यायला म्हणून आम्ही कवटे काकांच्या घरापाशी गेलो तर घराला कुलूप !!! शेवटी त्यांच्या मुलाच्या हातात आम्ही पैसे टेकवले तेव्हा त्याने कसल्यातरी भीतीने झटकन हात मागे घेतला !!
"काय रे ?? काय झालं ??" मी त्याला विचारलं.
"त्यांच्याकडून पैसे घेतलेस तर घरी आल्यावर मुस्काडेन असं बाबांनी सांगितलंय !!!" मान खाली घालत नरम स्वरात तो म्हणाला.
आता मात्र आमचे शब्दच खुंटले. कवटे काकांनी आदरातिथ्याचा एक अविस्मरणीय नमुना तर दाखवला होताच पण तोही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता !!! सह्याद्रीवर प्रेम केलं तर सह्याद्रीकडून भरभरून प्रेम मिळतंच !!  केवळ गिर्यारोहणातलेच नाही तर दैनंदिन आयुष्यातले धडेही हा सह्याद्री आपल्याकडून गिरवून घेत असतो हेच खरं !!

चावंड गावातून निघून आम्ही तासाभरात जुन्नरला पोहोचलो आणि आजच्या दिवसातला पहिला बॉम्ब पडला !!! प्रीतम आणि राजेशची गाडी जुन्नरच्या शिवाजी महाराज पुतळा चौकात आपोपाप थांबली आणि मागून येणा-या मलाही राजेशने हात दाखवून थांबवलं.
"आम्ही घरी परत चाललोय. प्रीतमला बरं वाटत नाहीये.  त्यामुळे आम्हाला पुढचा ट्रेक जमणार नाही !!!"

खरं तर ह्यात मनाला लावून घेण्यासारखं फार काही नव्हतं. पण पुढचे हडसर आणि निमगिरी आता मला एकट्यालाच करावे लागणार होते. गिर्यारोहणाच्या नियमांनुसार सोलो ट्रेक निषिद्धच आहेत.पण केवळ ते दोघं नाहीत म्हणून एवढया हाकेच्या अंतरावरून परत फिरणंही तत्वात न बसण्यासारखं होतं.  गावातून वाटाड्या घ्यायचा हे तर ठरलेलंच होतं त्यामुळे एकट्याने ट्रेक करण्याचीही भीती नव्हती. अखेर शेवटचा एक चहा घेऊन दोघांनाही नाईलाजाने निरोप दिला आणि आता मी एकटाच हडसर आणि निमगिरीच्या स्वच्छंद भटकंतीसाठी एकदम रेड्डी झालो !!

जुन्नरहून माणिकडोह धरणाच्या बाजूने जाणारा वळणावळणाचा अतिशय सुंदर रस्ता हडसरला गेला आहे. हाच रस्ता पुढे निमगिरी किल्ल्याच्या पायथ्यातून अंजनावळे मार्गे जीवधनच्या घाटघर गावात पोहोचतो. जुन्नरहून माळशेज रस्त्याला डावीकडे माणिकडोहचा फाटा आहे. माणिकडोह धरण आणि तिथून पुढे राजूर नं १ या गावामार्गे हडसर गावात दीड तासात पोहोचता येतं. (भंडारद-याजवळचं राजूर गाव वेगळं. हे राजूर नं १ पुणे जिल्ह्यात आणि ते राजूर नगर जिल्ह्यात आहे) . माणिकडोहचा फाटा मागे पडला तेव्हा ऊन वाढू लागलं होतं !!!

माणिकडोह धरण व त्याची भक्कम भिंत काही वेळातच सामोरी आली. मागे दिसणारा चावंड. 

 माणिकडोह धरणाच्या काठावरून हडसर उर्फ पर्वतगडाचा भव्य आकार डोळ्यात भरला. हडसरला जायचे प्रमुख तीन मार्ग आहेत.
१. मुख्य कातळकड्याच्या डावीकडे एक छोटा कातळकडा चिकटलेला दिसतोय. त्याच्या डावीकडून म्हणजेच त्याला उजवीकडे ठेवत पूर्ण वळसा घालून गेल्यास आपण हडसरच्या महादरवाजाकडे नेणा-या राजमार्गावर पोहोचतो जिथून साधारणपणे शंभर - दीडशे पाय-या चढून आपल्याला किल्ल्याचा माथा गाठता येतो.
२. डावीकडचा कातळकडा आणि मुख्य किल्ला यांच्या मध्ये दिसणा-या घळीतूनही किल्ल्यावर जायला वाट आहे. पण तिथे सोपे क्लाइंबिंग करावे लागते.
३. मुख्य कातळकड्याच्या साधारण उजवीकडच्या शेवटाला सुमारे साठ - सत्तर फूट उंचीच्या एका कातळटप्प्यावर गावक-यांनी काही पाचरी मारलेल्या आहेत. त्याला खुंट्या असं म्हणत असल्याने ह्या वाटेला खुंटीची वाट म्हणतात. पावसाळा सोडून इतर ऋतुंमध्ये या वाटेने गडावर जाता येतं. पण हा कातळटप्पा चढताना मागच्या बाजूला Exposure असल्याने सेफ्टीसाठी १०० फुटी दोर अतिशय आवश्यक आहे. दोर नसल्यास आणि बरोबरच्या सदस्यांना कातळारोह्णाचा अनुभव नसल्यास ह्या वाटेने अजिबात जाऊ नये. पहिल्या वाटेने पाय-या चढून सुरक्षितरित्या गडावर पोहोचावे.  


अर्ध्या तासात हडसर गावात येउन दाखल झालो.

गावचे सरपंच असणा-या सीताराम सांगळेंच्या घरासमोर गाडी लावली तेव्हा स्वत: सांगळे कुठेतरी बाहेरच निघाले होते. शहरी कपडे घातलेला विशीचा पोरगा एकटाच आलेला बघून त्यांच्या चेहे-यावर क्षणार्धात उमटलेलं प्रश्नचिन्ह मला स्पष्ट दिसलं. प्रीतम - राजेश आणि अस्मादिकांच्या जुदाईची सगळी कर्मकहाणी त्यांना कथन केल्यावर  मी सांगायच्या आत त्यांनी आपणहूनच गावातल्या एका छोट्या मुलाला माझी सोबत करायचं फर्मान सोडलं. पाठीवरचं ओझं त्यांच्या अंगणात उतरलं. हडसर गावातून आपण बाहेर पडलो की निमगिरीच्या रस्त्यावर हडसरच्या पायथ्याला पेठेची वाडी नावाची अगदी छोटी वस्ती आहे. तिथून अगदी ठसठशीत मळलेली पायवाट हडसरवर गेली आहे. पेठेच्या वाडीत जायचं नसेल तर हडसर गाव आणि पेठेची वाडी या मार्गावर असलेल्या एका विहिरीच्या मागून जाणारी पायवाट हडसरच्या डाव्या कातळकड्याच्या सावलीतून जात पेठेच्या वाडीच्या मुख्य वाटेला येउन मिळते. कुठूनही गेलं तरी आपण हडसरच्या पाय-यांपाशीच येउन पोहोचतो. माझ्याबरोबर असलेल्या गावातल्या मुलाने मला त्या विहिरीपाशीच  थांबवलं.
"मी जातो हितून परत. किरकेट खेळायला जायचंय !!!"
"अरे पण मला वरती कोण घेऊन जाणार." सांगळे काकांनी मला रस्ता अगदी व्यवस्थित समजावून सांगितला होता पण नियमाला मुरड घालायची नसल्याने एकटयाने जाण्याचं टाळण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत होतो.
"बाबा हायेत माझे वाटेवर. आत्ताच गुरं घेऊन गेल्येत. वाटेत भ्येटतील तुमाला."
"आता इथून पुढं कसं जाऊ ??" त्याच्या हातात बिस्किटांचा पुडा आणि गोळ्यांचं पाकीट ठेवत मी त्याला मुद्दामच विचारलं.
"ह्ये काय ह्यो रस्ता. अजिबात सोडायचा न्हाई. आटोमेटली जाल वरती !!!"
"कसं जाल ??" आतून उफाळून येणारा हास्याचा धबधबा महत्प्रयासाने थांबवत मी त्याला विचारलं.
"आटोमेटली ओ !!! म्हंजी आपोआप !!!" Automatically हा शब्द बरोबर उच्चारण्याचा त्याचा निरागस प्रयत्न मात्र अफलातून होता !!!
त्याला निरोप देऊन मी हडसरची पायवाट तुडवायला सुरुवात केली. त्याचे वडील वाटेवर भेटतील या अपेक्षेने. 

हडसरच्या ह्या दोन कातळकड्यांच्या मधल्या घळीतूनही वाट आहे.

 हडसरची घळीची वाट. घळीच्या पलीकडे दिसणारी किल्ल्याची तटबंदी. 
 
 डाव्या कातळकड्याच्या पायथ्याच्या वाटेने जाताना उजवीकडे हे छोटे टाके आहे.


ह्या वाटेने सरळ जाउन गडाला पूर्ण वळसा घातल्यानंतर ह्या पाय-या समोर आल्या.

  महादारवाज्याकडे नेणा-या पाय-यांची ही रांग सुंदर दिसत होती. ह्या पाय-यांच्या शेवटी डावीकडे वळल्यावर हडसरच्या दरवाजांची मालिका सुरु होते. 

 पाय-या संपल्यावर खणखणीत तटबंदीने जंगी स्वागत केले. 

हडसरच्या प्रवेशमार्गाची सुरुवात.
तटबंदीपासून डावीकडे गेल्यावर हडसरचा अतिशय सुंदर असा कातळकोरीव दरवाजा समोर आला.

दरवाजातील पहारेक-यांची देवडी आणि त्यावरचे कोरीव खांब आजही सुस्थितीत आहेत.

पहिल्या दरवाजातून दुस-या दरवाजात जाताना हा सुरेख जिना आहे. ह्यातून पुढे गेल्यानंतर गडाचा दुसरा दरवाजा लागतो. त्यातून प्रवेश केल्यावर आपण गडमाथ्यावर येउन दाखल होतो.

 गडमाथ्यावर पाऊल ठेवताच हे शेवाळलेलं टाकं लागलं.   

हडसरवरील हे दुसरं टाकं. मागे दिसणा-या गुरांना घेऊन आलेले गावातल्या मुलाचे वडीलही इथेच भेटले.

हडसर माथ्यावरील वाड्याचे भग्नावशेष

हडसर माथ्यावरील शिवमंदिर.

एकाकी !!!

हडसरवरील समाधी

कोरीव दगड

गावातील मामांना हडसरवरच्या प्रसिद्ध कोठारांचा पत्ता विचारून घेतला. हडसरच्या माथ्यावर प्रवेश केल्यानंतर जे पहिलं टाकं लागतं तिथून डावीकडे सरळ चालत गेल्यावर कड्याजवळ हडसरची कोठारं आहेत. माथ्यावर सुंदर गणेशपट्टी असलेली ही दारूकोठारं मात्र हडसर भेटीत आवर्जून बघण्यासारखी आहेत. पण दारूकोठाराच्या दरवाजातच कॅमे-याच्या सन्माननीय बॅटरीने ऐन वेळेस दगा दिल्याने तिचा प्रवास इथेच संपला आणि हडसरच्या कोठाराचे,माथ्यावरून दिसणा-या नजा-याचे आणि पुढच्या निमगिरी किल्ल्याचे फोटो घेता आले नाहीत. चालायचंच !! पुन्हा कधीतरी. 

हडसर गावातल्या मामांचा निरोप घेऊन प्रसन्न मानाने किल्ला उतरून गावात आलो तेव्हा गावातील पोरं माझ्या गाडीच्या आरश्यात बघून भांग पाडण्यात रमली होती. त्यातल्या दोघांचं गाडीच्या सीटवर कोणी बसायचं यावरून जोरदार शाब्दिक युद्ध सुरु होतं आणि तिसरा मुलगा एकटाच रडत होता !!! हा यक्षप्रश्न कसा सोडवावा तेच कळेना. एक वाजत आला होता. निमगिरी करून पुण्याला परतायचं होता. शेवटी "तुमचा फोटो काढतो" या बोलीवर त्यांचं असहकार आंदोलन थांबलं आणि फोटोसाठी एक झक्कास पोझ त्यांनी दिली !!!निरागस !!!

हडसर गावात सांगळे काकांच्या घरी आग्रहाचा चहा झाला. त्यांचा निरोप घेऊन पाऊण तासात निमगिरी पायथ्याला पोहोचलो. तिथेही गावातले दोन बच्चे सोबत मिळाले आणि अखेर निमगिरी - हनुमंतगडही यशस्वीरीत्या सर झाला !!! फोटो मिळाले नाहीत याची हलकीशी सल उरलीच पण या दोन दिवसात गाठीला मिळालेली अनुभवाची शिदोरी मात्र कधीच न संपणारी आहे !!!

                                                                                                                             ओंकार ओक

Comments

 1. ऑटोमेकटली … हेहेहे… लेख एकदम जिवंत वाटला ... एकंदरीत झकास वर्णन… जुन्या आठवणींना उजाळा मिळाला… मस्त…
  तेवढं निमगिरी आणि हनुमंतगडाचा लेख वाचायला मिळाला पाहिजे… लिव्हा लवकरंचं ...

  ReplyDelete
 2. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 3. मस्त मस्त :)
  पुढच्या भागाची वाट बघत आहे…
  हडसरची खुंटीची वाट-गुहा-कोरीव पाऊलवाट, निमगिरीच्या पायथ्याची पुष्करणी, गजलक्ष्मीशिल्प, चंद्र-सूर्य शिल्पं हे सारं देखणं वैभव आठवलं..

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड