Posts

Showing posts from 2019

भय इथले संपत नाही........

Image
दिवस पहिला - 
वेळ - दुपारी 4 वाजता...... 

“ए उठा रे....४ वाजलेत. किल्ला बघायला जायचंय. पुणेकर आहोत हे इथे पण दाखवलंच पाहिजे का ??”

रांगणा किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या रांगणाई देवीच्या मंदिराशेजारी पुरातत्व खात्याने नव्यानेच बांधलेल्या व्हरांड्यामधली आमची अतिनिवांत वामकुक्षी या आवाजाने खडबडून जागी झाली. बाहेरचं ऊन नुसतं म्हणायला कोवळं !! संध्याकाळचे ४ वाजले तरी त्याची धग काही कमी झालेली नव्हती. दुपारची अंगावर आलेली जेवणं डोळ्यांवर आली आणि बरोब्बर एक वाजता टाकलेली पडी चार वाजता उघडावी लागली. मनाशी झालेली जराशी चिडचिड संत्र्याच्या घासाबरोबर गिळून आम्ही बाहेर पडलो. आता सर्वात महत्वाचं काम म्हणजे गडभ्रमंती साठी आणि रात्रीच्या स्वयंपाकासाठी लागणारं पाणी भरणे. किल्ल्याच्या वाटेवरची जवळपास ५ किलोमीटर्सची पायपीट आणि दुपारच्या जेवणाच्या वेळी रिकाम्या झालेल्या आम्हा ८ जणांच्या जवळपास १२ बाटल्या किल्ल्यावर असलेल्या एकमेव तलावामध्ये भरल्या गेल्या. गडावर फिरताना जास्त वजन नको म्हणून आपल्यापाशी पुरेश्या बाटल्या घेऊन बाकीच्या तिथेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गडभटकंती सुरु झाली...अवशेष साद घालत हो…