खान्देशावर बोलू काही : - भाग एक

रात्रीचे पावणेदोन वाजत आले होते. नाशिकच्या द्वारका चौकात वाहनांची वर्दळ वेळ आणि देहभान विसरून धावतच होती. मुंबई - आग्रा महामार्गाचा गुळगुळीतपणा जाणवायला लागला तसा पुणे - नाशिक प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळाला . रस्त्यावरचे मैलाचे दगड वेगवेगळ्या गावांशी सलगी करत होते...आमच्यातलं आणि त्यांच्यातलं अंतर कमी करत होते. पौर्णिमा दोन दिवसांवर होती. वडाळेभोई गाव जवळ आलं तशी नजर आपोआपच डावीकडे वळाली.....लख्ख चंद्रप्रकाशात धोडपचा बुलंद आकार आणि कांचनाची जुळी टोकं मनात तरंग उमटवून गेली... आठवणी जाग्या करून गेली !!! भाऊडबारीच्या टोलनाक्याच्या आधी कांचना,मांचना,बाफळ्या,शिंगमाळ या असीम शिखरांवरून फिरत असलेली नजर विसावली ती राजदेहेर,कोळदेहेर आणि इंद्राई दुर्गांवर !! सातमाळा रांग आणि आमचं मनस्वी नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं....आनंद देऊन गेलं. मालेगाव चौफुलीवरच्या हॉटेलमध्ये फर्मास चहाचे घुटके घशाखाली रिचवत असताना चर्चा रंगल्या त्या मार्कंड्याच्या आभाळउंचीच्या,मोहनदरीच्या जगावेगळ्या नेढ्याच्या,कण्हेरगडाच्या खडतर चढाईच्या आणि धोडपच्या सर्वगुणसंपन्नतेच्या !! गाडीला आता वेग आला. रात्रीचा शेवटचा प्रहर सुरू झाला होता. गाडीची चाकं आणि आमची मनं साक्रीच्या दिशेने धावू लागली. सुनसान....निर्मनुष्य रस्त्यावरच्या अंधाराला चिरत गाडीमधला आवाज घुमत होता..."सो गया ये जहां, सो गया आसमां,सो गयी हो सारी मंझिले...हो सारी मंझिले..... सो गया है रस्ता !!!"

मार्च ते मे या तीन महिन्यातल्या भाजून काढणा-या ग्रीष्माला सहन करून मन वैतागलं होतं...सह्याद्रीला आणि पर्यायाने वरुणराजाला आर्तपणाने साकडं घालत होतं. पण आता त्याच्या कृपादृष्टीची वाट पाहण्यात अर्थ नाही हे लक्षात येताच जूनमधला तिसरा शनिवार - रविवार निवडला आणि आम्ही निघालो खान्देश वारीला. दोन दिवसात पाच सर्वांगसुंदर...अवशेषसंपन्न आणि अविस्मरणीय दुर्गांची वर्णी या मोहिमेसाठी लागली. धुळे आणि नाशिक जिल्ह्यांचा सुरेख संगम साधत प्लॅन तयार झाला आणि पाच उत्साही सह्याद्रीमित्रही !! आमच्या टीमची थोडक्यात ओळख करून घेऊ. 

१.  हर्षल कुलकर्णी : व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा पण मनाने मात्र सह्याद्रीच्या गिरिशिखरांवर भटकणारा एक अवलिया. शंभर - सव्वाशे किल्ले पायतळी घालूनही नाविन्याचा कायम ध्यास घेतलेला एक अस्सल भटका. 

२. अक्षय गायकवाड : व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आणि पाय कायम फिरते ठेवणारा गिर्यारोहक. एक उत्तम "कंपनी" म्हणून कधीही बरोबर न्यावा असा आणि नवीन माणसांबरोबरही सहजगत्या "मोल्ड" होणारा साथीदार. 

३. सौरभ पंडित : झूलॉजीचा विद्यार्थी आणि पुण्याच्या "जीविधा" संस्थेच्या राजीव पंडित यांचे चिरंजीव. नवीन ठिकाण म्हणलं की स्थळ काळ याची पर्वा न करता कोणत्याही अनवट ट्रेकसाठी वर्णी लावणारा उदयोन्मुख गिर्यारोहक. 

४. भूषण शिगवण : सौरभचा मित्र आणि बॉटनीचा विद्यार्थी. या दोन दिवसांमध्ये त्याच्या वनस्पतीज्ञानाची जेवढी परीक्षा आम्ही घेतली तेवढी त्याच्या कोणत्याही गुरूने त्याच्या संपूर्ण शैक्षणिक वर्षातही घेतली नसेल !!! फिटनेस उत्तम.  

५. सिद्धांत फडकुले : अक्षयचा ऑफिसमधील सहकारी आणि अत्यंत गरीब स्वभावाचं शांत व्यक्तिमत्व. कोणतीही कटकट न करता आयुष्यातला पहिला ओव्हरनाईट ट्रेक याने यशस्वीपणे पार पाडला. 


ज्या किल्ल्यांच्या दर्शनाची कित्येक दिवस चातकासारखी वाट पाहिली आणि आता पावसाची वाट ना बघता ज्यांची ओढ आम्हाला या ट्रेकच्या रूपाने साकार करता आली ते पाच किल्ले म्हणजे. 
१. गाळणा 
२. कंक्राळा 
३. भामेर 
४. सोनगीर
आणि  
५. लळींग 

खरं तर ऑगस्ट ते ऑक्टोबर हा या किल्ल्यांसाठीचा सर्वोत्कृष्ट कालावधी या किल्ल्यांच्या इतर ऋतूंमधल्या रुक्षपणाला पर्याय म्हणून समजला जातो. पण जून महिना म्हणजे भरून आलेल्या आभाळाखाली माथ्यावरच्या भर्राट वा-याचा आस्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम. एक निराळाच निवांतपणा या ऋतूमध्ये मिळत असतो. आणि तसाही खान्देश ऐन पावसाळ्यातही फार बहरत नसल्याने जून ते ऑक्टोबर हा काळ या प्रदेशातील भटकंतीसाठी सर्वार्थाने योग्य आहे. 

तर आमचं सारथ्य नेहमीप्रमाणे रणजित मोहिते अर्थात काकांकडे होतं. वेग आणि संयम यांचा उत्तम मिलाफ म्हणजे काका !! अत्यंत शांत आणि अजिबात "डायवरगिरी" चा पोकळ डौल नसल्याने जवळपास गेल्या आठ वर्षांपासून काका आणि माझे अगदी घरोब्याचे संबंध जुळले आहेत ते याच कारणामुळे. 

साक्री गावात पोहोचताना घडाळ्याचा काटा चारवर स्थिरावत होता. खरं तर नाशिक ते साक्री हे अंतर तीन - सव्वातीन तासांचं. पण उत्तम अवस्थेतल्या आणि मध्यरात्रीची वेळ असल्याने "व्होल वावर इज अवर" या न्यायाने संपूर्ण मोकळाच मिळालेल्या या राज्य महामार्गाने काकांच्या सारथ्याला असा काही साज चढवला की गाडीचा काटा शेवटपर्यंत शंभरावर टिकवत काकांनी आम्हाला वेळेच्या आधीच नियोजित ठिकाणी पोचवलं. साक्रीपासून रायपूर मार्गे भामेर फाट्याला पोचलो तेव्हा डावीकडे भामेरचा बलदंड पहाड उजेडाची वाट पाहत उभा होता. भामेर फाट्यापासून भामेर गावात थोडाफार कच्चा असलेला रस्ता गेला आहे. गावातल्या भवानी मातेच्या मंदिरात आंबलेल्या अंगांनी पथा-या पसरल्या तेव्हा गावाला हळूहळू जाग येत होती. काही मोजकीच पावलं सकाळच्या आन्हिकांना तर काही पोटापाण्याच्या सोयीसाठी बाहेर निघाली. डोळ्यावरची झापडं जड होऊ लागली तेव्हा पुढच्या दोन दिवसांचा खान्देशी आकृतिबंध स्वप्नातही स्पष्ट होऊ लागला होता !!!  

क्रमशः  
Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड