रायलिंग !!!!महाराष्ट्राचे दोन मानबिंदू असणा-या तोरणा राजगडाच्या मावळतीला असलेला एक अभेद्य कडा !!! पुणे अन रायगड जिल्ह्याची सीमा. सीमा कसली...ही तर सह्याद्रीच्या असामान्य रौद्रत्वाची परिसीमाच !!!या कड्यावर उभं राहिलं की पुढयात उभं असतं सह्याद्रीचं शिवलिंगआणि त्याच्याच मागे आपल्याला नकळतपणे नतमस्तक व्हायला लावणारं एक "शिव - मंदिर" !!! गिर्यारोहक नवखा असो वा कसलेला,निसर्गप्रेमी असो व निसर्गाशी अपरिचित असलेलाकोणत्याही मराठी मनाची तर क्षणार्धात झंकारावी आणि या रांगड्या सह्याद्रीशी त्याचं नातं कायमचं जुळवं. गिर्यारोहणाचा बेलभंडारा उधळावा आणि स्वत्व पावन करून घ्यावं ते इथूनच !! हे ठिकाणहे स्फूर्तीस्थान म्हणजेच रायलिंग पठार !!!

रायलिंग पठारावरून दिसणारा रौद्रभीषण लिंगाणा आणि शिवतीर्थ रायगड !!

कुसारपेठ गावातून रायगड व लिंगाणा एकाच कोनात


 देश आणि कोकणच्या म्हणजेच पुणे अन रायगड जिल्ह्यांना जोडणा-या अनेक घाटवाटा आहेत. पुणे जिल्ह्यातल्या वेल्हा तालुक्याच्या पश्चिमेलाही अशाच दोन घाटवाटा रायगड जिल्ह्यात उतरतात. सिंगापूर नाळ आणि बोराटा नाळ अशी त्यांची अगदी लोभस नावं. त्यांच्यापर्यंत पोहोचायला मात्र पुण्याहून सुमारे सत्तर किलोमीटर्सचा प्रवास करावा लागतो. पुण्याहून नसरापूर मार्गे वेल्हयाच्या दिशेने निघालो की डावीकडे राजगडाचं प्रसन्न दर्शन होतं. वेल्हा जवळ येताना ते गरुडाचं घरटं म्हणजेच तोरणगडही नजरेत भरतो. त्याला दंडवत घालत वेल्हयात दाखल व्हायचं. चहा - नाष्टा,भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था होणारं या मार्गावरचं हे शेवटचं ठिकाण. तोरणा विहारच्या कदमांचं उबदार आदरातिथ्य पदरी पाडायचं आणि भट्टी मार्गे पसली गावाकडे आपला प्रवास सुरु करायचा. तोरण्याच्या भेदक अशा घोडेजीन - विशाळा टेपाडाला मागं टाकून घाटमाथ्यावर आलो की साधारण नैऋत्येला सह्याद्रीचं अफाट साम्राज्य पसरलेलं दिसतं !!! रायरेश्वर,कोळेश्वरापासून ते पार महाबळेश्वर मधुमकरंदगडापर्यंतचे अनेक पर्वत साद घालू लागतात. हे सह्यवैभव भान हरपून डोळ्यात सामावून घ्यायचं आणि घाट उतरून दाखल व्हायचं ते पासली गावात. पासलीपासून केळदघाट चढून केळदखिंडीत पोहोचलं की मोहरी पर्यंतचा दहा किलोमीटर्सचा प्रवास सुरु होतो. या प्रवासातही सह्याद्री त्याचे विलक्षण अंतरंग किती मोकळेपणाने उलगडून दाखवतो !!! उजवीकडे तोरण्याचा संपूर्ण आकार नजरेत भरतो आणि त्याने राजगडाच्या दिशेने पुढे केलेला मैत्रीचा हातही. डावीकडे कांगोरी,मकरंदगड,प्रतापगड आणि आंबेनळी घाटही सुरेख दर्शन देतात. या वाटेवरचं एकलगाव मागे पडतं आणि एका वळणावरून रायगड आणि लिंगाण्याचं जे काही रूप नजरेत भरतं त्यासाठी शब्दच थिटे पडावेत !!! खोल तुटलेलं ते टकमक टोक, तो भवानी कडा,तो रेखीव नगारखाना आणि श्रीकृष्णाच्या मुकुटातल्या मोरपिसासमान भासणारं ते जगदीश्वराचं शिवालय !!! असं वाटतं की सरळ जाउन नि:शब्दपणे उभ्या असलेल्या रायगिरीच्या कड्यांना जाउन बिलगावं आणि त्यांनीही या लेकराला अलगदपणे कडेवर उचलून घ्यावं !!! नजर हटत नाहीमन भरत नाही पण घड्याळाचे काटे आडवे येउन सांगतात की पुढे अजून कितीतरी सुंदर असं काहीतरी आहे !!!
  
पासली घाटातून दिसणारा सह्याद्रीचा अविस्मरणीय नजारा


रायलिंगकडे जाताना…

रायलिंग पठारावरून रायगड

 पुढे आपण मोहरी गावात पोहोचलो की त्या गावाचं स्थान नेमकं लक्षात येतं. सह्याद्रीच्या करवतलेल्या कड्यांनी चारही बाजूंनी वेढलेल्या प्रदेशात मोहरीच्या दाण्यासमान असलेलं हे छोटंसं मोहरी गाव !!! गावचा सरपंच आणि आमच्या अगदी घरचा सदस्य असणारा शिवाजी पोटे म्हणजे एक अतिशय नम्र आणि आतिथ्यशील व्यक्तिमत्व. मायेने विचारपूस करणारा आणि आपुलकीने खाऊ घालणारा !! त्याच्या घरी पाठपिशव्या टाकायच्या आणि सरळ पश्चिमेकडे चालू लागायचं. वाट मळलेली तसंच लिंगाणा सतत समोर दिसत असल्याने चुकण्याचा प्रश्न येत नाही. अर्ध्या पाउण तासांच्या या प्रवासात डावीकडे सिंगापूर आणि बोराटा नाळीही आपलं अस्तित्व जाणवून देतात. सरतेशेवटी आपण रायलिंग पठारावर येउन दाखल होतो आणि क्षणभर डोळ्यात पाणीच तरळतं !!! शब्द सुचत नाहीत कारण उर भरून आलेला असतो. काय म्हणावं सह्याद्रीच्या या अपूर्व किमयेला !! किती धन्यवाद द्यावेत हेच उमगत नाही. लिंगाण्याच्या त्या मूर्तिमंत देखणेपणावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. रायगडावरून जगदीश्वराच्या गाभा-यातले पवित्र मंत्रोच्चार कानी पडू लागतात आणि आपण तिथेच स्वत:ची ओळख विसरतो. रोजचं रहाटगाडगं विसरावं अन त्या सह्याद्रीच्या चरणी अर्पण होऊन जावं !! उजवीकडे गायनाळ,निसणीची वाट,खानुचा डिगा,वारंगीचा कणा डोंगर,कोकणदिवा आणि कावळ्या - बावळ्याची खिंड ज्या रुपात समोर येते ते अवर्णनीयच !!! खाली रायगड जिल्ह्यात छोटीशी पाने अन दापोली ही गावं,वाळणकोंडीच्या डोहाचा प्रदेश,काळ नदीचं पत्र अन छत्री निजामपूरचं धरण दिसू लागतं !! समोरच्या लिंगाण्याच्या पोटात एक छोटेखानी गुहा दिसते अन त्याचं आभाळ भेदून गेलेलं शिखरही. त्याच्या डोळे फिरवणा-या वाटेशी सलगी करावी ती या मातीतल्या मावळ्यांनच !! त्याच्या अस्मानी माथ्यावर एकदा तरी पाऊल ठेवावं आणि मनोमन स्वाभिमानाची अभेद्य तटबंदी उभारावी !! रायलिंगाच्य कड्यावरून त्याच्याकडे बघताना हीच तर स्वप्न पहायची. आयुष्यातलं सर्वोच्च स्थान गाठण्याचीएक स्वच्छंद गगनभरारी घेण्याची !!!

रायलिंग पठाराच्या वाटेवर दुर्गप्रेमींनी आखलेले दिशादर्शक बाण. यातील सरळ दिशेने दाखवलेला RP लिहिलेला बाण म्हणजे रायलिंग पठार आणि डावीकडचा SN लिहिलेला बाण म्हणजे सिंगापूर नाळ

रायलिंगच्या वाटेवरचं नितांत सुंदर जंगल

सिंगापूर नाळेचा प्रदेश आणि सह्याद्रीच्या अजस्त्र डोंगररांगा

आभाळात बाणासारखा घुसलेला लिंगाणा आणि समोर साक्षात दुर्गपंढरी रायगड !!!  साहसवीरांना साद घालणारा लिंगाण्याचा अजिंक्य माथा 

रायलिंग वरून दिसणा-या सह्याद्रीच्या कराल डोंगररांगा

लिंगाण्याच्या कड्याला भिडलेले सह्याद्रीचे मावळेरायलिंग पठारावर उभं राहिल्यावर कुठेतरी गडकोटांची स्पंदनं जाणवू लागतात. त्या भर्राट वा-याचा झोत अंगावर घेताना स्वत:च्याही नकळत अंतरीची खूण पटावी अन उत्तरांना पडलेले प्रश्नही कसे अलगद सुटावेत !!! इथल्या शांततेशी काही काळ बोलावं आणि आयुष्यातली आपली सारी दु:ख इथून खाली कायमची फेकून देऊन मोकळं व्हावं !! रायगडावर चिरविश्रांती घेणा-या त्या युगपुरुषाला इथूनच दंडवत घालावा आणि त्याच्या तेजाचा अंश घेऊन इथेच आपल्या भटकंतीचा समारोप करावा !! भूतकाळातून योग्य ते शिकावंवर्तमानात मनसोक्त जगावं आणि भविष्यात स्वप्न सत्यात उतरवावीत !! सह्याद्रीतल्या डोंगरयात्रेची हीच तर खरी फलश्रुती आहे !!!
 ओंकार ओक

   


                                                                                           

Comments

  1. वाह वाह! काय सुंदर मांडलंयंस गड्या. ताबडतोब बॅग पाठीला मारून निघावंसं वाटतंय.
    - मकरंद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड