"श्रीमंत" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग २ : : अंतुर आणि लोंझा


"श्रीमंत" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग १ : : नियोजन आणि प्रस्थान  
 इथून पुढे चालू…. 

नियोजित पिल्यान परमाने आज आम्हाला ट्रेकचा पहिला टप्पा म्हणजे चाळीसगाव गाठायचं होतं. हा मार्ग नाशिक - मालेगाव मार्गे चाळीसगाव असा आहे. मुंबई - आग्रा हायवेवर लोण्याच्या गोळ्यावरून गाडी चालत असल्याचा भास होत होता. चांदवड गावाच्या बाहेर हायवेलाच हॉटेल भैरवनाथ मध्ये खुमासदार मिसळ,रस्सावडा,कांदाभजी आणि गरमागरम चहा हाणला तेव्हा कुठे आत्मा थंड झाला !!! इंद्राई किल्ल्याजवळच्या वडबारे गावाच्या फाट्यानंतर मुंबई - आग्रा हायवे उताराला लागला आणि त्यानंतर गाडीने उजवीकडे चाळीसगावच्या दिशेने मोर्चा वळवला आणि इथेच लोण्याचा गोळा हा भाजलेल्या पापडात बदलला !!! आपण इतका वेळ राष्ट्रीय महामार्गावरून जात होतो ही सुखावणारी जाणीव आता कंबरदुखीमध्ये परिवर्तित होत होती. राष्ट्रीय महामार्ग ते राज्य महामार्ग (???) हा प्रवास विलक्षण तापदायक होता. चाळीसगाव वरून आम्ही अंतुर किल्ल्याच्या जवळ असलेल्या त्यातल्या त्यात मोठया म्हणजे नागद गावाकडे निघालो. आज १५ ऑगस्ट. स्वातंत्र्यदिनाची तयारी अतिशय उत्साहात सगळीकडे सुरु होती. छोटया छोटया गावात वाजणारी स्वातंत्र्यगीते…मस्तपैकी आवरून शाळेत निघालेली लहान लहान मुलं…शाळांची सुरु असलेली सजावट ह्या सगळ्या गोष्टींनी वातावरण भारून टाकलं होतं !!! नागद - सायगव्हाण - औट्रम घाट चढून गौताळा अभयारण्य - नागापूर - खोलापूर व सरतेशेवटी अंतुर असा हा प्रवास आहे. नागद ते अंतुर किल्ला हे अंतर अंदाजे तीस किलोमीटर्स आहे. नागद सायगव्हाण रस्त्यावरून डावीकडे अंतुरचं सुरेख दर्शन झालं. इतक्या लांबूनही त्याचे बुरुज आणि काही अवशेष स्पष्ट दिसत होते. अंतुरच्या डोंगररांगेच्याच खालच्या बाजूला अगदी छोटासा लोंझा किल्लासुद्धा लक्ष वेधून गेला. ऑगस्ट महिना. पावसाने जवळपास दोन आठवडे दडी मारलेली असल्याने हिरव्यागार वातावरणात मोहवून टाकणारा गारवा होता आणि त्या हिरवळीने संपूर्ण प्रदेश खूपच सुंदर दिसत होता. सायगव्हाण नंतर गौताळा अभयारण्यात घेऊन जाणा-या औट्रम घाटाला एकूण २८ वळणं (टर्न्स) आहेत अशी माहिती मिळाली. आता अभयारण्यातूनच रस्ता काढलेला असल्यामुळे आजूबाजूला एखादा प्राणी पक्षी तर सोडाच पण साधी चिमणी सुद्धा दिसली नाही. कारण स्थानिकांना अभयारण्य म्हणजे काय ह्याचं मुळातच गांभीर्य नसल्याने जोरजोरात हॉर्न वाजवण्याबरोबरच कान बधिर होतील इतक्या मोठया आवाजात "ही पोली साजूक तुपातली" "बघतोय रिक्षावाला" वाजत होतं. हे सगळं सहन करून घाटमाथ्यावर पोहोचलो आणि इथे एक चौक लागला. ह्या चौकात वनखात्याची चौकी असून इथून डावीकडे जाणारा (भंगार) रस्ता नागापूर म्हणजेच अंतुर किल्ल्याकडे तर उजवीकडे जाणारा रस्ता कन्नडमार्गे औरंगाबादला जातो.


विस्तीर्ण,निसर्गरम्य आणि अवशेषसंपन्न अंतुर !!!

नागापूर - खोलापूर रस्त्यावरच अंतुर फाट्याच्या सुरुवातीलाच वनखात्याने ही दिशादर्शक पाटी लावली आहे. 

तत्पूर्वी नागद - सायगव्हाण रस्त्यावरून झालेलं अंतुरचं रूप सुखावणारं होतं. अंतुरचं वैशिष्टय म्हणजे नागापूर - खोलापूर रस्त्याने गेल्यास हा गड भुईकोट प्रकारात मोडतो. कारण त्या बाजूने अंतुरसाठी अजिबात चढाई करावी लागत नाही तर नागद - बेलखेडा - गोपेवाडी या मार्गाने गेल्यास तब्बल अडीच तासांची तंगडतोड अंतुर सर करण्याकरता करावी लागते.  ह्या फोटोत दिसणा-या डावीकडच्या धारेवरून गडावर पायवाट आहे. 


अंतुरच्या पाटीपासून आपण डावीकडे आत वळालो की सहा किलोमीटर्सचा हा कच्चा रस्ता सुरु होतो. ह्याच रस्त्यावर छोटंसं खोलापूर गाव आहे. ऐन पावसाळा सोडल्यास ह्या रस्त्यावरून सुमो सारखं वाहन जाऊ शकेल. काही ठिकाणी रस्ता अरुंद होत असल्याने मिनीबस न्यायला प्रॉब्लेम होऊ शकतो.

अंतुरकडे जाताना वाटेत उजवीकडे हा दगडी स्तंभ लागतो. ह्याच्या चारही बाजूंना अंतुर किल्ल्याच्या चारही बाजूस असणा-या महत्वाच्या गावांची नाव त्यांच्या त्यांच्या दिशांप्रमाणे फार्सी भाषेत लिहिलेली आहेत. इथून पुढे गेल्यावर एक मारुतीची मूर्ती आहे. त्याचा फोटो घेता आला नाही. 


ह्या रस्त्यावरचं शेवटचं वळण ओलांडलं आणि अथांग सागरातून जहाज वर यावं तसा अंतुरचा भव्य किल्ला समोर आला !!! घनदाट हिरव्यागार जंगलाने आच्छादलेला त्याचा तो डोंगर म्हणजे डोळ्यांसाठी प्रचंड मोठी पर्वणीच होती. गाडीतल्या सर्वांचेच डोळे हे दृश्य पाहून विस्फारले गेले आणि "क्या बात है !!!" हे उद्गार निघायला वेळ लागला नाही !!!
 वनखात्याने ह्या जागेवर म्हणजे अंतुर जिथून पहिल्यांदा दिसतो तिथे एक सुंदर "व्यू पॉइंट" उभारलेला असून तिथे एक सिमेंटचा "पॅगोडा" उभारलेला आहे. त्या ठिकाणी उभं राहून अंतुरचं हे देखणं रूप बघण्यासारखं दुसरं सुख नाही !!!


 अंतुर क्लोजअप 

गाडीरस्ता संपून जिथे अंतुरची पायवाट सुरु होते तिथेच वनखात्याने हा दुसरा "पॅगोडा" उभारला आहे. जेवणासाठी आणि प्रसंगी मुक्कामासाठी कमालीची सुंदर जागा !!!


अंतुरचा दुरूनही सहज लक्ष वेधणारा भक्कम बुरुज


वनखात्याने अंतुरची वाट ह्याप्रमाणे बनवली आहे. इतकी सुविधा उपलब्ध करून दिल्याने अंतुरचा किल्ला हा किल्ला राहिला नसून आजूबाजूच्या प्रदेशासाठी पिकनिक स्पॉट झाला आहे. इथून साधारणपणे वीस मिनिटं सपाटीने चालल्यावर अंतुरच्या अवशेषांना सुरुवात होते.

अंतुरचं मुख्य प्रवेशद्वार येण्याआधी डावीकडे ही मोठी देवडी म्हणजेच पहारेक-यांच्या निवासाची खोली आहे 


देवडीपासून आम्ही पुढे गेलो आणि अंतुरच्या ह्या भव्य प्रवेशद्वाराच्या दर्शनाने आम्हाला जागीच खिळवून ठेवलं. आजही भक्कम स्थितीत असलेल्या ह्या प्रवेशद्वाराला तीन कमानी असून वरच्या बाजूला शरभ शिल्प ठेवलेली आहेत. त्यातील डावीकडील शिल्प गायब झाले असून आणि उजव्या चौकटीतील शिल्प तुटले आहे .दरवाजाच्या वर असलेल्या संरक्षक कमानींना "चर्या" म्हणतात आणि त्यांच्यात बंदुका रोखण्यासाठी ज्या मारगिरीच्या जागा आहेत त्यांना "जंग्या" असं म्हटलं जातं. 


पहिल्या दरवाजातून डावीकडे वळालो की अंतुरचा दुसरा भक्कम दरवाजा समोर येतो.


दरवाजातून पुढे आल्यावर मागे वळून पाहिल्यास त्याच्या कमानीवर दोन कमलपुष्पे कोरलेली दिसतात तर दरवाजाच्या चारही बाजूस तोफगोळे लावलेले आहेत.


त्या दरवाजातच हा कोरीव दगड पडलेला दिसला

ह्याच दरवाजात डावीकडे हा झरोका ठेवला आहे. पहिल्या दरवाजातून दुस-या दरवाजाकडे येणारा मार्ग हा ह्याच झरोक्याच्या खालून येत असल्याने शत्रूवर गरम तेल ओतण्यासाठी ह्या झरोक्याचा वापर केला जायचा असा तज्ञांचं मत आहे.


दुस-या दरवाजातून पुढे आलो की समोरच आपल्याला अतिशय सध्या पद्धतीने बांधलेला तिसरा आणि शेवटचा दरवाजा दिसतो. ह्याच्या डोक्यावर फार्सी भाषेत कोरलेला शिलालेख अगदी स्पष्ट दिसतोय.


दरवाजाच्या वरील फार्सी शिलालेख


दरवाजातून आतमध्ये आल्यावर पुन्हा एकदा पहारेक-यांसाठी असलेली प्रशस्त देवडी आहे. ट्रेकर्सना मुक्कामासाठी अंतुर किल्ल्यावर ही सुंदर जागा उपलब्ध असून फोटोत दिसत असल्याप्रमाणे वनखात्याने ही देवडी स्वछ ठेवली आहे.


या देवडीपासून दोन पायवाटा फुटतात. ह्यातील उजवीकडच्या पायवाटेने चालायला सुरुवात केल्यावर ही पायवाट आपल्याला गडाला चारही बाजूने भक्कम संरक्षण देणा-या तटबंदीच्या कडेने घेऊन जाते. ह्याच तटबंदीतील एक बुरुज.

बुरुजापासून पुढे आलो की आपण गडावरच्या भक्कम अशा कोठारांपाशी येउन पोहोचतो. पण ह्यांच्या आत वटवाघळांची प्रचंड मोठी वस्ती असल्याने आत अजिबातच जाता येत नाही.

कोठारांपासून आम्ही पुढे आलो आणि अंतुरवरच्या अप्रतिम अशा बांधीव तलावाच्या दर्शनाने खरोखरच स्तिमित झालो. 


 तलावाच्या काठावरच हे दगडी पात्र ठेवलेलं आहे. 


तलावापासून दिसणारी भक्कम अवस्थेतील कोठारे

या कोठारांच्या माथ्यावर चढून जाण्यासाठी पाय-या आहेत. वरून   अजिंठा - सातमाळा रांगेचं अवर्णनीय असं दर्शन घडत होतं. कितीतरी वेळ आम्ही ते डोळ्यात साठवत होतो.

बाकीचे या ठिकाणी थांबलेले असताना मी एकटाच खाली उतरून आलो आणि खोलापूर गावच्या एका गुराख्याने माझं लक्ष वेधलं. पंचविशीतला तरुण अस्खलित मराठीत कोणाशीतरी फोनवर बोलत होता. त्याचं बोलून झाल्यावर मी त्याला हाक मारली.

"रामराम. कुठून आलात ??"
"हे काय. खोलापूरचे. "
"अच्छा. नाव काय तुझं??"
"शेख लतीफ. मुसलमान आहे मी"
"मग ?? त्याने काय फरक पडतो ??" त्याला मी विचारलं
"तसं नाही. तुम्ही शहराकडची लोकं. मी गावातला मुसलमान आहे म्हणल्यावर माझ्याशी बोलाल का नाही ते माहित नव्हतं !!!"
त्याचं उत्तर विचार करायला भाग पाडणारं होतं. म्हणजे ह्या आधीसुद्धा केवळ धर्मावरून त्याची मदत नाकारल्याचा कटू अनुभव त्याला आला होता !!

"एक काम कर. आम्ही इथे पहिल्यांदाच आलोय. आता तूच आम्हाला सगळा किल्ला दाखव !!!"

क्षणार्धात त्याच्या चेहे-यावरचे भाव बदलले !! कदाचित हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. आमचा हा संवाद सुरु असताना बाकीच्यांनी तटबंदीच्या कडेने गड भटकायला सुरुवात केली होती तर मी एकटाच लतीफशी जास्त वेळ बोलता यावं म्हणून तो दाखवेल तसा किल्ला बघत होतो. हळूहळू त्याने आपल्याकडच्या माहितीचा खजिना उघडायला सुरुवात केली.
"हा जो तलाव दिसतोय ना…तिथे गावात कोणाला जेवण बनवायचं असेल तर ते लोक हव्या असलेल्या भांड्यांची नावं एका कागदावर लिहून तो कागद ह्या तलावात सोडायचे आणि काही मिनिटात त्यांनी कागदावर लिहिलेली भांडी तलावातून वर यायची.त्याच्यात जेवण बनवलं जायचं नंतर नंतर लोकांनी ती वर येणारी भांडी चोरून न्यायला सुरुवात केली. तेव्हापासून अशी भांडी तलावातून वर येणं बंद झालं !!"

स्थानिक लोकांशी संवाद साधण्याचा हा एक मोठा फायदा असतो. बाकी काही मदत मिळो अथवा न मिळो… निखळ मनोरंजन करणा-या अशा दंतकथा मात्र निश्चितच ऐकायला मिळतात. पण एक गोष्ट मात्र इथे कटाक्षाने पाळावी. ती म्हणजे ते सांगत असेलेली माहिती कितीही का अविश्वसनीय,पुरावा नसलेली किंवा अशक्य कोटीतली असू दे…त्यांना ती मुक्तपणे सांगू द्यावी. किल्ल्यांचा ऐतिहासिक पुराव्यांद्वारे अभ्यास करणा-यांपैकी ते नसतात. उलट आपण त्यांचे पाहुणे म्हणून उत्साहाने ते आपल्याला त्यांना माहित असलेल्या गोष्टी सांगत असतात. त्यामुळे मध्येच "ह्या… काहीही काय सांगताय… हे साफ खोटं आहे." वगैरे बोलून त्यांचा हिरमोड करू नये. उलट तुम्हाला योग्य माहिती असेल तर ती त्यांना पटेल अशा भाषेत प्रेमाने समजावून सांगावी म्हणजे सुसंवाद व्यवस्थित साधता येतो.

तलावापासून थोडं वर चढलं की ही अजून दोन कोठारं दिसतात. ज्यांच्या आत जाण्यासाठी दोघांच्या मध्ये दरवाजा आहे.


 तलावाच्या शेजारीच ही एक घुमटाकार वास्तू आहे. पण ही मशीद नाही. खाली पसरलेली हिरवळ आणि मागे दाटून आलेले कृष्णमेघ ह्यांनी ह्या फोटोला चार चांद लावले हे मात्र नक्की !!!
 
वर दिलेली कोठारं बघून आपण पुढे गेलो की अंतुर किल्ल्याचं सर्वोच्च ठिकाण असलेला बुरुज आहे. इथून दिसणारा अंतुर किल्ल्याचा आणि आसमंताचा नजर म्हणजे केवळ लाजवाब !!!


अंतुर किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील नव्याने बांधून काढलेला बुरुज


बुरुजाच्या समोरच्या पठारावर अनेक जोती झाडांनी गिळंकृत केलेली दिसून येतात


अंतुरच्या सर्वोच्च माथ्यावरून समोर दिसणा-या हिरव्यागार गालिच्याच्या नजा-याला खरोखरंच तोड नव्हती. गडावर वाहणारा भर्राट वारा आणि त्याच्या तालावर डोलणारी हिरवाई… एक असीम आनंद देणारं ते दृश्य होतं !!!


मग हीच छानशी जागा बघून लतीफचा एक मस्त फोटू घेतला !!


अंतुरच्या सर्वोच्च बुरुजावरून दिसणारा नजारा. खाली झाडीत लपलेला तलाव दिसतोय तर दरीच्या पलीकडच्या टेकडीत असलेल्या झाडीत नीट बघितलं तर पांढरं बांधकाम दिसतंय. हाच वनविभागाने उभारलेला "व्यू पॉइंट" !!


अंतुरच्या सर्वोच्च माथ्यावरून पलीकडे म्हणजे आपण ज्या बाजूने आलो त्याच्या विरुद्ध दिशेला उतरलो की किल्ल्याची एकसलग तटबंदी आहे. खरं तर अंतुरच्यासर्वोच्च माथ्यावरून लहान - मोठे मिळून जवळपास पस्तीस तलाव दिसतात. पण अस्मादिकांच्या कॅमे-याच्या लहरीपणामुळे त्यांचा फोटो घेणं शक्य झालं नाही.


इथून पुढे डावीकडे कातळाच्या पोटात सुंदर खोदीव टाक्यांची मालिका सुरु झाली. यात काही खांबटाकी सुद्धा आहेत.
हे खांब टाकं हरिश्चंद्रगडावरच्या केदारेश्वर मंदिरासारखं आहे. ह्याला सुद्धा केदारेश्वराप्रमाणे चार खांब असून त्यातील तीन खांब पडले आहेत आणि एक खांब अजूनही उभा आहे.


इथून पुन्हा किल्ल्याच्या मुख्य पठारावर येताना एक घुमटीसारखी वास्तू दिसते.


पुढे जाताना किल्ल्याचा ब-यापैकी सुस्थितीतला बुरुज लागला


पुढे गेल्यावर आपल्याला एक दरवाजा लागतो जो किल्ल्याच्या उरलेल्या भागाकडे आपल्याला घेऊन जातो. ह्या दरवाजाच्या थोडंसं अलीकडे एक सुंदर वटवृक्ष असून त्याच्या थंडगार सावलीमध्ये अंतुरच्या कड्यावरून घोंघावत येणारा थंडगार वारा खाण्याची मजा काही औरच आहे !!


वर दिलेल्या दरवाजातून आपण सरळ येउन मागे बघितलं की दरवाजाची सुंदर कमान आणि त्याला खेटून उभा असलेला भक्कम बांधणीचा बुरुज दिसतो.


आणि या दरवाजातून सरळ जाउन मागे पाहिलं की अंतुर किल्ल्यावरची सगळ्यात सुंदर वास्तू दिसते. ह्या दरवाजाने अंतुर किल्ल्याचा आपण उभा असलेला भाग वेगळा केल्यासारखा वाटतो. ह्यातील डावीकडचा बुरुज म्हणजे वरच्या फोटोत दिलेला बुरुज आणि त्याला खेटूनच वरच्या फोटोत असलेला दरवाजा आहे. ह्या तटाच्या मध्यभागी एक दरवाजा दिसत असून उजवीकडच्या बुरुजाला लागूनही एक दरवाजा आहे. ह्या तटाच्या समोरही वडाचं प्रचंड मोठं झाड असून हा परिसर कमालीचा सुंदर आहे.


 वर दिलेल्या दरवाजाकडे पाठ करून आपण सरळ जाऊ लागलो की उजवीकडे पुन्हा हा एक बुरुज दिसतो. 


ह्या बुरुजापासून आपण सरळ गेलो की काही पाय-या चढून गेल्यावर महालाची वास्तू असून सध्या इथे एक पीर आहे.

वर दिलेल्या दरवाजातून आत आल्यावर मागे वळून पाहिलं की दरवाजाची  कमानी वास्तू ह्याप्रमाणे दिसते. 

पीर (राजवाडा) बघून आम्ही आता परतीचा प्रवास सुरु केला. वरच्या फोटोत दाखवलेल्या तीन दरवाजांच्या तटबंदीतील मधल्या दरवाजातून आपण बाहेर पडलो की पुन्हा आपण अंतुर किल्ल्याच्या मुख्य पठारावर येउन पोहोचतो.


वाटेत ही घुमटी सदृश वास्तू आहे.


पुढे आपण सुरुवातीला पाहिलेला गडाचा सुंदर बांधीव तलाव आहे. ह्याच्या डावीकडे सुद्धा एक दरवाजा उत्तम स्थितीत उभा आहे. तलावाकडे जाताना मध्येच एका ठिकाणी तळघर किंवा भुयारासारखी खोली असून आत पूर्ण अंधार असल्याने काहीही कळत नाही.   
ह्या तलावाचे फोटो काढत असताना माझ्या डावीकडे असलेल्या गडाच्या सर्वोच्च बुरुजावर अचानक सुंदर सूर्यप्रकाश आला आणि हे अप्रतिम निसर्गचित्र कॅमे-यात बंदिस्त करायला राहवलं नाही !!! ह्या भटकंती दरम्यान काढलेल्या फोटोंपैकी माझा एक अतिशय आवडता फोटो (वन ऑफ द फेव्हरेट !!!)


अंतुरच्या तलावापाशी शेख लतीफचा निरोप घेऊन आम्ही आता गड उतरायला सुरुवात केली. किल्ल्यावर आल्यापासून तब्बल तीन तास उलटले होते. ह्यावरून किल्ल्याचा आणि त्यावरील अवशेषांचा प्रचंड आवाका आपल्या लक्षात येईल !! काहीश्या जड पावलांनी पण भारावलेल्या प्रसन्न अंत:करणांनी अंतुरचा निरोप घेतला. नजरेसमोर आता अगदी मागच्या दोन वर्षांपर्यंत अनभिज्ञ असलेला लोंझा किल्ला तरळत होता !!
  
खोदीव टाक्यांनी वेढलेला लोंझा किल्ला !! 

दुपारचे तीन वाजत आले होते. नागापूर पासून लोंझा किल्ल्याला जाण्यासाठी पुन्हा एकदा औट्रम घाटामार्गे (शेख लतीफच्या भाषेत "अक्रम" घाटामार्गे !!!!) आम्ही नागदला निघालो तेव्हा गाडीत वाळवंट पसरलं होतं !! कारण अंतुर किल्ल्यावरून भरून आणलेलं पाणी जेवतानाच संपल्याने सगळ्यांच्याच बाटल्यांमध्ये खडखडाट होता. बाहेर हिरवागार आसमंत असतानाही आम्हाला गाडीत मात्र कंठशोष पडला होता. त्यामुळे नागदला पोहोचेपर्यंत पाण्याच्या किमान २-३ बाटल्या तरी भरणं गरजेचं होतं. काळाची आणि शरीराची गरज ओळखून रस्त्यावरच्या एका विहिरीमध्ये आम्ही पाणी भरायला थांबलो आणि जेव्हा त्या पाण्याचा पहिला घोट घेतला तेव्हा असं लक्षात आलं की आपण बहुदा रेडा धुवायला वापरतात ते पाणी पीत आहोत !!! पाणी कमालीचं जड आणि अत्यंत मचूळ होतं (ह्या ब्लॉगच्या पहिल्या भागातल्या सूचना आठवा !!! ). पण आता दुसरा पर्यायच नव्हता. शेवटी नागदला पोहोचेपर्यंत वेळ मारून न्यावी लागली !! नागद ह्या गावाला "धुळे" हे नाव जास्त शोभलं असतं !! कारण आम्ही गावात पोहोचलो त्यावेळी पावसाळ्यात धुकं असावं तसा प्रचंड धुराळा नागद मध्ये उडाला होता !! त्यामुळे कधी एकदा इथून निघतोय असं झालं होतं. नागदमध्ये मिनरल वॉटर आणि कोल्ड्रिंक्सची मनसोक्त खरेदी  झाली आणि आम्ही आता लोंझा किल्ल्याच्या दिशेने निघालो. 
 
चाळीसगाव वरून नागदला आल्यास मुख्य बाजारपेठेतून डावीकडे जाणारा तर अंतुरच्या म्हणजेच गौताळा अभयारण्य - सायगव्हाणच्या दिशेने आल्यास मुख्य बाजारपेठेतून उजवीकडे जाणारा रस्ता हा बेलखेडा - बनोटी - सोयगाव मार्गे फर्दापूरला जातो. ह्याच रस्त्याने नागद पासून सुमारे एक किलोमीटर गेल्यावर लगेचच रस्त्याच्या उजवीकडे खालील पाटी लावली आहे. 

 
लोंझा किल्ल्याच्या पायथ्याला हा आश्रम असल्याने तिथल्या परिसरात लोंझा किल्ल्याचा डोंगर हा "महादेव टाका" डोंगर ह्या नावाने प्रसिद्ध आहे. त्या परिसरात लोंझा किल्ला वगैरे काही माहित नाही. त्यामुळे "इथे किल्ला कुठे आहे" असं विचारल्यास अंतुर किल्ल्याचा पत्ता सांगितला जातो. म्हणून नागद मध्ये लोंझाच्या रस्त्याची चौकशी करताना "महादेव टाका" कुठे आहे असं विचारावं. नागद पासून ही पाटी म्हणजेच लोंझा किल्ल्याचा फाटा एक किलोमीटर  आणि ह्या पाटीपासून किल्ल्याचा पायथा सात किलोमीटर असं नागद ते लोंझा एकूण आठ किलोमीटर अंतर आहे.  

लोंझा किल्ल्याची उंची आणि गडावरील अवशेष बघता हा काही लढाऊ किल्ला नाही हे लगेचच लक्षात येतं. पण लोंझाच्या आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने ह्या भागात काही स्थानिक वाटा आहेत. आपल्या सोयीसाठी आपण त्यांना घाटमार्ग म्हणू शकतो. अंतुर हा त्या परिसरातील एक महत्वाचा किल्ला !! त्यामुळे अंतुरच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या दिशेने जाणा-या ह्या घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या प्रभावळीत जे किल्ले बांधले गेले त्यातील एक म्हणजे लोंझा किल्ला !! त्यामुळे उंची लहान आणि कार्य महान असंच लोंझाच्या बाबतीत म्हणता येईल. पण लोंझा किल्ल्यावर भटकंती करण्याआधी हा नवाकोरा किल्ला कसा सापडला ह्याची सुरस कथा आधी आपण ऐकू !!

एक ठाण्याचा रहिवासी आणि एक नाशिकचा रहिवासी असे दोन "चक्रम" लोक !! नावात आणि रक्तातच चक्रमपणा असल्याने जगापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि त्याच्याच जोडीला सखोल अभ्यासाची साथ लाभलेले दोन अवलिये !! झालं असं की अंतुर किल्ल्याचा "गुगल अर्थ" वरून शोध घेताना त्याच्या शेजारच्या छोटयाश्या डोंगरावर काहीतरी "अर्थ" पूर्ण असल्याचा साक्षात्कार या दोघांना झाला. गुगल अर्थ वरून त्या डोंगरावर झूम करून पाहिल्यावर मोठया आकाराचे भरपूर चौकोनी खड्डे ह्या दोघांना दिसले. पण गुगल अर्थच्या झूम करण्याच्या मर्यादा आडव्या आल्या आणि इथेच त्या दोघांचं कुतूहल जागं झालं. पण पुराव्याशिवाय काहीही जाहीर करता येणार नव्हतं. शेवटी आपण जाउन काय आहे ते बघून येऊ हा निर्णय झाला आणि ह्या डोंगराचा माग काढत हे दोघं स्थानिक लोकांच्या "महादेव टाका" ह्या ठिकाणी पोहोचले आणि इथेच महाराष्ट्राच्या किल्ल्यांच्या यादीत अजून एक खजिना दाखल झाला…किल्ले लोंझा !!! माध्यमांनीही ह्या आगळ्यावेगळ्या शोधकथेची दाखल घेतली आणि त्याला दणक्यात प्रसिद्धी दिली !!!
 

हे अचाट काम साध्य करणारे आणि महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्राला या शोधाच्या माध्यमातून एक नवीन ठेवा मिळवून देणारे हे दोन मावळे म्हणजेच राजन महाजन आणि हेमंत पोखरणकर !!! पुढे ह्या दोघांनी पुण्याच्या "भारत इतिहास संशोधक मंडळ" येथे आणि मुंबईच्या "गिरिमित्र" संमेलनात आपल्या शोधाविषयी सादरीकरण देऊन आणि एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये आपला शोधनिबंध प्रसिद्ध करून लोंझा किल्याला अधिकृत मान्यता मिळवून दिली. 


मुंबईच्या गिरिमित्र संमेलनात आपल्या शोधकार्याबद्दल पुरस्कार स्वीकारताना डावीकडे राजन महाजन आणि उजवीकडे हेमंत पोखरणकर 


आमच्या ट्रेकचा खरा "USP" म्हणजे लोंझा किल्लाच होता. ह्याचं कारण त्या शोधमोहिमेतला एक शिलेदार म्हणजेच साक्षात हेमंत आमच्याबरोबर होता. नागदहून अर्ध्या तासात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला दाखल झालो तेव्हा संध्याकाळचे रंग आकाशाच्या कॅनव्हासवर पसरायला सुरुवात झाली होती.  लोंझाच्या पायथ्याला एक तलाव असून त्याच्याच मागे झाडीमध्ये वरच्या पाटीत दर्शवलेला आश्रम आहे.  


पायथ्यापासून लोंझा किल्ला. फोटो Trekshitiz.com 


लोंझा किल्ल्याच्या रस्त्यावरून दिसणारा आणि संध्याकाळची उन्हं खाणारा अंतुर किल्ला. अंतुरच्या सगळ्यात उजवीकडे जो बुरुज दिसतोय तो म्हणजे किल्ल्याचा दर्शनी बुरुज (किल्ल्याच्या दक्षिणेकडील…म्हणजेच आपण जिथे गाडी लावतो तिथून समोर दिसणारा बुरुज) ज्यावर झेंड्याची काठी लावली आहे आणि त्याच्यामागे दिसणारं झाड म्हणजे अंतुर किल्ल्याच्या तीन दरवाज्याच्या समोर असणारं प्रचंड आकाराचं वडाचं झाड !!लोंझा किल्ल्याच्या पायथ्याला असलेला तलाव आणि त्याच्यामागे कमालीचा सुंदर दिसणारा अंतुर किल्ला


लोंझा किल्ल्याकडे जाताना डावीकडे दिसणारे मंदिर 


आम्ही जिथे गाडी लावली होती तिथून दहा मिनिटे सरळ गेल्यावर लोंझा किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जाणा-या ह्या सिमेंटच्या पाय-या सुरु झाल्या. 


लोंझा किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जाणारा सुरेख रस्ता 


ही सिमेंटच्या पाय-यांची वाट जिथे उजवीकडे वळते तिथे ही मारुतीची शेंदूर लावलेली मूर्ती आहे. 

                                             लोंझा किल्ल्याच्या शेवटच्या पाय-या. ह्या संपल्या की किल्ल्याचा पूर्णपणे भग्न झालेला दरवाजा आहे  


हेमंतने काढलेला लोंझा किल्ल्याचा नकाशा. किल्ला व्यवस्थित बघण्यासाठी ह्याचा प्रचंड उपयोग तुम्हाला होईल 
                            
लोंझा किल्ल्याचा भग्न दरवाजा

                                                                        लोंझा किल्ल्यावर प्रवेश करताच हे सुंदर खोदीव टाकं दिसलं. 


 लोंझा किल्ल्यावर आपण प्रवेश केल्यावर डावीकडे म्हणजे किल्ल्याच्या साधारण पश्चिमेकडे हे कोरडे टाके आहे. मागे झेंडा लावलेला दिसतोय ते आहे किल्ल्यावरचं पहिलं खांबटाकं


  हे ते झेंडा असलेलं खांबटाकं. ही बाहेरून दिसताना गुहा वाटत असली तरी ते मुळात खांबटाकं आहे. पण आत सध्या पाणी नसल्याने त्याचा गुहेसारखा उपयोग केला जात असावा.


 गुहा बघून मुख्य पायवाटेवर परत येउन आपण साधारण पूर्वेकडे म्हणजेच अंतुर किल्ल्याच्या दिशेला निघालो की पुढे ही टाक्यांची मालिका सुरु होते. 


 टाक्यांच्या शेजारी त्यांच्यावर आच्छादन टाकण्यासाठी जमिनीमध्ये हे खड्डे म्हणजेच "पोस्ट होल्स" करण्यात आलेले आहेत. 


हिरवागार लोंझा किल्ला 


पुढे गेल्यावर डावीकडे हे छोटे खांबटाके आहे


इथून पुढे आपण किल्ल्याच्या माथ्याला प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतो. त्याच वाटेवर असणारं हे कोरडं टाकं. इथून उजवीकडे खाली रचीव तटबंदीच्या मध्ये लपलेला छोटासा चोर दरवाजा आहे. टाक्याच्या मागे हिरव्यागार जंगलाच्या सान्निध्यात असलेला अंतुर दिसतोय.


वाटेत उजवीकडे ही रचीव दगडांची भिंत दिसते. फोटो सौजन्य www.Trekshitiz.com


आम्ही आता किल्ल्याच्या मागच्या बाजूला म्हणजेच किल्ल्याचा नागद दरवाजा ज्या बाजूला आहे तिकडे जायला सुरुवात केली तेव्हा पश्चिमरंग आसमंतावर आपली किमया  दाखवत होते !!!


हा किल्ल्याचा नागद दरवाजा असून काळाच्या ओघात पूर्णपणे नामशेष झाला आहे. त्याच्याकडे नेणा-या पाय-या मात्र असूनही सुस्थितीत आहेत. शेवटच्या दोन पाय-यांच्या उजवीकडे असणारे रचीव दगड दरवाजाची कमान इथे कधीकाळी अस्तित्वात असण्याचे पुरावे आहेत. 


 ह्या पाय-या उतरून थोडं खाली गेलं की डावीकडे दगडात कोरलेली मूर्ती आहे. ही मूर्ती कशाची हे ठामपणे सांगता येत नसलं तरी तिच्या समोर असलेल्या साडी - चोळी आणि बांगडयांवरून ही देवीची मूर्ती असावी असा कयास करता येतो.  

हा दरवाजा बघून आम्ही पुन्हा किल्ल्याच्या मुख्य पायवाटेवर येउन पुढे आलो तेव्हा डावीकडे हे प्रचंड मोठं खांबटाकं आढळलं. हे इतकं मोठं आहे की फोटोच्या एका फ्रेममध्ये मावत नाही. ह्याच्या डावीकडे गडावर राहणा-या साधूची अतिशय प्रशस्त गुहा असून ह्या साधूबाबांनी ह्या टाक्यात कोणाला जलसमाधी मिळू नये म्हणून बहुदा ही सूचना लिहिली असावी !!!


ह्या पाण्याच्या टाक्याला लागुनच लोंझा किल्ल्यावरची सर्वात मोठी आणि प्रशस्त गुहा आहे. ट्रेकर्ससाठी जणू काही राजमहाल !!!


आतल्या बाजूने गुहा. वीसेक जणांची अगदी आरामात सोय होईल अशी उबदार मुक्कामाची सोय लोंझा किल्ल्यावर उपलब्ध आहे. पाण्याचं टाकं शेजारीच असल्याने गडावरचा मुक्काम अविस्मरणीय असेल !!
फोटो सौजन्य www.Trekshitiz.com


पुढे पुन्हा किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाताना खोदीव टाक्यांची मालिका सुरूच राहते.  किल्ल्यावर एकूण मिळून सुमारे दहा - पंधराच्या  आसपास टाकी असावीत 


किल्ल्याच्या पश्चिमेकडून म्हणजेच आपण जिथून गडाच्या पाय-या चढून आलो तिथून गडाला पूर्णपणे प्रदक्षिणा घालून पुन्हा पाय-यांच्या दिशेला आल्यावर गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जायला छोटी वाट आहे. गडमाथ्यावर वाड्याचं भग्न जोतं आहे.


जोत्याला लागुनच अंजनीसुताची कमालीची सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे. ही बहुदा मूळची काळ्या पाषाणात कोरली असावी आणि गडावर येणा-या भाविकांनी त्याला रंगरंगोटी केली असावी.


 मूर्तीच्या मागच्या बाजूला हा पीर आहे. 


सहा वाजत आले होते. लोंझा किल्लाधिपति हेमंत बरोबर असल्याने किल्ल्याचे अवशेष सापडायला काहीही कष्ट घ्यावे लागले नाहीत. किल्ला उतरताना आम्ही पश्चिमाभिमुख असल्याने २०१४ च्या स्वातंत्र्यदिनाची सांजवेळ आमच्यासमोरच सजत होती…आमच्या डोळ्यात भरत होती. त्या कातरवेळेचे बदलत जाणारे रंग बघणे हा एक अविस्मरणीय सोहळा होता. भान हरपून सहा मनांनी आपपल्या शरीरांना तिथेच रोखलं. प्रत्येक क्षणागणिक ते पश्चिमरंग गहिरे होत होते !!! ती वेळ टाळून पुढे जाणं शक्यच नव्हतं. निसर्गाने आपण किती श्रेष्ठ किमयागार आहोत ह्याची सरणा-या प्रत्येक मिनिटाबरोबर जाणीव करून द्यायला सुरुवात केली तेव्हा अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारं… सीमारेषेवरच्या जवानांच्या आत्माहुतीचे स्मरण करून देऊन आपल्या नागरिकत्वाच्या कर्तव्यांची कठोर जाणीव करून देणारं…. आज त्यांच्यामुळे आपण उद्याचा दिवस बघू शकतोय ही भावना मनात चेतवणारं आणि गानकोकिळेने आपल्या स्वर्गीय आवाजात अजरामर केलेलं "ए मेरे वतन के लोगो" माऊथ ऑर्गनवर वाजत होतं !!!  सहा डोंगरवेडे आपलं अस्तित्व विसरून त्या अपूर्व सांजेचा एक एक क्षण जगत होते… आपल्या मनात राष्ट्रप्रेमाचं स्फुल्लिंग जागवत होते !!! आज का कुणास ठाऊक….तो लोहगोलही निरोप घ्यायला जरासा वेळच घेतोय असं वाटत होतं. कारण "ए मेरे वतन के लोगो" सलग दुस-यांदा वाजत होतं तरीही आसमंत भारावलेलाच होता !!!


लोंझा किल्ला आम्ही उतरलो तेव्हा ब-यापैकी अंधारून आलं होतं. गडावर पायथ्याच्या पांगरा गावातील तीन मुलं आली होती. किल्ला उतरताना आपोआपच त्यांच्याशी ओळख निघाली आणि "हा किल्ला फक्त महादेव टाका डोंगर नसून एक ऐतिहासिक किल्ला सुद्धा आहे आणि इथे येणा-या ट्रेकर्सना हा किल्ला कसा दाखवावा" ह्या विषयावर एक छोटंसं ज्ञानदानसत्र सुद्धा घेण्यात आलं. लोंझा किल्ला अगदी नव्यानेच प्रकाशात आल्याने त्याला भेट देणा-या काही मोजक्या गिर्यारोह्कांपैकी आम्ही एक होतो. आमच्या नंतर हा ब्लॉग वाचून जेव्हा आपल्यासारखे रसिक वाचक आणि दुर्गप्रेमी त्या सुंदर किल्ल्याला भेट द्यायला जातील तेव्हा स्थानिकांकडून त्यांना पूर्ण सहकार्य मिळेल ह्याची केलेली ती  छोटीशी तजवीज होती. 

आम्ही आता पुन्हा महादेव टाका फाट्यावर आलो. आजच्या दिवसातलं किल्ल्यांचं टार्गेट व्यवस्थित पूर्ण झालं होतं. आता मुक्काम होता तो सुतोंडा किल्ल्याच्या पायथ्याजवळ असणारं बनोटी गाव. नागद - फर्दापूर रस्त्यावर बनोटी हे अगदी छोटंसं खेडं आहे. तिथल्या अमृतेश्वर मंदिरात राहण्याची उत्तम सोय होईल अशी माहिती राजन महाजन कडून मिळाली होती.  नागद ते बनोटी हे अंतर सुमारे एकवीस किलोमीटर असून रस्त्याचा दर्जा सुद्धा बरा आहे. लोंझा किल्ल्याच्या पायथ्यापासून महादेव टाका फाट्यावर येताना अंधार पडल्याने आकाशात लाखो ता-यांची झालेली दिवेलागण  आणि त्यांच्या साक्षीने होणारा प्रवास ही एक विलक्षण अनुभूती होती (ह्याच्या जोडीला पं. जसराज किंवा शिवकुमार शर्मांचा एखादा बहारदार राग असता तर "सोने पे सुहागा" असा तो अनुभव असता. पण हे सगळं माझ्या पेनड्राईव्ह मध्ये असूनही काहीही उपयोग झाला नसता. कारण गाडीत टेपच नव्हता !!!!). अखेरीस आठच्या सुमारास आम्ही बनोटीला पोचलो. बनोटीच्या मुख्य चौकातून डावीकडे जाणारा रस्ता सोयगावमार्गे फर्दापूर तर सरळ जाणारा रस्ता हा वाडी गावामार्गे सुतोंडा किल्ल्याचा पायथा असलेल्या नायगावला जातो. बनोटीच्या मुख्य चौकात एक ध्वजस्तंभ असून त्याच्या पारावर गावातली काही टाळकी बसली होती. आमचं पहिलं लक्ष्य होतं जेवणासाठी हॉटेल बघणे आणि दुसरं लक्ष्य होतं अमृतेश्वर मंदिराचा पत्ता विचारणे. पण बनोटीमधील हॉटेल हे सात वाजताच बंद झालं होतं आणि जेवणासाठी हॉटेलच हवं असेल तर पस्तीस किलोमीटर्सवरील सोयगाव गाठावं लागेल असा निर्वाळा गावक-यांनी दिला.  वास्तविक हॉटेल नसतं तरीही आमच्याकडे पर्यायी व्यवस्था नक्कीच होती. पण त्या वेळी गरमागरम आयतं जेवण मिळण्याची संधीही सोडायची नव्हती. आमच्या गाडीच्या भोवती स्वखुशीने तयार झालेल्या "बनोटी ग्रामस्थ स्थानिक सल्लागार समिती" मध्ये एक अशी व्यक्ती होती ज्याने आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने असलेला "ड्राय डे" चा निर्बंध सूर्यास्त होताच विसर्जन केला होता आणि दिवसभर उपास घडल्याच्या रागातून स्थानिक बिअर बारचा इतका धंदा केला होता की क्या बात है !!! त्यामुळे आम्ही "हॉटेल कुठे आहे विचारलं" की "सुतोंडा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पंधरा किलोमीटर्स चालत जावं लागतं." असं उत्तर मिळत होतं. शेवटी बाकीच्यांनी त्या "अपक्ष" उमेदवाराची रीतसर उचलबांगडी केली आणि आमची त्या प्रचंड गोंधळातून मुक्तता झाली. गावातल्या एखाद्या कोंडाळ्याभोवती आपली गाडी थांबवून आपण पत्ता विचारला की एकाच गोष्टीची दहा दिशांना दहा तोंड असलेली इतकी "एक्स्पर्ट ओपिनियन" मिळतात की कुठून दुर्बुद्धी झाली आणि इथे थांबलो अशी परिस्थिती निर्माण होते !!! त्यात परत एकाने दिलेला  सल्ला दुस-याला कधीच पटत नाही. मग त्यांच्यात वैचारिक मतभेदातून उद्भवलेली चर्चा होते आणि अखेरीस आपल्याला योग्य आणि हवा असलेला सल्ला ब-याच वेळानंतर दिला जातो !!! बनोटीच्या त्या पारावर सुद्धा वीसेक मिनिटांचं असंच एक लोकसभा अधिवेशन भरलं !! अखेरीस तो सगळा गोंधळ थांबल्यावर त्या टोळक्यातल्या एका तरुणाने गावातल्या एका स्थानिक खानावळीत तुमची जेवणाची उत्तम सोय होईल असं सांगून  डायरेक्ट त्या खानावळ मालकाला फोन केला आणि आम्ही येत असल्याची बातमी दिली. आम्ही त्या खानावळीत पोहोचेपर्यंत गावातल्या बिअर बारचं एकनिष्ठ गि-हाईक असलेलं आणि पूर्णपणे हवेत गेलेलं ते "विमान" आणि त्याच्याबरोबर वैशागड किल्ल्याजवळच्या अंभई गावातील साळुंके नामक एक शाळामास्तर सुद्धा आमच्या मागोमाग तिथे येउन दाखल झाले. मास्तर काही कामानिमित्त बनोटी मध्ये आले होते. खानावळ मालकाने जेवण बनवायला पाउण तास लागेल असं सांगितल्याने आता आरामच होता. विमान आणि मास्तरांजवळ मी,हेमंत आणि हृषीकेश थांबलो आणि पुढच्या काही मिनिटातच त्याचं बक्षीस आम्हाला मिळालं !! मास्तरांनी स्वत:च्या भौगोलिक ज्ञानाचा अभूतपूर्व अविष्कार दाखवत आम्हाला बनोटी - सोयगाव - वेताळवाडी किल्ला -  उंडणगाव -  अंभई - जंजाळे - भराडी - सिल्लोड - वैजापूर - नाशिक हा पूर्ण रस्ता इतक्या व्यवस्थित समजावून सांगितला की आम्ही चाटच पडलो. ह्या नकाशाच्या दिशाशोधनात विमान मधूनच सारखं कुठेतरी भरकटत होतं (साहजिकच आहे म्हणा !!!). शेवटी मास्तरांनी पायलट बनून त्याला प्रत्येक वेळी गप्प बसवण्याची जबाबदारी स्वखुशीने स्वीकारली  आणि आमचं उद्याचं मोठं काम झालं !!! जाता जाता मास्तरांनीसुद्धा "मी (विमानाकडे बोट दाखवत) ह्यांच्यापेक्षा बरा आहे. त्यामुळे जास्त काय पीत नाही" असं म्हणत खिशातून एक "चपटी" काढली आणि खानावळीच्या बाहेरच्या खाटेवर आपला कार्यक्रम सुरु केला !!! आता मात्र तिथून निघणंच फायद्याचं होतं कारण त्या दोन विमानांच्या टकरीत आम्ही फुकटचे होरपळून निघालो असतो !! खानावळीच्या मालकाने शेजारीच एका खोलीत टेबल खुर्च्या ठेवल्या होत्या आणि तिथेच आमची जेवणाची सोय केली जाणार होती. तिथलं वातावरण मात्र कमालीचं सुंदर होतं.  लाखो ता-यांनी सजलेलं आकाश…रात्रीचा गार वारा वाहू लागलेला…आणि परिसरात कमालीची शांतता !!! पाउण तास टाईमपास करायचाच होता. शेवटी मी माऊथ ऑर्गन बाहेर काढला आणि त्या सुंदर वातावरणात तो वाजवताना जो काही स्वर्गीय आनंद मिळाला त्याला तोड नाही !! बनोटी गावातल्या ह्या "संगीत रजनी" ला उपस्थितांची सुद्धा जोरदार दाद मिळाली. काही वेळाने खानावळ मालकाने गरमागरम अस्सल चवीची झणझणीत शेवभाजी,पोळ्या आणि पहिल्या वाफेचा भात पेश केल्यावर त्यावर जी काही धाड पडली त्याला कसलीही उपमा देता येणार नाही !! जेवण करून आम्ही गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या अमृतेश्वर मंदिरात मुक्कामाला गेलो. अमृतेश्वराची जागा कमालीची सुंदर आणि अतिशय स्वच्छ आहे. मुक्कामाला अप्रतिम. मंदिरात श्रावण मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता. शेजारी वाहणा-या नदीच्या खळाळत्या आवाजाने नादब्रम्ह निर्माण केल्याचा भास होत होता. अंथरुणाला पाठ टेकताच जेव्हा डोळा लागला तेव्हा आसमंतावर मध्यरात्र पसरत होती !!! 

क्रमश: 

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड  
Comments

 1. Onkar::
  फोटोज, दुर्गवैशिष्टयं आणि अनुभव यांची भट्टी मस्त जमलीये.
  विशेषतः लोंझाचं फोटोडॉक्युमेंटेशन हा USP झालाय या पोस्टचा.
  लगे रहो...

  ReplyDelete
 2. ओंकार नेहमी प्रमाणेच मस्त लिहलं आहेस ... तुझे ब्लॉग वाचण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे किल्ल्यावर काय पहाव ते उत्तम सांगतोस तसेच आमच्या सारख्या ट्रेकरच अर्ध प्लान्निंग करून देतोस ... धन्यवाद या उत्तम ब्लॉग बद्दल आणि हो भाग ३ ची वाट पाहतोय ...

  ReplyDelete
 3. जबरदस्त… 'हेम' असताना लोंझा किल्ल्याला भेट देणं म्हणजे स्वातंत्र्य दिनी मिळाली एक अनोखी भेटचं म्हणावी लागेल…
  लोणी आणि पापड चं सुत जमलंय… 'अक्रम' घाट :)
  दुर्लक्षित अंतुर चा किल्ला एवढा प्रेक्षणीय असेल ह्याची कल्पना नव्हती… दोन्ही किल्ल्यांची सुंदर फोटोंसकट व्यवस्थित आणि परिपूर्ण माहिती दिलीस…
  श्रावणात असल्या जबरदस्त किल्ल्याला भेट देणं म्हणजे एक पर्वणीचं…
  खऱ्या अर्थाने श्रीमंत किल्ले आहेत… योग्य आणि चपखल ब्लॉगपोस्ट टायटल…
  बऱ्याच दिवसांनी ब्लॉगपोस्ट ची मेजवानी मिळाली…
  ज… ब… री…

  धनुर्वाद,
  दत्तू

  ReplyDelete
 4. ओंकार,

  लोंझा किल्ल्याचा नकाशा आहे त्याखालील ३ रा फोटो - त्यात प्रवेश केल्यावर 'डावीकडे' म्हटले आहेस. ते 'उजवीकडे' पाहिजे.

  ' पुढे गेल्यावर डावीकडे हे छोटे खांब टाके आहे ' असे एका फोटोसाठी लिहिले आहेस. ते 'उजवीकडे' पाहिजे.

  ' वाटेत उजवीकडे ही रचीव दगडांची भिंत दिसते ' असे एका फोटोसाठी लिहिले आहेस. ते 'डावीकडे' पाहिजे. कारण प्रवेश केल्यावर तुम्ही किल्ल्याला उजवीकडून डावीकडे अशी फेरी मारलेली आहे. त्यामुळे भिंत डावीकडे दिसणार.

  राजन

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड