श्रावणरंग !!!भरून आलेलं आभाळमनाच्या तारा हलकेच छेडणारा आणि क्वचित सुखावून जाणारा गार वारादरीतून उठणारे धुक्याचे लोट आणि प्रसन्न मनानं दर्शन देणारं हिरवंगार कोकणसह्याद्रीच्या कोणत्याही घाटमाथ्यावरचं हे एक चिरपरिचित दृश्य !! वरंध्यातल्या कावळ्याच्या तुटलेल्या कडयावर उभं रहा किंवा आकाशात झेपावलेल्या कोकणदिव्यावरसह्याद्रीचे हे अनोखे रंग मात्र प्रत्येक श्रावणात लोभसवाणे वाटतात. पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यात केळदच्या तुटलेल्या कड्यानजीक अशाच दोन घाटवाटा हातात हात घालून कित्येक वर्षांपासून उभ्या आहेत. पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर !!! नरवीर तानाजी मालुसरेंचं पार्थिव आपल्या अंगाखांद्यावरून आणि कदाचित डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत कोकणात नेणारा मढे घाट आणि त्याच्याच पलीकडे कोकणात डोकावणारा विलोभनीय असा उपांडया घाट. पुणे आणि रायगड जिल्ह्यांची सीमा रक्षणारे जणू राम लक्ष्मणच !!! एकानं घाटानं कोकणात उतरायचं आणि दुस-यानं पुन्हा देशावर यायचं.  पुण्याहून नसरापूर किंवा पाबे घाटातून वेल्हा गाठलं की १६ किलोमीटर्स वर वसलंय घाटमाथ्यावरचं केळद गाव. कोकणातल्या भातखाचरांचा हिरवा रंग ल्यालेलं आणि श्रावणातल्या सरींमध्ये मनसोक्त भिजणारं. तोरण्याला प्रदक्षिणा घालत भट्टी,पासली मार्गे केळद गाठलं की सुरु होतो एक अविस्मरणीय प्रवास. पहिल्यांदा जात असाल तर मात्र केळदचा एखादा माहितगार माणूस बरोबर असणं अत्यंत आवश्यक. केळदमधून एक पूल ओलांडून प्रशस्त पायवाटेनं अर्ध्या तासात घाटमाथ्यावर आलो की शेजारून लक्ष्मी धबधब्याचा प्रचंड प्रपात कोसळताना दिसतो. पूर्ण भरलेलं त्याचं ते शुभ्रांग स्वत:ला निवांतपणे कोकणात झोकून देताना जो आवाज करतं तो कानात साठवावा आणि क्षणभर स्वत:लाच विसरावं !!! जणू एखाद्या सतारीतून मुग्धपणे छेडलेला मल्हार रागच !!! लक्ष्मी धबधब्याच्या उजव्या अंगाच्या कडयाच्या बेचक्यातून मढे घाटाची सुरुवात होते. पायवाट अगदी ठळक. सुरुवातीच्या पाय-यांनंतर गर्द झाडीतून उतरणारी फरसबंदी पायवाट आपल्या पुरातन अस्तित्वाची जाणीव करून देत असते.   खरं तर  लक्ष्मी धबधब्यात स्वत:ला चिंब भिजवण्याचा आनंद काही औरच. पण पावसाळी पर्यटनाच्या नावाखाली मढे घाटात उडालेली शेकडो बेशिस्त आणि बेताल पर्यटकांची झुंबडदारूच्या बाटल्यांनी पांढ-याशुभ्र ओढयांचे बदललेले रंग आणि या अनेक  करंटयांचा धबधब्यात सुरु असलेला नंगानाच हे दृश्य मात्र क्षणभर मनावर ओरखडा उठवून जातं. आपल्याच कर्माने निसर्गाची केलेली धूळधाण बघून विषण्ण व्हायला होतं. पण आपण "त्यांच्यातले" नसल्यानेच तर मढे - उपांडयाची संगत धरलीये हा दिलासाच पुष्कळ ठरतो. कारण आपण निवडलेला मार्ग हा सह्याद्रीने सामन्यांसाठी कधीच खुला केला नव्हताआणि ही चूक तो कदापीही करणार नाही !!! 

मढे घाटातील नितांतसुंदर असा लक्ष्मी धबधबामढे घाटाच्या माथ्यावरून दिसणारं हिरवागार कोकण


तासाभरात आपण खाली उतरलो की ख-या अर्थाने सह्याद्रीच्या साम्राज्यात येउन दाखल होतो. समोर दिसणारा प्रचंड शेवताकडा उर्फ गाढवकडात्याच्यावरून प्रचंड आवाज करत कोसळणारा केळेवाडी धबधबा आणि डावीकडे दिसणारी वरंध्याची रांग हे दृश्य केवळ भान हरपवून टाकणारं !! पायाखाली सुरु झालेली लाल मातीची पायवाट आता अनेक छोटयामोठया ओढयांमधून आपले पाय हलकेच भिजवत कर्णवडी गावात घेऊन जात असते. आपण मढे घाट जरी उतरलेलो असलो तरी कर्णवडी गाव पुणे जिल्ह्यातच येतं बरं का !! पण त्या खालचं रानवडी येतं रायगड जिल्ह्यात. मढे घाट उतरल्या नंतरचा तासा - दीडतासाचा हा सपाटीवरचा मार्ग आता जास्तच जवळचा वाटू लागतो. क्वचित अंगावर शिडकावा करणारे पावसाचे थेंबदाटून आलेल्या कृष्णमेघांना दूर सारत हिरव्यागार धरणीला आणि सह्यकड्यांना पाचूचं रूप देणारे उन्हाचे कोवळे कवडसेलक्ष्मी धबधब्याचं दिसणारं संपूर्ण आणि जादुई रूप आणि एखाद्या दयाळ पक्ष्यानेशीळकरी कस्तुराने किंवा कुणा अनामिक पाखराने आळवलेले सुरेख आणि सुरेल राग हीच तर आपल्या डोंगरयात्रेची खरी फलश्रुती !!! 

कर्णवडी गावात घेऊन जाणारी सुंदर वाट

मढे घाटाच्या समोरचा धुक्यात हरवलेला गाढवकडामजल दरमजल करत कर्णवडीमध्ये येउन दाखल झालो की एखादी प्रेमाची ओसरी वाटच बघत असते. न मागता समोर आलेला पाण्याचा हंडा आणि कोरा चहा मिळाला की आपल्या श्रमपरीहाराचं सुख नकळत मिळून जातं !!! कर्णवडी हे पन्नासेक उंब-यांचं टुमदार गाव. उपांडयाच्या भेदक कड्यांच्या कुशीत वसलेलं.  उपांडयाच्या माथ्यापासून कर्णवडीपर्यंत पाण्याचा एक पाईप आणला गेला आहे.  याच्या सोबतीने गेलं की घाटमाथ्यावर अलगद पाऊल पडतं. कर्णवडीतून होणारी उपांडयाच्या चढाची सुरुवात तशी पटकन न लक्षात येणारी. पण सह्याद्रीतच आयुष्य काढलेला केळदचा भूमिपुत्र बरोबर असल्याने वाटेची निश्चिंती असते. कर्णवडीच्या कौलारू घरांनाइवलेसे डोळे उघडत सगळं जग त्यात सामावून घेण्याचा निरागस प्रयत्न करणा-या कोंबडीच्या छोटया पिलांना आणि "पुनारागमनायचं" म्हणत आपल्याला प्रेमाने निरोप देणा-या एखाद्या सत्तरीच्या आजोबांना डोळे भरून बघत उपांडयाची चढण चढू लागायचं !!!! सुरुवातीला अगदीच सोपी आणि नंतर घाटमाथ्यावर जाउन विसावणारी थोडीशी खडी पायवाट चढायला लागलो की आसमंतात एक जादू भरल्यासारखं वातावरण तयार होतं. उजवीकडे स्पष्ट दिसणारा शिवथरघळीचा जलप्रपात लांबूनही एक निराळीच किमया करून जातो !!! त्याच्या उजव्या अंगाला दिसणारा कावळ्याचा कडापायथ्याशी दिसणारी कोकणातली छोटीशी झापं आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर खुलून दिसणारा हिरवागार सह्याद्री…. मोहात पाडणारंपारणं फेडणारं  आणि स्वत्व विसरायला लावणारं एक अप्रतिम दृश्य !!! तासाभरात घाटमाथ्यावर पोहोचलो की पुन्हा लाल मातीच्या वाटेचा मागोवा घेत अर्ध्या - पाउण तासात केळदमध्ये दाखल व्हायचं. श्रावणरंगांचा एक मंत्रमुग्ध आविष्कार आपल्या पोतडीत जमा झालेला असतो. केळद ते केळद हा दोन घाटांच्या साक्षीने केलेला अद्भुतरम्य आणि अविस्मरणीय प्रवास इथेच थांबला ही सल मात्र काहीकाळ जाणवत रहाते. पण सह्याद्रीतून कसलीही फिकीर न करता स्वत:ला भूमीच्या स्वाधीन करणा-या धबधब्यांची रांग….वाटेवरून चालत असताना समोरच्या गगनचुंबी झाडावर बसलेल्या एखाद्या गरुडाने अचानक आकाशात घेतलेली स्वच्छंदी भरारीहिरव्याकंच गवतात झालेली एखादी गूढ सळसळ आणि या सगळ्याला असलेलं श्रावणसरींचं अवीट गोडीचं पार्श्वसंगीतही अनुभूती मनाच्या पटलावर एक सुंदर निसर्गचित्र क्षणाक्षणाला रंगवत असते !!!    

ओंकार ओक

   


Comments

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड