अनवट….भूपत… !!!

पिंजल खो-यातल्या अत्यंत अपरिचित गिरीदुर्गाची भन्नाट भटकंती…. !!!


"ओंक्या….शॉट झालाय !!!" 
"काय झालं ??"
"उद्याच्या ट्रेकसाठी तुझ्या घरी यायला निघालो होतो. डेक्कनपाशी पोहोचलो आणि तेवढ्यात गाडीची क्लच केबल खाड्कन तुटली. आत्ता रात्रीचे साडेनऊ वाजत आलेत आणि दिवाळीमुळे इथली सगळी गॅरेजेस बंद आहेत. मी इथे एकटाच थांबलोय… लवकर काहीतरी कर !!!"
"तिथेच थांब…. मी आलो !!"

हर्षल आणि माझ्यातला हा अवघ्या दोनेक मिनिटांचा संवाद ही होती आमच्या उद्याच्या भूपतगडाच्या ट्रेकची झालेली एक "ऑफबीट" सुरुवात !! तासाभरापूर्वीच रायलिंग पठारावरून परतलो होतो. दिवसभर ड्रायव्हिंग आणि त्यात रणरणत्या उन्हातला ट्रेक यामुळे शनिवार जरी सार्थकी लागलेला असला तरी उद्याच्या एका दिवसात जवळपास ५०० किलोमीटर्स कव्हर करणा-या बाईक ट्रेकसाठी थोडीतरी विश्रांती आवश्यकच होती. नुकताच डोळा लागलेला असताना फोन वाजला आणि वरचा संवाद ऐकायचं परमभाग्य पदरी पाडून घेतलं !!!

डेक्कनला पोहोचलो तेव्हा शेजारचा एक भुर्जीवाला आणि आजुबाजुची असंख्य अनोळखी माणसं यांच्या गराड्यात गाडीची तुटलेली क्लच केबल हातात धरून उभ्या असलेल्या हर्षलला आंधळ्याने देखील ओळखलं असतं. गाडी "टो" करून नेणं भाग होतं. तिथे पोचल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं असेल तर शेजारच्या भुर्जीवाल्याला एका डबल भुर्जीची ऑर्डर दिली !!! "ही ऑर्डर आपला परममित्र स्वत:साठी न देता आपल्यासाठी देऊन स्वत: गॅरेजच्या शोधात  भटकणार आहे" हा हर्षलच्या चेहे-यावरचा आनंद त्या अंधारातही मला स्पष्ट दिसला !!! "साडेनऊ ही काय दुकानं बंद करायची वेळ आहे का" यावर एक लघुपरिसंवाद पार पडला आणि मी गॅरेजच्या शोधमोहिमेवर निघालो. आपल्याला हवी असलेली दुकानं नेमकी अशाच वेळी कशी काय बंद असतात हे एक मला आजवर न सुटलेलं कोडं आहे. गाडीची क्लच केबल हवी असताना या लोकांकडे ती सोडून अख्खा विश्वरूपदर्शनाचा सेटअप मिळेल.पण हवी ती वस्तू मिळायची कायमची बोंब !! पाच सहा गॅरेजेसच्या बंद शटरवरची कुलुपं मात्र आता अंत बघून गेली. अखेर ब-याच भगीरथ प्रयत्नांनंतर दहाच्या सुमारास एका छोट्याश्या बोळातल्या गॅरेजवाल्याने परिस्थितीचं गांभीर्य (आणि अगतिकता) ओळखली आणि आम्ही गाडी "टो" करून आणेपर्यंत गॅरेज बंद न करण्याचं आश्वासन दिलं. सध्या तरी एवढं भांडवल पुरेसं होतं !! अखेर तीनचार लिटर घामाची आहुती दिल्यानंतर त्या दुकानातल्या एका क्लच केबलने आमच्या गाडीला "पसंत" केलं आणि क्षणाचीही उसंत न घेता आम्ही घरी परतलो !!  

आठवडाभर ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो तो अखेर सुरु होणार होता. आज रात्री बारा वाजता बाईकवरून पुण्याहून निघून कल्याण - भिवंडी - वाडा - विक्रमगड - जव्हार - चोथ्याचा पाडा - झाप - भूपतगड - मोखाडा - खोडाळा - विहीगाव -  कसारा - घोटी - भंडारदरा - अकोले - संगमनेर आणि पुणे ही जवळपास ६५० किलोमीटर्सची प्रदक्षिणा आम्ही आखली होती. दरवर्षीच्या शिरस्त्याला जागून दिवाळीनंतर एक मोठ्ठी बाईक राईड आणि एक अतिशय आडवाटेवरचा किल्ला करणे हा नियम यावर्षीही लागू  झाला आणि शनिवारी रात्री बारा वाजता आम्ही कल्याणच्या दिशेने कूच केलं. पहाटे चारच्या सुमारास कल्याणला पोहोचलो तेव्हा लाल चौकीच्या गणपती मंदिराबाहेर गाडीची वाट बघत उभे असलेले पाच सहा झोपाळलेले चेहेरे आणि त्यांना अत्यंत अनोळखी असणारे आम्ही याखेरीज चिटपाखरूदेखील नव्हतं. अखेर उरलेल्या झोपेची थकबाकी लाल चौकीच्या गणपती मंदिराच्या फरशीवरच पूर्ण केली (अर्थात तरीही ती काही अंशी अपूर्णच होती हा भाग निराळा!!). कल्याणला आमचा सह्यमित्र योगेश अहिरे आम्हाला जॉईन झाला आणि पावणेपाच वाजता दोन बाइक्स वाड्याच्या दिशेने सुसाट निघाल्या !!

वाड्याला पोहोचलो तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. वाडा गावच्या मुख्य चौकात एका अति आतिथ्यशील चहावाल्याने सकाळी सात वाजता "ही चहा मिळायची वेळ नाही" असं जणू काही चितळ्यांनी "बाकरवड्या संपल्या" ही पाटी लावलेली असूनही एखाद्याने "बाकरवड्या आहेत का ??" असा निर्विकार प्रश्न विचारल्यावर ज्या प्रकारचा आवाज आणि चेहेरा करून उत्तर दिलं असतं अगदी तसंच उत्तर दिलं !! आता विक्रमगडशिवाय पर्यायच नव्हता. साडेआठच्या सुमारास विक्रमगडला पोहोचलो तेव्हा गावाच्या मुख्य रस्त्यावर आठवडा बाजाराची लगबग उडाली होती. मुख्य रस्त्यावरच्या बाहेरून अतिशय सुमार दिसणा-या टपरीवजा हॉटेलमध्ये अप्रतिम चवीचे गरमागरम वडापाव,कांदाभजी आणि फक्कड चहा रिचवल्यावर जी काही तरतरी आली म्हणून सांगू !! कमाल !!

विक्रमगड ते जव्हार या संपूर्ण प्रवासाचा "युएसपी" जर काय असेल तर या दोन गावांमधला निर्विवादपणे सुंदर आणि गर्द झाडीने भरलेला (खड्डेविरहित) रस्ता आणि आजूबाजूचा भन्नाट आणि खास असा कोकणी निसर्ग. विधात्याने काय जीव ओतला होता हा प्रदेश तयार करताना ते त्यालाच माहित !! काळ्याकुळकुळीत रस्त्याची घाटदार वळणं आणि मध्ये लागणारे नितांत सुंदर कोकणी पाडे हाच या संपूर्ण प्रवासाचा आत्मा म्हणायला हवा !! सप्टेंबर - ऑक्टोबरच्या ऐन  बहराच्या काळात तर हा परिसर म्हणजे केवळ स्वर्गसुखच !!!  एका दिवसाच्या बाईक राईडसाठी मुंबईच्या जवळ यासारखा दुसरा प्रदेश शोधूनही सापडणार नाही हे नक्की. आपल्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात इथल्या सदाबहार निसर्गाला आणि कोवळ्या मनांना अबाधित ठेवलं म्हणजे मिळवलं !!! जव्हारला पोचलो तेव्हा ऊन तापायला लागलं होतं. योगेश आधी सहपरिवार इथे येउन गेलेला असल्याने जव्हारच्या सुप्रसिद्ध "मुकणे पॅलेस" अथवा "राजविलास पॅलेस" ची दिशा त्याला अचूक ठाऊक होती.
या राजवाड्याला भेट देण्यासाठी एक महत्वाची खूण सांगतो. या राजवाड्याला जायला सुमो जाईल इतका प्रशस्त पण लाल मातीचा रस्ता असून दुर्दैवाने या राजवाड्याची दिशा दाखवणारी एकही पाटी या रस्त्याच्या सुरुवातीला लावलेली नाही. हा फाटा सापडण्यासाठी विक्रमगडवरून जव्हारला येताना डाव्या हाताला "शिवनेरी ढाबा" आहे. हा शिवनेरी ढाबा डावीकडे दिसला की त्याच्या बरोब्बर समोरून म्हणजे रस्त्याच्या उजवीकडून आत जाणारा लाल मातीचा रस्ता पकडायचा आणि पाच मिनिटात राजवाड्यासमोर दाखल व्हायचं. किमान सद्यस्थितीत तरी राजवाडा सापडण्यासाठी हा शिवनेरी ढाबा ही एकच खूण असून भविष्यात मुकणे सरकारने एखादी दिशादर्शक पाटी लावल्यास ती अत्यंत उपयोगी पडेल.
(महत्वाची टीप : जव्हारमध्ये एकाच मालकाचे दोन शिवनेरी ढाबे असून वर उल्लेख केलेला ढाबा हा विक्रमगड - जव्हार रस्त्यावर सर्वप्रथम लागतो, जो रस्त्याच्या डावीकडे आहे. दुसरा शिवनेरी ढाबा हा या पहिल्या शिवनेरी ढाब्यापासून बराच पुढे असून तिथपर्यंत जाऊ नये).

मुकणे राजवाडा हा १९४० मध्ये जव्हारच्या संस्थानिकांनी बांधला असून त्यातल्या विक्रमसिंह मुकणे या महाराजांच्या नावावरूनच जव्हारच्या अलीकडे लागणा-या गावाला "विक्रमगड" हे नाव पडले आहे. विक्रमगड या नावाचा कोणताही किल्ला मात्र तिथे नाही. विक्रमसिंहाचे राज्य या अर्थाने "विक्रमगड" हे नाव त्या गावाला बहाल झाले आहे. राजवाड्याच्या समोर थांबल्यावरच गतवैभवाची भव्यता डोळे दिपवून टाकते. आपण जणू काही राजस्थानातली एखादी भव्य आणि देखणी वास्तू बघत असल्याचा भास क्षणभराकरता होतोच !! हा वाडा सध्याही वापरात असल्याने याचे आतून फोटोज काढण्याची परवानगी नाही. केवळ बाहेरून तुम्हाला वास्तूचे फोटोज काढता येतात. मुकणे राजांनी इथे एका कुटुंबाची कायमस्वरूपी "केअरटेकर" म्हणून नियुक्ती केली असून त्यांच्याच बरोबर तुम्हाला हा वाडा फिरावा लागतो. आतून प्रचंड विस्तार असलेल्या या वाड्यात अनेक खोल्या असून जुन्या काळच्या अनेक वस्तू,पेंटीग्स,तोफा इत्यादी गोष्टी असून राजवाड्यात पूर्वपरवानगीने अनेक चित्रपटांची शूटिंग्ज होतात…इति केअरटेकर !!


जव्हारची शान असलेला भव्य मुकणे राजवाडा. 
   
वाड्याची मागची बाजू. इथे सूर्यप्रकाशाची दिशा व्यवस्थित असल्याने फोटोला एक वेगळाच साज चढला !!


वाड्याच्या मागच्या बाजूला असलेला सुंदर टेहाळणी मनोरा. "आमच्या राणीसाहेब इथे आल्यावर या मनो-यात उभ्या राहून सूर्यास्त बघतात !!" केअरटेकरने पगाराला जागत माहिती पुरवली !! 

वाड्याची पूर्वाभिमुख असलेली भव्य "बाल्कनी" 
वाडा बघून गाड्यांपाशी परतलो तेव्हा उन्हं डोक्यावर चढली होती, जव्हार ते भूपतगड हे अंतर १६ किलोमीटर्सचे असल्याने आणि रस्त्याच्या तंदुरुस्तीचा पत्ता नसल्याने लगेचच काढता पाय घेतला आणि जव्हारमधून भूपतगड पायथ्याच्या झाप गावाकडे आमची चाकं वळाली.


जव्हार - झाप घाटातून मुकणे राजवाडा 


जव्हार ते झाप हा रस्ता जरी ओम पुरीच्या गालासारखा असला तरी त्याचं सौंदर्य मात्र हेमामालिनीसारखं आहे !! अगदी चिरतरुण !! अनेक ठिकाणी दोन्ही बाजूनी गर्द झाडी…मधूनच डोकावणारे झाडीभरले डोंगर आणि वाटेवर लागणारे आणि बाहेरून आलेल्या पाहुण्यांना एक निखालस हास्य देणारे कोकणी पाडे !! निर्विवादपणे सुंदर प्रवास आहे हा !! झापला पोहोचलो तेव्हा समोरून येणा-या दोन तरुणांनी कोणीही न सांगता आम्ही भूपतगडाला चाललोय हे बरोब्बर ओळखलं !!

"त्यो….समोरचा भोपटगड" फक्त आम्हालाच न दिसलेल्या आणि गच्च झाडीने भरलेल्या अनेक डोंगरांपैकी कोणत्यातरी एका डोंगराकडे अंगुलीनिर्देश झाला.
"चिंचपाड्यातून जायचं ना ??"
"हा बराब्बर…गाडी अर्ध्यावर जातीया. फुडं पायवाट धोपट हाये…"

आमच्याकडे असलेल्या गडाच्या सद्यस्थितीतील माहितीशी ही स्थानिक माहिती अचून जुळते आहे हा आनंद काय वर्णावा !!! झाप ते चिंचपाडा हे अंतर चार किलोमीटरचे असून चिंचपाड्यातून  गडाच्या अर्ध्यावर भविष्यात बस जाइल इतका प्रशस्त रस्ता बांधण्याचे काम सुरु आहे. सध्या मात्र या कच्च्या रस्त्यावरून बाईक आणि सुमोसारख्या गाड्या सहज जाऊ शकतात. झाप सोडा गडाच्या अगदी पायथ्याला जाईपर्यंत गड दिसत नाही मी सत्यपरिस्थिती आहे. एक मात्र आहे….भूपतच्या परिसरातील डोंगररचना कमालीची क्लिष्ट असून सर्वच डोंगर गच्च झाडीने भरलेले असल्याने आणि त्यांना विशेष आकार नसल्याने किल्ल्याची दिशा माहित असणे गरजेचे आहे. जिथे हा कच्चा रस्ता संपतो तिथे एक छोटे पठार असून त्या पठारावर एक झोपडी आहे. या झोपडीच्या शेजारीच गावक-यांनी एक झेंडा उभारलेला असून त्याच्या पायथ्याशी असलेल्या कोरीव पावलांना स्थानिक ग्रामस्थ "सीतेची पावले" म्हणून ओळखतात. इथून डावीकडे दिसणारा छोटेखानी भूपत त्याच्यावर असलेल्या भक्कम बुरुजामुळे लक्ष वेधून गेला.


सीतेची पावले 


सीतेच्या पावलांजवळील कोरीव दगड  


भूपतगडाचे प्रथम दर्शन 

  सीतेच्या पावलांपासून भूपतच्या माथ्यापर्यंत प्रशस्त वाट गेली होती. गडमाथा आधी डावीकडे आणि नंतर समोर ठेवून ही वाट माथ्यावर चढते 


भूपतच्या वाटेवरचा गर्द रानवा सुखावून गेला. मधेच झाली पानांची सळसळ आणि एखाद्या सुरेल रानपाखराची अवीट शीळ….हाच काय तो या आसमंतातला जीवंतपणा….बाकी सारं चिडीचूप आणि स्तब्ध !! विसेक मिनिटात भग्न दरवाजा लागला.  


भग्न प्रवेशद्वाराच्या बुरुजांचे अवशेष


भूपतच्या माथ्यावर प्रवेश केल्यावर गडाचं विस्तीर्ण पठार समोर आलं. प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडे व उजवीकडे अशा दोन वाटा फुटतात. गडाचे सर्व अवशेष उजवीकडेच असल्याने  आपण उजव्या बाजूने चालायला सुरुवात करून सर्व अवशेष बघायचे व किल्ल्याच्या माथ्याला प्रदक्षिणा घालून डावीकडील पायवाटेने पुन्हा प्रवेशद्वारापाशी यायचं. 
उजवीकडची पायवाट पकडल्यावर अजून तटबंदीला पडलेलं अजून एक भगदाड दिसलं. याला काही पाय-यादेखील आहेत.
  


या वाटेने पुढे गेल्यावर समोर बालेकिल्ल्यावरील राजवाड्याच्या भिंतीचे भग्नावशेष दिसतात. 


बालेकिल्ल्याला उजवीकडून प्रदक्षिणा घालताना मधेच हे मारुतीचे छप्पर हरवलेले मंदिर आहे. 


बलभीमाला दंडवत घालून बालेकिल्ल्यावर प्रवेश केला. बालेकिल्ल्यावर राजवाड्याचे भव्य जोते सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत    


राजवाड्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा हा एक हौद असून आजमितीला तो कोरडाच आहे. 


या हौदात उतरण्यासाठी कमानवजा दरवाजा आहे. 

भूपतवरील राजवाड्याचा बाहेरील भाग 


भूपतच्या तटबंदीवर उभं राहिलो आणि समोरच्या सुरेख नजा-याने आणि भर्र्राट विहारणा-या सह्याद्रीच्या मुक्त वा-याने ठावच घेतला !!! समोरचं पिंजल नदीचं खोरं,खोडाळा,सूर्यमाळचा प्रदेश आणि कमालीचा अंधुक दिसणारा अवाढव्य उतवड !!! वातावरण प्रचंड धुरकट असल्याने संपूर्ण त्र्यंबक रांग मात्र पाहता आली नाही पण सरत्या पावसाळ्यात या आसमंताला काय कमालीचा नूर चढत असेल नाही का !!!   


भूपतच्या आसमंताचा वेध घेणारे दोन शिलेदार….योगेश आणि हर्षल !!! भूपतच्या माथ्यावर उभं राहिल्यावारच त्याच्या अत्यंत आडवाटेला  (शब्दश: - कुठल्याकुठे खोपच्यात !!) असलेल्या स्थानाचा अंदाज बांधता येईल !!


बालेकिल्ल्याच्या उतारावर हा कातळात खोदलेल्या थंड पाण्याचा समूह असून यातील एका टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. सर्व या टाक्यांना चारही बाजूंनी दगडी भिंतीने सुरक्षित करून पाणी अडवण्याची योजना दुर्गनिर्मात्याने केलेली आढळते 


टाक्यांच्या पलीकडेच हा पाण्याचा तलाव असून याच्या कडेलाही भिंतीचे अवशेष दिसतात 


भूपतच्या साधारण दक्षिणेकडे असलेल्या पठारावर जाताना निळ्या आकाशाची सुंदर आकाशाची पार्श्वभूमी लाभलेला बालेकिल्ल्याचा बुरुज !!

किल्ल्याच्या दक्षिणेकडील टोकावर तुरळक तटबंदीचे अवशेष असून इथून गडाचा विस्तार चटकन नजरेत भरला. भूपतच्या या पायथ्याला कुर्लोट गाव असून तिथून असणारी भूपतची चढाई मात्र दम काढणारी आणि तब्बल दीड तास खाणारी !! त्यामानाने आम्ही वापरलेला चिंचपाड्याचा मार्ग अत्यंत सोयीस्कर आणि कमी वेळात किल्ल्यावर घेऊन जाणारा आहे.  

दोन वाजत आले होते. ठरल्याप्रमाणे परतीचा मार्ग जरी मोखाडा - विहीगाव मार्गे असला तरी त्याचा मुख्य गाभा हा त्र्यंबक रांगेचं मनसोक्त दर्शन घेणे एवढाच होता. पण वातावरणाने मात्र सपशेल निराशा केली. त्यामुळे आल्या वाटेनेच परतायचं हा निर्णय घेऊन बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा मारून आम्ही जिथून वर आलो त्या भग्न दरवाजापाशी येउन पोहोचलो आणि वीसेक मिनिटात दोन्ही गाड्या स्वत:ची आणि आमची भूक शमवण्यासाठी जव्हारकडे सुसाट वेगाने निघाल्या !!

आता ट्रेक आणि खादाडी हे कधीही भंग न पावणारं समीकरण !! सकाळी जव्हारच्या शिवनेरी ढाब्यावरील गर्दी बघूनच हे परमपवित्र ठिकाण आपली गरज भागवायला कोणतीही कसर सोडणार नाही याची खात्री कधीचीच पटली होती !!! त्या शिवनेरी धाब्यानेही दोनेक कोंबड्यांचे आयुष्य "सार्थकी" लावत जेवणाचा जो काही नजराणा पेश केला…आहाहाहा !!!! लाजवाब…. !! ग्राहकहिताला (आणि काउंटरवरील वाढत्या रकमेच्या अपेक्षेला सरावलेला) तो निर्व्याज मनाचा वेटर आम्ही न सांगताही पुढच्या ऑर्डर्स घेऊन येत असल्याचा भास जेव्हा स्पष्ट जाणवायला लागला तेव्हा कुठे आम्ही हात आखडते घेतले !!! याला म्हणतात ट्रेकची "परफेक्ट" सांगता होणं !!! 

आता मात्र आम्ही निर्धास्त होतो. वाटेत एखाद्या भव्य गोपुरासारख्या दिसणा-या घुमटाकार गोतारा किल्ल्यामागे तेव्हा लोहगोल अस्ताला जात होता तेव्हा भिवंडीच्या ट्रॅफिकने खा-या अर्थाने धडकी भरवायला सुरुवात केली !!! पण अपेक्षेपेक्षा आम्ही अतिशय लवकर कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या अत्यंत "रुंद" पुलावरून बाहेर पडलो आणि मोकळा श्वास कित्येक वर्षांनी घेतल्याचा जो काही फील आला त्याला जवाब नाही !! हर्षल कुलकर्णी या मनुष्याला देवाने कोणत्या साच्यातून निर्माण केलंय ते त्यालाच माहित !! याचं ड्रायव्हिंग स्किल बघून साक्षात श्रीकृष्णानेही तोंडात बोटे घालावीत !! जिथे साधं इंचभरही पुढे सरकण्याचा विचार करणं पण जीवावर येत होतं तिथे हर्षलने आमची बाइक ज्या सफाईने त्या कोंडवाड्यातून बाहेर काढलीये त्याचा वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत !! याला श्रीखंड्याच्या चक्क्यात जरी बाईक घेऊन सोडलं तरी हा त्यातून स्वत:ला आणि दुस-यालाही काहीही त्रास न देता बाहेर पडू शकतो !!  मला मागे बसल्या बसल्या शब्दश: आपण लहानपणी आपल्याला "एखाद्या उंदराला प्रचंड अडथळयातून चीजक्यूब पर्यंत पोचवा" नावाच्या मोहिमेवर जुंपलं जायचं त्याचाच भास होत होता !! हे वर्णन खरं वाटत नसेल तर रविवारी संध्याकाळी भिवंडी ते कळंबोली हा प्रवास विनासायास करून दाखवावा !!! बास !!

कल्याणला योगेशचा निरोप घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलो. आजूबाजूच्या प्रचंड कलहाचा विसरच पडला होता म्हणा ना !! काल रात्रीची ही वेळ जिथे घरातून निघण्याबाबतच अनिश्चितता होती ती पार करून आणि नियोजित मोहीम सफल करून आम्ही प्रसन्न मानाने घराकडे परतत होतो. मुख्य म्हणजे ५५० किलोमीटर्सचा एका दिवसात केलेला प्रवास,भूपतगडासारखा एक अत्यंत अपरिचित….अनवट आणि आडवाटेवरचा दुर्ग आणि जीवाभावाचे भक्कम ट्रेकर दोस्त !!! खरं तर या अनपेक्षित मोहीमाच अपार आनंदाची  शिदोरी आपणहूनच सोबत देतात !! रस्ता मागे पडत चालला होता….वेळ पुढे सरकत होती…पुणं जवळ येत होतं…आणि कानात किशोर मनातले सूर आळवत होता…. 

"मुसाफिर हुं यारों….ना घर है ना ठिकाना… 
मुझे चलते जाणा है…बस चलते जाना !!"   
    

Comments

 1. so called शितेची पावले ही समाधी असावी व तो कोरीव दगड विरगळ वाटतेय ..

  बाकी नेहमीप्रमाणेच लेखनात जान आहे :-)

  ReplyDelete
 2. धमाल रे बाबा !

  ReplyDelete
 3. too good...irresistible

  ReplyDelete
 4. छानचं आेंक्या...

  ReplyDelete
 5. ओकार मस्त! योगेश आमच्याबरोबर कामथे ढवळेला आला होता.एका दिवसात एवढी बाईक चालवण वर गड राजवाडा करन. धन्य!

  ReplyDelete
 6. ओंकार, मस्तच रे!
  बाईकने दमदार राईड,
  विक्रमगडचा राजवाडा-दुर्लक्षित भूपतगडची दमदार भटकंती आणि
  सोबत दमदार ट्रेकर दोस्त...
  जबरीच!!!!

  ReplyDelete
 7. भुपतगड ची माहिती जबरी…
  मजा आली…
  बढीया...

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड