"श्रीमंत" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग १ : : नियोजन आणि प्रस्थान


महाराष्ट्रात अजस्त्ररित्या पसरलेल्या सह्याद्रीच्या अभेद्य डोंगररांगांना कोंदण लाभलंय ते अप्रतिम अशा गिरीदुर्गांचं !! सह्याद्रीतला कोणताही किल्ला हा दुस-या किल्ल्यासारखा नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या सगळ्याच किल्ल्यांनी आपलं स्वत:चं एक खास असं वैशिष्टय जपलं आहे. कोणाचा कोकणकडा रौद्रभीषण तर कोणाचा बालेकिल्ला प्रेक्षणीय कोणाचा विंचूकाटा सुप्रसिद्ध तर कोणाचं परशुराम शिखर अस्मानाला भिडलेलं !!! महाराष्ट्रातल्या काही किल्ल्यांची दुरवस्था मात्र मन विषण्ण करणारी !! पण वाळवंटात अचानक पाण्याचा साठा सापडावा किंवा भाजून काढणा-या वैशाखवणव्यात थंड वा-याचा झोत सुखावून जावा तसं काहीसं आमच्या बाबतीत झालं. पडझड झालेल्या किल्ल्यांची दुरवस्था बघून हेलावून गेलेल्या मनांना दिलासा दिला तो औरंगाबाद जिल्ह्याने आणि सह्याद्रीच्या लाखमोलाच्या पाच गिरीदुर्गांचा खजिनाच आम्हाला अलगद सापडला !!! 
२०१४ सालाने आत्तापर्यंत आपल्याला काय दिलं तर काही जोडून येणा-या सुट्टया आणि त्यांचीच परिणती म्हणून शिजणारे दुर्गभ्रमंतीचे प्लॅन्स !! ऑगस्ट महिना म्हणजे आपल्यासाठी जणू काही वरदानच ठरला आणि दिनांक १४ ते १८ ऑगस्ट जोडून सुट्टया आल्या. घरी बसून थंडावलेल्या पावलांना उर्मी आली आणि त्याच्या आदल्या आठवड्यापासूनच फेसबुक स्टेटस वर प्रत्येकाच्या भटकंतीचे प्लॅन्स नजरेस पडू लागले. सालाबादप्रमाणे मायबोलीच्या अस्सल दुर्गभटक्यांचा "सह्यमेळावा" म्हणजेच गेट टूगेदर सातमाळा रांगेच्या सम्राटावर म्हणजेच धोडप किल्ल्यावर पार पाडायचं ठरलं. सुमारे दीड महिना नियोजनात आणि प्रचंड चर्चेत गेला आणि अखेरीस काही अपरिहार्य कारणांमुळे आमचा बहुचर्चित सह्यमेळावा सप्टेंबरवर ढकलला गेला !!! थोडाफार हिरमोड झालाच होता. पण कधी नव्हे ते जोडून आलेल्या सुट्ट्यांची महासुवर्णसंधी चुकवणं म्हणजे महत्पापच होतं !!!  शेवटी अस्मादिकांचा फोन नाशिकच्या आमच्या खास मित्राला आणि हाडाचा भटक्या असणा-या हेमंत पोखरणकरला गेला आणि काही मिनिटांत औरंगाबाद जिल्ह्यातल्या चाळीसगाव जवळच्या पाच किल्ल्यांवर शिक्कामोर्तब झालं !! आमच्या ट्रेकमध्ये खालील किल्ले समाविष्ट होते.

१. अंतुर
२. सुतोंडा
३. वैशागड
४. वेताळवाडी
५. लोंझा किल्ला

हेमंतबरोबरच आमच्या मंडळात सहा लोक अजून जमा झाले आणि अखेरीस आम्ही या अविस्मरणीय दुर्गदर्शनासाठी रेड्डी झालो. पुढच्या भागाला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या भटक्या जमातीची ओळख करून घेऊ.

१.  हेमंत पोखरणकर : नाशिकवासी असलेला आणि नाशिक जिल्हा कोळून प्यायलेला हार्डकोअर ट्रेकर. नाशिकच्या वैनतेयच्या आणि मुंबईच्या चक्रम हायकर्सचा कॉमन खेळाडू. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व. सायकलिंगमध्येसुद्धा प्राविण्य मिळवलेला आणि उत्तम फिटनेस असलेला भटक्या. वर दिलेल्या किल्ल्यांपैकी लोंझा किल्ला शोधून काढण्याचं श्रेय हेमंतला आणि आमचा अजून एक खास मित्र आणि चक्रमचाच सदस्य असलेल्या राजन महाजनला जातं.

२. संजय अमृतकर उर्फ नाना : नाशिक जिल्ह्याचा चालताबोलता Encyclopedia !!! नाशिक परिसरातील किल्ल्यांवर आणि डोंगरांवर लिहिलेल्या जबरदस्त पुस्तकामुळे केवळ नाशिकमध्येच नाही तर उभ्या महाराष्ट्रातल्या ट्रेकर्स जमातीमध्ये प्रसिद्ध झालेलं एक दिलखुलास व्यक्तिमत्व. सह्याद्रीवर निस्सीम प्रेम असलेला आणि त्याचं रौद्रभीषण सौंदर्य आपल्या कॅमे-यात अप्रतिमरित्या टिपणारा एक अवलिया.

३. सूरज बोरकर  :  पहिली ते चौथी माझ्याच वर्गात असलेला एक अतिशय साधा सरळ आणि सज्जन पोरगा. सध्या सीए करतोय.  अतिशय शांत आणि समजूतदार व्यक्तिमत्व.

४. हृषीकेश वाकदकर : नाशिकस्थित आयटी इंजिनियर. सूरजचा भाऊ. मी ह्याला पहिल्यांदाच भेटलो.

५. पुनीत संकलेचा  : नाशिक स्थित गिर्यारोहक. हाही मला ह्या ट्रेकदरम्यान पहिल्यांदाच भेटला.

६. जालिंदर काका उर्फ सारथी  : आमच्या टाटा सुमोचे डायवर आणि फुल टाईमपास माणूस. ह्यांनीही २-३ किल्ले आमच्याबरोबर पालथे घातले. आमच्या दोन दिवसाच्या ट्रेकमध्ये ह्यांनी अनेक भन्नाट किस्से केले. ते प्रसंगानुरूप पुढे येतीलच.

१५ ऑगस्टला सकाळी निघून १६ ला परत यायचा प्लॅन ठरला. १७ ऑगस्टलां रविवार असूनही हेमंतला कामावर जाणं गरजेचं असल्याने मूळचा ३ दिवसांचा कार्यक्रम दोन दिवसांवर आणण्यात आला आणि पाचच किल्ले आखले गेले. मी आणि सूरजने १४ ऑगस्टला रात्री पुण्याहून निघून पहाटेपर्यंत नाशिकला पोहोचायचं आणि तिथून पुढे प्रवास सुरु करायचा असं ठरलं. आमचा पिल्यान पुढीलप्रमाणे होता.

दिवस पहिला

१. नाशिक - मालेगाव - चाळीसगाव - नागद - सायगव्हाण - औट्रम घाट चढूननागापूर - खोलापूर - अंतुर किल्ला

२. खोलापूर - नागापूर - औट्रम घाट उतरून सायगव्हाण - नागद - महादेव टाका फाटा - लोंझा किल्ला - बेलखेडा - बनोटी गावात मुक्काम

दिवस दुसरा

३. बनोटी - नायगाव - सुतोंडा किल्ला

४. नायगाव - बनोटी - सोयगाव (बनोटी ते सोयगाव अतिशय सुमार आणि अत्यंत भंगार अवस्थेतील रस्ता) - वेताळवाडी गाव - हळदा घाट चढून घाटाच्या माथ्यावर असलेला वेताळवाडी किल्ला

५. उरलेला हळदा घाट पूर्ण करून हळदा गाव - उंडणगाव - अंभई - जंजाळे (जंजाळा) - वैशागड उर्फ विसागड उर्फ जंजाळयाचा किल्ला

परतीचा प्रवास

जंजाळा - अंभई - भराडी - सिल्लोड - खुल्ताबाद - वेरूळ - वैजापूर - येवला - नाशिक.

परतीच्या प्रवासाचा मार्ग आम्ही सोयगाव - बनोटी रस्त्याच्या अनुभवावरून ठरवला होता. हा लांबचा मार्ग होता. पण सुमार रस्ते आणि आधीच खिळखिळया झालेल्या हाडांना विश्रांती म्हणून ह्या रस्त्याने येण्याचा निर्णय घेतला गेला.

मुंबईकर गिर्यारोहकांसाठी वर दिलेला प्लॅनच योग्य असून पहिल्या दिवशी अंतुर किल्ल्यासाठी त्यांना नाशिकहून चाळीसगाव - नागद - सायगव्हाण - नागापूर - अंतुर ह्या रस्त्याशिवाय नाशिक - येवला - औरंगाबाद - कन्नड - गौताळा अभयारण्य - नागापूर - खोलापूर - अंतुर हा ब-यापैकी चांगल्या अवस्थेतील रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. गौताळा अभयारण्यात घेऊन जाणा-या औट्रम घाटाच्या माथ्यावर नाशिक - मालेगाव - चाळीसगाव - नागद - सायगव्हाण - नागापूर रस्ता हा मार्ग आणि औरंगाबाद - कन्नड - गौताळा अभयारण्य मार्गे नागापूर रस्ता हे दोन्ही मार्ग एकत्र येतात आणि दोन्ही मिळून नागापूरला जातात. त्यामुळे आपल्या सोयीनुसार मार्ग ठरवावा.

पुण्यातील गिर्यारोहकांना पुढील प्लॅन योग्य आहे. 

१. पुणे - नगर - औरंगाबाद - कन्नड - गौताळा अभयारण्य - नागापूर - खोलापूर - अंतुर किल्ला

२. खोलापूर - नागापूर - औट्रम घाट उतरून सायगव्हाण - नागद - महादेव टाका फाटा - लोंझा किल्ला - बेलखेडा - बनोटी गावात मुक्काम

दिवस दुसरा

३. बनोटी - नायगाव - सुतोंडा किल्ला

४. नायगाव - बनोटी - सोयगाव (बनोटी ते सोयगाव अतिशय सुमार आणि अत्यंत भंगार अवस्थेतील रस्ता) - वेताळवाडी गाव - हळदा घाट चढून घाटाच्या माथ्यावर असलेला वेताळवाडी किल्ला

५. उरलेला हळदा घाट पूर्ण करून हळदा गाव - उंडणगाव - अंभई - जंजाळे (जंजाळा) - वैशागड उर्फ विसागड उर्फ जंजाळयाचा किल्ला

परतीचा प्रवास

जंजाळा - अंभई - भराडी - सिल्लोड - औरंगाबाद - पुणे 

ह्या कार्यक्रमाप्रमाणे पुणेकरांना औरंगाबाद ते औरंगाबाद असा प्लॅन योग्य आहे. अंतुर ते वैशागड असा वर दिलेला जो क्रम आहे तो उलटया दिशेने फिरवून पुणे - नगर - औरंगाबाद - सिल्लोड - भराडी - अंभई - जंजाळा - वैशागड अशी सुरुवात करून अंतुरवर ट्रेकचा शेवट करून कन्नड - औरंगाबादमार्गे पुणे गाठता येईल. ह्यामध्ये बनोटी ते सोयगाव ह्या विलक्षण टुकार अवस्थेतील रस्त्याला पर्याय म्हणून पाचोरा - शेंदुर्ली मार्गे एक चांगला रस्ता उपलब्ध आहे. तो थोडा लांबचा असला तरी ब-यापैकी सुस्थितीत असल्याने नक्कीच परवडतो. त्यामुळे आपापल्या वेळेच्या आणि किलोमीटर्सच्या गणितानुसार निर्णय घ्यावा. 

ह्या ट्रेकची ओव्हरऑल वैशिष्टय 

१. तुम्ही विचारही करू शकणार नाही इतके सुंदर आणि सुस्थितीतील किल्ले. अंतुर आणि वेताळवाडीच्या किल्ल्यावर तर आपण नक्की महाराष्ट्रातला किल्ला बघतोय का राजस्थानातला असा प्रश्न पडावा इतक्या प्रचंड  प्रमाणात आणि खणखणीत अवस्थेतील अवशेष आहेत. 

२. सुतोंडा सोडल्यास सर्व किल्ल्यांवरून दिसणारे कमालीचे सुंदर नजारे 

३. भंगार / सुमार / थर्डक्लास / बकवास / अतिवाईट / फालतू इत्यादी सर्व विशेषणांमध्ये चपखल बसणारे रस्ते. घरी आल्यावर हाडाच्या डॉक्टरकडून तपासणी नक्की करून घ्या. 

४. अतिशय गलिच्छ गावे. हागणदारीमुक्त गाव वगैरे योजनांचा ह्या गावांना पत्ताच नसावा. 

५. जेवण व राहण्याची कुठेही उल्लेखनीय सोय नाही. ह्यातल्या कोणत्याही किल्ल्याच्या पायथ्याला "ही जागा राहण्यासाठी चांगली आहे" असा विचार कधीच येत नाही. अर्थात ही गोष्ट प्रत्येकाच्या मतावर अवलंबून आहे की कोणाला कोणती जागा पसंत होईल. पण साधारणपणे कुठेही योग्य सोय नाही. 

६. सोयगाव सोडल्यास कुठेही जेवणासाठी स्वच्छ हॉटेल नाही. चहाच्या टप-या जवळपास सगळीकडे आहेत पण तिथल्या वडापाव वगैरे गोष्टींना चवीपेक्षा धुळीचाच सहवास जास्त आहे. त्यामुळे "आम्ही काहीही खाऊ शकतो. आमची खायची प्यायची कसलीही नाटकं नसतात" असल्या फालतू ओव्हरकॉन्फीडन्सखाली आणि उगाचच आपण किती भारी आहोत हे दाखवून दुस-यांना इंप्रेस करण्याच्या फंदात ट्रेकच्या दरम्यान स्वत:ची तब्येत धुळीस मिळवायची असेल तर कोणत्याही गावात जरूर खा. सुज्ञ गिर्यारोहकांनी मात्र आपल्याबरोबर खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था ठेवावी. अगदी स्वयंपाकाचं सामान न्यायला जमलं नाही तर वेळ मारून नेण्यासाठी कोरडे पदार्थ कंपल्सरी बरोबर ठेवा. आम्ही ह्या ट्रेकच्या दरम्यान हा नियम कटाक्षाने पाळला होता.

७. सुतोंडा सोडल्यास कोणत्याही किल्ल्याला वाट दाखवण्यासाठी तरी वाटाड्याची गरज नाही. पण घेतल्यास नक्की फायदा होतो कारण अनेक लपलेले अवशेष हे स्थानिक लोकांना व्यवस्थित माहित असतात आणि ते संपूर्ण किल्ला व्यवस्थित फिरून दाखवतात. आम्हाला अंतुर आणि वेताळवाडी दरम्यान गडावर भेटलेल्या आणि आम्हाला किल्ला फिरवण्याची स्वत:हून तयारी दाखवलेल्या स्थानिक लोकांचा प्रचंड फायदा झाला.

८. ह्यातील प्रत्येक व्यवस्थित किल्ला बघायला किमान दोन ते तीन तास नक्की लागतात. प्रचंड अवशेषांनी समृद्ध असलेल्या ह्या किल्ल्ल्यांमधील अनेक अवशेष प्रेक्षणीय आहेत. त्यामुळे दोन दिवसात दहा किल्ले वगैरे "मॅरेथॉन" ट्रेकचा वायफळ अट्टाहास करण्यापेक्षा घरी बसा !!!

९. कोणत्याही किल्ल्यावर निवा-याची विशेष सोय नाही. जवळपास सर्व किल्ल्यांमधील पाणी मचूळ आहे. त्यामुळे पाणी स्वच्छ करणारं लिक्विड किंवा तुरटीची गोळी नक्की बरोबर ठेवा कारण पाण्यावर सुद्धा ट्रेकच्या दरम्यानची तब्येत अतिशय मोठया प्रमाणावर अवलंबून असते. 

१०. ह्या परिसरातील सर्व गावांतील पाणी हे बोअरचे आणि पचायला जड असल्याने वर म्हणल्याप्रमाणे पाणी स्व्च्छ करणारं लिक्विड बरोबर ठेवा किंवा सरळ जमेल तिथे मिनरल वॉटर  विकत घ्या. कारण आपल्यासारख्या शहरी लोकांना इतक्या जड पाण्याची सवय नसल्याने एका मर्यादेनंतर पोटदुखी वगैरे त्रास सुरु होतात. त्यामुळे ह्या बाबतीत कोणतीही जोखीम पत्करू नका.

अखेर निघायचा दिवस उजाडला. १४ ऑगस्टच्या सकाळी मी शिवाजीनगर एसटी स्थानकावर नाशिकच्या गाडीची चौकशी केली तेव्हा आतल्या माणसाने मान वरसुद्धा न करता "रात्री १२.३० पर्यंतच्या सगळ्या गाडया फुल आहेत" असं उत्तर देऊन बोलतीच बंद केली. संपूर्ण वीकेंड जोडून आलेला. बाहेरगावी जाणा-यांची भाऊगर्दी उसळली होती. आता काहीच पर्याय उरला नव्हता. पुणे - नाशिक हायवेसारख्या अपघातांसाठी कुप्रसिद्ध रस्त्याने रात्री बाईकवर प्रवास करण्याची माझी चुकूनही तयारी आणि इच्छा नव्हती. शेवटी नाईलाजाने खासगी बसचा आधार घ्यावा लागला आणि शेवटी एकदाचं माझं आणि सूरजचं बुकिंग झालं. रात्री गाडीमध्ये बसल्यावर आमच्या दोघांच्याही असं लक्षात आलं की त्या बसच्या कंपनीने अगदीच लाज जाऊ नये म्हणून गाडीत सीट लावल्या होत्या. कारण २ X ३ आसनव्यवस्था असलेल्या त्या बसमध्ये जिथे दोघांसाठीची सीट होती तिथे एक माणूसच कसाबसा बसत होता आणि ३ माणसांची क्षमता असलेल्या सीटवर दोन माणसांचीच जागा होती. शेवटी आलिया भोगासी म्हणत स्वत:लाच दूषणं दिली.पण नाशिकपर्यंत पोहोचण्याची काहीतरी सोय झाल्याने दोघंही सुखावलो होतो. गाडीचा ड्रायव्हर कमालीचा स्लो होता. कारण आम्ही पहाटे ४. ३० ला नाशिकला पोहोचणं अपेक्षित होतं त्याऐवजी आम्हाला पोहोचायला ६ वाजले. ट्रेकचं  संपूर्ण प्लॅनिंग आणि सगळा ट्रेक व्यवस्थित पार पडायची जबाबदारी नानांनी माझ्यावर आणि हेमंतवर दिलेली होती. त्यामुळे आमच्या मूळ प्लॅनप्रमाणे आम्ही जे ४ वाजता निघणं अपेक्षित होतं त्यासाठी ह्या कूर्मगतीच्या प्रवासामुळे ६ वाजले. पण पहिल्या दिवशीचे अंतुर आणि लोंझा हे दोन्ही किल्ले चढाईसाठी अतिशय सोपे असल्याने तशी विशेष काळजी नव्हती. वडाळेभोई गावापासून पुढे आलो तेव्हा सातमाळा रांग धुक्यात लपली होती. पण कोळदेहेर आणि राजदेहेरवर मात्र सकाळची सोनेरी किरणं पसरली होती. मुंबई - आग्रा हायवेने मालेगावच्या दिशेला आता आमचा प्रवास सुरु झाला होता !!!  Comments

  1. वा ओंकार मस्त ... संजय अमृतकर आणि हेमंत सारख्या दिग्गज लोकांबरोबर इतके सुंदर किल्ले करता आले बस और क्या चाहिये एक ट्रेकर को ... हे सगळेच किल्ले पहायचे आहेत ... बरेच डीटेल्स दिले आहेसच त्यामुळे नक्कीच फायदा होईल ... बाकी पुढच्या भागाची वाट पाहतोय ... येउद्या लवकर

    ReplyDelete
  2. खणखणीत आणि सुस्पष्ट शब्दात वर्णन केलयस ओंकार.. अतिहुशार आणि मी म्हणजे देव आहे अस म्हणणाऱ्या लोकांच्या श्रीमुखात बसली असेल तुझा हा लेख वाचून ..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड