एक दिवाळी.....आडवाटेवरची !!

नक्की तारीख आठवत नाही....पण भल्या पहाटे जेव्हा सिंदोळा किल्ल्याच्या पायथ्याचं बगाडवाडी गाव गाठलं त्यावेळी सह्याद्रीच्या अजस्त्र कड्यांमागून तेजोभास्कराची रोषणाई झालेली होती आणि गावातल्या प्रत्येक घरात संध्याकाळच्या रोषणाईची जोरदार तयारी सुरु होती. गावातल्या अनेक चेहे-यांवर “दिवाळीत घरी बसायचं सोडून ही चार कार्टी इथं कुठं कडमडायला आली !!” असले भाव स्पष्ट झळकत होते. आम्ही मात्र त्यांना एक लाघवी हास्य दिलं आणि सिंदोळयाची पायवाट तुडवू लागलो....तो माहोलच काही और होता !!

निमित्त होतं दिवाळी स्पेशल म्हणून आखलेल्या पुणे जिल्ह्यातल्या आणि जुन्नर तालुक्यातल्या सिंदोळा,हडसर,चावंड आणि निमगिरी या चार भन्नाट किल्ल्याच्या स्वैर भटकंतीचं. ऐन दिवाळीत घरी बसायचं सोडून पोरगं अजून तिघाचौघांना नादाला लावून आणि पाठीवर बोचकी घेऊन भटकायला निघालंय या कमालीच्या उद्विग्नतेतून निर्माण झालेल्या आणि कानावर सुतळीबॉम्ब सारख्या फुटणा-या घरच्यांच्या शिव्या ऐकल्या आणि बाईकवरून पहाटेच्या प्रचंड थंडीत रक्त गोठवत सिंदोळा किल्ल्याचा पायथा गाठला. सिंदोळा किल्ला मात्र भन्नाट आहे. नाळेतली खडी चढाई अंगावर आली पण वरून दिसणा-या सह्याद्रीच्या विराट दर्शनाने सारा शिण घालवला. किल्ला बघून पायथ्याला परत आलो तेव्हा बगाडवाडीतले ग्रामस्थ आमच्या घरच्यांच्या शिव्यांचा हप्ता पूर्ण करायची नैतिक जबाबदारी दिल्यासारखे गाडीभोवती कोंडाळं करून उभेच होते. अपेक्षेप्रमाणे प्रश्नांचा भडीमार झाला आणि आम्ही इथे का आलो याची कारणमीमांसा झाल्यावर हातात आपोआपच चिवड्याची डिश,खंडीभर चकल्या ,कडबोळ्या आणि करंज्यांची खैरात झाली !!! घरी बसायचं सोडून इथे यायचं कारण एकच....या वर्षीची दिवाळी जरा हटके साजरी करायची आणि त्या सुखद आठवणींच्या फराळाची शिदोरी आयुष्यभर पुरवायची...बस्स !! चांगला तासभर बगाडवाडीतल्या लोकांनी आमचा खास पाहुणचार केला आणि मगच आमचा मार्ग मोकळा झाला. त्या दिवशी सिंदोळा हा एकच किल्ला असल्याने ट्रेकची गती अतिशय निवांत होती. आणि म्हणूनच पूर्ण दिवस किल्ल्यावर काढून संध्याकाळी खाली उतरलो आणि जुन्नरला जेव्हा पोहोचलो तेव्हा मुख्य चौकातल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या मागून सायंकाळच्या लाल छटा डोळ्यात भरू लागल्या.

चावंड किल्ल्याच्या पायथ्याच्या चावंड गावात पोहोचलो आणि त्या रोषणाईने डोळेच दिपून गेले !! काय त्या उत्साहाच्या सोहळ्याचं वर्णन करावं.....गरिबी आणि श्रीमंती किंवा रोजच्या जगण्यातल्या सोयी आणि गैरसोयी यांच्या पुसटश्या सीमारेषा जर ओलांडल्या तर त्या भाबड्या गिरीपुत्रांत आणि आपल्यात काय फरक उरतो. माणसाच्या मनाला तर सणवार सारखेच. मग तो शहरी गजबजाट असू दे किंवा एखादा आडवाटेवरचा आदिवासी पाडा !!  उत्साहाचं भरतं मात्र निखळ मनांनाच जास्त आपलंसं वाटून जातं. चावंड किल्ल्याचं दुसरं नाव “प्रसन्नगड” . त्या दिवशी समजलं की गडाच्या नावातला “प्रसन्न” शब्द किती सार्थ आणि चपखल आहे !! चावंडवाडीतल्या ग्रामस्थांनी आम्ही जणू काही आगाऊ कल्पना देऊन गावात आल्यासारखं स्वागत केलं. कोण कुठली चार मुलं एवढ्या लांबून आपला किल्ला बघायला आली आहेत यासारखं अप्रूप त्यांना नसावं. रात्रीच्या स्वयंपाकासाठी आमची भांडी बाहेर निघायच्या आत “साहेब...माझ्याकडे आज रात्री जेवायला यायचं बरं का...!!” हे गावातल्या कवटे काकांचे शब्द कानावर पडले. गावात प्रत्येक घरात दिव्यांची रोषणाई झालेली होती. आपसातले हेवेदावे विसरून पारावर गप्पा रंगत चालल्या होत्या. महिलामंडळाची रांगोळीसाठीची लगबग तरबच्चेकंपनीचा फटाक्यांचा उत्साह मात्र दांडगा आणि निरागस होता. अख्खी चावंडवाडी त्या रात्री उजळून निघाली होती. लक्ष दिव्यांनी प्रकाशित केलेलं चावंड गाव त्या रात्री एखाद्या कल्पनेच्या अपार असलेल्या जगाप्रमाणे भासलं...वर्षभर जणू याच दिवसाची चातकासारखी वाट बघत असल्यासारखं !!! तिथे कोणाला ना सरलेल्या भूतकाळाची आठवण होती ना अनाकलनीय असलेल्या भविष्याची प्रतिक्षा. कल्पनेच्या आणि अपेक्षांच्या सीमारेषा पार करून हे सर्व ग्रामस्थ मनाने एकरूप झाले होते....एकमेकांच्या मनात आपुलकीचा आणि मित्रत्त्वाचा लख्ख प्रकाश उजळवत होते. फटाक्यांची चालत असलेली मनमुराद उधळण पाहून तर कोणाचेही डोळे दिपून जावेत संधी साधून आम्हीही चार पाच फटक्यांना वाती लावल्या हा भाग निराळा !! पण त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासारखं समाधान बाकी कशातच मिळालं नसतं हेच खरं. नवीन कपड्यांचा शौक असू दे किंवा कोणाच्या पणत्या जास्त याची एक निखळ स्पर्धा....ये बातही कुछ और थी !!

नऊ वाजता कवटे काकांची जेवणासाठीची हाक आली आणि आम्ही भानावर आलो. अख्खं गाव नव्या कपड्यांनी सजलेलं असताना ट्रेकच्या गबाळ्या कपड्यातले आम्ही मात्र चर्चेचा विषय ठरलो होतो हे जाता जाता लक्षात आलं !! शेणाने सारवलेल्या अंगणात पंगत बसली आणि फ्लॉवर – बटाटा रस्सा,शेवयांची खीर,पोळ्या,आमटी भात आणि हे कमी की काय म्हणून वर लाड म्हणून बेसनाचे लाडू,चिवडा आणि शंकरपाळ्या असं भरगच्च ताट समोर आलं !! “खा हो....आज पाहुणे तुम्ही गावचे. घरी असतात तर पाहिलं असतंत का ताटाकडे.” या कवटे काकांच्या बिनतोड युक्तिवादाला मात्र आम्ही निरुत्तर ठरलो आणि हाता – तोंडाची गाठ पडली. बाहेर बॉम्बचे आवाज आणि फुलबाज्या,भुईचक्र आणि कारंज्याची डोळे दिपवणारी रोषणाई सुरूच होती आणि आम्ही मात्र त्या वातावरणात तोंडात घोळणा-या बेसनाच्या लाडवासारखे विरघळून गेलो होतो !!

जेवणानंतर पारावरच्या गप्पांना मात्र वेळ कमी पडला. रात्री कधीतरी दहाच्या सुमारास बाहेरचे आवाज थांबले पण गाव मात्र अजून जागंच होतं. उद्याचा आमचा कार्यक्रम ठरलेला असला तरी सकाळी नाष्ट्याशिवाय जायचं नाही हा ग्रामस्थांचा आग्रह मात्र मोडवला नाही. सकाळी किल्ला बघून गावात परत आलो तेव्हा चावंडवाडी एका नव्या आशेने आणि नव्या उत्साहात कामाला लागली होती. आयुष्यातल्या अनेक अर्थहीन आणि चेहे-यावरच्या हास्यात अडथळा ठरणा-या चिंतांची राख बहुदा कालच्या फटाक्यांबरोबरच झाली असावी !!! नवीन दिवसाला निखळ मनानी सामोरं जाणारी आणि आल्या पाहुण्याचं जणू घरचा सदस्य असल्यासारखं स्वागत करणारी ही निखळ मनं मात्र त्या दिवाळीतला खरा आकाशदीप ठरली होती !!!


Comments

 1. ओंकार खूप छान! आपल्या trekker ला सह्याद्रीतल्या स्थानिक गावकाऱ्यांकडून होणारा पाहुणचार हा तर स्वतंत्र लेखनाचा विषय आहे!

  ReplyDelete
 2. दर्जेदार लिखाण , सोबत गाववाल्यांचे प्रेम कमालीचे.
  सह्यद्रीत भटकताना असे कित्येक अनुभव येतात जेव्हा माणसातला माणूस कळतो.

  ReplyDelete
 3. Excellent... Thanks for sharing and keep writing...

  ReplyDelete
 4. Well written. Is this Shambu Dongar ?

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड