अरण्यवाटा.... !! - भाग एक"मास्तर ती दूधगावची एसटी किती वाजता आहे हो  ??"
"शी बाई केवढे डास आहेत इथे !!" 
"अय... त्यांना विचार टायलेट कुठे आहे "
"आयला हे तंबू लावून कोन झोपलंय हिथं  ?? आरं नसेल हाटेल परवडत !!!"

शनिवारच्या पहाटेचे हे संवाद आमच्या कानावर आदळत होते ते साडेपाचचा गजर म्हणूनच  !!  टेन्टच्या बाहेर अनेक सावल्या जमा झालेल्या बघून आपण यांच्या चर्चेचा विषय ठरायला लागलोय हे आमच्या लक्षात आलं आणि तिघेही ताड्कन उठून बसलो. महाबळेश्वरच्या एसटी स्टॅन्डमध्ये टेन्ट लावून झोपणारे इतिहासात आम्हीच पहिलेच असू !! शुक्रवार रात्रीचा बाईकवरून केलेला पुणे ते महाबळेश्वर प्रवास चांगलाच अंगी लागला होता. त्यात रात्री १.३० वाजता एसटी स्टॅण्डमध्ये घडलेल्या भन्नाट प्रसंगाने (हा किस्सा भेटल्यावर सांगेन) झोपायला आधीच उशीर झालेला. टेन्टची कनात उघडून बाहेर आलो तेव्हा आमच्याच शेजारी दोन कॅरीमॅट पडलेली दिसली आणि आपण एकटेच एसटी स्टॅण्डवर जमलेल्या स्थानिकांच्या चर्चेचा विषय नाही या आमच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला !! सकाळचे सगळे सोपस्कार पार पडून आणि त्या कॅरीमॅट्सचे मालक असलेल्या युथ हॉस्टेल मालाडच्या दोन सदस्यांशी कोंडनाळ आणि हातलोट घाट या विषयावरचा परिसंवाद संपवून आम्ही स्टँडच्या बाहेर आलो तेव्हा पूर्वेला दिवेलागणीची  सुरुवात झाली होती.  एसटी स्टँडच्या समोर इतक्या पहाटेही आपल्या धंद्याची काळजी असणा-या एका हॉटेल मालकाने अगदी मनापासून गरमागरम चहा आणि पोह्यांचा नजराणा पेश केला आणि आता आम्ही सज्ज झालो ते या अरण्यवाटा धुंडाळायला ....  !!

रौद्रभीषण, भीमकाय,मूर्तिमंत इत्यादी विशेषणांनी ज्याचं वर्णन करावं आणि सह्याद्रीचा महिमा ज्याच्या उल्लेखाशिवाय थिटा पडावा असा पहाड म्हणजे महाबळेश्वर !! ढवळी,जावळी,कृष्णा, सावित्री या खो-यांना ज्याने आपल्या बलदंड बाहुंमध्ये सामावलं आहे  आणि सह्याद्रीच्या कराल कातळकड्यांचा साज ज्याने आपल्या अंगाखांद्यावर पेलला आहे तो हा.... महाबळेश्वर !! अगदी नावाप्रमाणेच शक्तिशाली आणि देखणा. अवघ्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जरी हे एक हिल स्टेशन असलं तरी आपल्यासारख्या सह्याद्रीप्रेमींना खुणावतात त्या इथल्या दुर्गम अरण्यवाटा आणि भारलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा !! इथला इतिहास जणू अनादी काळासाठी मंतरलेला आणि आजही आपल्या अस्तित्वाच्या खुणा निगुतीने जपणारा. छत्रपती शिवाजी महाराजांनी  जिथं चंद्रराव मो-याला जेरीस आणलं, जिथं त्याच्या मी मी म्हणणा-या पोकळ डौलाला असा काही झटका दिला की त्याच्या अहंकाराचा क्षणार्धात महाबळेश्वराच्या खोल कड्यांमध्ये कोसळून चक्काचूर झाला आणि स्वराज्यावर वावटळासारखं चालून आलेलं अफझलखान नावाचं भयाण संकट जिथं आपल्या असामान्य शक्ती आणि बुद्धीच्या जोरावर धुळीच्या लोटासारखं कुठल्याकुठे उधळून लावलं ...ती ही जावळी !!! पुढच्या दोन दिवसात मागोवा घ्यायचा होता याच मंतरलेल्या इतिहासाचा, काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या पुरातन अरण्यवाटांचा आणि स्वतःचा.... !!!

महाबळेश्वर एमटीडीसी - मेट तळ्याची वाट - मेट तळे - रडतोंडी घाट - घोगलवाडी - पार - प्रतापगड - वाडा कुंभरोशी - दाभिळटोक घाट - दाभिळ गाव - लहुळसे - सावित्री घाट - जावळी - बाजारपेठेची वाट - महाबळेश्वर इतका भरगच्च कार्यक्रम या दोन दिवसात आखला गेला . सह्याद्रीत मनमुराद आणि संवेदनशील मनाने भटकणा-या प्रशांत कोठावदे,साईप्रकाश बेलसरे आणि मनोज भावे या खास सह्यमित्रांच्या मदतीने संपूर्ण ट्रेकचा आराखडा तयार झाला आणि सोबतीला तयार झाले हर्षल कुलकर्णी आणि नवा भिडू (आणि होऊ घातलेला नवरदेव ओंकार नवघरे). एमटीडीसी मध्ये गाड्या व्यवस्थित लावून आम्ही आता महाबळेश्वरच्या बॉम्बे उर्फ सनसेट पॉईंटची वाट चालू लागलो. काळ्या कुळकुळीत डांबरी रस्त्याला दाट झाडीचं कोंदण लाभलं होतं. सकाळच्या कमालीच्या शांत ,निरव आणि निस्तब्ध वातावरणाला एखाद्या पाखराची शीळ  हलकेच छेडून जात होती. अप्रतिम अशी एक निराळीच प्रसन्नता अनुभवत वीसेक मिनिटात आम्ही मुंबई पॉईंटला पोहोचलो. संध्याकाळी गजबजलेली सारी दुकानं आता मात्र एकदम चिडीचूप होती. समोर उठावला होता महाबळेश्वरचा शिरपेच...प्रतापगड आणि त्याच्या पायाशी पसरलं होतं जावळीचं गच्च अरण्य. मुंबई पॉईंटच्या मुख्य गेटच्या अंदाजे ५० एक फूट अलीकडे रस्त्याला लागूनच डाव्या हाताला एक लाल मातीचं अगदी छोटं मैदान आहे. मैदानातून सरळ जाणारा एक गर्द रानाचा बोगदा दिसला....हीच ती मेट तळ्याची वाट. हवाहवासा वाटणारा एक थंडावा आता सुरु झाला. रोजच्या वापरातली भली मोठी प्रशस्त वाट आता आंबेनळी घाटात उतरू लागली. उतार किंचित  तीव्र असला तरी  दिवसाची एक सुंदर सुरुवात होत आहे या विचाराने सुखावलो. वाट आता डांबरी रस्ता जवळ करू लागली होती. 
वीसेक मिनिटात आंबेनळी घाटाचा डांबरी रस्ता लागला. आता मात्र पूर्णपणे उजाडलं होतं. सकाळचं कोवळं ऊन आणि जावळीच्या जंगलाची हिरवी छटा यांच्या रंगसंगतीचा सुरेख मेळ साधणा-या त्या "वॉलपेपर" दृश्याकडे आम्ही बघतच बसलो.  पुढच्या पंधरा वीस मिनिटात आम्ही मेट तळ्यामध्ये होतो. खरं तर मेट याचा अर्थ चौकी किंवा पहा-याची जागा. एखाद्या गडाच्या वाटेवर आत्ताच्या भाषेत सांगायचं तर जसे "चेकपोस्ट" असतात तशी मेटं असत आणि त्यांच्या प्रमुखाला मेटकरी म्हणलं जाई. महाबळेश्वरवरून प्रतापगडला उतरणा-या या वाटेवरच्या तळे या गावात असच एखादं मेट असावं म्हणून गावाचं नाव मेटतळे पडलं असेल. इतिहासातले हे आडाखे मनोरंजनात्मक तर असतातच पण ज्ञानातही भर घालणारे ठरतात. मेट तळ्यातून साधारण पश्चिमेला झालेल्या मकरंदगड आणि दूधगावच्या परिसराच्या सुरेख दर्शनानं सुखावलो.मेट तळ्याहून पोलादपूरच्या दिशेला थोडं पुढे गेलो की रस्ता पूर्णपणे उजवीकडे यु टर्न घेतो आणि या वळणावरच महाबळेश्वरची  लॉडविक आणि एल्फिस्टन ही टोकं नजरेत भरतात.याच जागी घाटाचा संरक्षक कठडा तोडून एक वाट खाली उतरायला लागते. हीच त्या इतिहास गाजवणा-या रडतोंडी घाटाची सुरुवात. पायवाट आता हळूहळू मोठी होऊ लागली. महाबळेश्वरचे उत्तुंग कडे मागे पडू लागले होते. 

रडतोंडी घाट अगदीच प्रशस्त आहे. पायथ्याच्या दुधोशी आणि घोगलवाडी या गावाच्या ग्रामस्थांचा महाबळेश्वरला येण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे रडतोंडी घाट. पण या घाटाने शिवरायांच्या रणनीतीची अशी काही जादू अनुभवली आहे ज्याला इतिहासात तोड नाही !! प्रचंड सैन्य घेऊन अफझलखान महाराजांवर चाल करून निघाला. प्रतापगडावर पोहोचण्याचा "सोपा" मार्ग महाराजांनी त्याला सुचवला... तो म्हणजे आजचा रडतोंडी घाट !! प्रचंड सैन्य,हत्ती,घोडे, जड - जवाहिर तोफा आणि असा अभूतपूर्व लवाजमा घेऊन अफझलखानाने रडतोंडी घाट उतरायला सुरुवात केली. पण हाय रे कर्मा...काही वेळातच जावळीच्या या निबिड अरण्याने आणि सह्याद्रीच्या पाऊलवाटांनी आदिलशाही फौजेच्या तोंडाला अक्षरश: फेस आणला !! रडतोंडीच्या घनदाट जंगलाची आत्ताची परिस्थिती बघता त्यावेळी हे जंगल काय असेल याची कल्पनाही करवत नाही. पण आदिलशाही फौजेची काही वेळातच धूळधाण उडाली. संपूर्ण सैन्याला जावळीच्या जंगलाने पार ओरबाडून टाकलं, छत्रचामरं फाटली, झाडांच्या वेलींमध्ये पाय अडकून तोंडावर आपटल्याने आदिलशाही सैन्याचे गुडघे फुटायला लागले. काहींनी तर तिथेच प्राण सोडला....सह्याद्रीने दाखवलेल्या आपल्या रांगड्या रंगामुळे आदिलशाही फौजेची तोंडं रडवेली झाली आणि हा रडतोंडी घाट इतिहासात अजरामर झाला !!  वाट आता मोकळवनात आली. पाठीमागून घरघर करत येणा-या एखाद्या ट्रकचा हॉर्न इतकाच काय तो या वातावरणातला जिवंतपणा !! बाकी सारा आसमंत ती शांतता अनुभवत होता. समोर मकरंदगड उठावला आणि त्याच्या पलीकडे पश्चिमेकडे सरकलेली सह्याद्रीची मुख्य रांग नजरेत भरली. 

प्रतापगडाच्या दर्शनाने मात्र नवी स्फूर्ती मिळवून दिली. पायथ्याशी पसरलेलं आणि आजही आपलं अस्तित्व जपलेलं निबिड अरण्य या परिसराच्या इतिहासकालीन दुर्गमतेची साक्ष देऊन गेलं. पायथ्याशी असलेलं टुमदार दुधोशी गावही आता दृष्टीक्षेपात आलं. घोगलवाडी मात्र या मार्गावरून चटकन दिसत नाही. त्यामुळे पायथ्याशी दिसत असलेलं गाव दुधोशी आहे हे लक्षात ठेवूनच मार्गक्रमण सुरु ठेवावं.   


भली थोरली आणि ठसठशीत मळलेली फरसबंदी पायवाट जंगलाच्या थंडगार सावलीत खाली खाली सरकू लागली. त्या वाटेवर सकाळच्या प्रसन्न वातावरणात चालण्याचं सुख काय सांगावं  !! मंतरलेल्या इतिहासाचं हेच तर देणं असतं. ते मनसोक्त अनुभवावं आणि आपली परिक्रमा अविस्मरणीय बनवावी. रडतोंडीचं घनदाट अरण्य आता बोलू लागलं. रानपाखरांचे आवाज कानात हलकेच रुंजी घालू लागले. पानात झालेली अनामिक सळसळ त्या रानाचा साज ठरली. पायाखाली चुरचुरणा-या कोरड्या पानांनी त्या वेळेला एक गूढपणा मिळवून दिला. अवाक्षरही न बोलता फक्त पायांच्या गतिकडे लक्ष देत आम्ही आता घोगलवाडी जवळ करू लागलो. 
वाटेवर मिळालेल्या माफक उघडिपीतून समोर दिसणारं सह्यवलोकन करायचा मोह मात्र आवरता आला नाही. 


नाव रडतोंडी असलं या निखालस सुंदर घाटाने मात्र आमची तोंडं समाधानाने खुलवली !! वाटेवरच्या फरसबंदी खुणा दोन्ही बाजूला लावलेल्या दगडांमुळे पटत होत्या. स्थानिकांनी इतकी ठळक असूनही ती अजिबात चुकूच यासाठी झाडांवर लावलेल्या पिवळ्या रिबिन्सनी वाटेच्या निश्चितीकरणाची खात्री पटवून द्यायचं काम चोख बजावलं होतं. शेवटच्या टप्प्यातल्या मोकळवनात पोहोचलो आणि वाटेवरून डावीकडे जेव्हा मकरंदगडाचा सुरेख नजारा पाहायला मिळाला तेव्हा पायथ्याला वाजलेल्या जीपच्या हॉर्नने घोगलवाडी आल्याची वर्दी दिली. पाचव्या मिनिटाला डांबरी रस्त्यावर उतरलो. घोगलवाडीच्या केवळ सहा विद्यार्थी असलेल्या शाळेच्या मास्तरांनी अगदी प्रेमाने थंड पाण्याची बाटली हातात दिली. घोगलवाडीतून प्रतापगड मात्र सुरेख दिसत होता.मुंबई पॉईंटवरून निघाल्यापासून फक्त दोन तासात आम्ही घोगलवाडी गाठली होती. या पुढचा पार गावापर्यंतचा मार्ग मात्र डांबरी रस्त्यावरून नेणारा. अगदी दोन तीन किलोमीटर्सची का होईना पण डांबरी रस्त्यावरून असणारी रटाळ पायपीट ही ट्रेकमधली सगळ्यात मोठी डोकेदुखी असते. ना कुठला नजारा ना वाटेचं सौंदर्य !! शेजारून भसकन जाणारी वाहनं मात्र "टुक टुक" केल्याच्या अविर्भावात आमच्याकडे बघत निर्विकारपणे पुढे निघून जात होती.  घोगलवाडी  ते पार या रटाळ चालीमधे दिलासा देणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे या वाटेवर खुद्द छत्रपती शिवाजीमहाराजांनी रयतेकरता बांधलेला कोयना नदीवरचा भक्कम पूल !! जनतेच्या सुखासाठी दिवसरात्र  एक करणा-या त्या दृष्ट्या राजाची दूरदृष्टी मात्र निर्विवादपणे वंदनीयच आहे. आजही हा पूल इतिहासकालच्या भक्कमपणाला जागत स्थानिकांच्या वापरासाठी अगदी शाबूत आहे. कोयनेच्या पात्रात उतरून तिच्या पाण्यात पडलेलं त्या ऐतिहासिक वैभवाचं सुंदर प्रतिबिंब सगळी पायपीट विसरायला लावणारं ठरलं.  दुधगाव फाटा जवळ आला तेव्हा पार गावात वाजणा-या एकसुरी गाण्यांनी मात्र आमच्या डोकेदुखीत अजूनच भर घातली. डांबरी रस्त्याच्या चालीचा छळ कमी व्हावा म्हणून वातावरणाशी जुळणारं गाणं किशोरकुमार मुक्तपणे गात होता "मुसाफिर हुं यारों....ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना हैं...बस चलते जाना !!" पार गावातल्या एका लग्नघरी तसली गाणी लागलेली बघून नवरदेवाची लग्न करायची इच्छा कशी काय मावळली नाही याचा विचार करतच पार गाव गाठलं !!


पार गावातलं रामवरदायिनीचं भव्य आणि नव्यानेच बांधलेलं नितांत सुंदर मंदिर म्हणजे या संपूर्ण भागासाठी अत्यंत श्रद्धेचं स्थान. गावाचं मूळ नाव पार्वतीपुर. रामवरदायिनी ही मो-यांची कुलदेवता. आजही या भागात नवीन लग्न झालेली जोडपी देवीच्या पायावर मस्तक ठेवूनच आपल्या सांसारिक प्रवासाची सुरुवात करतात. महाबळेश्वर परिसरात इतकं प्रसिद्ध असूनही पार गावात मात्र व्यावसायिक वृत्तीचा आणि कृत्रिमपणाचा लवलेशही नव्हता. चारही बाजूंनी डोंगरांच्या कुशीत वसलेलं पार गाव मात्र अत्यंत टुमदार आणि देखणं !! रामवरदायिनी मंदिराशेजारी असणा-या छोटेखानी दुकान कम हॉटेलमध्ये थंडगार लिंबू सरबताचे घोट रिचवत असताना दुकानाच्या मालकीणबाई असलेल्या सोंडकर आज्जींनी मात्र कमालीच्या मायेने विचारपूस केली. "तुमी हि वझी (ओझी) ठेवा हिथंच. कोनीबी हात लावनार नाय. माझ्या डब्यातल्या चपात्या अन भाजी खा अन प्रतापगड बघून या मुक्कामाला" ही त्यांची कळकळच सगळं विसरायला लावणारी होती. त्यांच्याच दुकानात सॅक ठेवल्या आणि रामवरदायिनीच्या भव्य राऊळात प्रवेश केला. कमालीचं स्वच्छ आणि देखणं मंदिर अगदी रुबाबात उभं आहे. रामवरदायिनीची मूर्ती अत्यंत देखणी असून  त्या आदिशक्तीचं दर्शन घेतानाच अंगावर सर्र्कन काटा आल्याची स्पष्ट जाणीव झाली !! जागृत देवस्थानाची यथोचित  प्रचिती येत असल्याचा भास त्या धीरगंभीर वातावरणात झाला. देवीच्या गाभा-यात आजही शिवकालीन दांडपट्टा असून देवीचे पुजारी विनंती केल्यास तो नक्की दाखवतात. या पूजा-यांचं मूळ आडनाव मोरे. पण शिवाजीमहाराजांनी प्रतापगडच्या युद्धात पार वरून किनेश्वरला उतरणा-या पार घाटाची आणि पार ते प्रतापगड या पायवाटेच्या सोंडेच्या रक्षणाची दिलेली जबाबदारी समर्थपणे यशस्वी केल्याने  मोरे कुटुंबियांना "सोंडकर" ही उपाधी प्राप्त झाली आणि आजही हे कुटुंब किंबहुना हे संपूर्ण गावच शिवकाळाच्या पराक्रमाच्या खुणा जपतय...शिवरायांच्या रणनीतीच्या गाथा शिवभक्तांना अभिमानानं सांगतय !!


रामवरदायिनी मंदिराच्या शेजारीच असणा-या शिवमंदिराच्या बाहेर दोन भल्यामोठ्या तोफगोळ्यांची वर्णी आमच्या फोटोंच्या लिस्टमध्ये लागली. ऊन तापायला सुरुवात झाली होती. पार गाव ते प्रतापगड हे अंतर तासाभराचं असलं तरी अगदी बुजुर्ग गावक -यांच्या "तासभर कसला हो....पाच सहा वर्षांची पोरं पण वीस मिनिटात जातात गडावर" या वाक्यांवर विश्वास ठेवायला आम्ही तयारच नव्हतो !! पार गावातल्या विलक्षण देखण्या आणि प्रशस्त अंगणाच्या घरांमधून वाट प्रतापगडाकडे निघाली. पहिल्या पाचेक मिनिटांच्या छातीवरच्या चढातच श्वासाची लय वाढू लागल्याचं तिघांनाही जाणवलं. पण संपूर्ण वाट घनदाट जंगलातून जात असल्याच्या आमच्या माहितीला गावक-यांनी बिनविरोध पुष्टी दिली आणि आम्ही निश्चिंत झालो.प्रतापगडावर असलेल्या अफझलखान कबरीच्या जवळ असलेल्या एका विहिरीतून पाण्याचा पाईप गावापर्यंत आणला गेला आहे. त्याची सोबत धरली की चुकायची अज्जिबात शक्यता नाही. जंगलातून वर चढणा-या वाटेचा प्रशस्तपणा मात्र दिलासा देणारा होता. या वातावरणात गप्पांना रंग चढला नसता तरच नवल. हर्षलचा आणि माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे नाशिक जिल्हा !! त्यात ओंकार नवघरे नाशिकचाच असल्याने त्याला वेगळं सांगण्याची काही गरज भासलीच नाही. धोडपच्या डाईकपासून साल्हेरच्या हाईकपर्यंत आणि शामसुंदर मिसळीपासून अचला पायथ्याच्या वडा - उसळीपर्यंत अवघ्या नाशिक जिल्ह्याची यथोचित पारायणं झाली. वाटेवर लागलेल्या आणि पुरानी हवेलीतल्या एखाद्या झपाटलेल्या खोलीसारख्या दिसणा-या पाईपरूम उर्फ जनरेटर रूम पाशी छोटी विश्रांती झाली. विषय नाशिक जिल्ह्यातून प्रतापगड युद्धाकडे वळाला होता. शिवाजीमहाराजांनी अफझलखानाची पुरेपूर कोंडी करण्यासाठी आखलेली युद्धनीती केवळ अजोड !! आजही इतिहासात त्याला पर्याय नाही आणि कधीच नसेल. परदेशामध्ये मॅनेजमेंटचे  कित्ते गिरवताना आणि भारतीय सैन्याला रणनीती अर्थात "वॉरफेअर स्ट्रॅटेजीचे" धडे देताना आजही दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवल्या गेलेल्या या अतुलनीय लढाईची उदाहरणे देण्यात येतात. पावलागणिक ह्या गोष्टी स्मरत होत्या....महाराजांविषयीचा आदर अजूनच वृद्धिंगत करत होत्या !!समोरच्या झाडीतून पलीकडे दिसणा-या निळ्याशार आभाळाच्या दृश्यामुळे आपण चढाईची परीक्षा पार करत आलो आहोत हे जाणवलं आणि तेवढ्यात समोर वनखात्याने बांधलेल्या खोल्यांची जुनी इमारत आणि त्याच्या खाली असलेली खोल विहीर लागली. नाशिकवरून प्रतापगड युद्धापर्यंत आलेल्या गप्पा थांबल्या. आता थोडाच चढ आणि प्रतापगड !! अफझल कबरीपाशी पोहोचताना मोठमोठ्या बसेसचे आवाज कानी पडले आणि इतिहासातून वर्तमानात आल्याची बोचरी जाणीव झाली. वाटेवरच्या संरक्षक कठड्यावर मुक्तपणे विहरणारा वारा अंगावर घेत समोर एखाद्या कसलेल्या मल्लासारख्या दिसणा-या प्रतापगडाच्या आजही खणखणीत उभ्या असलेल्या दुर्गस्थापत्याचं डोळे भरून दर्शन घेतलं !! 
अफझल कबरीपाशी पोहोचलो तेव्हा तिथल्या रखवालदारांच्या "तुम्हाला इकडे यायला कोणी सांगितलं" या विधानाने अवाकच झालो. खरं तर हेच ते ठिकाण...जनीचा टेंभ. इथेच अफझलखानाच्या भेटीसाठी महाराजांनी भव्य शामियाना उभारला आणि त्या मदोन्मत्त दैत्याला काही क्षणातच धुळीस मिळवलं !! शिवप्रताप इथं घडला....शिवरायांच्या पावलांनी इथल्या मातीचा कण न कण पवित्र झाला !! नरसिंहाने मातलेल्या हिरण्यकश्यपूचा ज्याप्रमाणे कोथळा काढला त्याच प्रमाणे शिवरायांनी अफझलखानाच्या अजस्त्र देहाची चाळण केली....त्याला सह्याद्रीच्या कडव्या मातीची चव चाखायला लावली. सध्याच्या काळात मात्र ही जागा अत्यंत वादग्रस्त आहे. का ?? तो वेगळा चर्चेचा विषय होईल. पण पार गावातून प्रतापगडावर येणा-या एखाद्याला जर ही जागा वादग्रस्त आणि प्रतिबंधित आहे याची अजिबातच माहिती नसेल तर तो कायद्याच्या कचाटयात सापडलाच म्हणून समजा !! इथे प्रवेश निषिद्ध आहे ही पाटी डांबरी रस्त्याच्या बाजूने लावली आहे पण पार गावाच्या वाटेने आल्यास असली कोणतीही पाटी नाही. त्यामुळे अफझल कबरीकडे न जाता प्रतापगडावर कसं जावं याची तजवीज करण्याचे कष्ट मात्र राज्य सरकारने घेतलेले नाहीत. यथावकाश आम्ही डांबरी रस्त्यावर पोहोचलो. स्थानिक दुचाक्यांपासून ते चकचकीत दिसणा-या असलेल्या चारचाकी गाड्यापर्यंत  आणि शैक्षणिक सहलीच्या बसेसपासून ते गाडीच्या टेपवर वातावरण भेदत जाणा-या "कधी व्हन्नार तू रानी माझ्या लेकराची आई" असल्या कर्णकर्कश्श आवाजाने आनंद मिळवणा-या बेशिस्त पर्यटकांची झुंबड त्या रस्त्यावर उडाली होती. आम्ही मात्र भवानी मातेचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही हे ठरवून आल्यामुळे त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष करत तो डांबरी रस्ता तुडवू लागलो. सहलीसाठी आलेले छानशौकी पर्यटक आणि लाल मातीने माखलेले आमचे अवतार यात जमीन अस्मानाचा फरक होता. आमच्या पाठीवरच्या सॅक्स,त्याला लावलेलं कॅरीमॅट आणि रापत चाललेले चेहेरे हा मात्र तिथल्या जनतेच्या आश्चर्यभरल्या नजरेचा विषय ठरला होता. 

प्रतापगड पार्किंगमधल्या महालक्ष्मी हॉटेल मधलं फेसाळलेलं थंडगार ताक त्या तापलेल्या वातावरणात संजीवनी ठरलं. परहेड तीन ग्लास ताक रिचवून कमालीच्या फ्रेश  मूडमध्ये प्रतापगडाच्या पाय-या आम्ही आता चढू लागलो. पण किल्ल्याचा महादरवाजा जसा जसा जवळ येत होता तशी तशी आमची किल्ला बघण्याची इच्छा मावळू लागली. प्रतापगडावर आम्हा तिघांचीही ही चौथी पाचवी फेरी असेल असामान्य दुर्गस्थापत्याने सजलेल्या या भोरप्याच्या डोंगरात मात्र प्रत्येक वेळी काहीतरी नवा खजिना सापडतोच याची खात्री होती. पण शनिवार असल्यामुळे बेताल आणि स्थळकाळाचं भान नसलेल्या निर्लज्ज पर्यटकांची गर्दी आता आमचा श्वास कोंडू लागली. "Will you take our selfie with the statue of  Shivaji ??" सारख्या वाक्यांमुळे हातावरचा ताबा सुटून मी कोणाचा तरी कोथळा बाहेर काढेन इतकी जबरदस्त तिडीक मस्तकात गेली.वाटेवरचं दुर्गस्थापत्य पर्यटकांच्या भिंतीला टेकून उभं राहून फोटो काढण्याच्या स्पर्धेत कुठल्याकुठे हरवलं होतं. पण आपण "यांच्यातले" नाही ही भावना मनाला संयम घालायला पुरेशी ठरली. अखेर गडाच्या पाय-या चढत बरोब्बर साडेबारा वाजता आम्ही भवानी मंदिराशेजारच्या सुदीप फ़डणीसांच्या मराठमोळ्या "हॉटेल शीतल" मध्ये प्रवेश केला आणि तिथल्या बैठकीच्या टेबलांची आसनव्यवस्था असलेल्या गाद्यांवर अंग झोकून दिलं तेव्हा मनाला जे काही समाधान मिळालं त्याला तोड नव्हती. पोटात आता आग पडली होती. धडाधड ऑर्डर्स सुटल्या आणि वांग्याचं भरीत,पिठलं,कांदाभजी,शेवभाजी,पोळ्या,ठेचा आणि ताक असा भरगच्च, सुग्रास आणि केवळ अप्रतिम चवीचा अस्सल मराठमोळा मेनू जेव्हा समोर आला तेव्हा अवाक्षरही न बोलता फक्त हातातोंडाची पडलेली गाठ आम्ही अनुभवत होतो !!  फडणीसांचं शीतल हॉटेल म्हणजे घरगुती चवीचा परमोच्च आनंद. संपूर्ण प्रतापगडावर या चवीचं जेवण देणारं आणि अतिशय नम्र व तत्पर सेवा असणारं हे एकमेव हॉटेल असावं. कित्येक दिवस शोधूनही या हॉटेलचा संपर्क अगदी इंटरनेटवरही कुठेही मिळत नव्हता. त्यामुळे हा "हॉटेल शीतल" चा काँटॅक्ट खास तुमच्यासाठी.सुग्रास चवीचं ते जेवण, खास करून थंडगार "मटका ताक" अगदीच अंगावर आलं. हर्षल काहीच महिन्यांपूर्वी प्रतापगडावर येऊन गेलेला असल्यामुळे त्याने मला आणि ओंकारला देवीचं दर्शन घेऊन यायला सांगितलं आणि स्वतः आमच्या बॅगांची रखवाली करण्यास आनंदानं तयार झाला !! शीतल हॉटेलच्या पाय-या उतरून आम्ही भवानी देवीच्या मंदिरात प्रवेश केला. अत्यंत जागृत आणि प्रचंड भक्तिभावानं पूजलं जाणारं हे देवस्थान. प्रतापगड बांधणीच्या वेळेस शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीतून आणलेल्या त्या नश्वर शिळेला हे मूर्तरूप प्राप्त होण्याचं भाग्य लाभलं आणि त्या शिळेला एक दैवी संजीवनी मिळाली. देवीच्या गाभा-यात स्फटिकाचं शिवलिंग असून एक तलवारही आहे. भवानी मातेचं सोनेरी शिखर उन्हात न्हाऊन निघालं होतं. मंदिराच्या शेजारी असलेल्या हस्तकला केंद्राच्या बाहेर काही ऐतिहासिक अस्तित्व दिसली. 


हस्तकला केंद्राच्या अंगणातून प्रतापगडाची माची आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभे असणारे महाबळेश्वरचे उत्तुंग कडे सुरेख दिसत होते. या माचीवरच्या बुरुजाच्या (ज्याला अफझल बुरुज असं जनमानसात रूढ असलेलं नाव आहे) बरोब्बर समोर महाबळेश्वरची एक धार खाली उतरलेली दिसतीये, तेच आमच्या ट्रेकचं आरंभस्थळ अर्थात बॉम्बे पॉईंट. आज सकाळपासून आत्तापर्यंतची सारी तंगडतोड क्षणार्धात नजरेत भरली. 


हस्तकला केंद्राच्या अंगणातच शिवकाळातील भांडी आणि तोफा ठेवल्या आहेत. त्या बघून हॉटेलमध्ये परत आलो.


पावणेतीन वाजत आले होते. खिशातले मीठ मसाला लावलेले आवळ्याचे तुकडे चघळत गडाच्या पाय-या उतरून पार्किंगमध्ये आलो आणि बरोब्बर चार वाजता वाडा कुंभरोशीच्या प्रतापगड फाट्याच्या कमानीपाशी पोहोचलो.  अंधार पडायच्या आत दाभिळटोक घाट उतरून लहुळसे गाठायचं होतं. संध्याकाळची उन्हं कलायला लागली. प्रतापगड फाटा ते दाभिळटोक आरंभ ही पुन्हा डांबरी रस्त्यावरची सुमारे अडीच तीन किलोमीटर्सची तंगडतोड समोर दिसू लागली. पोलादपूरच्या दिशेने आमची पावलं पडणार तेवढ्यात एक ट्रक आमच्यासमोर दत्त म्हणून उभा राहिला. आम्हा तिघांचीही झालेली सूचक नजरानजर ओळखून अत्यंत बेरकी दिसणा-या त्या ट्रक ड्रायव्हरला मी दाभिळटोक घाटाच्या सुरुवातीपर्यंत सोडाल का असं विचारलं. त्याने फक्त मानेनंच "आत या" अशी खूण केली. ट्रकच्या त्या दोन पावट्या चढून कुठेही न धडपडता पहिल्याच प्रयत्नात केबिनमध्ये  जाऊन बसणं याला कमालीचा सराव आणि कौशल्य असलं पाहिजे असं मला उगाचच वाटून गेलं !! आमची ती धडपड ट्रकचालकाच्या तोंडावर मिश्किल हास्य घेऊन आल्याचं स्पष्ट दिसलं. अखेर तीन बॅगा आणि त्यांचे मालक ही वरात त्या केबिनमध्ये स्थिरावल्यावर पुढच्या काही मिनिटात ट्रक चालकाने आमच्या बॉडी बॅलन्सची जी काही परीक्षा पहिली त्याला तोड नाही !! आपल्या संपूर्ण खानदानाला महाराष्ट्र राज्याने आंबेनळी घाट आंदण म्हणून दिला आहे या अविर्भावात कुठल्याही तीव्र वळणाची आणि आमच्या अडकलेल्या श्वासांची तमा न बाळगता गुटख्याचा गच्च तोबरा भरलेल्या तोंडाने ज्या निर्विकारपणे तो ट्रक चालवत होता ते बघून मायकल शूमाकरनेही लज्जेने मान खाली घातली असती !! त्यात मी दाराशी बसलेलो असल्यामुळे एका वळणावर त्याने इतका तीव्र टर्न घेतला की "यापुढे आपल्या स्मरणार्थ आंबेनळी घाट ओळखला जाईल !!" असली भावना माझ्या मनात येऊन गेली.  अखेर घाटाच्या उजवीकडे असलेल्या दाभिळ गावाच्या पाटीजवळ नेऊन त्याने ट्रक उभा केला आणि आमचे अडकलेले श्वास मोकळे झाले. पटापट बॅगांना केबिनच्या बाहेर ढकलून आम्ही रस्त्यावर उड्या मारल्या. आम्ही मानलेल्या आभाराला प्रतिसाद म्हणून त्याने तोंडातल्या गुटख्याची एक लालभडक पिंक कारंज्यासारखी पच्चकन त्या रस्त्यावर उडवली आणि पोलादपूरच्या दिशेने सुसाट निघून गेला. त्याने ज्या पाटीपाशी आम्हाला जीवनदान दिलं (!!) त्या पाटीच्या मागच्या बाजूने कोकणात म्हणजेच रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यात उतरणा-या दाभिळटोक घाटाची सुरुवात होते.समोर महाबळेश्वरची लॉडविक,एल्फिस्टन,सावित्री आणि  ऑर्थरसीट ही टोकं पश्चिमेची कोवळी उन्हं अंगावर घेत उभी होती. दाभिळटोक घाट आम्ही आता उतरायला सुरुवात केली. 

पाटीच्या मागून थेट कोकणात उतरत गेलेली दाभिळटोक घाटाची सरळसोट सोंड दिसू लागली. दिवसभरात केलेल्या तंगडतोडीच्या एकदम विरुद्ध दृश्य. दाभिळटोक हा जावळीच्या खो-यात येत नसल्याने इथे जंगल वगैरे प्रकारच नव्हता. शुष्क आणि उघडीबोडकी वाट पानगळ झालेल्या निष्पर्ण झाडांनी सजली होती. पांढरीशुभ्र  खोडं असलेल्या त्या वृक्षांच्या (ही झाडं कोणती  जाणकार फोटो बघून सांगू शकेल का ??) मधून दाभिळटोक घाटाची एकसंध पायवाट खाली उतरू लागली. दाभिळटोक घाटाच्या उजव्या बाजूला दिसणारं महाबळेश्वरच्या भव्य कड्यांचं दृश्य धडकी भरवणारं होतं. डोळ्यासमोर कांगोरी उर्फ मंगळगड,महादेवमुऱ्हा,मोहनगडाच्या आजूबाजूचा परिसर,रायरेश्वर,नाखिंदा,पाठशिला,अस्वलखिंड आणि बहिरीच्या घुमटीचा परिसर सारं लख्ख दिसत होतं. भान हरपून कितीतरी वेळ ते दृश्य बघतच बसलो !!

सुरुवातीची आडवी सरळसोट चाल संपली, वाट आता उताराला लागली आणि समोर आल्या घडीव पाय-या. निश्चितच हा प्राचीन घाटमार्ग आहे याची ती खूण होती !! खणखणीत मळलेली प्रशस्त वाट आणि त्या वाटेवर लागलेल्या या पाय-या या आंबेनळी परिसराची इतिहासाशी जी नाळ जोडली गेली आहे त्याची प्रचिती देत होत्या. संध्याकाळच्या कलत्या उन्हाबरोबर वातावरणातलं धुराड कमी झालं आणि समोरच्या नजा-यात अजूनच स्पष्टपणा आला. सावित्री नदीच्या खो-यात डोकावलो त्यावेळी कोरड्या पडलेल्या नदीपात्राच्या शेजारी वसलेलं छोटंसं लहुळसे गाव लक्ष वेधून गेलं. 

  
मंगळगडाच्या पार्श्वभूमीवर सावित्री खो-यापलीकडची करंजे आणि खोतवाडी ही गावं संध्याकाळच्या उन्हात न्हाऊन निघाली होती. करंजे गावाच्या मागे असलेल्या धारेच्या माथ्यावरून उजवीकडे म्हणजेच ऑर्थरसीटकडे सरकलेली वाट थेट सापळखिंडीत घेऊन जाते. साधारणपणे १८० अंशात विस्तीर्ण पसरलेलं असीम दृश्य पाहताना हर्षलने नकळतच एक सुंदर पोज दिली आणि हा फोटो "वन ऑफ द फेव्हरेट्स" च्या यादीत कायमचा समाविष्ट झाला !!


पायवाटेने शेवटच्या काही पाय-या उतरायला सुरुवात केली. समोरच्या दरीकडे सरळसोट चालत गेलेल्या पायवाटेकडे न जाता मुख्य वाट एकदम डावीकडे काटकोनात वळली आणि समोर दगडांवर केलेल्या बाणाच्या खुणा दिसल्या. पुढे पुढे जात राहिलो तशी दगडांच्या घडीव पाय-या बांधलेली भक्कम पायवाट दाभिळकडे उतरत गेली. पायाखाली कुरकुरणा-या शुष्क पानांच्या सोनेरी झालरीवरून पावलं पुढे पडत होती पण त्याचबरोबर गतकाळाच्या सुस्पष्ट खुणा मागे पडत होत्या.  

दाभिळटोक घाटाची पायवाट जिथून डावीकडे काटकोनात वळली तिथून बरोब्बर पस्तीसाव्या मिनिटाला आम्ही दाभीळमध्ये येऊन दाखल झालो आणि समोर साकारलं होतं ऊन सावलीचा सुरेख संगम साधणारं हे मोहक दृश्य !!दाभिळ गावाचं स्थान मात्र कल्पनेपलीकडचं आहे !! महाबळेश्वरच्या अजस्त्र कातळकड्यांनी दाभिळ आणि लहुळसे या गावांना इतक्या मायेने कुशीत घेतलं आहे की त्या ओलाव्याची अनुभूती दाभिळमध्ये पाऊल ठेवताचक्षणी अनुभवायला मिळाली. दाभिळ गावात जवळपास सगळेच दळवी आडनावाचे लोक आहेत. गावातल्या एका किराणा मालाच्या दुकानासमोर आम्ही पोहोचलो तेव्हा घड्याळाचा काटा साडेपाचवर येऊन स्थिरावला होता. दुकान मालकिणीने थंडगार पण पॅकबंद असणारं लिंबूसरबत तिघांच्याही हातात सोपवलं. आम्ही सकाळपासून केलेली चाल ऐकून तिथे अख्ख दाभिळ गाव जमा झालं. आम्हाला उगाचच ओशाळायला होत होतं !! दुकानासमोरच्या एका चौसोपी घराच्या कट्ट्यावर बॅगा आपटून सरबताचे घुटके घेत असताना उपस्थितांमधून पहिला प्रश्न आला.......

"आता मुक्काम कुठे ??
"लहुळश्यात"
"कोन हाये का वळखीचं ??"
"हो... XYZ मामांना चार दिवसांपूर्वीच फोन करून ठेवलाय. "
"ह्ये बरं केलंत. उद्या काय कार्यक्रम मग ??"
"उद्या सकाळी त्यांच्याबरोबर निघणार आणि सावित्री घाटाने जावळी. मग तिथून दरे आणि बाजारपेठेच्या वाटेने महाबळेश्वर !!"
"कुठून जानार ??" आपल्या कानांवर विश्वास न बसल्याचा सुरात प्रश्न आला. 
"सावित्री घाट. हा काय समोरचा" लहुळश्यात उतरलेल्या सावित्री घाटाच्या धारेकडे बोट दाखवत मी उत्तरलो.

माझ्या या उत्तराने अणुबॉम्ब पडावा तसं वातावरण तिथे पसरलं. इतका वेळ कौतुकानं बघणारे भाव वेड्यात काढणा-या मुद्रेत बदलल्याचा खुणा तिथल्या सुरकुतलेल्या चेहे-यावर स्पष्ट दिसून आल्या. एकमेकांकडे विचित्र नजरेने बघत त्यांनी बचावाचा पावित्रा घेतला. त्या सगळ्यांमध्ये एक अनामिक गूढ भीती,शंका आणि अनिश्चिततेचं सावट क्षणार्धात पसरलं.  
"आगं बयाबयाबयाबया....काय येडेबिडे झालात का काय तुम्ही ?? कोनी सांगितलं धटाची वाट चालू हाये म्हनून ??"
"धटाची वाट ?? "
"तीच ज्याला तुमी सावित्री घाट म्हनताय. गेल्या पंधरा वर्षात तिथे कुनीच गेलं नाहीये. तुमचा तो XYZ पन गेला नसंल. पूर्णपणे वाट मोडलीये. एकतर जनावरं फिरतायत. रानडुकरं मोक्कार. शाने असाल तर गप रावा आज रातीला अन उद्या सकाळच्या मुक्कामी एस्टीने पोलादपूरला जाऊन महाबळेश्वरला परत जावा. "

स्थानिकांच्या वापरात नसलेली एखादी वाट आपण करायची म्हणलं की हा संवाद ओघाने येतोच. ही भीती अनेकदा काळजीपोटी असते. शहरातल्या लोकांना असल्या वाटा झेपायच्या नाहीत ही भावना त्यात जास्त. पण काही वेळेस त्यात १००% तथ्य असू शकतो. ही परिस्थिती स्थानपरत्वे बदलू शकते. पण आज मात्र आम्ही ज्या मामांच्या शब्दावर इतकी तंगडतोड करून आलो होतो त्यांनाही सावित्री घाटाची वाट निश्चित माहित नसल्याची गॅरंटी त्यांच्या सोडाच पण शेजारच्याच गावातल्या लोकांना जास्त होती. मामांनी फोनवर वाटेबद्दल शंभर टक्के खात्री दिली नसली तरी गावातला कोणीतरी जाणकार माणूस सोबत घेऊन जाऊ हे आश्वासन दिल्याने आम्ही निर्धास्त होतो. पण संपूर्ण वाट मोडलेली आहे, उरल्यासुरल्या वाटेवर उभं आडवं रान आणि प्रचंड घसारा हे वर्णन आमच्यासाठी नवीनच होतं.

"मग आता ?? उगाचच आलो आम्ही इथं. फेरी फुकट गेली आमची"
"फुकट कशाला जाईल ??" आत्तापर्यंत उपस्थित नसलेला एक आवाज आला. आम्ही वळून पाहिलं तेव्हा आमचा हा परिसंवाद शांतपणे ऐकत असलेली एक मध्यमवयीन स्त्री पुढे आली. अलिबाबाच्या गुहेच्या खजिन्याची चावी घेऊन आल्याचे भाव तिच्या नजरेत होते.
"फुकट कशाला जाईल ?? धटाचा नाद सोडा तुम्ही. ही ओझी घेऊन जमायचं नाय तुमाला.त्यापेक्षा द-याच्या दांडानं जा वरती !!!"

एखाद्या अनामिक परिसाचा अचानक शोध लागावा तसे माझे डोळे चमकले. तिच्या शब्दांकडे जीवाचे कान करून  देऊ लागलो.
"कुटं ऐकली पन नसेल ही वाट तुमी. पन धटापेक्षा शंभर पटीने सोपी अन वापरातली हाये. पन फक्त स्थानिकांनाच माहितीये. दोन तासात पोचाल वाडा कुंभरोशीला. धटानं गेलात तर वाट शोधन्यात अख्खा दिवस जाईल तितुन पुढं जावळी अन मंग तुमची बाजाराची वाट का काय ते. द-याच्या दांडानं दोन तासात वाडा कुंभरोशी गाठाल. तिथून पुढं वाटलं तर जीपनं जा दरे गावात अन मंग जा महाबळेश्वरला."

अचानक एखादा अपरिचित खजिना गवसावा तसं आमचं झालं. द-याचा दांड ही वाट कोणत्याही पुस्तकात वाचल्याचं मला तरी आठवत नव्हतं. कुणी केली असेल तर ते प्रकाशित नसल्याने माहित नव्हतं. वाट अगदीच काही अपरिचित नसली तरी अगदी म्हणजे अगदीच नगण्य गिर्यारोहकांनी वाट द-याच्या दांडासाठी वाकडी केली आहे हे मात्र दाभिळ ग्रामस्थांनी छातीठोकपणे सांगितलं. कारण आंबेनळीतून दाभिळला यायला आम्ही उतरलेला दाभिळटोक घाट हा एकमेव परिचित मार्ग आहे असं समस्त ग्रामस्थांचं म्हणणं होतं. पण सावित्री घाटाचा आमचा मोह मात्र दाभिळकरांनी सपशेल हाणून पाडला. गावाकडं पाठ करून आम्ही शेतं तुडवत चालू लागलो. दाभिळ ते लहुळसे ही मळलेली पायवाट आता मागं पडू लागली. मनात शंकांचं काहूर माजलं होतं. आज दिवसभरात केलेली पायपीट ज्या सावित्री घाटाच्या ध्यासाने केली तो गेल्या पंधरा वर्षात वापरात नाही ?? काय करावं. विचारांच्या ओघातच पाय रेटत होते. एक छोटा उतार उतरून पंधरा वीस मिनिटात आम्ही लहुळश्यात पोचलो तेव्हा पश्चिमेकडे केशरी रंगांची झालेली उधळण गावावर पसरली. मामांच्या घरी पोहोचलो तेव्हा मामींनी गरम पाणी दिलं आणि गरमागरम चहाचा कप समोर आला. अंगणातल्या खाटेवर आडवं होईपर्यंत मामा आले. पहिल्या दहा मिनिटातच मामा ही काय चीज आहे हे माझ्या लक्षात आलं. कमालीचं दिलखुलास आणि सदाहरित व्यक्तिमत्व. त्या संपूर्ण परिसराचा नकाशा मामांच्या जिभेवर इकडून तिकडे नाचत होता. पहिल्या मिनिटापासूनच माझी आणि मामांची जी काय नाळ जुळली ती बघून त्यांच्या घरी जमा झालेले इतर ग्रामस्थही चकित झाले. आजूबाजूच्या परिसरातली आणि त्यांच्या रोजच्या व्यवहारातली सापळखिंड, बहिरीची घुमटी,केवनाळ,आंबेमाचीची वाट, रानकड सरी, भावलीचा दांड, निसणीची वाट अशी सहस्त्रनामावली माझ्या तोंडून ऐकल्यावर मामा आ वासून बघतच राहिले !! त्यात मी वकील आहे हे कळल्यावर  मामांनी गावातल्या केसेसचा पाढाच माझ्यासमोर वाचला. संध्याकाळी सहा ते रात्री १२ या प्रदीर्घ कालावधीत मामांबरोबर आलेल्या इतर टाळक्यांमध्ये अजून एका  Character ची भर पडली होती. करंजे गावातल्या विश्वनाथ सावंत या त्या तिशीच्या तरुणाने त्याच्या मेंदूच्या संवेदना भेदून गेलेल्या "चपटीच्या" परिणामाचा असा काही नमुना दाखवला की मी भोवळ यायचाच बाकी होतो. मामा आणि विश्वनाथ हे अत्यंत जिगरी अन जय वीरू स्टाईल प्रकरण आहे हे गावातल्या जवळजवळ प्रत्येकाने मला सांगितलं. हर्षल आणि ओंकार त्यांच्या गप्पांमध्ये रंगले होते तर माझ्याभोवती ग्रामस्थांचा वेढा पडला होता. मी मामांच्या मुलाच्याच वयाचा आहे हे कळल्यावर मामा एकदम अहो जाहो वरून अरे तुरे वरच आले !! पण उद्या सकाळच्या कार्यक्रमाचा विषय निघाला तेव्हा सावित्री घाटाचं नाव ऐकून सगळ्या ग्रामस्थांनी एकमेकांकडे चमकून पाहिलं. रात्री ९.३० च्या शांततेत आमच्या रंगलेल्या चर्चेला सावित्री घाटाच्या नावामुळे लागलेला पूर्णविरामाच सगळं काही सांगून जात होता. खरं तर सावित्री घाट इतका कठीण नसेलही. पण कित्येक वर्षात कोणी तिकडे न फिरकल्यामुळे वाट पूर्णपणे मोडलीये आणि तिथे जायची जोखीम कोणीही पत्करणार नाही हे मात्र आम्हाला कळून चुकलं. 

या सगळ्यांमध्ये एकच माणूस ठाम होता तो म्हणजे विश्वनाथ. देशी मालाचा असा काही अंमल त्याच्या मेंदूवर चढला होता की त्याने गावातल्या सगळ्यांना फाट्यावर मारून मला जावळीत पोचवायचं आश्वासन दिलं. पण मामांच्या चेहे-यावर मात्र कुठंच शाश्वती दिसत नव्हती. अखेर मी मुख्य विषयाला वाचा फोडली. 
"मामा... तुमच्यावर आहे. सावित्री घाटाने जायचंय का ?? वाट नक्की माहितीये का ??"
"ह्ये बघ बाळा. वाट पूर्णपणे मोडलीये. मी पण कित्येक वर्षात फिरकलो नाहीये. तुम्ही तरणीबांड पोरं आहात म्हणून मी फोनवर तयार तरी झालो की तुम्हाला घेऊन जातो. पण पहिल्या पावलापासून झाडं कापत जावं लागेल. ब्येक्कार चढ आणि मुरमाड आहे. नाही जमलं तर गपगुमान खाली यायचं !!"
आता मात्र माझा धीर सुटला 
"म्हणजे मामा आमच्या नशिबी सावित्री घाट नाही ??"
"नाही. कारण मला अर्ध्यापर्यंतच वाट माहित आहे !!!!"

झालं.....सगळ्यात महत्वाची गोष्ट मामांनी सगळ्यात शेवटी बॉम्बसारखी टाकून आमच्या कार्यक्रमावर पाणीच फिरवलं. भलाथोरला महाबळेश्वरचा पहाड अर्ध्यातून उतरून परत खाली यायचं म्हणजे शुद्ध वेडेपणा होता. मामा जोखीम घ्यायला तयारही होते...पण ते आमच्या आग्रहाखातर. त्यांना स्वतःला सावित्री घाटात कसलंही स्वारस्य नव्हतं. केवळ आमचा मूडऑफ होऊ नये म्हणून त्यांनी तयारी दाखवली. 

"मामा हे बघा. थोडक्यात निश्चित काहीच नाहीये. वाट मुश्किलीने मिळाली तर जावळीत पोचायला उशीर, अगदीच नाही मिळाली तर बॅक टू लहुळसे.म्हणजे गॅरंटी कसलीच नाहीये. त्यापेक्षा तुम्ही आम्हाला द-याच्या दांडाने घेऊन जा. तुम्हाला ती वाट शंभर टक्के माहित आहे ना ??"

"आरं रोजच्या वापरातली वाट. म्हणजे मी नाही वापरत पण दाभिळचे लोक वापरतात आणि मला अन विश्वनाथला शंभर टक्के माहितीये. दोन तासात वाडा कुंभरोशी गाठू आपण." मामांचा चेहेरा खुलला. आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या चेहे-यावरची भीती झटकन नाहीशी झाली आणि द-याचा दांड एकमताने पास झाला. मामांनी घरात सुग्रास जेवण अगदी आग्रहाने खाऊ घातलं. आम्ही आल्यापासूनच मामा माझ्यावर थोडे कावले होते याचं कारण म्हणजे मी त्यांना जास्त काही कष्ट नकोत म्हणून जेवणात फक्त डाळ भात द्या इतकी माफक मागणी केली होती. इतक्या आडगावात कसला मेनू मागायचा ?? पण यामुळे मामांना दर शनिवारी हक्काने मिळणारी कोंबडी त्यांच्या तडाख्यातून वाचली होती आणि त्याची नाराजी मामांनी मला जेवताना किमान वीस वेळा बोलून दाखवली !!

"काय गरज होती रे तुला साधंच जेवन बनवा म्हणून सांगायची !! आमच्या बायकोने तुम्हालाही प्रेमानं कोंबडी खायला घातली असती. तुमच्यामुळे माझापण उपास झाला !!" 
मला काही केल्या हसू आवरत नव्हतं. मामी मात्र त्यांचे कष्ट वाचले म्हणून मला मनोमन धन्यवाद देत होत्या !!    

जेवणानंतर मामांच्या अंगणात शेवटची मिटिंग जमली. मला तर इतकी गहन चर्चा बघून आपण एव्हरेस्टला निघालोय का काय असं वाटू लागलं !! द-याच्या दांडाच्या माझ्या आणि मामांच्या निर्णयाला व्हाईस कॅप्टन असलेल्या विश्वनाथने हिरवा कंदील दाखवला आणि पुढचा एक तास तुफान हास्यकल्लोळात घालवून मी मामांच्या ओसरीत परतलो तेव्हा हर्षल आणि ओंकारला झोपून दोन तास झाले होते !! स्लीपिंग बॅग अंगाभोवती गुंडाळताना सावित्री घाट चुकल्याचं शल्य होतं पण (किमान मी तरी) कधीही न ऐकलेला द-याचा दांड हा मार्ग बघण्याची उत्सुकता होती. डोळ्यासमोरच्या नभोमंडळात पिवळसर चंद्रप्रकाश महाबळेश्वराचे कडे उजळवत होता. पाचव्या मिनिटाला झोप लागली तेव्हा समोर उद्याचा ना पाहिलेला अनामिक मार्ग मूर्तरूप घेत होता !!


क्रमश:     

अरण्यवाटा... !! भाग दोन - अंतिम
     

जबाबदार ट्रेकर आहात ?? मग ट्रेकच्या दरम्यान या गोष्टी पाळाच 


Comments

 1. सुरेख व माहितीपूर्ण लेख. नविन कॅमेऱ्याला बाप्तिस्मा दिलास तर..! पुढील भागाची वाट पहातोय..

  ReplyDelete
 2. सुरेख व माहितीपूर्ण लेख. नविन कॅमेऱ्याला बाप्तिस्मा दिलास तर..! पुढील भागाची वाट पहातोय..

  ReplyDelete
 3. झक्कास वर्णन....!!!

  ReplyDelete
 4. अतिशय सुंदर लेख

  ReplyDelete
 5. अप्रतिम लिखाण 👍👍

  ReplyDelete
 6. मस्त वर्णन ओंकार..

  ReplyDelete
 7. छान वर्णन! फक्त एकच सुधारणा सुचवतो, ती म्हणजे अफजलखान वधाचे साल १६६९ नसुन १६५९ करावी.

  ReplyDelete
 8. जबरी रे

  तो ट्रक मधला अनुभव भन्नाट आहे. शूमाकर सुद्धा अश्या "डायवर" मंडळी कडून निश्चित प्रेरणा घेत असावा

  आणि नेहमी प्रमाणे तुझे लिखाण व वर्णन अफाट झाले आहे

  ReplyDelete
 9. सुंदर वर्णन

  लंकेच्या युद्धात जय मिळावा.. असा रामाला वर देणारी ती रामवरदायनी /\

  ReplyDelete
 10. शब्दभास्करा मस्त ब्लॉग! पुढच्या भागाची वाट पाहतोय.

  ReplyDelete
 11. हसून हसून साफ मेलो. ट्रकचा किस्सा वाचून सोफ्यावरून लोळून पडायचाच बाकी राहिलो.
  बस मधला किस्सा ऐकायला आवडेल.
  मी मिस केला ट्रेक.
  कोंबडीचे जीव वाचला बिचारीचा.

  ReplyDelete
 12. Atishay oghavtya bhashetla likhan ahe tujha onkar... Mullana ST Depotlya tent ni jamach hasayla Ala...

  ReplyDelete
 13. छान शब्दबद्ध केलं आहेस,खूप सुंदर ...

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड