Save the Sahyadri .....


नमस्कार गिरीमित्रांनो व भटक्यांनो, 
सह्याद्रीतल्या ट्रेकिंगचा "Peak Season" म्हणजे अगदी सदाहरित व बारमाही !!! महाराष्ट्रातल्या दुर्गम गडकोटांकडे,घाटवाटांकडे गिर्यारोहकांची पावलं वळू लागतात आणि या सह्याद्रीउत्सवाला अगदी उधाण येतं . पण या वाढत्या ट्रेकिंग संस्कृतीबरोबर काही उत्साही पर्यटकांमुळे सह्याद्रीला आणि त्याच्या जैवविविधतेला धोका उत्पन्न झाल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. जिथे जाऊ तिथे दारूच्या बाटल्यांचा खच,सिगारेटची पाकिटं, कचरा, आधीच मरणासन्न अवस्था भोगणा-या अवशेषांवर लिहिल्या जाणा-या प्रेमकहाण्या आणि त्याला खतपाणी घालणारे बेताल पर्यटक हे दृश्य आता सहन करण्याच्या पलीकडे गेलं आहे. निव्वळ निष्काळजीपणामुळे डोंगरांमधील वाढू लागलेले अपघात हाही चिंतेचा विषय आहेच.त्यामुळे तैलबैला येथे नुकत्याच पार पडलेल्या Sahyadri Trekkers Bloggers Meet मध्ये या सर्व गोष्टींना अंकुश बसावा आणि गिर्यारोहण सुरळीत व्हावं यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल उचलण्यात आलं आहे.
Sahyadri Trekkers Bloggers च्या सदस्यांनी काही प्रतिबंधात्मक चिन्ह तयार केली असून त्याचे फ्लेक्स प्रत्येक किल्ल्यावर,घाटवाटेवर व पर्यटनस्थळांवर व्यवस्थित दिसतील अशा ठिकाणी लावण्यात येणार आहेत. यातील पहिला फ्लेक्स सांधण व्हॅली इथे लावला गेला असून इतर ठिकाणीही खाली दिलेला फ्लेक्स लावला जाणार आहे.
हे मिशन महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचावं आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळावा यासाठी एक सुजाण गिर्यारोहक म्हणून आपणा सर्वांना हे आवाहन आहे की इथून पुढे आपण जिथे ट्रेकिंगसाठी जाऊ तिथे हा फ्लेक्स 4x3 च्या किंवा त्यापेक्षा मोठ्या साईझमध्ये लावण्यात यावा जेणेकरून त्या ठिकाणी जाणा-या ट्रेकर्सना डोंगरात काय करावं व काय करू नये याचा उलगडा अगदी व्यवस्थित होईल व आपले उद्दिष्ट सफल होण्यास मदत होईल.प्रबोधनाचं हे एक माध्यम यशस्वी केल्यास आपला सह्याद्री एक नवं रूप धारण करेल यात शंकाच नाही. गरज आहे ती आपल्या सहकार्याची व सहभागाची !! एका फ्लेक्सच्या माफक खर्चात जर आपला लाखमोलाचा सह्याद्री पुन्हा उजळून निघणार असेल तर इतना तो बनता है बॉस !!!
पुन्हा एकदा आवाहन...आपला सह्याद्री वाचवण्यासाठी वेळ आली आहे ती आता ही वज्रमूठ बांधण्याची व हे पहिलं पाऊल यशस्वी करण्यासाठी नव्या जोमाने एकत्र येण्याची !!
फ्लेक्सची Printable Image https://drive.google.com/…/0B0I9ip9UpeHVVmU2OExKU2ZOQXc/view या लिंक वर उपलब्ध आहे. फाईलची साईझ मोठी असल्याने ती डाउनलोड होण्यास ५-१० मिनिटांचा कालावधी लागू शकतो. 
लिंक मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास
sahyadri.trekkers.bloggers@gmail.com या ईमेल आयडीवर Test Mail करा. तुम्हाला फ्लेक्सची Printable Image पाठवली जाईल.
Comments

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड