पाऊस असा रुणझुणता.....

पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवरची एक अजस्त्र डोंगररांग !!! इथले कड्यांची रौद्रता आणि तिथून खाली दिसणा-या दरीच्या खोलीच्या नुसता अंदाज जरी घेतला तरी बघणा-याचे डोळेच फिरावेत. ह्या बेलाग कडेकपा-यांना कोंदण लाभलंय ते  गहि-या निसर्गाचं आणि रानवेड्या पाउलवाटांचं !! आहुपे...हे त्या आगळ्यावेगळ्या दुनियेचं नाव !! खाली पाहिल्यावर कोकणातलं लोभसवाणं खोपिवली गाव आणि त्याच्या शेजारी एखाद्या ध्यानस्थ योग्यासारखे भासणारे गोरख – मच्छिंद्रचे बुलंद सुळके. सोबतीला असतो घोंघावणा-या वा-याचा आवाज...त्याच्या तालावर डोलणारा  हिरवाकंच आसमंत...उंच कड्यावरून स्वत:ला दरीत झोकून देणारे पांढरेशुभ्र धबधबे ....नशीबवान असाल तर समोर अलगद उमटणारं इंद्रधनुष्य आणि हे दृश्य वेडावून पाहणारे आपण...सह्याद्रीमित्र !!!सह्याद्रीतला पाऊस हा असाच...स्वत:ही तो रसिक असल्याने एखाद्या कविमनाच्या गिर्यारोहकाला चार ओळी सुचल्या नाहीत तरच नवल. वैशाखाच्या तप्त काहीलीतून स्वत:ची सुटका करण्यासाठी आसुसलेली धरती आणि पावसाचा पहिला शिडकावा अंगावर घेण्यासाठी रानोमाळ भटकणारा गिर्यारोहक हे गणित आता सह्याद्रीलाही नवीन नाही. बळीराजा जितक्या आतुरतेने वर्षाऋतूची वाट पाहतो त्याच्याइतकंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्व गिर्यारोहकाला ह्या वर्षाऋतुचं असतं. मग कधी लोहगडाच्या विंचूकाट्यावर तर कधी राजमाचीच्या श्रीवर्धन बालेकिल्ल्यावर...दुर्ग धाकोबाच्या वळणवेड्या पाऊलवाटेवर तर कधी हरिश्चंद्रगडाच्या स्वर्गीय कोकणकड्यावर दोनेक दिवसाचं बि-हाड मांडलं जातं !! घरून कितीही शिधा बांधून किंवा रांधून दिला तरी त्या ठिकाणी मिळणा-या आणि आईच्या मायेने आग्रहाने वाढणा-या एखाद्या घरातील किंवा झापातील गरमागरम झुणका भाकरीची आणि फर्ड्या ठेच्याची चवच न्यारी !! त्याची सर बांधून आणलेल्या पराठ्याला किंवा पोळी भाजीला कधीही यायची नाही.

आकाशात ढगांचं आक्रमण झालं की इतर वेळी तशी धांदल उडते खरी पण आता हा पाऊसच नसानसात भिनवून घ्यायला आलेल्या गिर्यारोहकाला त्याचं काय नवल. उलट पाऊस नाही म्हणून एखाद्या घराच्या आडोशाला गेलेला हा सह्यमित्र केवळ पावसाने साधी हजेरी लावायची सूचना दिली तरी धावतपळत उघड्या आभाळाखाली येतो. ह्या चिंब भिजण्याला मात्र कसलाही पोस नसतो....त्यात ना आजारी पडण्याची भीती असते ना दुस-या दिवशी ऑफिस बुडण्याची !! आत्ता समोर आलेला क्षण मनसोक्त जगायचा हेच तर घरापासून इतक्या लांब येण्याचं खरं उद्दिष्ट असतं !!! हरिश्चंद्राचा कोकणकडा,साल्हेरचं परशुराम शिखर,राजमाचीचे बालेकिल्ले,भीमाशंकरचं नागफणी टोक,आहुपे घाटाचा कोकणकडा ह्या ठिकाणांची महती म्हणजे जूनच्या साधारण पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात दिसणारं इंद्रवज्र !!!! गोलाकार असलेल्या ह्या इंद्र्वज्रामध्ये आपली सावली दिसते हाही एक निसर्गाचा आविष्कारच !!! ह्यासाठी तर अट्टाहास करायचा आणि वैयक्तिक आयुष्यातले सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून हा सोहळा अनुभवायला सह्याद्रीच्या कुशीत जायचं....आत्मानंदासाठी !!!जुलै ऑगस्टचा पाऊस हा कधी हवाहवासा तर कधी प्रचंड हैराण करून सोडणारा. त्याने धरती हिरवीगार बनवलेली असते...धबधब्यांनाही एक आकार प्राप्र्त झालेला असतो...एकूणच निसर्गाने त्याची किमया साधलेली असते पण पावसाचं बाह्यरूप जेवढं सुखावणारं तितकंच त्याचं रौद्ररूप नकोसं करणारं !!! झोडपून काढणा-या मुसळधार पावसात स्वत:ला आणि इतरांना सांभाळत राज्माचीची किंवा पन्हाळा – विशाळगडाची वारी आनंदाने करणारे “वारकरी” कमी नाहीत. शेवटी आमची पंढरी म्हणजे सह्याद्रीच की हो !!! मग कितीही कष्ट का लागेना तिला जवळ करायला....पायी बळ आपोआपच मिळत असतं !!! भिजून घेण्याचा स्वच्छंद आनंद लुटल्यावर हातात आलेल्या वाफाळत्या चहाची सर साक्षात अमृतालाही नाही. त्याचा एक एक घोट म्हणजे संजीवनीच !!! त्याक्षणी कुठेतरी आपण तमाम दुनियेपेक्षा काहीतरी वेगळं केलंय ह्याची खात्री पटते. गुडघाभर चिखलात कशाचीही पर्वा न काटा मैलोनमैल अंतर तुडवणं म्हणजे चेष्टा नाही हो. शारीरिक कस आणि संयमाची देखील परीक्षाच जणू !! पण ह्या परीक्षेचा निकाल मात्र कायमच आनंद मिळवून देणारा !! इथे नापास होण्याला थाराच नाही...ज्याचा शेवट गोड होतो अशी ही परीक्षा !!! आगळावेगळा अनुभव देऊन जगणं समृद्ध करणारी !!


ऑगस्ट सप्टेंबर नंतर मात्र सह्याद्रीचा नूरच पालटतो !! हिरव्याकंच जमिनीवर पिवळ्याधमक जरीची नक्षी आखीवपणे चितारावी तसं सोनकी आणि इतर अनेक सुंदर रानफुलांचं साम्राज्य सह्याद्रीवर पसरतं. इतरवेळी धडकी भरवणारे किंवा धुक्यात हरवलेले गडकिल्ले,सुळके आणि अजस्त्र कडेही विलक्षण भासतात. मग हे सगळं अनुभवायला जायचं कात्राकड्यावर,रतनगडाच्या पिवळ्याजर्द गालिच्यावर,साल्हेरच्या लांबूळक्या आणि स्वर्गीय अशा गादीपठारावर किंवा मग कुलंगच्या बेभान कातळकड्यांवर !!! आनंदवनभुवनी !! ह्याची तुलनाच होऊ शकत नाही !! फोटोग्राफर्स मंडळींसाठी तर हा काळ म्हणजे पर्वणीच. स्वच्छ वातावरणाला मिळालेली निळ्याशार आभाळाची जोड आणि खाली पसरलेला रंगीत सह्याद्री...स्वर्गसुखाच्या व्याख्येसाठी अजून काय हवं ???पण पावसाळा हा ऋतुच मुळी अल्लड आणि तितकाच निरागस !!! ह्याच्या छटा अनुभवायला अंगी रसिकपणाच हवा. पण दगडालाही जिथे पाझर फुटतो अशा वर्षाऋतूत एखाद्या अरसिक मनातही पालवी बहरवण्याचं सामर्थ्य ह्या वरुणराजाच्या अंगी आहे !! त्यामुळे घराच्या खिडकीतून कॉफीचा वाफाळता कप हातात घेऊन बाहेरचा पाऊस बघत बसण्यापेक्षा घरापासून आणि “कम्फर्ट झोन” मधून बाहेर पडून बघा....हा ऋतू त्याची कशी कायमची ओढ लावून जातो ते...!!!Comments

 1. ओंकार एकदम ओलं केलस बघ!

  ReplyDelete
 2. लग्नासाठी जागा पाहून आलास काय?

  ReplyDelete
 3. Sir. . Sahyadrit jaun alya sarakh vataty

  ReplyDelete
 4. Very poetic. Felt like going to the hills immediately.

  ReplyDelete
 5. The above comment was from Shrikant Oak

  ReplyDelete
 6. फारच छान व ओघवत्या भाषेत लिहिले आहे. मनात लगेच एखाद्या पावसाळी डोंगर सहलीला जाण्याची उर्मी येते आहे. भूतकाळातील सर्व पदयात्रांंच्या आठवणी जाग्या झाल्या...👍👌

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड