श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड

"श्रीमंत" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग १ : : नियोजन आणि प्रस्थान

"श्रीमंत" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग २ : : अंतुर आणि लोंझा

इथून पुढे….

दिनांक १६ ऑगस्ट. बनोटी गावातल्या अमृतेश्वाराच्या राऊळावर पूर्वा उजळली. अमृतेश्वर मंदिराचा परिसर अतिशय सुंदर !!! आभाळाला भिडलेला मंदिराचा कळस,विलक्षण स्वछ असलेलं आवार,शेजारी खळखळत वाहणारी नदी आणि त्या सुंदर सकाळी कानावर पडणारी रानपाखरांची भूपाळी !!! दिवसाची झालेली सुरम्य सुरुवात !! आज आम्हाला सुतोंडा बघून सोयगाव मार्गे वेताळवाडी आणि वैशागड हे किल्ले बघून परतीचा प्रवास सुरु करायचा होता. श्रावणातल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे रात्रीचे वारकरी सकाळी बदलले आणि पुन्हा एकदा त्या वाद्याचा झंकार अखंडितपणे सुरु झाला. सकाळी मंदिरात आलेल्या लोकांपैकी एकाला आम्ही विचारलं,
"वाडीचा किल्ला (सुतोंडा) कोणता हो ??"
"त्यो काय समोरचा." बनोटी गावाच्या पश्चिमेला असलेल्या एका उंच डोंगराकडे बोट दाखवत तो म्हणाला. त्या डोंगराचा आकार बघून आमच्या डोळ्यासमोर काल रात्री न पाहिलेले सगळे तारे भल्या पहाटेच चमकून गेले !!! गड चढायला दहा वाजलेले दिसू लागले आणि आजच्या दिवसातला शेवटचा किल्ला वैशागडसुद्धा मनामध्ये धूसर होऊ लागला. पण जास्त काहीही विचार न करता सकाळची कामं उरकून आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आणि बनोटी गावात पोहोचलो. आता पूर्णपणे उजाडलं होतं. थंडगार वा-याचे झोत सुखावून जात होते. बनोटी मधल्या कालच्या खानावळ मालकाला चहा आणि पोह्यांची ऑर्डर देऊन किल्ला बघून आल्यावर येतो असं सांगितलं आणि वाडी - नायगाव मार्गे सुतोंडा किल्ल्याकडे आमचा प्रवास सुरु झाला. बनोटी गावातून सुतोंडा किल्ला फार फार तर पाच - सहा किलोमीटर्स. पण बनोटी ते नायगाव हा रस्ता अत्यंत वाईट !! त्यामुळे ह्या रस्त्याने आमचा जवळपास पाऊण तास खाल्ला. पण जालिंदरकाका उर्फ आमचे ड्रायव्हर ह्यांनी साक्षात श्रीकृष्णाकडून सारथ्याचे क्लासेस घेतलेत की काय अशी शंका यावी इतक्या सफाईने आणि शिताफीने ते आमचा रथ त्या सुमार रस्त्यावरून चालवत होते !! नायगाव पासून सुतोंड्याचा Actual पायथा एक किलोमीटर वर आहे. पण जसं जसं नायगाव जवळ येऊ लागलं तसा तसा मंदिरातल्या गावक-याने दाखवलेला उंच डोंगर लांब जाऊ लागला…त्याच्या पुढच्या एका छोटयाश्या टेकडीवर तटबंदीसारखं बांधकाम दिसू लागलं आणि तेवढयात हातातल्या संदर्भ पुस्तकातल्या एका ओळीने माझं लक्ष वेधलं,
"नायगावच्या मागे प्रचंड उंच असा रक्ताईचा डोंगर असून त्याच्या पुढे असलेला छोटासा टेकडीवजा डोंगर म्हणजे सुतोंडा किल्ला आहे !!!!"
सहा सुटकेचे नि:श्वास एकाच वेळी बाहेर पडले !!!! जीव भांड्यात पडणे म्हणजे काय ह्याची प्रचिती ह्या वाक्याने दिली. वास्तविक पाहता रक्ताईचा डोंगर हा जरी सुतोंडा किल्ला असता तरी तो चढायला आमची ना नव्हतीच. प्रश्न होता तो वेळेचा !! आजच्या दिवसात सुतोंडा सोडला तर आकाराने अजस्त्र आणि भरपूर अवशेष असल्यामुळे बघायला वेळ लावणारे वेताळवाडी आणि वैशागड हे दोन मोठे किल्ले बाकी होते,ह्या तिन्ही किल्ल्यांमधला प्रवास बाकी होता आणि त्यानंतर परतीचा मार्गही आमची वाट बघत होता. सुतोंडा किल्ल्याची वाट फारशी मळलेली नसल्याने गडावर जाण्यासाठी वाटाड्या अत्यंत आवश्यक आहे. पण आमच्या दुर्दैवाने आम्ही नायगावात पोहोचलो तेव्हा गडावर वाट दाखवायला येणारी मुलं सकाळच्या "कामाला" तरी गेली होती किंवा शेतांवर तरी. त्यामुळे खूप प्रयत्न करूनही माहितगार माणूस उपलब्ध झाला नाही. शेवटी आमची पूर्ण श्रद्धा असलेल्या संदर्भ पुस्तकाच्या भरवशावर किल्ला बघायचं ठरलं आणि आम्ही नायगावातून बाहेर पडलो. तो खडखडाटी प्रवास संपवून आम्ही सुतोंड्याचा पायथा गाठला तेव्हा स्वच्छ निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर गर्द रानाने सजलेला सुतोंडा सकाळची कोवळी उन्हं झेलत होता !!

गूढरम्य सुतोंडा किल्ला


निळ्या आभाळाखाली हिरवागर्द शेला पांघरून उभा असलेला सुतोंडा किल्ला. किल्ल्याच्या मागे दिसणारा डोंगर म्हणजे रक्ताईचा डोंगर

ह्या फोटोवरून आपल्याला सुतोंडा किल्ल्याची कल्पना येईल. खालच्या फोटोत दाखवलेली ठिकाणं अगदी तंतोतंत प्रमाणबद्ध नसतील तरी ती ठिकाणं किंवा ते अवशेष किल्ल्याच्या नेमक्या कोणत्या दिशेला आहेत ह्याचं स्पष्ट चित्र दुर्गप्रेमी वाचकांच्या समोर उभं राहील.  पण तरीही गावातील वाटाड्या अत्यावश्यक आहे.


सुतोंडा किल्ल्याच्या साधारण दक्षिणेकडे जोगणामाईचे घरटे नावाचे एक हिंदू लेणे आहे. त्याकडे जाताना ह्या पाय-या लागल्या.


 किल्ल्याच्या पोटात असलेले जोगणामाईचे घरटे 

लेण्यांमधील विष्णुमूर्ती

बाळ मांडीवर घेतलेली देवीची मूर्ती. ह्याच देवीवरून कदाचित ह्या लेण्यांना "जोगणामाई" चे घरटे म्हणत असावेत.

लेण्यांमधील भगवान महावीरांची मूर्ती  


लेण्यांपासून डावीकडे गेल्यावर हे एक कोरडे खांबटाके आहे. ह्याचा उल्लेख आमच्या पुस्तकात नव्हता.


खरं तर सुतोंडा किल्ल्याच्या पायथ्यापासून निघाल्यावर आधी जोगणामाईचे घरटे आणि हे खांबटाके बघून पुन्हा किल्ल्याच्या मूळ पायवाटेला येउन किल्ला चढणे हाच क्रम योग्य आहे. पण आम्ही आधी किल्ला बघून उतरताना फारशा वापरात नसलेल्या आणि अतिशय कठीण अशा पायवाटेने उतरलो आणि ह्या लेण्यांच्या समोर येउन पोहोचलो. ही वाट अतिशय कठीण आणि फसवी असल्याने ट्रेकर्सनी ह्या वाटेने किल्ला चढायचा किंवा उतरायचा अजिबात प्रयत्न करू नये. त्यामुळे वर दिलेल्या क्रमानुसार आधी लेणी बघून किल्ल्याच्या मुख्य पायवाटेला येउन मगच किल्ला चढावा. बरोबर वाटाडया घेतल्यास ह्या सगळ्या वाटा सापडणं अतिशय सोपं आहे.

लेणी बघून आम्ही किल्ला डावीकडे ठेवत त्याला पूर्ण वळसा मारला आणि अखेर वर तटबंदीमध्ये लपलेला हा चोर दरवाजा समोर आला. वर दिलेल्या दुस-या क्रमांकाच्या फोटोमध्ये ह्या दरवाजाची वाट आणि दिशा दाखवली आहे.

चोर दरवाजा आतल्या बाजूने

  दरवाजातून किल्ल्याच्या माथ्याकडे जाताना लागणारे अवशेष

किल्ल्याच्या वाटेवर उजवीकडे हे एक कोरडं टाकं दिसलं

किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे येताना ही मशिदीची कमान आहे किल्ल्यावरील पीर आणि मागे दिसणारी अजिंठा - सातमाळा रांग

पीराच्या समोरच ही प्रचंड आकाराची भरपूर खोदीव टाकी आहेत.ह्या सर्व टाकीसमूहाला "राख टाकी" असं म्हटलं जातं. 


ह्या टाक्यांच्या समूहात हे मोठं खांबटाकं सुद्धा आहे.

पुढे रक्ताईच्या डोंगराच्या दिशेने किल्ल्याला प्रदक्षिणा घालताना हा खोदीव टाक्यांचा समूह आहे.
गडावरील एक सुटे टाके आणि मागे रक्ताईचा डोंगर

सुतोंडा किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील वास्तूचे अवशेष

गडावर असलेला कोरीव दगड

पुढे गेल्यावर हे अजून एक गुहाटाकं आहे

ह्या टाक्याच्या शेजारचं कोरडं टाकं. हे टाकं इतकं कामातून गेलं आहे की त्यातलं सगळं पाणी त्याच टाक्यात वाढलेल्या ह्या झाडाने स्वत:च्या वाढीसाठी वापरल्यासारखं वाटत होतं !!!

ह्या टाक्याच्या शेजारी भर्राट वा-याचा झोत अंगावर घेत असतानाच अचानक आभाळ भरून आलं आणि गडाला चिकटून असणारा हा रक्ताईचा डोंगर अजूनच लोभसवाणा दिसू लागला. सुतोंडा किल्ल्याशेजारी  विलक्षण सुंदर जंगलाने अच्छादलेल्या ह्या डोंगरावर एका देवीचे देऊळ असून तिच्यासमोर प्राण्यांचे बळी दिले जात असल्याने ह्या डोंगराला रक्ताईचा डोंगर असे समर्पक नाव पडले आहे.

गडावरून निखालस सुंदर दिसणारी अजिंठा रांग !! गर्द हिरवाईने बहरलेला आसमंत…त्याला कृष्मेघांनी अलंकृत झालेल्या आभाळाची पार्श्वभूमी आणि पार क्षितिजाला कवेत घेणारी ही सह्याद्रीची रांग !!! निसर्गाच्या आणि सह्याद्रीच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडायला ह्यापेक्षा वेगळं काय हवं !!!

किल्ल्याच्या प्रदक्षिणेच्या पुढच्या प्रवासाला निघाल्यावर डावीकडे थोडं वरच्या बाजूला हे प्रचंड आकाराचं लेणंवजा खांबटाकं आहे. ह्याला "सीतान्हाणी" असं नाव आहे.

सीतान्हाणीपासून आम्ही पुढे गेलो आणि समोरचं दृश्य पाहून अक्षरश: जागीच खिळलो  !!!!  भान विसरायला लावेल इतक्या प्रचंड मोठया आकाराच्या खांबटाक्यांचा समूह आमच्यासमोर एखाद्या "सरप्राईज" सारखा प्रकट झाला होता. हॉलीवूडच्या सिनेमातील एखादया खजिनाशोध मोहिमेवर असल्याचा भास आम्हाला ही टाकी बघून होत होता. हा समूह इतका अवाढव्य आहे की ह्याचा फोटो एका फ्रेममध्ये घेणं अतिशय अवघड !! पण आतापर्यंतच्या कष्टांचं सार्थक करेल असं हे दृश्य आहे. सुतोंडा किल्ला बघताना एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते की किल्ल्यावरील वाड्याचे अवशेष आणि भुयारी दरवाजा सोडल्यास किल्ल्याच्या संपूर्ण परीघावर असंख्य टाकी खोदण्यात आली आहेत. ह्या टाक्यांची अजस्त्रता बघता त्या अनामिक कलाकारांना मानाचा सलाम !!!
दहा वाजत आले होते. नव्वद टक्के किल्ला फिरून झाला होता. आता शेवटची शोधमोहीम होती ती सुतोंडा किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्टय आणि आकर्षण असलेल्या भुयारी मार्गाची !!! आमच्याकडे असलेल्या पुस्तकात किल्ल्याच्या उत्तरेकडे भुयारी मार्ग खोदून काढलेला आहे असं लिहिलेलं होतं. त्या पुस्तकातील माहितीवर आणि लेखकांवर कमालीची श्रद्धा असल्याने पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही आता किल्ल्याच्या उत्तरेकडे म्हणजे आपण ज्या तटबंदीच्या खालून किल्ल्यावर येतो त्याच्या दिशेला निघालो. वाटेत गच्च वाढलेल्या झाडीशिवाय आणि हिरव्यागार गवताशिवाय काहीही नव्हतं. तरीही चिकाटीने आम्ही किल्ल्याची उत्तर दिशा चहूबाजूंनी धुंडाळायला सुरुवात केली. पण किल्ल्याच्या उत्तरेकडचा भुयारी दरवाजा नेमका कुठे आहे ह्याचं उत्तर अजूनही अनुत्तरीतच होतं !!! वाढत्या उकाड्याने घामटं काढायला सुरुवात केली. दरवाजा सोडाच पण किमान त्याच्याकडे नेणारी पुसटशी का होईना पण एखादी पायवाट किंवा पाय-यांचा मागमूसही नव्हता. घड्याळातले काटे आता जास्तच वेगाने पळू लागले. हा भुयारी दरवाजा बघितल्याशिवाय सुतोंडा किल्ल्याच्या भेटीला काही अर्थच उरला नसता इतका हा दरवाजा प्रेक्षणीय आणि महत्वाचा आहे. आता मात्र आम्ही सहाही जण वेगवेगळ्या दिशांना पांगलो. मी आणि हेमंत एकीकडे,नाना आणि पुनीत एकीकडे आणि हृषीकेश आणि सुरज अजून तिसरीकडे अशी विभागणी झाली. कोणाला दरवाज्याचा जरासा सुद्धा माग लागल्यास एकमेकांना लगेच हाक मारायची किंवा शक्य असल्यास घ्यायला यायचं असं ठरलं. पाऊण तास उलटून गेला. आम्ही इतका वेळ पुस्तकात दिल्याप्रमाणे किल्ल्याच्या उत्तरेकडेच शोध सुरु ठेवला होता. पण काहीही उपयोग झाला नाही. नाना लेखकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. पण तेही बहुदा एखाद्या किल्ल्यावरच असावेत. फोन लागला नाही. इकडे हेमंतने राजन महाजनला फोन लावला. पण राजन सांगत असलेली माहिती आणि पुस्तकातील माहिती ह्यात कमालीची तफावत होती. त्यामुळे अजूनच गोंधळ उडाला !!! (अर्थात नंतर खरी माहिती कुठली ह्याचा प्रत्यय आलाच). सुतोंडा किल्ल्याचा दरवाजा नक्की भुयारी आहे का "अदृश्य" आहे अशी शंका आता आम्हाला येऊ लागली. त्यातच भरून आलेल्या आभाळाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आणि पाऊस सुरु झाला. आमच्या संपूर्ण ट्रेकमधला हा पहिला आणि शेवटचा पाऊस. काहीही केल्या तो दरवाजा सापडायला तयार नव्हता. सहाही जीव शब्दश: "Frustrate" झाले होते !! अजून किल्ला उतरून आणि मधला प्रचंड प्रवास संपवून वेताळवाडी आणि वैशागड बघायचे बाकी होते. वेळ फुकट वाया चालला होता. पुस्तकातील माहिती संपूर्ण चुकीची असल्याची खात्री पटली. अखेरीस त्या अनभिज्ञ दरवाजाला रामराम ठोकायचा निर्णय झाला. पाऊसही आता छोटासा शिडकावा करून थांबला. आल्या वाटेने आम्ही आता परत निघालो. वाटेत मगाशी पाहिलेल्या खांबटाक्यांच्या समूहाची भव्यता पुन्हा एकदा नजरेच्या कक्षा ओलांडून गेली !! आम्ही आता रक्ताईच्या डोंगराच्या बरोब्बर समोर म्हणजेच किल्ल्याच्या दक्षिणेकडे येऊन पोहोचलो. वातावरण स्वछ झालं होतं. आणि तितक्यात सगळ्यात पुढे असलेल्या मला आणि हेमंतला एक ठळक मळलेली पायवाट रक्ताईच्या डोंगराच्या दिशेला खाली उतरत असलेली दिसली. ही वाट मगाशी सुद्धा आम्ही हेरून ठेवली होती. पण ही किल्ल्याची दक्षिण बाजू होती आणि आमच्या शोधाची दिशा उत्तर असल्याने आम्ही त्याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. अखेर शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही त्या वाटेने खाली उतरायला सुरुवात केली. वाट हळूहळू स्पष्ट होत होती. तेवढयात अचानक समोर आलेल्या भग्न दरवाजाच्या बुरुजांनी आमचं स्वागत केलं आणि क्षणार्धात उतरलेल्या चेहे-यांवर एखादा अनमोल खजिन्याचा शोध लागल्याचे भाव दाटले !!! म्हणजे राजनने अचूक माहिती सांगितली होती. हीच वाट होती ह्याची आता खात्री पटली आणि बघता बघता त्या भुयारी मार्गाच्या सुरुवातीचा खंदक समोर आला. श्वास रोखले गेले. खंदक ओलांडून आम्ही आता भुयारात प्रवेश केला. वाट काटकोनात वळली आणि समोरून प्रकाशाचा झोत येऊ लागला. कमालीच्या अधीरतेने ते शेवटचं वळण आम्ही पार केलं आणि…….अजि म्या ब्रम्ह पाहिले !!! ज्यासाठी इतका अट्टाहास केला होता…एका क्षणी हा दरवाजा सापडेल ह्या आशेवर पाणी सोडलं होतं आणि परतीचा मार्ग धरायची भावना मनात जागलेली असतानाच आम्हाला हवं ते गवसलं होतं !!! "Try For the Last Time Before You Want to Quit" ह्या वाक्याची प्रचिती आम्ही ह्याची देही ह्याची डोळा अनुभवत होतो !!! हरवलं ते गवसलं होतं !!

रक्ताईच्या डोंगराच्या बरोबर समोर हे टाकं असून समोर दिसणा-या वाटेने आपण किल्ल्याला प्रदक्षिणा घालत येतो. वरच्या फोटोंपैकी झाड असलेल्या टाक्याच्या नंतर उजवीकडे हे टाकं दिसतं. हे टाकं आणि रक्ताईचा डोंगर आपल्या बरोब्बर उजव्या बाजूला असताना एक ठळक वाट खाली गेलेली दिसते. तोच भुयारी दरवाजाकडे नेणारा मार्ग आहे. हा दरवाजा किल्ल्याच्या उत्तरेकडे नसून दक्षिणेकडे म्हणजेच रक्ताईच्या डोंगराच्या दिशेला तोंड करून उभा आहे.


भुयारी दरवाज्याच्या अलीकडे असणारा पण सध्या भग्न झालेला दरवाजा. मागे पुसटशी अजिंठा रांग दिसत आहे.


दरवाजाच्या बुरुजांचे अवशेष


भुयारी मार्गाच्या सुरुवातीला असलेला भव्य खंदक

सुतोंडा किल्ल्याचं सगळ्यात मोठं वैशिष्टय आणि ज्यामुळे सुतोंडा किल्ला ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध आहे असा अभिनव रचनेचा मानवनिर्मित भुयारी दरवाजा आमच्या समोर उभा होता आणि आम्ही डोळे विस्फारून त्या एकमेवाद्वितीय कलाकृतीकडे बघत होतो. किती कष्ट पडले असतील ह्याच्या निर्मात्याला….काय विचार त्याने केला असेल आणि हे दुर्गशिल्प पूर्ण झाल्यावर त्याने स्वत:चीच पाठ थोपटली असेल का हो ???
सगळंच विलक्षण !!!

दरवाजाच्या माथ्यावरील शरभशिल्प आणि तोफेचा गोळा डागण्यासाठी तयार केलेली जागा.

दरवाजावरील "केवल शरभ" ह्या प्रकारातील शरभशिल्प

विस्मयचकित करणारा सुतोंड्याचा भुयारी मार्ग. लाल गोलात शरभशिल्पाची जागा दाखवली आहे.

तृप्त मनाने आम्ही किल्ला उतरून खाली आलो. आता मनात उत्तरेकडचा "अदृश्य दरवाजा" शोधण्यात वाया गेलेल्या वेळेचं दु:ख नव्हतं तर अवचितपणे गवसलेल्या त्या अद्भुत दुर्गशिल्पाची दृश्य अजूनही तरळत होती !!! प्रस्तुत पुस्तकातील माहिती पूर्णपणे चुकीची असल्याची खात्री पटली पण आता आपण तरी आपल्या गिर्यारोहक मित्रांना तपशीलवार आणि अचूक माहिती देऊ शकतो ह्याचं समाधान होतं. त्या पुस्तकाचे लेखक माझे अगदी जवळचे मित्र असल्याने त्यांना योग्य ती माहिती मी पुरवली आणि त्यांनीही त्यांची चूक मान्य करून त्या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत त्यात बदल करण्याचं मान्य केलं आहे.  
(त्या पुस्तकाचं आणि त्याच्या लेखकाचं नाव न देण्याचं कारण म्हणजे आमचा अनुभव वाचून त्यांच्या सगळ्याच पुस्तकांमध्ये अशीच दिशाभूल करणारी माहिती आहे की काय…अशी भावना गिर्यारोहकांच्या मनात येऊन त्या लेखाकाविषयीचा आणि त्यांच्या भटकंती व अभ्यासावरचा विश्वास निघून जाऊ नये हा शुद्ध विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांचं नाव द्यायचं टाळलं आहे. एक गिर्यारोहक आणि दुर्गप्रेमी म्हणून ते नीतीमत्तेला अनुसरून होणार नाही. ह्या संपूर्ण ब्लॉगमध्ये पाचही किल्ल्यांची विस्तृत आणि तपशीलवार माहिती मी दिलेली आहे. पण तरीही सुतोंडा किल्ल्याच्या किंवा अन्य कोणत्याही किल्ल्याच्या माहितीबद्दल काही प्रश्न असल्यास थेट मला संपर्क साधावा).  
आम्ही नायगावात परतलो. साडेअकरा वाजले होते. दरवाजा शोधण्यात वेळ गेला नसता तर कदाचित आम्ही तासभर आधीच पोहोचलो असतो. पण पुढचे वेताळवाडी आणि वैशागड चढायला अगदीच सोपे असल्याने आजच्या दिवसातलं शारीरिक कष्टांचं छोटंसं टार्गेट संपलं होतं. नायगावात एका झाडाखाली विष्णूची विलक्षण सुंदर आणि रेखीव मूर्ती असून सुतोंडा भेटीत ती अजिबात चुकवू नये.


आम्ही आता बनोटीकडे निघालो. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. नायगाव ते बनोटी ह्या रस्त्यावर एका ठिकाणी पूर्णपणे चिखल पसरला होता. आधीच रस्ता अरुंद. तेवढयात समोरून येणा-या एका बाईकवाल्या स्थानिक तरुणाने जालिंदरकाका उर्फ सारथी ह्यांनी योग्य तो इशारा देऊनही आपली गाडी पुढे दामटवली आणि आमच्या गाडीला हलकासा "Cut" दिला. ह्यावर काकांनी "तुला माहित नसेल तर सांगतो !! हे सगळे जण "डिपार्टमेंट" चे लोक आहेत. गाडी जरा बघून चालवत जा. नाहीतर ह्यांचं डोकं फिरलं तर तुझं लायसन्स कायमचं जप्त करतील !!" अशी धमकी दिल्यावर त्या पोराचा चेहेरा बघण्यासारखा झाला आणि गाडीत प्रचंड हशा पिकला !!! 
बनोटीमध्ये कालच्या खानावळवाल्याला सकाळीच चहा आणि पोह्यांची ऑर्डर देऊन ठेवलेली असल्याने आम्ही गेल्यागेल्या गरमागरम चहा आणि पोहे समोर आले आणि काही क्षणात पोह्याचं ते भलमोठं पातेलं बघताबघता रिकामं झालं. आता बनोटी ते सोयगाव हा जवळपास पस्तीस किलोमीटर्सचा प्रवास सुरु झाला. पण आमचा आनंद फार काळ टिकणार नव्हता. कारण बनोटी सोडल्यावर काही वेळातच आमचा आणि पर्यायाने जालिंदरकाकांचा अंत बघणारा अत्यंत सुमार अवस्थेतला रस्ता सुरु झाला. ह्याला गाडीरस्ता का म्हणावं असा प्रश्न पडावा आणि काही ठिकाणी आपण नक्की पृथ्वीवर आहोत की चंद्रावर अशी शंका यावी ह्या आकाराचे खड्डे आमची क्षणाक्षणाला हाडं मोडू लागले !!! गाडीत निवांत झोप काढण्याचा प्लॅन सुद्धा शब्दश: "खड्ड्यात गेला" !!! ही बघा ह्या रस्त्याची झलक.


आता माघार नव्हती आणि पुढे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं !! पण बनोटी ते पार वैशागड ह्या संपूर्ण आणि लांबलचक प्रवासात आम्हाला एकही एस.टी दिसली नाही ह्याचं कारण असले भिकार अवस्थेतील रस्तेच असावेत. शेवटी त्या एस.टी ड्रायव्हरला पण स्वत:च्या बायकापोरांची काळजी असेलच ना !! काही केल्या ह्या नरकयातना संपायला तयार नव्हत्या. एका क्षणी तर "आता ह्यापुढे किल्ल्याच्या वरपर्यंत अगदी हायवे जरी असेल तरीही मी गाडी घालणार नाही !!" अशी घोषणा करून ड्रायव्हर काकांनी पूर्णपणे असहकार पुकारला. कमालीचा कष्टदायक असा हा प्रवास होता. तिडका वगैरे गावं मागं पडत चालली होती. अखेरीस न राहवून समोरून बाईकवर येणा-या एका काकांना आम्ही ह्या रस्त्याचा अंत विचारला आणि त्यांनीसुद्धा बहुदा आमच्या केविलवाण्या चेहे-यांवरचे भाव अचूक टिपले असावेत. कारण पुढे चार किलोमीटर्स नंतरच्या कवळी गावानंतर व्यवस्थित रस्ता असल्याची  माहिती त्यांनी पुरवली आणि आमचा जीव खड्ड्यातून भांडयात पडला !!!

खणखणीत तटबुरुजांचा आणि प्रेक्षणीय वास्तूंचा मूर्तिमंत आविष्कार : सर्वगुणसंपन्न असा वेताळवाडी किल्ला

सोयगाव पासून हळदा घाटमार्गे आम्ही आता वेताळवाडी किल्ल्याकडे निघालो. सोयगाव ते वेताळवाडी किल्ला हे अंतर जवळपास सहा - सात किलोमीटर्स असून रस्त्याची अवस्था ब-यापैकी चांगली होती. वेताळवाडी गाव जसजसं जवळ येऊ लागलं तसा वेताळवाडी किल्लासुद्धा स्पष्ट होऊ लागला.


वेताळवाडी किल्ल्याच्या पायथ्याचं वेताळवाडी गाव समोर आलं आणि गडावरच्या वास्तू स्पष्ट दिसू लागल्या. 


वेताळवाडी किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर असलेली आणि विलक्षण सुंदर बांधकाम केलेली कमानीची वास्तू आणि त्याच्या खाली वेताळवाडी गावाच्या दिशेला असलेल्या वेताळवाडी दरवाजाची भक्कम तटबंदी 

हळदा घाटाची साचेबद्ध आणि कमनीय वळणं सुरु झाली. ह्यातल्या प्रत्येक वळणावरून दिसणा-या वेताळवाडी किल्ल्याने आमची ओढ अजूनच वाढवली. 

हळदा घाट पूर्ण चढून माथ्यावर पोहोचलो आणि वळून बघितलं तेव्हा ट्रेकसाठी ह्या भागाची निवड केल्याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटून घ्यावी असं क्षणभर वाटून गेलं !!! खणखणीत तटबंदी आणि बुरुजांनी सजलेला कमालीचा देखणा असा वेताळवाडी किल्ला आमच्यासमोर उभा होता.

गडाच्या मुख्य दरवाजापासून पश्चिमेकडे धावत गेलेली एकसंध तटबंदीसुद्धा लक्ष वेधून गेली.

वेताळवाडी किल्ल्याच्या दरवाजाची अभूतपूर्व रचना

हळदा घाट जिथे संपतो तिथे गाडी उभी करून आम्ही वेताळवाडी किल्ल्याच्या दरवाजाकडे निघालो. निळ्या आभाळाखाली अचल आणि सजगपणे उभ्या असलेल्या दरवाजाच्या संरक्षक बुरुजांची भव्यता जवळ जाताना पटू लागली.

वेताळवाडी किल्ल्याचा भक्कम आणि भव्य बुरुज आणि त्याच्या पुढे असलेली "जिभी". जिभी ह्याचा अर्थ दरवाजाच्या पुढे अशी एक भिंत उभारली जाते जेणेकरून बाहेरील व्यक्तीला दरवाजात किंवा त्याच्या आत चालणा-या हालचाली दिसू नयेत.
 वेताळवाडी किल्ल्याचा भव्य आणि सुस्थितीतील दरवाजा आणि त्याच्या वर असणारी शरभ शिल्प 

 वेताळवाडीच्या दरवाजावरील "केवल शरभ"

दरवाजातून आतमध्ये आल्यावर उजवीकडे पहारेक-यांसाठी असलेली ही प्रशस्त देवडी आहे.

दरवाजा पार करून आपण किल्ल्याच्या मुख्य पठारावर पोहोचतो. इथे किल्ल्याचा पहिला टप्पा असून हा टप्पा तटबंदीने संरक्षित केला आहे.

इथून वरती पाहिल्यास वेताळवाडी किल्ल्याचा बालेकिल्ला व त्याची तटबंदी दिसते

तटबंदीतला हा सुंदर बुरुज निळ्याशार आभाळाच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधून गेला

दरवाजातून आतमध्ये येउन पहिल्या टप्प्यावर आलो की दरवाजाच्या बुरुजावर जाण्यासाठी पाय-या आहेत. इथून पुढे गडाला फेरी मारण्यासाठी उजवीकडे वळायचं आणि बालेकिल्ला डाव्या हाताला ठेवत मळलेली पायवाट पकडली की गडावरच्या एकेका अवशेषाला सुरुवात होते. ह्या वाटेच्या सुरुवातीलाच उजवीकडे बुरुजात एक छोटा दरवाजा दिसतो.

दरवाजाच्या काही पाय-या उतरून आम्ही खालच्या भागात पोहोचलो आणि थंडगार वा-याचा झोत सुखावून गेला. वेताळवाडी किल्ल्याच्या बुरुजामध्ये ही "हवामहल" सारखी भासणारी सुंदर खोली बांधून काढली आहे. अतिशय कल्पक अशी ही रचना असून ह्या झरोक्यांमधून अंगावर शहारा आणणा-या वा-याच्या झोताने दुर्गनिर्मात्याच्या रसिकपणाची ग्वाही दिली. 

गडाच्या वाटेवर डावीकडे हे खांबटाकं आहे. ह्यातील पाणी तर पिण्यायोग्य नाहीच पण ह्याच्या आत वटवाघळांची अख्खी जनता वसाहत आहे !!

ह्या टाक्यानंतर वाट आता पूर्णपणे डावीकडे वळली. ह्या वळणावर हा एक बुरुज उभा आहे. तत्पूर्वी गडाच्या दरवाजाच्या बुरुजावर गडावर गुरं घेऊन आलेले हळदा गावचे सुदाम बोराडे नावाचे स्थानिक ग्रामस्थ भेटले. अतिशय नम्र आणि आतिथ्यशील स्वभावाच्या सुदाम मामांनी आम्हाला स्वत:हूनच किल्ला दाखवायची तयारी दर्शवली आणि आमचं काम सोपं केलं. 

गडाच्या बालेकिल्ल्याची पाच मिनिटांची सोपी चढण संपवून आम्ही  बालेकिल्ल्यावर पोहोचलो आणि समोर  ही घुमटाकार वास्तू दिसली. ही नेमकी कसली वास्तू आहे ह्याचा अंदाज लावता येणं अवघड आहे. पण गुप्तधनाच्या हव्यासापोटी ह्या वास्तूत अनेकदा खोदकाम झाल्याची माहिती सुदाम मामांनी दिली. 

या घुमटाकार वास्तूपासून आम्ही सरळ गेलो आणि मामांनी आम्हाला किल्ल्याच्या तटबंदवरून न्यायला सुरुवात केली. ह्या तटबंदीवरून किल्ल्याच्या भक्कमपणाची कल्पना तुम्हाला येईल.

तटबंदीच्या शेवटी आपण खालून पाहिलेला सुंदर बुरुज उभा होता. वेताळवाडी धरणाचा सहवास लाभलेलं ते दृश्य आम्ही कितीतरी वेळ बघतच बसलो !!!

बुरुजाच्या झरोक्यातून एखादया सळसळत जाणा-या नागिणीसारखी हळदा घाटाची कमनीय वळणं दिसत होती !!
वेताळवाडी किल्ल्याच्या खणखणीत तटबंदीचा बुरुज बघून झाल्यावर आम्ही आता गडावरील अंबारखाना म्हणजे धान्यकोठाराच्या समोर येउन पोहोचलो. इथे पुरातत्व विभागाने लावलेला फलक आपल्याला दिसेल.

कदाचित पुरातत्व विभागाचं लक्ष असल्याने हे धान्यकोठार आतमधून अतिशय स्व्च्छ आहे.

कोठाराच्या बाहेर असलेला तेल साठवायचा रांजण (??)

कोठाराच्या जवळील वाड्याचे अवशेष

आम्ही आता किल्ल्याच्या पश्चिमेकडे जायला सुरुवात केली. वाटेत ही नमाजगीर नावाची इमारत लागते.

ह्या वास्तूच्या आतील सुंदर कमानी.

नमाजगीरच्या समोरच वेताळवाडी किल्ल्यावरचा हा प्रचंड मोठा बांधीव तलाव आहे. सध्या जरी ह्याच्यात गाळाचं साम्राज्य असलं तरीही सद्यस्थितीत किल्ल्यावरचा हा एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. त्यामुळे आपल्याकडे पाणी स्वछ करायचं लिक्विड असल्यास हेच पाणी वापरावं लागतं.   

 पुढे पश्चिमेकडे किल्ल्याची निमुळती होत जाणारी माची असू त्याच्या सुरुवातीला ही सदरेची वास्तू लागली.

आणि ह्या माचीच्या शेवटी आम्ही  समोर येउन पोहोचलो ते अशा एका वास्तूच्या जीने आम्हाला अगदी वेताळवाडी गावापासूनच ओढ लावली होती आणि जिच्या केवळ अस्तित्वानेच वेताळवाडी किल्ला एक अविस्मरणीय कलाकृती बनला आहे तीच ही वास्तू…बारदरी उर्फ हवामहल !!! राजघराण्यातील स्त्रियांना संध्याकाळचा पश्चिमेकडील वारा खाण्यासाठी खास तयार केली गेलेली ही वास्तू आहे. ह्या वास्तूच्या आत कोणतही बांधकाम नाही आणि ह्याला कोणतं छतसुद्धा नाही. आजही आपण ह्या महालाच्या आत उभे राहिलो की ह्याच्या बांधणीची सार्थता पटते !!!

काय ह्या कल्पकतेचं कवतिक करावं आणि किती धन्यवाद ह्याच्या निर्मात्याच्या सुबक विचारांना आणि रसिकतेला द्यावेत !!! कदाचित आम्हाला ह्या महालात उभं राहिल्यावर स्वत:चा विसर पडला तसा त्या कुशल आणि रसिक अनामिकालाही ही वास्तू बांधताना जगाचा आणि पर्यायाने स्वत:चा विसर पडला असावा आणि म्हणूनच ही अजोड निर्मिती तो करू शकला !!! 

हवामहालाच्या सुंदर कमानी आणि त्यातून दिसणारे अविस्मरणीय नजारे

वेताळवाडी गाव  
 

 हवामहालाच्या डोईवर आता निळं आभाळ दाटून आलं होतं

हवामहालापासून समोर हा किल्ल्याचा भक्कम बुरुज दिसत होता

हवामहालापासून आम्ही आता वेताळवाडी गावाच्या दिशेला उतरायला सुरुवात केली. वेताळवाडी गावाच्या दिशेला असलेला वेताळवाडी दरवाजा हे आता आमचं लक्ष्य होतं. 

खाली उतरून सपाटीवर आल्यानंतर समोर ह्या तटबंदीच्या "चर्या" लागतात

इथे समोरच एक खणखणीत अवस्थेतील तोफ पडली आहे.

तोफेच्या समोरच्या तटबंदीतील पाय-या उतरल्यावर वेताळवाडी किल्ल्याचा चोर दरवाजा लागला

दरवाजातून आतमध्ये गेल्यावर वरच्या  बुरुज असून खाली बांधीव खंदक आहे

चोर दरवाजा बघून आम्ही आता वेताळवाडी किल्ल्याच्या वेताळवाडी दरवाजाकडे निघालो. ह्या दरवाजांच्या समूहापैकी पहिला सध्या बांधणीचा दरवाजा लागला.

त्याच्याच पुढे मुख्य वेताळवाडी दरवाजाला जाणारी वाट असून हा दरवाजा दोन्ही बाजूंनी अजस्त्र तट व बुरुजांनी संरक्षित केलेला आहे.

दरवाजाच्या अलीकडे ह्या देवड्या आहेत

वेताळवाडी दरवाजातून दिसणारे वेताळवाडी धरण

दरवाजाच्या पाय-या उतरून आम्ही बाहेर पडलो आणि मागे वळून पाहिल्यावर हा आजही उत्तम स्थितीत असलेला वेताळवाडी दरवाजा दिसला

दरवाजाच्या संरक्षक बुरुजावर ही शरभ शिल्प कोरली आहेत 

दरवाजाला कुशीत घेणा-या बुरुजांची भव्यता बघून अवाकच झालो !!

दरवाजातून दिसणारं टुमदार वेताळवाडी गाव आणि हिरवागार बहरलेला आजूबाजूचा प्रदेश

त्या बुरुजाची भव्यता डोळ्यात सामावून घेत असतानाच अचानक लख्ख सूर्यप्रकाश आला आणि त्याच्यात  डोईवरचं आभाळ आणि वेताळवाडीचा दरवाजा उजळून निघाला !!! मनासारखा मिळालेला फोटो !! 

रुद्रेश्वर लेण्यांच्या डोंगरावर ऊन - सावलीच्या पाठशिवणीचा सुरेख खेळ सुरु झाला होता

सुजलाम सुफलाम झालेलं वेताळवाडी गाव आणि परिसर. कागदपत्रांमध्ये वेताळवाडी किल्ल्याचा उल्लेख "बैतुलवाडी" असा येतो. असं म्हणतात की वेताळवाडी गावच्या लोकांना वेताळवाडी किल्ल्याच्या नावातला "वेताळ" हा शब्द आवडत नसल्याने ते ह्या किल्ल्याला फक्त "वाडीचा किल्ला" ह्या नावाने संबोधतात 

दरवाजा बघून आम्ही पुन्हा किल्ल्याच्या मुख्य पठारावर आलो. वेताळवाडी गावाच्या दिशेला तुरळक तटबंदी आणि काही भग्नावशेष आहेत.

वेताळवाडी किल्ल्यावरून दिसणारं वेताळवाडी धरणाचं विहंगम दृश्य !!! सर्वात मागे अजस्त्र विस्ताराचा वैशागड उर्फ जंजाळयाचा किल्ला.

चार वाजत आले होते. आम्ही केलेल्या पाच किल्ल्यांपैकी स्वत:च्या अपूर्व देखणेपणामुळे आणि विलक्षण अवशेषांमुळे आमच्या मनात ध्रुवता-यासारखं अढळस्थान निर्माण केलेला वेताळवाडी किल्ला अतिशय मोहक दिसत होता. 

ह्या लाजवाब किल्ल्याला अखेरचा सलाम करून आम्ही वेताळवाडी किल्ल्याचा निरोप घेतला. उरलेला हळदा घाट पार करताना वेताळवाडी किल्ल्याचा एक एक सुंदर अवशेष डोळ्यासमोर तरळत होता !!


आम्ही वेताळवाडी किल्ला बघून निघालो आणि आमच्यातल्या पुनीतला तातडीने पुण्याला जावं लागेल असा फोन आला. आजच्या दिवसातला आणि ट्रेकमधलाही शेवटचा वैशागड फक्त उरला होता. पण त्याचं पुण्याला जाणं अपरिहार्य होतं. त्यामुळे त्याला सिल्लोड - गोळेगाव - जळगाव रस्त्यावरच्या अंभई गावात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आम्ही आमचा शेवटचा किल्ला पूर्ण करून नाशिकला निघायचं असं ठरलं. हळदा घाटानंतर हळदा गाव ते अंभई ह्या रस्त्यावर उंडणगाव नावाचं एक गाव आहे. त्या गावातली शाळा मुक्कामाला अप्रतिम !!! इतकी सुरेख आणि नेटकी ठेवलेली शाळा त्या संपूर्ण परिसराने स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्यांदाच बघितली असेल !! अखेर आम्ही अंभईला पोहोचलो. पुनीतला सिल्लोडला जाणारी गाडी लगेचच मिळाली आणि पाच वाजले असल्याने आम्हीही तिथेच चहासाठी थांबलो. समोरच एका हॉटेलमध्ये गरमागरम वडापाव आणि पाव पॅटिस तळण्याचा कार्यक्रम सुरु होता. ह्या दोन्ही चमचमीत पदार्थांचा आकार,कमालीचा आकर्षक रंग आणि घमघमणारा खमंग वास आणि त्यात चहाची वेळ हे सगळं कसं जुळून आलं होतं. दुपारचं जेवणही आम्ही वेळ जाऊ नये म्हणून स्कीप केलं होतं. तोंडाला पाण्याचा धबधबा सुटला होता !! कोणीही न सांगता गाडी त्या हॉटेलसमोर थांबली आणि आम्ही गाडीतून उतरणार इतक्यात मागून एक टेंपो आला आणि जवळपास किलोभर धूळ त्या वडापाववर उडवून शांतपणे निघून गेला !!!! आमच्या तोंडाला सुटलेल्या धबधब्यानेही ते "अभूतपूर्व" दृश्य बघून रिव्हर्स गियर टाकला आणि पुन्हा आमच्या घशाला कोरड पडली !!! ते वडापाव आणि पाव पॅटिस विकत घेण्याचा प्लॅन क्षणार्धात "धुळीला" मिळाला. असली "टॉपिंग्ज" बघून आमची भूक पुढच्या दोन आठवड्यांकरता मेली की काय असं वाटायला लागलं. आमची गाडी समोर थांबलीये हे बघून त्या हॉटेल मालकाचा उजळलेला चेहेरा खर्रकन उतरवून आम्ही दुस-याच हॉटेलमध्ये शिरलो आणि भेळभत्त्यावर समाधान मानून गोळेगावमार्गे जंजाळा गावचा रस्ता धरला !!!
जंजाळा गावचा रस्ता अतिशय रेखीव…घाटदार आणि संपूच नये असं वाटणारा !!! रस्त्यावर असलेल्या एकाकीपणाची भर ही त्याच्या सौंदर्यात भर टाकून गेली असावी !! आम्ही जात होतो ती संध्याकाळची वेळ किंवा आम्ही ह्या परिसरातील किल्ल्यांसाठी निवदेलेला ऋतू अगदी योग्य होता…ह्या गोष्टीचाही हा परिणाम असेल कदाचित. पण डोळ्याला सुखावून जाणारा हा प्रवास होता !!  जंजाळा गाव ते वैशागड हा परस्ता अतिशय अरुंद खराब आणि अस्वच्छ. वैशागडच्या अलीकडे जंजाळा गावातली मुसलमान वस्ती असून इथे गाडीरस्ता संपतो आणि पुढे गावातली शेतं सुरु होतात. पावणेसहा वाजत आले होते. रविकिरणांचा रंग बदलायला सुरुवात झाली. जंजाळा गावातून शेतांच्या वाटेने दहा पंधरा मिनिटं चालून गेल्यावर एक वाटनाका आला आणि तो आमच्या समोर उभा राहिला ते एक भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊनच !! जंजाळा गावाच्या थोडं खालच्या बाजूला प्राचीन अशी घटोत्कच लेणी असून शासनाने / वनविभागाने / पुरातत्व खात्याने रितसर सिमेंटच्या पाय-यांचा मार्ग लेण्यांपर्यंत बांधून काढला आहे. आमच्यासाठी वैशागड आणि घटोत्कच लेणी ही दोन्ही ठिकाणं तितकीच महत्वाची होती. पण प्रश्न होता तो वेळेचा !!! सकाळी सुतोंडा किल्ल्याच्या भुयारी मार्गाच्या शोधमोहीमेने बराच वेळ खाल्ला होता… त्यात भर म्हणून बनोटी ते सोयगाव ह्या टुकार रस्त्याने मानसिक आजारपण तर आणलंच होतं पण वेळेचाही प्रचंड अपव्यय केला आणि त्यात आता ही परिस्थिती समोर उभी राहिली. योग्य निर्णय घ्यावा लागणार होता. हृषीकेश,सुरज आणि डायवर काकांनी लेण्यांचा रस्ता धरला आणि आता त्या एकाकी पठारावर मी,हेमंत आणि नाना असे तिघेच उरलो. वेळ भरभर पुढे सरकत होता. मन वैशागडाकडे झुकतं माप देत होतं. ह्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे वैशागडावर आम्ही ह्यापूर्वी कधीही न बघितलेलं एक कमालीचं सुंदर शरभशिल्प आहे जे महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही किल्ल्यावर सापडणार नाही. इतक्या लांब येऊन हे दुर्गवैशिष्टय आणि वैशागडसारखा एक आडवाटेवरचा किल्ला न बघता गेलो तर मनाला कायमची हुरहूर लागेल हे नक्की होतं. शेवटी जड मनाने निर्णय घेऊन घटोत्कच लेण्यांना दुरूनच दंडवत घातलं आणि आम्ही तिघांनी आता वैशागडाची पायवाट तुडवायला सुरुवात केली !!

देखणं "लोकेशन" लाभलेला - वैशागड

जंजाळा गावच्या हिरव्यागार शेतातून दिसणारा अजस्त्र वैशागड आता ओढ निर्माण करत होता

पश्चिमेकडे तेजोनिधीनेही आपला संसार आवरायला सुरुवात केली होती. कमालीचं सुंदर दृश्य होतं ते. वेळ पुढे सरकत होता. पायांची गती वाढली होती. पण हा नजारा बघून वेग आपोआपच मंदावला…डोळे विस्फारले गेले आणि वाहत्या वा-याबरोबर कॅमे-याच्या शटर्सचा आवाज आसमंतात पसरू लागला !!!


जंजाळा ते वैशागड हा लाल मातीचा रस्ता आहे. कितीही वेगाने चालत होतो तरीही वैशागड अजूनही लांबच होता.


सुमारे पंचवीस मिनिटं तंगडतोड केल्यावर गडाची पहिली तटबंदी समोर आली.


 वैशागडच्या मार्गावरून संध्याकाळच्या सोनेरी किरणांमध्ये न्हाउन निघालेली अजिंठा - सातमाळा रांग अप्रतिम दिसत होती. 

वैशागडच्या प्रवेशद्वाराजवळील तटबंदी


 वैशागडचे भक्कम बुरुज आणि किल्ल्यात घेऊन जाणारी पायवाट 


किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर किल्ल्याचा हा भग्न दरवाजा लागला


दरवाजातून आत प्रवेश केल्यावर किल्ल्याचा प्रचंड पसारा क्षणार्धात लक्षात आला. गडाच्या मुख्य भागाकडे जाताना लागणा-या पठारावर असलेल्या तटबंदीत ही कमान आहे. हा कोणताही दरवाजा नाही

वैशागडाची खणखणीत तटबंदी. या तटबंदीमध्ये सुद्धा एक दरवाजा असून त्याकडे नेणारी मोठी पायवाट स्पष्ट दिसत आहे. गडाच्या पठारावर हा एक मोठा तलाव आहे. पाणी पिण्यायोग्य अजिबात नाही. पण त्या नितळ जळांत स्वत:चंच रूप न्याहाळणारी सायंकाळ अविस्मरणीय होती. नानांनी ह्याच तलावापाशी फोटोग्राफीसाठी थांबायचा निर्णय घेतला आणि आता मी आणि हेमंत किल्ल्याकडे निघालो.


 

किल्ल्याच्या प्रचंड विस्तारलेल्या पठारावरून आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडीतून झपाटयाने मार्ग काढत आम्ही किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. इथे कमान असलेली एक वस्तू सुस्थितीत असून त्याच्या समोर पुरातत्व खात्याने बोर्ड लावला आहे.


वरच्या वास्तूच्या आतील भाग. पुरातत्व खात्याच्या देखरेखीमुळे ही वास्तू अतिशय स्वच्छ आहे.


ही वास्तू उजवीकडे ठेवत आम्ही किल्ल्याच्या पश्चिमेकडे आलो आणि अखेरीस ज्यासाठी इतका अट्टाहास आणि जीवाचा आटापिटा करत सगळी धावपळ केली ते शरभशिल्प अखेर नजरेत भरलं !! ह्या शरभाला शिंगे असून तीन पायांना धारदार नखं कोरलेली आहेत. ह्या शरभाने सर्वात पुढच्या पायात हत्ती पकडला असून ह्याच्या गळ्यात घुंगरू आहेत (कालौघात हे बारकावे अस्पष्ट होत चालल्याने पटकन दिसत नाहीत पण फोटो झूम केल्यास सगळं व्यवस्थित दिसतं). ह्याच्या पाठीवर बैलाप्रमाणे झूल घातलेली असून शेपूट अतिशय झुपकेदार आहे.

वैशागडावरची सर्वात महत्वाची गोष्ट आता बघून झाली होती. पण किल्ल्यावर असलेली तोफ मात्र त्यात दिलेल्या वर्णनाप्रमाणे कुठेही सापडत नव्हती. अखेर सूर्य मावळतीला जात आहे हे बघून आम्ही उरलेल्या गडाचा निरोप घ्यायचा निर्णय घेतला. गडावर वर दिलेल्या अवशेषांशिवाय राजवाड्याचे अवशेष आहेत ज्याचा फोटो आम्हाला पुरेसा उजेड नसल्याने काढता आला नाही. बाकी वेताळवाडी किल्ल्याच्या दिशेला एक दरवाजा असून गडावर अजून एक मोठा तलावही आहे. ह्या तलावाजवळ अनेक कोरीव दगड असून एक शिलालेख सुद्धा आढळतो. पण राजवाडा सोडता हे अवशेष आम्हाला वेळेअभावी बघता आले नाहीत ह्याचं शल्य अजूनही मनाला टोचतंय. पण जंजाळा गावापर्यंत पूर्ण अंधार पडायच्या आत चालत जायचं होतं आणि लगेचच नाशिकच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु करायचा असल्याने जड मनाने आम्ही ह्या भव्य किल्ल्याचा निरोप घेतला. पण एकदा पूर्ण दिवसाउजेडी भरपूर वेळ हाताशी ठेवून परत एकदा ह्या किल्ल्यावर येणार हे नक्की !!!  

वैशागडावरील वास्तू

 संधीप्रकाशात सुंदर दिसणारी तटबंदी 

आम्ही किल्ल्याच्या बाहेर आलो. नानांची फोटोग्राफीची इच्छा सुद्धा अगदी मनसोक्त पूर्ण झाली होती. आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आलो आणि शेवटची संधी घेऊन बघावी म्हणून मी त्या अपु-या प्रकाशातच त्या पुस्तकात असलेला तोफेचा फोटो पुन्हा एकदा नीट पाहिला आणि अचानक साक्षात्कार झाला की ज्या ठिकाणावरून तो फोटो काढला आहे त्याच्या समोरच आपण उभे आहोत !! क्षणाचाही विलंब न करता आम्ही तिघेही त्या ठिकाणी आलो आणि उन्हा पावसाचा मारा अगतिकपणे सहन करत वैशागडाची ही भक्कम तोफ उघड्यावरच बेवारशासारखी एका कोप-यात निपचित पडलेली दिसली. ना पुरातत्व खात्याचं लक्ष ना गावक-यांचं !!! ही तोफ गडाचा मुख्य दरवाजा येण्याच्या अगदी अलीकडे मुख्य पायवाटेपासून थोडीशी उजवीकडे आहे. ह्या फोटोवरून त्याचं निश्चित स्थान कळू शकेल. फोटोत गडाचा भग्न दरवाजा दिसत असून त्याच्या अगदी जवळच ही तोफ आहे.


दुर्लक्ष झाल्यामुळे इतक्या सुंदर तोफेला कोणीही वाली उरलेला नाही ह्याचं दु:ख वाटत राहतं !!

झपाटयाने काळोखात हरवत चाललेला वैशागड. आता पूर्ण सूर्यास्त झाला होता.

वैशागड व त्याच्यामागचा हिरवागार प्रदेश.

पर्वतांची दिसे दूर रांग….काजळाची जणू दाट रेघ !!! ह्या ओळी स्मराव्यात इतकं विलक्षण दृश्य आम्ही अनुभवत होतो !!! आता मात्र कसलीही घाई नव्हती. संधीप्रकाशात बुडून गेलेली अजिंठा - सातमाळा रांग आणि जादुई वातावरणाने भारलेला आसमंत !!! एक अविस्मणीय संध्याकाळ आम्ही पाहत होतो. ह्या ट्रेकमधला हा शेवटचा फोटो !!! एक संपूर्ण समाधान !!!पायांना आता एक आपसूक येणारा निवांतपणा आला होता. अंधार प्रचंड वेगाने पसरत होता आणि मंत्रमुग्ध झालेले तीन जीव निश्चलपणे ती एकाकी पायवाट तुडवत होते…स्वत:तच कुठेतरी हरवत होते !!! जंजाळा गावात पोहोचलो तेव्हा पूर्ण अंधार पडला होता. गावात झालेली दिवेलागण हीच काय ती त्या परिसराला असलेली जिवंतपणाची खूण. घटोत्कच लेण्यांना भेट दिलेले वीरही एव्हाना गावात पोहोचले होते. का कोण जाणे पण दोन दिवसाची सुरम्य दृश्य डोळ्यांसमोरून जाईचना !!! भव्यतेचे असीम दर्शन घडवणारा आणि अवशेषसंपन्न अंतुर…कोरीव टाक्यांचा लोंझा आणि त्यावरची ती अविस्मरणीय संध्याकाळ…गूढ वातावरणातला सुतोंडा आणि त्याने स्वत:हूनच आमच्या नशिबी लिहिलेली प्रदक्षिणा…बघताचक्षणी मोहात पाडणारा…इथून किमान दोन दिवस तरी हलूच नये अशी भावना निर्माण करणारा आणि कमालीच्या रेखीव आणि सुंदर वास्तूंनी सजलेला देखणा वेताळवाडी किल्ला आणि अजस्त्रपणाची जाणीव पुन्हा एकदा जागवणारा आणि सर्वात पश्चिमेकडे असल्याने असीम दृश्य साकार करणारा वैशागड…सगळच किती देखणं…विलोभनीय आणि "मॅजिकल" !!! नाना,हेमंत ह्यांच्यासारख्या अस्सल भटक्या डोंगरमित्रांचं सह्याद्रीवरचं अपार आणि निर्विवाद प्रेम जवळून बघायला मिळालं…पुनीत,हृषीकेश सारखे नवे मित्र मिळाले…आणि जुनाच दोस्त असलेल्या सूरजबरोबर एक "भटकंती रि - युनियन" सुद्धा अगदी झक्कास पार पडलं !!! मनाच्या कोप-यात ह्या दोन दिवसांना आपोआपच एक "स्पेशल" जागा मिळाली !!!

नाशिकच्या दिशेने आता परतीचा प्रवास सुरु झाला. जाताना फरशी फाटा नावाच्या ठिकाणी एका ढाब्यावर जेवायला थांबलो. जालिंदर काकांनी आमच्या आधी पुढे जाऊन त्या हॉटेलवाल्याच्या कानात असं काही सांगितलं की त्याचा आमच्याबद्दलचा आदर काहीही कारण नसताना आणि कसलीही ओळख नसताना अचानक वाढला. काकांनी त्याला "आम्ही पोलिस आहोत आणि जेवणाविषयी जर ह्यांच्यातल्या एकाकडून जरी तक्रार आली तरी इथेच तुझं दुकान ते बंद करतील" अशी इरसाल धमकी त्या हॉटेल मालकाला दिली आणि त्याचा योग्य तो परिणाम साधला गेला !!! त्या हॉटेलच्या मेनुकार्डाने शुद्धलेखन ह्या संकल्पनेचा जो काही उद्धार केला होता त्याला तोड नाही. बघा त्यात काय काय "गमती" होत्या ते !!!
अखेर नाशिकला पोहोचायला पहाटेचे चार वाजले. नानांनी वैशागड सोडतानाच घरी मुक्काम करण्याची धमकीच दिल्याने ती आज्ञा न पाळण्याची सोयच नव्हती. रविवार मात्र नाशिककरांच्या  आदरातिथ्यामुळे अविस्मरणीय झाला. नाशिकचे सुप्रसिद्ध सर्जन असलेल्या डॉ. हेमंत बोरसे ह्या दिलखुलास गिर्यारोहक व्यक्तिमत्वाशी भरपूर गप्पा झाल्या…. नाष्ट्याला मस्तपैकी नाशिकची सुप्रसिद्ध शामसुंदर मिसळ हादडली…त्यानंतर महाराष्ट्राला सुपरिचित असणारे नाशिकचे दुर्गसंशोधक व ज्येष्ठ गिर्यारोहक गिरीश टकले ह्यांचीही भेट झाली आणि मगच ह्या अविस्मरणीय दुर्गभ्रमंतीची मनासारखी सांगता झाली !!!

ओंकार ओक

Comments

 1. ओंकार, किती भाग्यवान आहेस यार तू!...I envy YOU! :D असो, तिन्ही लेख जबरी अन् प्रकाशचित्रे तर एकदम लाजवाब आणि आशयाला अधिक बळकट करणारी - खूप मस्त!...पायाला अशीच भिंगरी असु दे आणि असेच उत्तमोत्तम दुर्गदर्शन सोहळे तुझ्या हाती लिहून पार पडू देत ही सदिच्छा!... :)

  ReplyDelete
 2. अफ़ाट आहे राव सगळंच !
  तुमच्या पेशन्सना आणि प्रयत्नांना मानाचा मुजरा मित्रा _/\_

  ReplyDelete
 3. Mast... mast... kupach mast.......!!!!!

  ReplyDelete
 4. ओंकार,

  "पुस्तकातील आणि मी दिलेल्या माहिती मध्ये कमालीची तफावत होती आणि खरी माहिती कुठली याचा प्रत्यय आलाच "

  च्या मारी तुझ्या…… !! पुस्तकातील चूक उलगडून दाखवलीस पण खरी माहिती दिल्याबद्दल क्रेडिट तरी दिलखुलासपणे दे, ते मोघमपणे लिहिलेस. पक्का पुणेरी रे तू……

  राजन

  ReplyDelete
 5. राजन,
  ..शेवटी राजनने दिलेली माहितीच खरी ठरली.. एवढा दिलखुलास उल्लेख केलाय नां त्याने..! खांद्यावर घेतलं तर डोक्यावर रेडीओ ठेवता तुम्ही च्यायला...
  उलट याबद्दल तू सगळ्या बिल्डींगीस लायटींग करून फुक्कट फटाके वाटायस हवेस सगळ्यांस..! :)
  - हेमंत

  ReplyDelete
 6. ओंकार,
  खूप छान + तपशीलवार + मनापासून + मेहेनेतीने लिहिलंयस…
  दिग्गज ट्रेकर्स बरोबरचे अनुभव आणि फोटोज यांची भट्टी जमलीये. त्यामुळे ट्रेकर्स आणि हौशी पर्यटक अश्या दोन्ही प्रकारच्या वाचकांना आवडेल आणि उपयोगी पडेल.
  सह्याद्री घाटांची "मोहिनी" सोडत/ सोडवत नसल्याने, आमचा अजंठा रांग ट्रेक "याद्यांमध्येच बिनसतो", आणि "बोहल्यावर चढत नाही" ;)
  - साई (http://www.discoversahyadri.in/)

  ReplyDelete
 7. Onkar, I just read all the three blogs back to back and was mesmerized with the richness of the forts and your minute detailing! Really you have compiled a very useful information of these offbeat forts and it would be helpful for future trekkers. Also, your precautions regarding food and water will help other trekkers to prepare better. Looking at the photos, I feel the best time to visit these forts would be during or just after monsoon. Your wit and humor added fun to the whole experience and I enjoyed every bit of it! Trekking with so many legends together must have been a lifetime experience! Overall, great blog! Keep it up!

  ReplyDelete
 8. फोटो अतिशय कडक आलेत… खूपच जिवंत वाटतात फोटोज…
  नेहमीप्रमाणे अफाट लेखन आणि जबरदस्त मांडणी… अनवट किल्ल्यांची योग्य माहिती… योग्य प्रकारे… योग्य शब्दात… पुरवलीस… झकास
  एकंदरीतच… आम्ही सगळे ह्या भागात मुशाफिरी करायला म्हातारपणी जाणार आहोतच… तेव्हा तुझ्या ब्लॉगपोस्ट ची प्रिंट काढूनचं जाणार… उगीच पुस्तकावर कशाला विश्वास ठेवायचा? :)
  मस्त लिखाण… वाचून मजा आली…
  लगे रहो…

  टीप : राजन साहेबांना योग्य ते क्रेडीट दे रे बाबा… ते खरंच Deserve करतात... शिवाय आपल्या पुण्याच्या इज्जतीचा ही प्रश्न आहेचं कि रे …

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक