एक " बुंगाSSSट" रविवार !!!

एल.एल.बी. च्या परीक्षेचा शेवटचा पेपर !! वेळ काही केल्या पुढे सरकत नाहीये आणि "Remedies for the Breach of Contract" चं भलं मोठं उत्तर लिहिताना नाकी नऊ आले आहेत….डोळ्यासमोर कशेडी घाटाची कमनीय वळणं तरळत आहेत…वरंध्यातून लांबवर दिसणारे राजगड,तोरणा,मढे - उपांडया,रायगड आणि गोप्या घाटाच्या करवतलेल्या कड्यांनी हृदयाचे ठोके चुकवले आहेत…आंबेनळीतून दिसणारी ढवळे ते ऑर्थरसीटची रांग अधिकच रौद्रभीषण झाली आहे….प्रतापगडाची आभाळउंची नजरेच्या कक्षा केव्हाच भेदून गेली आहे…. पण साला तो शेवटचा एक तास काही केल्या आपला हट्ट सोडत नाहीये !!!!!

आमच्या पुणे - भोर - वरंधा घाट - पोलादपूर - कोंढवी किल्ला - आंबेनळी घाट - महाबळेश्वर - पुणे ह्या एका दिवसात जवळपास ३५०-४०० किलोमीटर्स कव्हर करणा-या जंगी प्लॅनला मात्र काही ना काही कारणांनी सुरुंग लागतच होता. त्यामुळे दिवाळीमध्ये घरच्यांकडून आपले लाड पुरवून घेतले आणि ऐन दिवाळीत आमच्या आयुष्यात दरोडेखोरासारख्या घुसलेल्या परीक्षेमार्फत युनिव्हर्सिटीचे फाजील लाड पुरवून झाले की निघायचं ह्या निर्णयाप्रत मी आणि हर्षल आलो आणि रविवारी सकाळी पाचच्या ठोक्याला आलेल्या हर्षलच्या फोनने फायनली आपल्याला आज हा दिवस बघायला मिळतोय ह्याची सुखद जाणीव करून दिली !!! भोरचा नेकलेस पॉइंट गाठेपर्यंत थंडी हाडात घुसून माहेरवाशीण झाल्यासारखी सरावली. पण नीरा नदीने नकळतपणे साधलेली ती अभूतपूर्व किमयाही धुक्याची चादर पांघरून थंडीशी भांडत होती…साखरझोपेत हरवली होती !!! रोहीडखो-यात पोहचून विचित्रगडाच्या पश्चिम पायथ्याचं आंबेघर गाठेपर्यंत त्याच्या शिरवले आणि वाघजाई बुरूजांमागून केशरी छटा उगवल्या.…पाखरांना जाग आली आणि रस्त्यांनाही जीवंतपणा आला. एसटीची लगबग सुरु झाली आणि जीपाड्यांमधून "भूपाळ्या" कानावर पडू लागल्या…!!! पण कासलोडगड उर्फ मोहनगड पायथ्याच्या शिरगावला पोहोचेपर्यंत मात्र थंडीने आमचा पिच्छा काही सोडला नव्हता. तत्पूर्वी नीरा देवघर धरणाच्या बॅकवॉटर मध्ये स्वत:च्याच प्रतिबिंबात हरवलेला मोहनगड पाहताना आम्हीही हरवलो.

         शिरगाव फाट्यावरून मोहनगड
                                

शिरगाव फाट्याच्या कोकणसेवा हॉटेलचा मालक असलेल्या आमच्या निलेश पोळला पुढच्या महिन्यात मोहनगडला येत असल्याचा सांगावा दिला. थंडी आता सरली  होती. धारमंडप फाट्याला पोहोचल्यावर समोर दिसलेल्या अन डोळ्यात अक्षरश: घुसणा-या वरंध्याच्या करवतलेल्या कड्यांनी आणि कावळ्या किल्ल्याच्या पोटातून अवखळ मुलासारख्या धावत गेलेल्या वरंध घाटाच्या रस्त्याने मात्र सकाळ प्रसन्न केली. पण त्याच वेळी हे मुल आपली हाडं खिळखिळी करण्याइतकं अवखळ आहे ह्याची बोचरी जाणीव सुद्धा होती !!! वरंध घाटाचा रस्ता वर्षानुवर्ष विकारग्रस्तच आहे…ना त्याच्यावर कसली शस्त्रक्रिया ना कसले प्रथमोपचार…सगळाच अनागोंदी कारभार !!! वरंधच्या रायगड दर्शन पॉइंटच्या अलीकडच्या वळणावर उंबर्डी गावचे दगडू पवार आजोबा घाटाच्या कट्टयावर निवांत उन्हं खात बसले होते. दगडू पवार म्हणजे वरंधपुत्रच !! घाटातून प्रवास करणा-या पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ह्यांनी सर्वात पहिल्यांदा हॉटेल पवार सुरु केलं आणि आता ही खमंग सेवेची प्रथा त्यांचा मुलगा नारायण आणि त्याच्या साथीने इतर स्थानिक तरुण अगदी समर्थपणे चालवत आहेत. काकांना अव्हेरून पुढे जाता येणं शक्यच नव्हतं !! ते बसलेली "पोझिशन" मात्र फोटोसाठी कमालीची सुंदर होती. अखेर मनाचं समाधान करून घेतलंच !!
नारायणच्या हॉटेलवर पोहोचेपर्यंत पहाटे निघताना खरपूस आणि खमंग असलेले पॅटिस मात्र आता कंटाळून निपचित पडले होते. पण नारायणच्या "दादा… अहो घरून आनलंय त्ये ठीके…पण एक पिलेट कांदाभजी तरी घ्या की…ह्ये बघा…आत्ता गरमागरम काढली हायेत !!!" ह्या आग्रहाला मात्र आम्ही सपशेल बळी पडलो. दगडू आजोबांनी हॉटेलचं लोकेशन मात्र अगदी सुरेख निवडलंय !!! समोर कावळ्याचा कोकणात घुसलेला कडा…त्यापलीकडे मढे,उपांडया,आंबेनळी (हा आंबेनळी वेगळा… ही शिवथर खो-यातून घाटावर केळदच्या दिशेला चढणारी पायवाट आहे),गोप्याचे धारदार कडे…क्षितिजरेषेवर आपल्या अस्तित्वाची गडद जाणीव करून देणारे राजगड आणि तोरणा तर हॉटेलच्या मागच्या बाजूस दिसणारा दुर्गराज रायगड !!! ह्या निमित्ताने दोन वर्षांपूर्वी वरंध घाटातून जाताना काढलेल्या फोटोंच्या आठवणी जाग्या झाल्या. आज तर वातावरण अतिशय खराब आणि धुरकट होतं. पण त्यावेळी घेतलेल्या फोटोंवरून वरंध घाटातून स्वच्छ वातावरणात काय दिसतं ह्याची कल्पना येईल.
कावळ्या किल्ल्याचा वाघजाई कडा आणि पायथ्याला छोटासा भजी पॉइंट


कावळ्या किल्ला…मागे मढे घाटाच्या डोंगररांगा…आणि क्षितीजरेषेवर तोरणा !!


दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि अगदी बारकाईने पाहिल्यास डावीकडे दिसणारा नगारखाना आणि उजवीकडे जगदीश्वर मंदिर !!!


राजगड 


तोरणा 


सर्वात खाली डाव्या कोप-यात कावळ्या व त्याचा न्हावीण सुळका ,मागे पुणे जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यातल्या शिवथर खो-यात उतरणा-या डोंगररांगा आणि मागे डावीकडे तोरणा व उजवीकडे राजगड

पवार हॉटेलवर पोटातली आग शमवून वाघजाई देवळापाशी आलो. इथेही आमची नाळ जोडलेली आहे !! विजय पवार स्वत: नसले तरी पवार मावशी आणि त्यांचा मुलगा किरणने मात्र आमच्या अनेक वर्षांच्या प्रेमाच्या नात्याचा मान राखत आम्ही काहीही न सांगता गरमागरम कांदाभजी पुढे केली आणि आम्ही पुन्हा हरवलो !!! काही वेळापूर्वीच केलेला नाष्टा हा पवार मावशींच्या मायेने आतच कुठेतरी हरवला आणि पोटात पुन्हा वरंध्याच्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांपेक्षा मोठा खड्डा पडला !!! ही नाती मात्र काही केल्या पुसली जात नाहीत…ना ह्या स्थानिक जीवलगांचा आपल्यावर असलेला लळा कमी होतो !!! विजय पवारांच्या चौकोनी कुटुंबाचंसुद्धा हेच गणित !! आणि मीही त्या निर्व्याज प्रेमाचं कोडं मात्र कधीही सोडवू शकलो नाही !! जुलै मध्ये मंगळगडला जाताना त्यांच्याच टपरीवर बसून त्या धुंद अशा श्रावणी वातावरणात मी वाजवलेल्या माऊथ ऑर्गनच्या सुरावटी सुद्धा त्यांच्या कानात अजूनही ताज्या होत्या…आणि म्हणूनच "आज तुमची ती बासरी आणली नाहीत का हो !!!!" असं विचारायला पवार मावशी अन किरण विसरला नाही !! अखेर आम्ही वरंध उतरू लागलो. कावळ्या किल्ला आता पूर्णपणे उजळला होता. त्याच्या माथ्यावरचा भगवा बेभान वा-याशी लगट करत होता आणि त्याच वेळी आम्ही मात्र घाटाच्या एकेक वळणाचा मान ठेवत रायगड जिल्ह्यात प्रवेश केला !!पोलादपूर गाठलं तेव्हा उन अक्षरश: भाजून काढत होतं !! शरीराची त्वचा ही भट्टीत भाजल्यासारखी दिसत होती. पण सात किलोमीटर्सवर असलेल्या कोंढवी गावचा पत्ता मात्र तिथल्या अनेकांसाठी अनभिज्ञच होता. शेवटी उपलब्ध माहितीच्या जीवावर कशेडी घाट चढून आम्ही धामणदेवीमध्ये पोहोचलो आणि हायवेवरच्या झाडांवर मध गोळा करणा-या कातक-यांनी एका धुसर डोंगराकडे अंगुलीनिर्देश करून कोंढवी गावाची दिशा स्पष्ट केली. कशेडी घाट म्हणजे साला लोण्याचा गोळाच !!! एकही खड्डा नाही. वळणं तर अगदी प्रेमात पडावी अशीच. वर्षाऋतूत तर ह्याचं असीम सौंदर्य काय वर्णावं !!! शब्दच थिटे पडतील. कोंढवी गाव मात्र अगदी खोल खड्ड्यात वसलं आहे. कशेडी घाटातून तर अंदाजही लागू शकत नाही की ह्या परिसरात गाव वगैरे असेल. कोंढवी गावच्या दोन वाडया आहेत. एक मुख्य कोंढवी गाव आणि त्याच्या साधारण एक किलोमीटरवर असलेली तळ्याची वाडी. ह्याच्याच वरती कोंढवी दुर्गाचा अगदी छोटा डोंगर आहे. डोंगर कसला…टेकडीच म्हणायची. तळ्याच्या वाडीतल्या संजय निकमांशी आधीपासूनच ओळख असल्याने डायरेक्ट त्यांच्याच घराची पायरी चढलो आणि सॅक त्यांच्याकडे ठेवल्या. कोंढवी गावासारख्या दुर्गम भागात वसलेल्या संजय निकमांनी किल्ल्यावरच्या अवशेषांचे फोटो दाखवायला मोबाईल काढला आणि माझे आणि हर्षलचे डोळेच फिरले !!! त्यांच्याकडे Micromax कंपनीचा Canvas २ हा फोन होता आणि साहेब Whatsapp वर सुद्धा अगदी सक्रिय आहेत हे त्यांच्याकडूनच कळालं !!! निकम काकांच्या घरात त्यांचे वृद्ध आई - वडील,त्यांचं कुटुंब आणि भाचा - भाची आहेत. पण गड उतरल्यावर मात्र हे घर आमच्या मनात काय वादळ उठवणार आहे ह्याची आम्हाला कल्पनाच नव्हती !!!

 कोंढवी किल्ला आणि डावीकडे मागे आंबेनळी घाटाच्या पुसटश्या डोंगररांगा 


घनदाट जंगलाने वेढलेला कोंढवी दुर्ग 

                                                                    "टिपिकल" कोकणी "फील" असलेलं कोंढवी उर्फ तळ्याची वाडी गाव


तळ्याचीवाडी गावातून कोंढवीच्या दिशेने गेलेली पायवाट आम्ही तुडवत निघालो तेव्हाच गडमाथ्यावर गवताने काय उच्छाद मांडला असेल ह्याची जाणीव झाली. गावाच्या लगेचच वरती हे भैरवनाथ मंदिर असून मंदिरात अतिशय रेखीव अशा मूर्ती आहेत. भैरव मंदिरापासून गडावर जाणा-या मस्त पायवाटेला गडाच्या थंडगार रानव्याने कुशीत घेतलं आहे. पंधरा मिनिटात माथा गाठला तेव्हा समोर नव्याने जीर्णोद्धार केलेलं नवनाथ मंदिर सामोरं आलं. 

मंदिरासमोरच हे नवीन बांधलेलं तुळशी वृंदावन आहे.

 मंदिराच्या पायरीवर हा शिलालेख कोरला आहे 

नवनाथ मंदिराबाहेरील कोरीव दगड


नवनाथ मंदिराच्या बाहेर असा सुरेख कोरीवकाम केलेला दगड आहे असं निकम काकांनी फोटोत दाखवून सांगितलं होतं. पण पुरुषभर उंचीच्या गवतात त्या दगडाचा काहीही मागमूस लागला नाही. फोटो नीट बघितल्यावर कळलं हा दगड आणि मंडणगडावर असलेला दगड ह्यांच्यात अगदीच साधर्म्य आहे त्यामुळे कल्पना येण्यासाठी मंडणगडावरील ह्या सुंदर कोरीव दगडाचा हा फोटो इथे देत आहे. अगदी सेम असाच दगड कोंढवी किल्ल्यावर आहे. 


नवनाथ मंदिराच्या समोरच हे मारुती मंदिर आहे.

आणि शेजारीच हे झोपडं. ह्याच्या समोरच भग्नावस्थेतला नंदी उघड्यावरच पडलेला आहे.


हे अवशेष सोडले तर कोंढवी किल्ल्यावर बघण्यासारखं काSSSहीही नाही. वरून पश्चिमेला कशेडी घाट आणि पूर्वेला प्रतापगड मात्र स्पष्ट दिसतो. इतिहासानेही कोंढवी किल्ल्याशी नातं जोडायचे कष्ट अजिबात घेतलेले नाहीत. रायगड जिंकून घेतल्यावर चंद्रराव मो-यांवर वचक ठेवण्यासाठी शिवाजीमहाराजांनी चंद्रगड आणि कोंढवी हे किल्ले जिंकून घेतले एवढाच काय तो माफक उल्लेख. पण पोलादपूर परिसरात जाणारच असाल तर हा किल्ला बघून यावा. बाकी काहीही खास नाही. 
निकम काकांच्या घरातून निघाल्यापासून बरोब्बर पंचेचाळीसाव्या मिनिटाला आम्ही त्यांच्या घरात परत देखील आलो होतो. काका शेतीच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात आजी आणि निकम काकांचा भाचा आदेश जाधव होते. आजींनी अगदी मायेने पाणी दिलं आणि चहा टाकू का असं विचारलं. आजीचं वय पंच्याहत्तरच्या आसपास असावं. आदेश मात्र दहावीला होता. 

"आजी तुमच्या घरी कोणकोण असतं ??" हर्षलने विचारलं   
"मी,माझा मुलगा संजय,त्याची बायकापोरं अन ही माझ्या मुलीची मुलं." आजींनी उत्तर दिलं. 
"मग ह्याचे आईवडील कुठे असतात………??"

आमच्या ह्या प्रश्नाबरोबर त्या घरात स्मशानशांतता पसरली. आजींच्या चेहे-यावरचे भाव बघता बघता बदलले आणि आदेशने मान खाली घातली !!! पुढच्या सेकंदाला आजींचे शब्द आमच्या संवेदना हृदय चिरत गेले…… 
"अनाथ आहेत हो ही पोरं. ह्यांच्या आईला…माझ्या लेकीला ह्या पोरांच्या बापाने विष देऊन मारून टाकलं ओ आणि ही कोवळी लेकरं माझ्या पदरात टाकून बेपत्ता झालाय. कुठे असेल काय माहित. ह्यांना मीच जमेल तसं वाढवलं. ह्याला एक बहिण हाये मोठी. आता ह्यांचा मामा म्हणजे संजयच ह्यांना सांभाळतो. ह्यांचा खर्च करतो. माझ्याच्यानं होत नाही हो. पण आईची माया तरी कुठून देऊ ह्यांना !!! सगळंच संपलंय !!!!!!"

सुन्न होऊन आम्ही ही नियतीची क्रूरकहाणी ऐकत होतो. मेंदूचा एक भाग पूर्ण बधिर झाल्याचा भास होत होता. आजींचे ते केविलवाणे शब्द तिथली नीरव शांतता चिरत गेले आणि एका क्षणात काळजाचा ठोकाच चुकला. आमच्या तोंडाला आजींच्या त्या करुण स्वरांनीच भलंमोठं कुलूप ठोकलं. परमेश्वराने पदरात अन्याय टाकलेली ही माणसं मात्र आमच्या काळजाला कायमची घरं पाडून गेली. आजींचे पाणावलेले डोळे काही केल्या थांबेचनात. आदेशही स्वत:ला सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता पण कोवळ्या वयात स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेलं ते क्रूर सत्य त्याच्या मेंदूवर जोरजोरात धडका मारत असावं.  आजींच्या यातना बघवत नव्हत्या पण आम्हीही हतबल होतो. अजून काही वेळ इथे थांबलो असतो तर कदाचित आमचीही अवस्था आजी आणि आदेशपेक्षा वेगळी नसती. शेवटी जमेल तसा त्यांना दिलासा दिला आणि जड पावलांनी त्या घराच्या बाहेर पडलो. कशेडी घाटातल्या कोंढवी फाट्यावर पोहोचेपर्यंत मी आणि हर्षल एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही हीच कदाचित संवेदनशील मनाची खूण असावी !! आजही ह्या ओळी लिहिताना आजींचे ते शब्द आठवताहेत आणि काही क्षण हाताला कापरं भरली आहेत !!!

पोलादपूरला आम्ही परतलो तेव्हा आता आंबेनळी घाट चढून महाबळेश्वरला पोहोचायचं एवढाच कार्यक्रम डोळ्यासमोर होता. पण पोलादपूर नंतर आंबेनळी घाटाच्या मार्गावर लागलेल्या कापडे गावातल्या एका कमानीने मात्र आमचं लक्ष वेधलं !!! "नरवीर तानाजी मालुसरे स्मारक…उमरठ". केवळ दहा किलोमीटर्सचं अंतर. हाच रस्ता पुढे चंद्रगड पायथ्याच्या ढवळे गावात नेणारा आणि चारही बाजूंनी सह्याद्रीच्या राकट कड्यांनी वेढलेला. खरं तर उमरठ गाव आमच्या आजच्या नकाशावर अजिबात नव्हतं. पण इतिहासावरचं प्रेम हे असंच वेडं असतं. आपोआपच आमच्या गाडीने उमरठचा रस्ता धरला. वाटेवरच्या वाकण गावानंतर उमरठकडे नेणारा फाटा लागला आणि ह्यानंतर ह्यानंतर रस्त्याची अवस्था पार दयनीय झाली. स्मारकाच्या कमानी टोलेजंग पण त्याकडे नेणारा मार्ग मात्र चीड आणणारा  !! तानाजीचं बलिदान आठवताना होणा-या मानसिक वेदना अनुभवताना ह्या शारीरिक वेदनाही शासनाने इतिहासप्रेमींच्या भाळी लिहिल्या आहेत. ही इतिहासाची प्रतीकं पर्यटकांपासून दुर्लक्षित राहिली आहेत कारण ही शासनाच्याच "अजेंड्या" वरच कधी आलेली नाहीत. उमरठ गावच्या पहिल्या वाडीत रस्त्याच्या उजवीकडे तानाजींची समाधी असून बाजूला शेलारमामांचीही समाधी दिसते. तानाजी मालुसरे ह्यांची समाधी - उमरठ


 

उमरठ गावाच्या पुढच्या वाडीत तानाजींचा पुतळा उभारला असून त्याच्या शेजारी असणा-या एका दुकानदाराकडे ऐतिहासिक तलवार आणि दांडपट्टा आहे ही आमच्याकडे असलेली माहिती स्थानिकांनी मान्य केली आणि अखेरीस आम्ही उमरठ गावात पोहोचलो. उमरठ गावाचं स्थान मात्र बघतचक्षणी प्रेमात पडावं असंच. मागच्या बाजूला महाबळेश्वरच्या आर्थरसीटचे आणि सापळखिंडीचे रौद्रभीषण कडे आणि गावातून वाहणारा वारा हा त्या भेदक कड्यांच्या पायाला स्पर्शून जाणारा. एकेक डोंगरधार हृदयाचा ठोका चुकवणारी !!! उन्हाचा तडाखा वाढलेला होता. भाजपने उमरठ गावात एका भुईकोट किल्ल्याची प्रतिकृती तयार केलेली असून आतमध्ये बाग आणि समोर तानाजींचा रणावेशातील पुतळा आहे.  त्या शिल्पकाराच्या मनात त्यावेळी काय चालू असेल माहित नाही पण बघणा-याच्या अंगावर सरसरून काटा यावा आणि उर अभिमानाने भरून यावा असे भाव त्या पुतळ्याच्या चेहे-यावर निर्माण करण्यात मात्र तो १०० % यशस्वी झाला आहे !!! आजही तानाजींच्या चेहे-यावर समोरून येणा-या यवनांना केवळ नजरेच्या करारी भावानेच रोखण्याचं सामर्थ्य आहे. तो पुतळा बघताना आपणही मंत्रमुग्ध होतो आणि इतिहासाची पानं आपोआपच उलगडली जातात. 

पुरंदरचा तह. खरं तर स्वराज्यावर ओढवलेली एक प्रकारची नामुष्कीच. नुकतंच बाळसं धरू पाहणा-या स्वराज्यातील तेवीस किल्ले मुघलांनी अक्षरश: ओरबाडून घेतले. पण आग्र्याहून औरंगजेबाच्या मगरमिठीतून सहीसलामत सुटून आल्यावर महाराजांनी सर्वात पहिल्यांदा पुरंदरच्या तहात दिलेले देवीस किल्ले परत जिंकून घेण्याचा निश्चय केला आणि ह्या मोहिमेच्या शुभारंभाचा नारळ फुटला तो सिंहगडावर. 
खरं तर कोंढाणा किल्ल्याला सिंहगड हे नाव तानाजीच्या मृत्युच्या आधीपासूनच पडलेलं आहे. कारण १६७० च्या आधी महाराजांनी लिहिलेल्या एका पत्रात गडाचा "सिंहगड" असा उल्लेख आलेला आहे. पण माघ वद्य नवमीची ती रात्र मात्र काही वेगळीच होती. सिंहगडावरची भयाण शांतता चिरत हर हर महादेवच्या गर्जना गडावर उठल्या आणि अख्ख्या गडाची झोपच उडाली. तलवारीच्या खणखणाटांनी आसमंत भरून गेला. मशालीच्या उजेडात मृतदेहांच्या राशी पडू लागल्या. रक्ताचे पाट वाहू लागले. सिंहगडाच्या मातीचा रंगच बदलला. पण त्याचवेळी गडाचा कडवा राजपूत किल्लेदार उदयभान राठोड आणि तानाजींची गाठ पडली. हे दोन्ही कसलेले योद्धे एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले. एका डोळ्यात होती ती बदल्याची आग तर दुस-या डोळ्यात पेटल्या होत्या स्वराज्याच्या ज्वाळा !!! कोणीही माघार घेईना. पण एकमेकांचे वज्राघात वर्मी लागून अखेर हे दोन्ही योद्धे मृत्युमुखी पडले आणि त्याच वेळी तानाजींच्या वीरमरणाने सिंहगडाच्या अंगावरही सरसरून शहारा आला !!! तानाजींच्या मृत्यूमुळे सैरभैर झालेल्या मराठी फौजेला तानाजींच्या पाठच्या भावाने म्हणजेच सूर्याजीने सावरलं आणि निर्णायक हल्ला करून गड जिंकला. दिनांक ४ फेब्रुवारी १६७०…. सिंहगड पुन्हा स्वराज्यात येउन दाखल झाला. तानाजींचं पार्थिव बघताना महाराजांबरोबर सह्याद्रीच्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या असतील. पण हा दिवस मात्र इतिहासाने सुवर्णाक्षरात कोरून ठेवला !!!


हीच ती मर्दानी भावमुद्रा जीने मुघलांच्या काळजाचं पाणी पाणी केलं असेल !!!

तानाजी मालुसरेंचे स्मारक


कापडे गावातून निघून आंबेनळी चढायला लागलो तेव्हा पोटातल्या कावळ्यांनी डायनॉसोरचं रूप धारण केलं होतं.  पण घाटाच्या एका वळणावरून दिसण-या प्रतापगडाच्या देखण्या रूपाने मात्र ती भूक काही काळाकरता हरपली !!!आंबेनळी  घाट चढून आल्यावर लगेचच प्रतापगड फाटा असून त्याच्यासमोरच "प्रतापगड कॉर्नर" हे अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे. पण स्थानिक जनतेने मात्र प्रतापगड कॉर्नर मध्ये जेवण्याच्या आमच्या स्वप्नांना सुरुंग लावत पार फाट्याच्या थोडं पुढे असणा-या सह्याद्री हॉटेलचं नाव सुचवलं आणि हे सजेशन किती सार्थ होतं ह्याची जाणीव खालच्या फोटोवरून तुम्हाला होईल !!!! प्रतापगड कॉर्नर पेक्षा अतिशय सुंदर जेवण हॉटेल सह्याद्री मध्ये मिळतं आणि ह्या हॉटेलची ख्याती ऐकून इथे कायम गर्दीचा माहोल असतो. त्यामुळे ह्या हॉटेलने आमच्या जिभेचे चोचले आणि पोटाचे लाड आगदी यथायोग्य पद्धतीने पुरवले !!

महाबळेश्वरला पोहोचलो तेव्हा साडेपाच वाजत आले होते. पण महाबळेश्वरच्या प्रचलित बॉम्बे पॉइंट  उर्फ सनसेट पॉइंट  वर निघालेली जत्रा आम्हाला आंबेनळी फाट्यालाच भेटली आणि आम्ही ऑर्थरसीट पॉइंटवर जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात आर्थरसीट ही काही अगदीच निवांत जागा नाही पण मावळत्या लोहगोलाच्या साक्षीने कामथा खोरं आणि रायरेश्वर,कोळेश्वर,महादेव मु-हा आणि बहिरीच्या घुमटीचा म्हणजेच सापळखिंडीच्या डोंगराच्या दर्शनाचा अनोखा योग आम्हाला चुकवायचा नव्हता. ऑर्थरसीट यायच्या पाच किलोमीटर आधीपासूनच वाहनांची हीSSS भलीमोठी रीघ लागलेली. पण त्यातून कसाबसा मार्ग काढत आम्ही अखेर ऑर्थरसीट गाठण्यात यशस्वी झालो आणि तेव्हाच त्या तेजोनिधीने आपला संसार आवरायला सुरुवात केली !!!

 बघताचक्षणी डोळे फिरवणारे आणि धडकी भरवणारे सह्याद्रीचे रौद्रभीषण कडे !!! खरं तर ज्याला ट्रेकिंग किंवा सह्याद्री म्हणजे काय हे अजिबातच माहित नाही त्याला कुठेही गडावर नेउन शारीरिक कष्ट देण्याची गरज नाही. त्याला फक्त एकदा काही क्षणांसाठी ह्या ऑर्थरसीटवर आणून बसवावं…सह्याद्री काय चीज आहे हे त्याचं त्यालाच कळेल !!!रविवारच्या कुंभमेळ्यातून महाबळेश्वर ओलांडून बाहेर पडणं म्हणजे खिंड लढवण्याइतकं कठीण काम होतं. पण आज दिवसभरात घेतलेल्या अनुभवांच्या शिदोरीने उर्जेचं काम केलं आणि महाबळेश्वर - पुणे हा प्रवासही आनंदाने झाला. हर्षलसारख्या भन्नाट दोस्ताची साथही हा अनुभव समृद्ध करून गेली आणि त्याच्या ड्रायव्हिंग स्कीलचं कोडकौतुक तर करावंच लागेल. खरं तर सह्याद्रीच्या अंतरंगात असलेला खजिना शोधायला हा जन्मही पुरायचा नाही. पण रोजच्या रहाटगाडग्यातून थोडासा वेळ स्वत:साठी काढावा आणि मनाची कवाडं रोज नव्याने उघडावीत हेच सह्याद्री आपल्याला शिकवत असतो… नाही का ???

ओंकार ओकComments

 1. जमलंय लेका. कैक दिवसांपासून अशी बाईक राईड करायचं मनात आहे. त्यात रॉयल एनफिल्ड आल्याने अजूनच खाज. पण अजून योग येईना बघ.

  ReplyDelete
 2. छान लिहिल आहेस... त्यात bike ride (y) मस्तच

  ReplyDelete
 3. Very Nice Omkar, It reminded us our visit to these places. Keep Blogging!

  ReplyDelete
 4. ओंकार,
  खूप मनापासून अनुभवलेले आणि शब्दात मांडलेले सुरेख शब्द..
  बाईक - सह्याद्री - दुर्ग - खादाडी - रानातली माणसं अशी बुंगाट मुशाफिरी आहे.
  तुझं सह्याद्रीतल्या माणसांशी जुळलेलं (आणि तू प्रयत्नपूर्वक जुळवलेलं) नातं खरंच मस्त रे...
  लगे रहो...

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड