भय इथले संपत नाही........दिवस पहिला - 
वेळ - दुपारी 4 वाजता...... 

“ए उठा रे....४ वाजलेत. किल्ला बघायला जायचंय. पुणेकर आहोत हे इथे पण दाखवलंच पाहिजे का ??”

रांगणा किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या रांगणाई देवीच्या मंदिराशेजारी पुरातत्व खात्याने नव्यानेच बांधलेल्या व्हरांड्यामधली आमची अतिनिवांत वामकुक्षी या आवाजाने खडबडून जागी झाली. बाहेरचं ऊन नुसतं म्हणायला कोवळं !! संध्याकाळचे ४ वाजले तरी त्याची धग काही कमी झालेली नव्हती. दुपारची अंगावर आलेली जेवणं डोळ्यांवर आली आणि बरोब्बर एक वाजता टाकलेली पडी चार वाजता उघडावी लागली. मनाशी झालेली जराशी चिडचिड संत्र्याच्या घासाबरोबर गिळून आम्ही बाहेर पडलो. आता सर्वात महत्वाचं काम म्हणजे गडभ्रमंती साठी आणि रात्रीच्या स्वयंपाकासाठी लागणारं पाणी भरणे. किल्ल्याच्या वाटेवरची जवळपास ५ किलोमीटर्सची पायपीट आणि दुपारच्या जेवणाच्या वेळी रिकाम्या झालेल्या आम्हा ८ जणांच्या जवळपास १२ बाटल्या किल्ल्यावर असलेल्या एकमेव तलावामध्ये भरल्या गेल्या. गडावर फिरताना जास्त वजन नको म्हणून आपल्यापाशी पुरेश्या बाटल्या घेऊन बाकीच्या तिथेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गडभटकंती सुरु झाली...अवशेष साद घालत होते....वेळ पुढे सरकत होती...उन्हं कोवळी होऊ लागली आणि.......

कोल्हापूर जिल्ह्यातला रांगणा किल्ला उर्फ प्रसिद्धगड म्हणजे ह्या जिल्ह्याची शानच. पुरातत्व खातं आणि कोल्हापूरच्या निसर्गवेध परिवाराने अत्यंतिक कष्टाने किल्ल्याचा कायापालट करायचा घेतलेला ध्यास ठायी ठायी दिसून येतो. किल्ल्याची श्रीमंती पुन्हा एकदा प्राप्त करून देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न त्याच्या पुनरुज्जीवीत होत असलेल्या प्रत्येक अवशेषांमध्ये दिसून येतात. प्रसिद्ध दुर्गअभ्यासक भगवान चिले सरांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या गडदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या पुस्तकातील तपशीलवार माहितीमुळे किल्ल्याचे अवशेष अभ्यासणं सोपं जात होतं. रांगणा किल्ल्याचा विस्तार प्रचंडच असल्याने त्याच्या काठाकाठाने किल्ल्याला प्रदक्षिणा मारावी लागते.  किल्ल्याच्या तटबंदीमध्ये कमालीच्या कौशल्याने बांधलेले पण सध्या झाडीत अक्षरश: लुप्त झालेले दरवाजे केवळ अप्रतिम !! रांगणा किल्ल्याच्या हत्तीसोंड माचीवर आम्ही पोहोचलो तेव्हा सूर्यास्ताला काही मिनिटंच बाकी होती. किल्ल्याची ही माची म्हणजे दुर्गराज राजगडच्या सुवेळा माचीची आठवण करून देणारी कलाकृती. संध्याकाळचा थंडगार वारा सुखावून जात होता. खाली पसरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्तीर्ण जंगलाचे आणि छोट्या छोट्या गाव – पाड्यांचे दृश्य म्हणजे दुग्धशर्करा योगच !! काही क्षण तिथे निवांत विसावलो...तेजोभास्काराची सोनेरी किरणं उरात सामावून घेतली आणि पुढच्या अगणित भटकंतीची उर्जा त्याच्याशी एकरूप होत जेव्हा मिळाली तेव्हाच हत्तीसोंड माचीवरून पावलं हलली !! हत्तीसोंड माची ते आम्ही मुक्काम करत असलेलं रांगणाई देवीचं मंदिर (म्हणजे मंदिरा शेजारचे व्हरांडे) हे अंतर अगदी नॉर्मल स्पीडने पण जवळपास अर्ध्या तासाचं आहे. त्यात फोटोसेशन चालूच होतं. हत्तीसोंडेवरून मंदिराकडे जाणारी पायवाट अनेक ठिकाणी झाडीत लुप्त होत असल्याने व माचीवरून मंदिर दिसत नसल्याने मंदिराची दिशा धरूनच मार्गक्रमण करावं लागत होतं. ग्रुपमध्ये सर्वात पुढे चिन्मय कीर्तने,तुषार कोठावदे व नितीन मोरे–सुतार तर मध्ये मी,विराग रोकडे,मुकुंद पाटे,तुषार पोमण व सर्वात शेवटी सदानंद शहाणे काका असा क्रम होता. गप्पांचा ओघ वाढत चालला होता. दिवसाचा प्रवास संधीप्रकाशाकडून अंधाराकडे वेगाने सुरु होता. वाटेवर असलेल्या गर्द झाडीमुळे पायाखालची वाट  अधिकच अंधारलेली वाटत होती. आत्तापर्यंतच्या भटकंतीमध्ये पाहिलेले देखणे सूर्यास्त,ट्रेकच्या आठवणी,थरारक किस्से ह्यांना उधाण आलं होतं......आणि अचानक..........

.............सर्वात पुढे चालत असेलेले नितीन आणि चिन्मय जीव खाऊन मागे पळत आले..........आणि मागून “थांबा रे...काहीतरी आहे तिथे....आई शप्पत !!” अश्या धास्तावल्या हाका ऐकायला आल्या. मधल्या फळीतील आम्ही व मागे असलेल्या शहाणे काकांना काहीही कळेपर्यंत शेजारच्या अत्यंत घनदाट झाडीमध्ये एखादा प्रचंड धोंडा पडावा तशी भयंकर हालचाल झाली.....थिजल्यासारखे आम्ही जागेवर खिळून उभे राहिलो पण कदाचित त्या क्षणी तिथून निसटणं सगळ्यात महत्वाचं होतं. भानावर येऊन आहे नाही ती ताकद पणाला लावत पावलं जेव्हा उचलली तेव्हा सरकत्या नजरांना एक काळीभोर आकृती दिसल्याचा स्पष्ट भास झाला.....

अस्वल ??? हो हो....बहुतेक अस्वलच आहे....

”अजिबात मागे राहू नका......पळा लवकर...मंदिर खूप लांब आहे अजून...मोठमोठ्याने बोला आता कारण त्याने आपल्याला पाहिलंय...पावलं उचला रे...” किंकाळ्या,हाकांची तीव्रता वाढतच होती. एक थंडगार अनामिक शिरशिरी सबंध अंगातून सर्रर्रकन सळसळली !!! त्या पूर्णपणे अंधारलेल्या वाटेवर रांगणाई देवीचं मंदिर कित्येक किलोमीटर दूर भासत होतं. भराभर पावलं उचलूनही मंदिर काही येईना. कोणीतरी वेगाने आपला पाठलाग करतंय अशी भावना स्पष्ट जाणवू लागली. नेहमीपेक्षा अत्यंत वेगाने जवळपास पळतच सुटल्याने छातीचे ठोके अशक्य धडधडत होते. थंडगार वाऱ्याचे झोत आता बोचरे वाटू लागले. कधी एकदा मंदिर येतंय असं झालेलं असतानाच सर्वात पुढे असलेल्या मुकुंदचा आवाज त्या किर्रर्रर्र अंधा-या वातावरणात घुमला.........“मंदिर आलं रे....!!!!”.

वेळ - रात्री 9 वाजता.....

आकाशातलं चांदणं आता बहरलं होतं. गच्च आभाळात अगणित तारे आणि तारकासमूहांनी फेर धरला होता. भारावून टाकणारी गूढ पण मुग्ध शांतता आणि हलक्या थंडीला जास्त अंगावर येऊ न देणारी चुलीची धग....दोन दिवसांच्या निवांत ट्रेकचं हेच तर खरं गुपित आहे. त्या वातावरणाला एक सुरेल झालर होती ती हरिप्रसादांच्या स्वर्गीय पुरिया कल्याणची !! कधीच सरू नयेत असे क्षण....हेच जगायला तर सह्याद्रीत फिरायचं !! रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी आता सुरु झाली. चुलीवरच्या सूप आणि खिचडीसाठी लागणा-या पाण्याची व्यवस्था आम्ही किल्ला फिरायला जाण्याआधीच केली होती. ते फक्त त्या तलावापासून आणायचं होतं. मी आणि नितीन मोरे दोन रिकाम्या सॅक  घेऊन तलावाकडे निघालो. मंदिर ते तलावाचं अंतर दहा मिनिटांचं. मगाचच्या प्रसंगाची भीती दोघांच्याही मनातून अद्यापही सरली नव्हती. तलावाकडे जाणारा उतार उतरून आम्ही पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या जागी आलो आणि नितीनने मोठ्ठा बॉम्ब फोडला........

“अरे इथे ठेवलेल्या बाटल्या कुठे आहेत ?? सगळ्या बाटल्या गायब झाल्या आहेत....एकही बाटली इथे नाहीये !!!”.

मला आता वेड लागायची पाळी आली होती !!!!

“अरे चुकीच्या ठिकाणी बघतोयेस तू,...शेजारी बघ बरं.” 
“अरे मला माहितीये ना. ह्या झाडाखाली बाटल्या ठेवून त्यावर पानं टाकून ठेवली होती. नाहीयेत इथे कुठे !!”  

आम्ही त्या तलावाचा जिथे शक्य होता तो सगळा भाग धुंडाळला पण बाटल्यांचा काही पत्ता नव्हता. जाताना इथे होत्या तर आता गेल्या कुठे मग ?? आम्ही तसेच हात हलवत मंदिरापाशी परतलो आणि आता ही बातमी ऐकून हादरायची पाळी गप्पांमध्ये आणि हास्यकल्लोळामध्ये बुडून गेलेल्या बाकीच्या मंडळाची होती.काही वेळासाठी एक विचित्र शांतता त्या व्हरांड्यात पसरली.शेवटी नाईलाजाने आपापल्या सॅकमध्ये ठेवलेल्या एक एक रिझर्व्ह बाटल्या बाहेर आल्या आणि त्यावर स्वयंपाक करायचं ठरलं. पण त्या संपल्या की पुन्हा भरायला जायची नौबत ठरलेलीच होती. अशक्य चिडचिड....पण उपाय नव्हता. हे सगळं कमी की काय म्हणून विरागने एक अजून मोठ्ठा बॉम्ब टाकला.......

“माझी नवी कोरी १२०० रुपयांची वॉकिंग स्टिक मिळत नाहीये. मी आपण किल्ला फिरायला जाताना इथेच ठेवली होती.”
“अरे बघ ना असेल इथेच...आज तसंही आपण सोडून किल्ल्यावर कोणीच नाहीये. “वॉकिंग” स्टिक आहे म्हणून ती काय स्वत:हून थोडीच चालत कुठे जाणारे !!” (इथे थोडा हशा पिकला).
“नाहीये कुठेही. मी सगळीकडे शोधलं !!”

झालं आता !! काय बोलावं कळेना. “जाउदे” हा एकच शब्द उच्चारून सगळे आपापल्या कामाला लागले आणि भन्नाट सूप आणि अतिचविष्ट खिचडी ह्यावर रात्र सरू लागली. पण मनात दडून बसलेली भीती उगाचच डोकावू लागली कारण मध्यरात्री संपूर्ण किल्ल्यावर सामसूम असताना आमच्या व्हरांड्याबाहेरून कोणीतरी येरझा-या घालतंय असे भास उगाचच होऊ लागले. उठून पाहिलं तर अर्थातच कोणीही नव्हतं. शेवटी स्लीपिंग बॅग डोक्यापर्यंत ओढून झोपलो कारण उद्या अजून बरंच काही ताटात वाढून ठेवलं होतं !!!

दिवस दुसरा 
वेळ - सकाळी 9 वाजता..... 

सकाळी उरलेली गडफेरी संपवून आम्ही आता पुन्हा गाड्या जिथे लावल्या होत्या तिथे निघालो. सकाळचा पहिला धक्का म्हणजे काल हरवलेली सकाळी विरागची नवीकोरी वॉकिंग स्टिक अचानक अवतीर्ण झाली कारण किल्ल्यावर काम करत असलेल्या परप्रांतीय मजुरांपैकी दोन तीन कुटुंबांमध्ये आम्ही आमचा उरलेला शिधा,बिस्किटांचे आणि मॅगीचे मोट्ठे पुडे वाटल्यावर त्यातल्या एकानेच साक्षात्कार किंवा पश्चात्ताप होऊन त्यानेच काल वॉकिंग स्टीक मंदिरातून घेतल्याची कबुली दिली !! “मिळाली ना....बास झालं.” असं म्हणून आता सकारात्मक नोट वर परतीचा प्रवास सुरु झाला. रांगण्याची अतुल्य श्रीमंती आणि देखणं गडपण मात्र मनावर कायमचं गारुड करून गेलंय !! येताना भटवाडीला कळशीभर थंडगार ताक रिचवलं आणि कोल्हापूरला तांबडा पांढ-याचा मनसोक्त फडशा पाडत परतीचा प्रवास सुरु झाला. किशोरची गाणी, नवीन गाण्यांची काढली जाणारी मापं,खेचाखेची,क-हाडचं संयम बघणारं ट्रॅफिक वगैरे सोपस्कार झाले....विरागची कार आणि आमची इनोव्हा अश्या दोन्ही गाड्या चहासाठी संध्याकाळी ६ च्या सुमारास खंबाटकी घाटाच्या अलीकडे आराम हॉटेलजवळ थांबल्या. शिरवळला नितीन मोरेला निरोप द्यायचा म्हणून इथेच गळाभेट झाली. आमची इनोव्हा तिथून निघाली. त्या हॉटेलपासून फार फार तर 200 मीटरवर आम्ही जाऊन पोहोचलो. खंबाटकीचा बोगदा समोर दिसायला लागला आणि........
आमची गाडी खंबाटकीच्या बोगद्यात शिरणार तेवढ्यात फोन खणाणला.....
“अरे असाल तसे मागे या. विरागच्या गाडीची बॅटरी पूर्णपणे ब्लास्ट झाली आहे !!!”  
   
काय चाललंय राव आयुष्यात ??? त्रास,चिडचिड,मनस्ताप वगैरे भावनांचं एक छान स्नेहसंमेलन भरलं.पुण्याला पोहोचायला आता उशीर होणार होता. नशिबाने मुकुंदला जवळच एक मेकॅनिक सापडला पण त्याच्याकडे नवी बॅटरी शिल्लक नसल्याने त्याने हवी तशी बॅटरी मिळायला जवळपास दीड तास लागेल असं सांगितलं आणि पुण्याला पोचायला अजून चार तासांची निश्चिंती झाली !! आम्हाला खंबाटकी घाटाच्या त्या एकेरी वाहतुकीमुळे यु टर्न मारायला जागाच नव्हती. शेवटी आम्ही आहे तिथेच थांबून विरागच्या गाडीतील लोकांनी सर्व सूत्र हलवायचा निर्णय झाला. संध्याकाळी सहा वाजता सुरु झालेला हा प्रसंग संपायला तब्ब्ल सव्वानऊ वाजले...आणि तरी आम्ही तिथेच होतो. अखेरीस बॅटरी बदलल्याचा फोन आला आणि दोन्ही गाड्या सुस्कारे सोडून पुण्याकडे निघाल्या. नसरापूर क्रॉस झालं. गाडी मस्त वेगात पण व्यवस्थित नियंत्रणात होती. अखंड गप्पा सुरु असल्याने झोपेचा प्रश्नच नव्हता (एवढं सगळं झेलल्यावर काय झोप लागणार होती म्हणा !!). बाजूने आत्यंतिक वेगाने गाड्या निघून जात होत्या. एका ठिकाणी रस्ता मोकळा मिळाल्याने तुषारदादाने गाडीचा वेग थोडा वाढवला आणि अचानक............


जाउद्या....इतके धक्के पचवल्यानंतर हा प्रसंग सांगायचे त्राण आता उरले नाहीयेत !! पण कधीतरी नक्की वेळ काढून अश्याच एखाद्या निवांत ट्रेकला भेटा...सांगेन नक्की. हा...पण येताना देवाला एखादा नारळ वाढवून यायला मात्र विसरू नका !!


पूर्वप्रकाशित : साप्ताहिक सकाळ - दिनांक 8 एप्रिल 2019 Comments

 1. बापरे. एकदम भन्नाट अनुभव!!

  ReplyDelete
 2. मस्त वाटलं वाचताना...भटकंती अशा रोमांचक अनुभवाची शिदोरी असते...तुमच्या वाट्याला जरा जास्तच आली...👍

  ReplyDelete
 3. भय इथले, खरे तर, संपूच नये.. कारण, त्यात तर भटकंतीची खऱ्ररी मज्जा आहे, रोमांच आहे! 😊
  लवकर येऊ दे पुढचं पान!😂😂

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अरण्यवाटा.... !! - भाग एक

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड