"सुर"म्य भ्रमंती"हॅलो…मला उद्या जमत नाहीये. माझं कॅन्सल झालंय !!"…… कमालीच्या निर्लज्ज आवाजात आणि कोणत्याही प्रकारचा "गिल्ट" मनात न बाळगता आशिष दामलेने शनिवारी रात्री आठ वाजता हा फोन केला आणि माझी झोपच उडाली !!! उद्या सुरगडचा ट्रेक. जेवणाच्या डब्यासकट सगळी तयारी झालेली. त्यात ह्या ट्रेकचे भिडू दोघंच… मी आणि दामले. आता हा "आगाशे" (ह्याचा लॉन्ग फॉर्म भेटल्यावर सांगेन !!) झालाय म्हणल्यावर ट्रेक खड्ड्यात गेला हे उघडंच होतं. पावसाने जोर धरलेला आणि सह्याद्री हिरवाईने सजलेला !! सुरगडाची ओढ काही स्वस्थ बसू देईना. त्यात सुरुवातीपासूनच सोलो ट्रेकिंगच्या प्रचंड विरोधात असल्याने एकट्यानं जाण्याचा सवालच नव्हता. त्यामुळे हाही ट्रेकपावसात विरघळून जाण्याची शक्यता कोणीही बदलू शकत नव्हतं !! पण रात्री साडेदहा वाजता अचानक जादूची कांडी फिरावी तसा एक अविश्वसनीय चमत्कार झाला. पलीकडून सौरभ बोलत होता…… 
"अरे मी आणि बाबा उद्या सुरगडला जाणार आहोत…प्लीज माहिती देशील का ???"

चलबिचल होत असलेलं मन क्षणार्धात शांत झालं आणि डोळ्यासमोर हिरव्यागार  सुरगडाची दृश्य तरळायला लागली. किल्ल्याची नुसती माहिती कशाला…माहिती देणारा अख्खा माणूसच बरोबर येतोय हे सांगितल्यावर सौरभचाही क्षणभर विश्वास बसला नाही आणि आता ट्रेकवर फायनली शिक्कामोर्तब झालं !!!

२०११ च्या ऑगस्ट मधली ही गोष्ट. त्या वेळी पाऊससुद्धा इमानदारीत होता. काँग्रेस सरकार असूनही त्यांची वागणूक पावसात मात्र उतरली नव्हती !!! कमालीचं धुंद वातावरण…हवेत वाढलेला गारवा…आणि आपल्या एकेका हिरव्या पात्यातून अंतर्मनाला साद घालणारा सह्याद्री…बास… हेच पुरेसं होतं !! .पुण्याहून सुरगडला जायचं असेल तर दोन मार्ग आहेत. एक म्हणजे पुणे - लोणावळा - खोपोली - पेण मार्गे मुंबई - गोवा हायवेला लागायचं आणि नागोठणे गाव पार झालं की त्यानंतर लागणा-या नागोठणे खिंडीच्या अथवा सुकेळी खिंडीच्या नंतर लगेचच जे खांब नावाचं गाव लागतं तिथून डावीकडे वळून वैजनाथ मार्गे सुरगड पायथ्याच्या घेरा सुरगड गावात येउन दाखल व्हायचं. पुण्यातून जायचा दुसरा मार्ग म्हणजेपुणे - ताम्हिणी - विळे - कोलाड - खांब - वैजनाथ आणि अखेरीस घेरा सुरगड !! (सध्या मुंबईच्या दुर्गवीर (www.durgveer.com) संस्थेचं श्रमदान आणि संवर्धन या गडावर होत असल्याने खांब ते अगदी घेरा सुरगड पर्यंत दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत) सकाळी सव्वासहा वाजता स्वारगेट स्थानकावरून सुटणा-या पुणे - श्रीवर्धन एसटीने आम्ही त्रिमूर्ती ताम्हिणी पायथ्याच्या विळे गावात उतरलो तेव्हा आसमंतात भान हरपायला लावणारी किमया भरली होती. आश्चर्याचा अजून एक धक्का म्हणजे माझ्या शेजारी बसलेला शंकर नामक सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला तरुण हा खांब गावचाच निघाला. विळेहून सिक्स सीटर करून आम्ही कोलाडला पोहोचलो तेव्हा साडेनऊ वाजले होते. कोलाडच्या प्रभाकरमधली अशक्य जबरी चवीची मिसळ आणि वडापाव हादडला आणि अखेरीस मुंबई - गोवा हायवेवरच्या खांब गावात येउन पोहोचलो !!

खांब गावातून काळेकभिन्न कातळकडे धारण केलेला सुरगड कमालीचा लोभस दिसत होता. खांबहून वैजनाथ मार्गे पायथ्याचं घेरा सुरगड  फार फार तर चार किलोमीटर्स. पण पावसाळा असूनही त्या दिवशी अगदी कडक उन पडल्याने हवेत विलक्षण उकाडा होता आणि त्यामुळे ही तासाभराची चालही असह्य वाटत होती. त्यात गिर्यारोहकांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे डांबरी रस्ता आणि आता तासभर त्याच्याशीच सामना होता. पण भगवद्गीतेत (म्हणजे डोंगरयात्रा पुस्तकात !!) लिहिल्याप्रमाणे सुरगडच्या पायथ्याला घनदाट जंगल दिसत असल्याने चालताना नैसर्गिक एसीचा आनंद मिळणार याची खात्री होती. दोन्ही चाकं पंक्चर झालेल्या गाडीसारखं स्वत:ला ढकलत घेरा सुरगड गावात एकदाचे पोहोचलो आणि पहिल्याच घरापाशी एका जख्ख म्हातारबुवांनी वाट अडवली !!

"कुटं जातायसा ?? वरदायिनीला ??" सुरगडच्या डावीकडे असलेल्या उसर गावच्या रामवरदायिनी देवीच्या डोंगराच्या दिशेकडे बोट दाखवत म्हातारबुवांनी विचारलं.
 "नाही. सुरगड बघायला आलोय."
"अस्सं अस्सं. कुटून आलाय… म्हमईहून (मुंबईहून) का??
"नाही. पुण्यातून आलोय.:"
"बरं बरं. पहिल्यांदाच आले असाल तर गावातला गडी घेऊन जावा येखादा. जंगल लई ब्येकार हाये"
"हो. घेऊन जाणारच आहे.तुम्हीच द्या आम्हाला कोणीतरी"

तेवढयात आमचा हा संवाद ऐकून मागच्याच घरातल्या तरण्याबांड अशोक पार्टेने खिडकीतून आम्हाला हाक मारली.
"दादा रामराम."
"रामराम"
"सुरगडवर जाताय का ?? मी येतो सोबत. आज मला पण कंपनीला सुट्टी आहे."

आयतीच सोय झाली होती !! अशोकने स्वत:हून बरोबर यायची तयारी दाखवल्याने आता आमचाही उत्साह वाढला आणि त्याच्या घराच्या समोरूनच जाणा-या पायवाटेने आमची पायपीट आता सुरगडाच्या दिशेने सुरु झाली. (मुंबईची दुर्गवीर संस्था इथे संवर्धनाचं काम करत असल्याने सध्या प्रत्येक दगडावर बाण आखले गेले आहेत आणि वाट रुंद केली आहे. तसेच त्यामुळे चुकण्याची अजिबातच शक्यता नाही)

(टीप : आम्ही केलेल्या या ट्रेकच्या वेळी कॅमेरा नसल्याने फोटो काढता आले नव्हते. त्यामुळे नुकत्याच दुस-यांदा केलेल्या सुरगडच्या ट्रेकचे फोटोज रेफरन्स साठी देत आहे. वर्णन मात्र पहिल्या सुरगड भेटीचे आहे. )


घेरा सुरगडच्या हिरव्यागार तांदळाच्या शिवारातून वाट पुढे पुढे सरकत होती आणि समोर सुरगड एखादया अवखळ मुलासारखा त्या सदाहरीत जंगलाची चादर अंगावर ओढून उभा होता. 

घेरा सुरगड गावातून निघाल्यावर मळलेली ठळक पायवाट सुरगडच्या दिशेने झेपावली होती. वाटेत लागणारी थंड पाण्याची विहीर आणि त्यानंतर लगेचच लागणारा एक निखालस सुंदर शुभ्र पाण्याचा ओढा ह्या वाट बरोबर असल्याची ग्वाही देणा-या खुणा. तो ओलांडला की सुरु होते एक आनंदयात्रा…सुरगडच्या गर्द रानव्याच्या साक्षीने घडणारी !!! दुर्गवीरचं काम इथे सुरु होण्यापूर्वी गडपायथ्याच्या तरुणांनी एकत्र येउन स्थापन केलेल्या "सुरगड बचाओ समिती" तर्फे गडाचे दिशादर्शक बाण ठराविक अंतरावर दिसत होते. या जंगलाच्या थंडाव्याने मात्र थकव्याची जाणीवच होऊ दिली नव्हती. लपाछपी  खेळत असताना भिंतीच्या कडेआडून हळूच डोकावण-या निरागस मुलासारखा सुरगड त्या झाडीतून डोकावत होता. एकमेकांशी एकही शब्द न बोलता वाटचाल सुरु होती. कानावर पडत होती ती फक्त रातकिड्यांची किरकिर आणि मधूनच सुखावून जाणारी एखाद्या शीळकरी कस्तुराची अत्यंत सुरेल शीळ !!! कदाचित म्हणूनच ह्याला "सुर" गड नाव पडलेलं असावं !!! पाउणेक तासाची सुरम्य चढाई संपली आणि आम्ही सुरगडच्या वाटेवर असणा-या प्रशस्त पठारावर येउन पोहोचलो. कृष्णमेघांचं  शिरस्त्राण धारण केलेला सुरगडचा बेलाग कडा मात्र अप्रतिम दिसत होता. थंडगार वाहत्या वा-याने ते क्षण मात्र आजही बंदिस्त करून ठेवले आहेत !!!

माथ्यावर भगवं निशाण धारण केलेला सुरगड आता समोर आला. 

सुरगडच्या पठारावर आमचा निवांत श्रमपरिहार सुरु होता. ती जागा आणि ते वातावरणच इतकं मंत्रमुग्ध करणारं होतं की आपण सुरगड बघायला आलोय याचं काही क्षण शब्दश: विस्मरण झालं.

"काय अप्रतिम जंगल होतं रे !!! खूप प्रकारची झाडं असतील नाही का इथे ??" खाली दिसणा-या सुरगडच्या हिरव्या गालिच्याकडे नजर टाकत सौरभने विचारलं.
"अर्थात. खूप सुंदर सांभाळलय गावातल्या लोकांनी ह्या जंगलाला" मी उत्तर दिलं.
"तुला इथल्या झाडांची नावं सांगता येतील का ?? इतका फिरतोस तर नक्की माहित असेल. "
"नाही राव. त्यातलं झाड काही कळत नाही आपल्याला !!!"
सहजच केलेल्या माझ्या या कोटीमुळे सुरगडच्या त्या पठारावर हास्याचा अक्षरश: स्फोट उडाला आणि त्याच्या लवंग्या पार सुरगडचा माथा गाठेपर्यंत फुटत राहिल्या !!!

सुरगडच्या पहिल्या पठारावर आपण आलो म्हणजे जवळपास माथा गाठलाच असं समजायचं. पठारावरून गडाच्या डावीकडे दिसणा-या घळीत सुरगडचा भग्न दरवाजा आहे. ह्या दरवाजाकडे जाताना शेवटची खडी चढण आहे आणि मध्ये काही ठिकाणी खोदीव पावट्याही आहेत. सुरगडच्या कातळकड्याच्या खाली थंडगार पाण्याचं एक टाकं कोरलेलं असून त्यातलं पाणी मात्र अप्रतिम होतं. सुरगडची घळ आता समोर आली. घळीकडे जाताना मध्ये खरं तर एक सोप्या श्रेणीचा कातळटप्पा आहे पण सुरु असलेल्या पावसाळ्यामुळे तो कमालीचा निसरडा झाला होता. बूट काढून त्या थंडगार कातळावर पाय ठेवला तेव्हा क्षणभर एक कमालीची तीव्र शिरशिरी मेंदूच्या नसा क्षणभर छेडून गेली. हात ठेवायला असलेले होल्ड्स सुद्धा शेवाळलेले होते. पण कातळटप्पा अगदीच आवाक्यातला असल्याने काही मिनिटात त्याचा माथा गाठला. सुरगडाची उभी घळ आता सुमारे सत्तर अंश कोनात आमच्या डोक्यावर होती. खोदीव पाय-यांचा मान राखत दरवाजा गाठला आणि जेव्हा घड्याळात नजर गेली तेव्हा पायथा सोडून फक्त एक तास झाला होता !!!

सुरगडची उभी घळ

सुरगडचा कातळटप्पा

सुरगडचा भग्नावस्थेतील दरवाजा

 सुरगडची घळ आणि त्यातील पाय-या 

सुरगडची घळ चढून गेल्यावर "पुच्छ ते मुरडिले माथा" या प्रकारातील मारुतीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. कमरेला खंजीर असलेल्या या मारुतीला मिशा असून पायाखाली राक्षसाला चिरडले आहे. या फोटोत संवर्धनाच्या आधीची मूर्ती आणि नंतरची मूर्ती दिसत आहे. डावीकडच्या म्हणजे संवर्धनाचं काम सुरु होण्याच्या आधीच मूर्तीच्या खाली नीट पाहिलंत तर लाल सर्कलमध्ये दाखवलेली बियरची बाटली दिसेल !!!! ही आहे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची सध्याची अवस्था !!!मारुतीच्या मूर्तीपासून एक वाट डावीकडे बालेकिल्ल्यावर जाते तर एक वाट उजवीकडच्या कड्यावर. इथे घेरा सुरगड गावाकडे तोंड असलेला एक बुरूज असून इथे असलेला भर्राट वारा मात्र काही क्षण अनुभवावा असाच !!! इथून सुरगडचा हिरवागार बालेकिल्ला दिसतो

ह्या बुरुजावरून समोर दिसणारं कुंडलीकेचं पात्र म्हणजे त्या परिसराला असलेला एक हारच !!! हा हिरवागार प्रदेश हाच तर सुरगडचा "यूएसपी" !!!
समोर दिसणा-या दोन डोंगरांपैकी डावीकडचा छोटा डोंगर बहुदा घोसाळगड असावा.  

 बुरुजावरून दिसणारा घेरा सुरगड गावाचा सुंदर नजारा !!

 या बुरुजावरून बालेकिल्ल्याकडे जाताना एक सुमारे १०X१२ चं शेवाळलेलं टाकं आहे. त्यातला गाळ काढून ते स्वच्छ केल्यास सुरगडाला पाण्याचा एक सुंदर स्त्रोत मिळेल हे नक्की.

मारुतीच्या मूर्तीपाशी परत येउन बालेकिल्ल्याकडे जाताना किल्ल्याचे भग्नावशेष दिसले. यांचा ना कोणताच मागमूस ना कोणताच पाठपुरावा. जणू काही ह्यांना इतिहासात जागाच नसावी. निपचित पडलेल्या या दगडांनी मात्र फक्त ऋतुबदल अनुभवायचा. गडावरच्या वास्तूला मिळणारं सुख मात्र ह्यांच्या नशिबात नाही !!
पुढे गेल्यावर भग्न अवस्थेतील हेमाडपंथी मंदिर आहे

या मंदिरात भैरव - भैरवीची मूर्ती आहे

या मंदिरापासून थोडं पुढे गेलं की सुरगडवरची सर्वात जास्त तग धरलेली वास्तू म्हणजेच कोठार आहे

कोठाराच्या समोर गोमुखासमोर रचतात त्याप्रमाणे मांडलेली रचना आहे

सुरगड माथ्यावरच्या पहिल्या म्हणजेच कोठार असलेल्या पठारावरून सर्वोच्च माथ्याकडे जाताना वाटेत उजवीकडे हे सिंहासनासदृश अवशेष आहेत

सुरगडच्या सर्वोच्च माथ्यावर खडकात खोडलेली ही अतिशय सुंदर पाण्याची जोडटाकी आहेत. ही टाकी बारमाही नाहीत कारण खालच्या फोटोत दिसतंय त्याप्रमाणे आम्ही सुरगडच्या दुस-या भेटीत जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे भर पावसाळ्यात जाऊनही या टाक्यांमध्ये पाण्याचा मागमूसही नव्हता.

 पण ही कमी भरून काढली आहे ती सुरगडवरील थंडगार पाण्याचा बारमाही स्त्रोत असलेल्या खांबटाक्याने. वर दाखवलेल्या पाण्याच्या टाक्यापासून उजवीकडे खाली थोडयाश्या पाय-या उतरून गेलो की गुहेसदृश असलेल्या ह्या टाक्यात बारमाही पाणी असून आत आधारासाठी खांब आहेत 

 गुहाटाक्याच्या आतील खांब

 गुहाटाक्याच्या शेजारील पाण्याचे शेवाळलेले टाके

गुहाटाक्यापासून वर चढून पुन्हा आपण मुख्य पठारावर आलो की किल्ल्याची सदर आहे.

ह्या सदरेच्या शेजारीच किल्ल्याचा अतिशय भक्कम असा बुरुज दिमाखात उभा आहे.

बुरुजापासून आपण सरळ गेलो की आपल्याला अरबी आणि देवनागरी भाषेतील हा शिलालेख दिसतो. ह्या शिलालेखानुसार सिद्दीसाहेब नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून हा किल्ला बांधला गेला असे नमूद केले असून किल्ल्या बांधणा-याचं नाव सूर्याजी तर किल्ल्याच्या हवालदाराचं म्हणजेच किल्लेदाराचं नाव तुकोजी हैबतराव होतं.  कर्नल प्रॉथरने इंग्रज शिरस्त्याप्रमाणे १८१८ साली हा किल्ला जिंकून घेतला.  किल्ल्याच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात ही भक्कम तटबंदी आहे.

तटबंदीच्या शेवटी बा बुरुज असून ह्याच्या जवळ पाण्याचं एक टाकं आहे. ह्या बुरुजाच्या शेजारून एक दुसरी वाट खाली उतरते जी गडाला पूर्ण वळसा मारून पुन्हा गडाच्या चढाईदरम्यान लागणा-या विस्तीर्ण पठारावर येते. ह्या वाटेने येताना मध्ये एक तोफ आणि अणसाई (हे नाव बहुदा अनुसया असावं) देवीचं मंदिर आहे. ज्यांना गडाच्या वाटेवर लागणारा कातळटप्पा टाळायचा आहे त्यांनी ह्या वाटेने गडावर यायला हरकत नाही पण लक्षात ठेवा ही वाट बरीच लांबची असून वेळखाऊ आणि दाट जंगलातून जात असल्याने काहीशी त्रासदायक सुद्धा आहे.

सुरगडच्या जंगलातील वाटेची एक छोटीशी झलक. पण ही दिसते तेवढी सरळ नाही. खूप लांबून वळसा मारून जात असल्याने आणि वेळखाऊपणामुळे काहीशी तापदायक ठरते.

ह्या वाटेवर लागणारं अणसाई (अनुसूया) देवीचं मंदिर. तोफेचा फोटो मिळू शकला नाही.


तर आता ही पूर्ण झाली गडदर्शनाची कथा. आता Back to आमचा ट्रेक. 

अशोकने हा संपूर्ण किल्ला अगदी व्यवस्थित फिरून दाखवला. गडावर पूर्वी घरीलेवाडी नावाची वस्ती होती. पण रोजगारासाठी त्या वस्तीने आता स्थलांतर केलं असून त्यातील काही कुटुंब ही घेरा सुरगड गावात तर काही रोहा येथे स्थायिक झाली आहेत. परत येउन पाण्याच्या त्या जोडटाक्यांपाशी आलो तेव्हा आभाळ भरून आलं होता. दोन चार मिनिटं सुखावून जाणारा शिडकावा करून पावसाने पुन्हा एकदा माघार घेतली. आमच्या ह्या भेटीत मात्र ऑगस्ट महिना असल्याने ही सर्व टाकी अगदी तुडुंब भरली होती. एक अविस्मरणीय असं वातावरण त्यावेळी सुरगड अनुभवत होता. सौरभने आणलेले पराठे,छुंदा आणि बिर्याणी उघडली आणि अक्षरश: त्यावर आमच्या उडया पडल्या !! जडावल्या देहांनी त्या टाक्याशेजारीच आम्ही आडवे होणार तेवढयात दुपारी दोनची रोहा- पुणे एसटी असल्याची आठवण अशोकला झाली. पण त्याचा आता काहीही उपयोग नव्हता. गडावरच दीड वाजला होता !!!

आता एसटी नाही तर गड उतरून काय करायचं ह्या विचाराने पुन्हा एकदा मंडळींनी गडावरच्या लुसलुशीत गवतात लोळण घेतली. पण आमचा हा डाव पावसाने यथार्थ हाणून पाडला आणि अडीच वाजता गड सोडावाच लागला. अशोकच्या घरी पोहोचलो तेव्हा साडेतीन वाजले होते. त्याच्या गृहलक्ष्मीने कौतुकाने दिलेला गरमागरम कोरा गवती चहा घशाखाली उतरला तेव्हा स्वर्गसुख काय असतं ह्याची जाणीव पुन्हा एकदा नव्याने झाली. परतीच्या वाटेवरची घेरा सुरगड ते खांब ही चार किलोमीटर्सची कंटाळवाणी तंगडतोड जेव्हा पुन्हा एकदा सुरु झाली तेव्हा जडावल्या पावलांनाही आता सूर सापडला होता !!!

Comments

 1. Blog Ekdam chhan lihila ahes... Mukhya mhnaje sarva avasheshanche photographs dilya mule killyawar kadhi na gelelya manasala hi te gelya war shodun baghata yetil, he changle ahe. Hya madhe maruti baddal 2-3 goshti hotya.. Marutichya payakhali "pavavati" (waiit shakti stree rupat ) asate, rakshas nasato...Tasech tyachya hya mudrela chapetdar mudra mhnatat. Durdaivane hya murtiche samvardhan kele ase mhanwat nahi. Rang na dilelya kalya pashanatil murtila kuthla hi rang dene he tyache "vidrupikaran" ahe. Durgveer should not do such things in future. The temple shown in the images is not "hemadpanti" but should be called " shushkasaandhi" ( dry masonry) type of structure. He mandir yadav kalin mandir nahi, tya nantarchya madhya yugatle mandir ahe. Baki sarva ekdam chhan... Ansaai devi chya murticha javalun photo pahayala awadel !

  ReplyDelete
 2. < नाही राव. त्यातलं झाड काही कळत नाही आपल्याला!!!>… हे वाक्य अगदीच जमलेलंय … एक नंबर… कडक…
  "आगाशे" चा फ़ुल्ल फॉर्म… Well in that Case… अजून तरी तशी लोकांनी आमच्यावर वेळ आणून दिली नाहीये… :) :D
  दामले चा आगाशे झाला असला… निदान… बहुतेक सौरभ चं आडनाव तरी आगाशे नसावं… :) :D
  हि ब्लॉगपोस्ट वाचल्यावर संपूर्ण गडाला व्हरच्युअल फेरफटका मारल्याचा फील आला… जबरी लेख…
  "साईली" ने सांगितल्याप्रमाणे… त्याच्यात काही ऐतिहासिक लेखनिक बदल करून टाक…
  एकंदरीत नेहमीप्रमाणेचं जबरी लेखन आणि झकास फोटोज… आवडलाय…
  सुरगड आणि आजूबाजूचा परिसर बघताना ह्या ब्लॉगपोस्ट ची प्रिंटआऊट नक्क्की घेऊन जाणार…
  लगे रहो…

  ReplyDelete
 3. Onkar, wonderful blog (as usual) on Soorgad along with beautiful snaps! :) Only one rectification requested regarding that scripture - the script is Arabi and its language is Farsi! :D

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड