अरण्यवाटा.... !! - भाग दोन : अंतिम

अरण्यवाटा....!! भाग एक

लहुळश्यातली सकाळ उजाडली तीच मुळी मामांच्या घरच्या आवाजानं. ओसरीवर सांडलेल्या आमच्या तीन देहांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून घरातली सगळी कामं व्यवस्थित चालू होती. समोरच्या भिंतीवर निष्काम कर्मयोगाची साधना करणा-या घडाळ्याकडे माझं लक्ष गेलं आणि आमची झोपच उडाली !!   सकाळी सहाला उठू म्हणून काल रात्री ११ लाच गाशा गुंडाळलेले आम्ही ७.४५ झाले तरी स्लीपिंग बॅगच्या कुशीत लोळत पडलो होतो. आमची धांदल ऐकून मामी बाहेर डोकावल्या आणि त्यांनी दुसरा बॉम्ब फोडला "ह्ये गेलेत मळ्यात झोडपणीला. येतील तासाभरात. तुम्ही आवरून घ्या मी चहा अन पोहे करते. " आली का आता पंचाईत !! पुढचा तासभर तरी मामांचं दर्शन लाभण्याचं भाग्य आमच्या नशिबी नव्हतं. पण बहुदा आमच्या मनात सुरु झालेली वेळेची गणितं आणि ओघाने होणारा उन्हाचा त्रास या दोन्ही गोष्टी मामींनी अचूक ओळखल्या आणि द-याच्या दंडाच्या संपूर्ण वाटेवर घनदाट जंगल आहे हे सांगून आमचे जीव चहाच्या कपात पाडले !! हर्षलने परममित्राचं परमकर्तव्य पार पाडत शेजारच्या दुकानातून आणलेल्या बिस्किटांच्या पुड्याचे आम्ही तिघं आणि मामांचा कुत्रा असे चार सामान भाग झाले आणि आम्ही सॅक आवरायला सुरुवात केली. पुढच्या पंधरा मिनिटात मामांचा हसतमुख चेहेरा आणि एकदम ताजातवाना आवाज कानावर पडला.
"हा आलात का. दहा मिनिटं बसा. मी चहा घेतो आणि निघू आपण. दोन तासात वाडा कुंभरोशीला पोचवतो तुम्हाला !!" मामांनी हा निर्वाळा देईपर्यंत कालचं कारंजे गावाचं विमान अर्थात विश्वनाथ प्रकट झाला आणि आमची घालमेल सुरु झाली. काल रात्रीचे त्याचे पराक्रम ऐकून आमच्या नशिबी काय वाढून ठेवलय अशी शंका आम्हालाच काय सगळ्या जगाला आली होती.  मामींनी पोह्यांचा आखलेला बेत मामा आणि विश्वनाथ यांनी एकमताने हाणून पडला आणि जवळपास पाव किलो अंडा भुर्जी आणि सात - आठ तांदळाच्या भाक-यांची ऑर्डर सोडून मामा अंघोळीला पळाले. 

कोवळी उन्हं आता प्रखर या प्रकारात मोडायला सुरुवात झाली. मामांच्या घरचं प्रेमळ आदरातिथ्य काळजात घर करून गेलं. लहुळश्यातून आम्ही आता बाहेर पडलो. (ग्रामस्थांच्या मते) पूर्णपणे मोडलेल्या आणि रानडुकरांचा मोक्कार वावर असलेल्या सावित्री घाटाचा नाद सोडून आम्ही आम्ही द-याच्या दंडाने निघालोय हे कळल्यावर लहुळसे - पोलादपूर या एसटीसाठी लहुळश्यात पोचलेल्या दाभिळ ग्रामस्थांच्या चेहे-यावर एका अनामिक विजयाचे भाव स्पष्ट दिसून आले !!  गावातली खुरटी शेतं मागे पडू लागली, उजवीकडे कालचा दाभिळटोक घाट आणि डावीकडे मागे अर्थात साधारण पूर्वेकडे महाबळेश्वरचा एल्फिस्टन पॉईंट नजरेत भरला. समोर आंबेनळी घाटाचा भला थोरला पहाड अंगावर आला. समोर पसरलेल्या आणि घाटमाथ्यावर सरासर वर चढणा-या एका डोंगरधारेकडे मामांनी बोट दाखवून सांगितलं..."हाच तो द-याचा दांड !!"


आमच्या मागोमाग डोक्यावर हे भलं थोरलं ओझं घेऊन दाभीळटोक घाटाने वर निघालेल्या या मावशींनी आमची इथ्यंभूत माहिती विचारूनच आपली मार्गक्रमणा सुरु केली.

लहुळश्याची शेतं आता एका टेपाडाच्या पल्याड गेली. छोटी चढण चढून आम्ही एका पठारावर आलो तेव्हा दाभिळहून द-याच्या दांडाकडे येणारी वाट आम्हाला मध्ये येऊन मिळाली.  आम्ही चालत असलेला मार्ग हा तिन्ही बाजूंनी महाबळेश्वराच्या आणि आंबेनळी घाटाच्या उंच डोंगरांनी वेढलेला !! क्लिष्ट डोंगररचना. पण मामांसारखा जाणकार सोबत असल्याने आम्ही अगदी निर्धास्त होतो. 


मोकळवनातली वाट विसावली ती एका कोरड्या ओढ्यापाशी. या ठिकाणाला "आंब्याचा टेप" असं म्हणतात. समोर सळसळत गेलेली वाट गर्द  रानात लुप्त झाली. मगाशी समोर दिसणा-या डोंगराच्या पायथ्याला आम्ही येऊन ठेपलो होतो. घाटवाट चालू होण्यासाठी केवळ पाचच मिनिटं उरली होती.

झाडीत पाऊल ठेवल्या क्षणापासून अंग शहरावं इतका थंडगार रानवा सुरु झाला. आतापर्यंतच्या वाटेवर कानावर पडणा-या वा-याचे गूढ ध्वनी थांबले आणि सुरु झाली एक किर्र्र्र शांतता !! पायाखाली कराकरा वाजणा-या पाचोळ्याचा आवाज तेवढा त्या शांततेला भेदून जात होता. बाकी सारं रान अगदी चिडीचूप होतं. आंब्याच्या टेपानंतर काही वेळाने आम्ही थांबलो. द-याच्या दांडाची सुरुवात आता झाली होती.
"मामा पुढचा मार्ग कसा आहे हो ??"
"ह्ये काय एकदम सोपा. ह्ये असंअसं चढत गेलं की दोन तासात वाडा कुंभरोशी" इंग्रजी Z सारखे हातवारे करत मामांनी उत्तर दिलं. काही म्हणा, पण मामांची काटक शरीरयष्टी बघता त्यांना महाबळेश्वर सारख्या आडदांड डोंगररांगेच्या वाटांची कसून सवय झाली असल्याची खात्री मला पहिल्या दहा मिनिटातच पटली.  सावित्री घाट सोडला तर मामा कोणत्याही घाटवाटेला "अत्यंत सोपी" याच श्रेणीत ढकलून मोकळे होत होते. द-याच्या दांडाची चढाई अगदीच अंगावर किंवा खड्या उंचीची नसली तरी एकापुढे एक शिस्तीत मांडलेल्या नागमोडी वळणांमुळे  काही वेळानंतर कंटाळवाणी वाटू शकते. पण वाटेवरचं जंगल मात्र सारं काही विसरायला लावणारं !! कधीतरी स्वतःत गुंतण्यापेक्षा या रानाच्या अंतरंगात डोकावून बघावं....एक जगावेगळं सुख पुढ्यात उभं राहतं !!

घाटवाटेची सुरुवात झाल्यापासून हर्षल आणि विश्वनाथ सगळ्यात पुढे आणि मी,मामा आणि ओंकार पिछाडीला हा क्रम शेवटपर्यंत टिकला. हर्षल विश्वनाथच्या बरोबरीने आणि त्याच्याच वेगात चालत असलेला बघून मामांनी तोंडात बोट घातलं. काल पूर्णपणे "आभाळात" गेलेला विश्वनाथ आज मात्र वर्गात वात्रटपणा केल्यामुळे शिक्षकांनी चोप चोप चोपल्यावर एखादं पोर जसं गपगुमान कोपरा धरून बसतं अगदी तसा अवाक्षरही न बोलता स्वतःच्याच नादात चालत होता. मात्र कुंभरोशीला पोहोचेपर्यंत किमान पाच ते सहा वेळा हर्षलच्या निर्विवाद आणि जबरदस्त फिटनेसचं कौतुक मामांनी अगदी तोंडभरून केलं !! 

द-याच्या दांडाच्या या वाटेवर आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट दिसून अली ती म्हणजे या वाटेवर अनेक ठिकाणी दगडांवर मार्किंग केलं आहे.

बंबाळ्या रानातून वाट वर वर सरकत होती. विश्वनाथला एक उत्तम कंपनी मिळाली होती आणि त्या दोघांनाही आपल्या मागे तीन जीव या रानातून चालत आहेत याची कसलीही चिंता नव्हती !! सुसाट वेगाने दोघ पुढे जायचे आणि मागून मामांची हाक आली की आहे त्या जागी निवांत विश्रांती घ्यायचे. तंबाखूचा बार तोंडात धरत हसतमुख चेहे-याने मामा इतक्या सराईतपणे वाट काढत होते की ज्याला तोड नाही.


वाट आता थोडक्या मोकळवनात डोकावली. डोईवरचा रानवा जरा बाजूला झाला आणि समोर दिसला उभाच्या उभा "काठीचा दांड". 


तास - दीड तासाच्या चढाईची एकाग्रता भंग पावली ती कानावर पडलेल्या गाडीच्या हॉर्नने !! डोक्यावरच्या गार्ड झाडातून काहीही दिसायला तयार नव्हतं. पण घरघरणा-या इंजिनांचा आवाज आणि ट्रकसारखं एखादं धूड रस्त्यावरून जाताना होणारी धडधड स्पष्ट जाणवू लागली. घाटमाथा जवळ आल्याची ही खूण होती. मामांनी उजवीकडे तिरप्या रेषेत अंगुलीनिर्देश केला आणि डोंगराच्या घळीतून एक लाल आकृती पश्चिमेकडे सरकताना दिसली !! आंबेनळी घाट आता दृष्टीक्षेपात आला. इतका की येणारी जाणारी वाहनं आम्हाला सहज ओळखता येत होती. दहा साडेदहाच्या सुमारास मामांच्याच पोटात भडका उडाल्याने त्यांनी सगळ्या टोळीला एकत्र केलं आणि ही चढण संपल्यावर नाश्ता करू असा हुकूम सोडला.

वाट तशी एकसंध नव्हतीच. मधूनच झाडो-यात आणि पाऊलवाटेवर झालर पांघरलेल्या पानांच्या भाऊगर्दीत दिसेनाशी होत होती. पण दिशा अचूकपणे माहित असल्याने कुठेही न चुकता हे मार्गक्रमण यथोचित सुरु होतं. वारा पूर्णपणे थांबला होता. पण आम्हाला निघायला जरी तासभर उशीर झालेला असला तरी गर्द रानामुळे उन्हाचा कसलाही त्रास होत नव्हता. वाकलेल्या वेली पायात अडकायच्या. त्यांना झुगारून पुढेही जाता यायचं नाही. त्यांची पकड इतकी चिवट की चुकून जरी पुढे गेलो तर आपटलेल्या तोंडावर लाल मातीची रंगपंचमी ठरलेली !! एकूणच सुरेख असा एक मार्ग आमच्या पायतळी जात होता. 

सुमारे दोन तासांची नागमोडी प्रदीर्घ चढण संपली ती एका छोट्या झाडापाशी. याला "आवळीचा माळ" असं म्हणतात.  मामांना आता डब्यातली भुर्जी दिसू लागली होती. अखेर मामांनी मगाशी सुचवलेल्या या टप्प्यावर आम्ही विसावलो. मलबार धनेशाची सुरेख भरारी डोळ्यासमोर साकारली. त्याचं देखणं रुपडं नजरेत भरलं. डावीकडच्या आंबेनळी घाटातल्या गाड्यांचा गोंगाट थोडा मंदावला होता. डब्यातल्या भुर्जीचा यथोचित फडशा पडला. मन तृप्त झालं. पाय दुखावले आणि पाठ सुखावली.  थंडगार वा-याचे झोत महाबळेश्वराच्या बुलंद कड्यांशी सलगी करू लागले. घाटमाथा जवळ आल्याची खूण !! समोरची दरीला खेटून जाणारी अरुंद वाट दिसली आणि मामांनी निवांतपणे त्यावरून स्लीपर्स घासत चालायला सुरुवात केली. पाठीवरच्या सॅक आणि गळ्यातले जडशीळ कॅमेरे सांभाळताना आमची मात्र तारांबळ उडत होती. अत्यंत मुरमाड आणि घसरड्या मातीचा "स्क्री" प्रकारातील आडवा टप्पा हळूहळू मागे पडत होता. कॅमरा बाहेर काढण्याचीही फुरसत न मिळाल्याने त्या घसा -याच्या वाटेचे फोटो मिळाले नाहीत.   

हर्षल आणि विश्वनाथ सोबत आता ओंकारने आघाडी घेतली. मी आणि मामा मागून निवांत येत होतो. जवळच्या रानकढीपत्त्याच्या घमघमाट वातावरणात भरला होता. मामांकडे विषयांची मात्र कसलीही कमी नव्हती. स्वतः राजकारणात सक्रिय असल्याने संपूर्ण देशाच्या राज्यव्यवस्थेची जी काही लक्तरं ते काढत होते त्याला सुमार नाही. एकूणच बोरिंग वाटावा  असा प्रवास अजिबात नव्हता. आजूबाजूच्या वाटांची जमेल तशी माहिती मामा देत होते. त्यांच्या मागून जात असताना एका झाडाखाली मी बुटाची लेस बांधायला थांबलो. पुढे चाललेले मामाही थांबले. आणि इतक्यात ...............भूकंप व्हावा तसा प्रचंड आवाज आमच्या कानावर पडला. काही सेकंदात काळजाचं पाणी पाणी झालं. इतका वेळ हसतमुख असलेल्या मामांच्या चेहे-यावर क्षणार्धात भीतीचं सावट स्पष्ट  दाटून आलं. "रानडुकरं येतायेत आपल्या दिशेला" एवढंच ते पुटपुटले. प्रचंड वेगात काहीतरी खाली धडधडत येत होतं. हर्षल आणि ओंकारला मारलेल्या हाकांना काहीच उत्तर येत नव्हतं.   बुटाची लेस तशीच सोडून मी आणि मामांनी त्या दिशेला धाव घेतली आणि आमच्या समोर उजवीकडच्या टेकाडावरून मातीचा प्रचंड ढीग जमीन हादरवत दरीत कोसळत होता !! कित्येक किलो मातीचा प्रचंड धबधबा आमच्या वाटेत दत्त म्हणून उभा राहिला. हे कमी की काय म्हणून समोर पाहिलं तेव्हा हर्षल आणि विश्वनाथ त्या मातीच्या धबधब्याच्या पैलतीरी पोचले होते आणि आम्ही तिघंच या बाजूला समोर चाललेलं दृश्य पाहत होतो. कित्येक किलो माती आमच्या समोरच्या वाटेलाही दरीत घेऊन गेली. त्या शांत वातावरणात त्या कोसळण्याचा आवाज मात्र भीषण वाटू लागला. एखादी प्रचंड दरड कोसळावी तसं अखंडपणे मातीच्या ढिगाचे लोट खाली येतच होते. सुमारे दहा मिनिटांनी हा प्रकार थांबला !! आता मात्र त्या आधीच चिंचोळ्या असलेल्या पायवाटेची अवस्था अजूनच बिकट झाली. अखेर मामांनी पुढाकार घेऊन त्या घसा-यातून कशीबशी वाट काढली आणि तो टप्पा पार झाला तेव्हा डावीकडच्या पटलावर हे दृश्य साकारलं होतं !!

द-याचा दांड संपला होता...काही सुखद आणि काही अविस्मरणीय आठवणी घेऊन. शेवटच्या चढाईचा भाग असणारी गर्द झाडीभरली "वाड्याची  खिंड" आम्ही पार केली आणि अगदी शेजारून गाडी जावी इतक्या जवळून वाहनांचे आवाज आणि हॉर्न कानावर आले. मामांचा चेहरा परत खुलला. विश्वनाथने त्या झाडीतून स्वतःसाठी कसल्यातरी फांद्या तोडून घेतल्या होत्या. त्या पिशवीत कोंबत समोर दिसणा-या उघडीपीच्या जवळ आम्ही आलो आणि अचानक घनदाट जंगलातून एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करावा तसा समोर अचानक आंबेनळी घाटाचा कला कुळकुळीत रस्ता आणि वाडा कुंभरोशीची घरं अवतरली. इतक्या चटकन आम्ही गाडीरस्त्याला लागू असं वाटलं देखील नव्हतं. मामा आणि विश्वनाथ या दोघांनाही आता घराचे वेध लागले होते. डोळ्यासमोरून पोलादपूरची एक एसटी गेलेली बघून झालेला विश्वनाथचा चेहेरा मात्र बघण्यासारखा होता  !! 


अडीच तासांची भन्नाट डोंगरयात्रा संपली. दोन दिवसांच्या या दुर्गम अरण्यवाटांच्या असीम अनुभूतीची सुरेख सांगता द-याच्या दांड आमच्या खात्यात जमा करून झाली !! मामांनी त्यांच्या आणि माझ्यात झालेला घरोबा पाहून "मी पैसे घेणार नाही" हे कालच जाहीर केलं होतं. त्यामुळे आम्ही गाडीरस्त्याला लागताच मागे वळूनही न पाहता दोघंही वाडा कुंभरोशीच्या बसस्टॉपच्या दिशेने भराभरा निघाले. पण तापलेल्या उन्हाच्या काहिलीला जागून अन्नपूर्णा हॉटेलमध्ये थंडगार लिंबू सरबताचा मारा झाला आणि मगच दोघांची सुटका झाली. मी मुलांना खाऊसाठी का होईना पण काही माफक रक्कम खिशातून काढतोय हे बघून मामांच्या डोळ्यात जमा झालेले प्रेमळ भाव मात्र लपू शकले नाहीत. गेल्या दोन दिवसात मामांनी त्यांच्या अत्यंत गोड आणि निखळ स्वभावाने काळजाला हात घातला. त्या दोघांना सामावून घेऊन एक ट्रक पोलादपूरच्या दिशेने निघाला. पण आमच्या डोळ्यासमोर विश्वनाथची कालची भन्नाट बडबड  आणि मामांची साधी,काटक पण अगदी घरोबा करून जाणारी मूर्ती अजूनही तरळत होती. 

बोरिवली - महाबळेश्वर बस जशी रिकामी अली तशी त्यात फार भर न घालता आंबेनळी घाट चढू लागली. बसच्या खिडकीतून प्रतापगड - मकरंदगड पुन्हा डोकावले. जावळीचं हिरवंगार खोरं डोळ्यांना थंडावा देऊन गेलं. सुखावून जाणा-या वा-याच्या झुळूकीमुळे जेव्हा नकळत डोळे मिटले तेव्हा दोन दिवसांच्या ट्रेकचा संपूर्ण आलेख नजरेसमोर तरळत होता.   

जबाबदार ट्रेकर आहात ?? मग हे पाळाच 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भय इथले संपत नाही........

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड